मेरीफील्ड, रॉबर्ट ब्रूस : ( १५ जुलै १९२१ – १४ मे २००६ )
रॉबर्ट ब्रूस मेरिफील्ड यांचा जन्म अमेरिकेतील टेक्सास येथील फोर्टवर्थ शहरात झाला. मॉण्टेबेल्लो हायस्कूल येथून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. शाळेत असताना खगोलशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयांतील त्यांची गोडी वाढली. नंतर त्यांनी पासाडेना ज्युनिअर कॉलेज व पुढे लॉस एंजल्स येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात प्रवेश घेतला. त्यांनी रसायनशास्त्रात पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी वर्षभर फिलिप्स आर. पार्क रिसर्च फाऊंडेशन येथे कृत्रिम अमिनो आम्ल आहाराच्या स्थायू अवस्थेतील पेप्टाइड निर्मिती पद्धतीवर अमेरिकन केमिकल सोसायटीच्या जर्नलमध्ये शोधनिबंध प्रसिद्ध केला. प्रयोगशाळेत बहुपेप्टायडे व प्रथिन निर्मितीची पद्धत यावरून तयार करण्यात आली. कॅलिफोर्निया विद्यापीठातील जीवरसायनशास्त्राचे प्राध्यापक एम. एस. डन्न यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पदव्युत्तर अभ्यास पूर्ण केला. १९४९ साली पीएच्.डी. पूर्ण केल्यानंतर रॉबर्ट ब्रूस मेरीफील्ड हे रॉकफेलर इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च येथे पुढील संशोधनासाठी स्थलांतरित झाले. जीवरसायनशास्त्रज्ञ डॉ. डी. डब्लू. वुल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम केले. दोघांच्या सहकार्याने त्यांनी पेप्टाईड आणि डायन्यूक्लीओटाईड (दोन ॲमिनो आम्ल संयुक्त होणे) यावर काम केले.
ते १९५७ पासून १९८७ पर्यंत रॉकफेलर इन्स्टिट्यूट येथील जीवरसायनशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून काम करीत होते. १९५९ साली ब्रूस मेरीफील्ड यांनी पेप्टाईड स्थायू निर्मितीवर (Solid Phase Peptide Synthesis) संशोधन केले. ही पद्धत नंतर प्रथिने संश्लेषण क्रियेमध्ये मार्गदर्शक पद्धत ठरली. मोठ्या प्रमाणात पेप्टाईड निर्मितीचे फायदे समजल्याने त्यांनी स्वयंचलित पेप्टाईड निर्मिती मॉडेल बनवले. १९६० च्या दशकात याचा परिणाम म्हणून पेप्टाईड ब्रॅडिकायनिन, प्रोटीन ॲन्जिओटेंसिन, डेस ॲमिनो ऑक्सिटोसिन आणि इन्शुलिन अशा संप्रेरकाची त्यांच्या प्रयोगशाळेत निर्मिती झाली. रीबोनुक्लीएज ए या विकराचे पहिली निर्मिती रॉबर्ट आणि त्यांचे सहकारी बेर्ण्ड गट्ट यांच्याकडून झाली.
त्यांनी १९६९ मध्ये ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ पेप्टाईड अँड प्रोटीन रिसर्च’ या जर्नलचे संपादक म्हणून काम पाहिले. आपल्या कारकिर्दीची शेवटची काही वर्षे ते ओरेगॉन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड मेडिसीन येथे संलग्न प्राध्यापक होते. १९९३ मध्ये त्यांनी लाईफ ड्यूरिंग अ गोल्डन एज ऑफ पेप्टाईड केमिस्ट्री, द कन्सेप्ट अँड डेवल्पमेण्ट ऑफ सॉलिड फेज पेप्टाईड सिन्थेसिस नावाचे आत्मचरित्र लिहिले. १९८४ मध्ये त्यांना स्थायू मॅट्रिक्स रासायनिक संश्लेषण पद्धत विकसित करण्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले.
मेरीफिल्ड यांचे दीर्घ आजाराने क्रेस्किल, न्यू जर्सी येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- Life during a golden age of Peptide chemistry , the concept and development of solid phase peptide synthesis, Wiley VCH (15 November 1993)
- https://www.thefamouspeople.com/profiles/robert-bruce-merrifield-php
समीक्षक : मोहन मद्वाण्णा