मॉन्टेग्निअर, ल्युक : ( १८ ऑगस्ट १९३२ )

ल्युक मॉन्टेग्रीअर यांचा जन्म छाब्रिस (Chabris) गावात झाला. त्यांचे वडील अँटोनी हे मध्य फ्रान्समधील पठारे आणि जुन्या ज्वालामुखीच्या प्रदेशात राहत. त्यामुळे त्यांना त्यांचे मॉन्टीग्नीअर म्हणजे डोंगरावर राहणारी माणसे हे आडनाव प्राप्त झाले.

त्यांच्या आजोबांना पोटाचा कर्करोग झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यातूनच त्यांनी पुढे वैद्यकीय शिक्षण घेऊन कॅन्सरवर संशोधन करायचे ठरवले. शालेय जीवनात त्यांना विज्ञान विषयाची आवड निर्माण झाली. फावल्या वेळात त्यांनी त्यांच्या वडलांना इलेक्ट्रीकल बॅटरी व कॅमेऱ्यावर काम करताना पाहिले. त्यांनी त्यांच्या राहत्या घराच्या तळघरात प्रयोगशाळा स्थापन करून रसायनशास्त्राचे प्रयोग सुरू केले. ज्यात हायड्रोजन गॅस तयार करणे, नायट्रोग्लिसरीन तयार करणे आदी गोष्टींचा समावेश होता. पुस्तक वाचनातून भौतिकशास्त्रातील घडामोडी त्यांना समजून येत, गणिताकडे त्यांचा विशेष कल नव्हता पण त्यांना जीवशास्त्रात रुची असल्यामुळे त्यांनी पुढे वैद्यकीय शाखेत शिक्षण घ्यायचे ठरवले. घरापासून जवळ असल्यामुळे ते सकाळी हॉस्पिटल तर संध्याकाळी जीवशास्त्र आणि भूशास्त्र शिकत या विषयांमध्ये त्यांनी पदवी मिळवली.

जीवशास्त्राचा अभ्यास करताना वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक पीरे गाव्हाद (Pierre Gavauder) यांच्या ते संपर्कात आले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे ल्युक हे प्रयोगशाळेत डीएनए, प्रथिने आदींचा अभ्यास करू लागले. तसेच त्यांना विषाणूंच्या अभ्यासात गोडी उत्पन्न झाली. त्याचवेळी त्यांना त्यांच्या वडलांनी सूक्ष्मदर्शक यंत्र भेट दिले. त्याचा वापर करून त्यांनी क्लोरोप्लास्ट, एल आकाराचे जीवाणू आदींचा अभ्यास केला. पुढील अभ्यासासाठी ते पॅरिस येथील पाश्चर संस्थेत दाखल झाले. तिथे त्यांनी विषाणू आणि कर्करोगाच्या अभ्यासाला सुरुवात केली.

जीवशास्त्राचा अभ्यास करताना त्यांनी तंबाखूच्या पानावर रोग पसरविणाऱ्या (Tobacco Mosaic virus) विषाणूच्या जनुकाचा म्हणजे आरएनएचा अभ्यास केला. पुढे त्यांनी फूट अँड माऊथ डिसीजेस या रोगाचा विषाणू व एन्सेफॅलोमायोकार्डीटीस (encephalomyocarditis) साठी कारणीभूत असणाऱ्या विषाणूंवर संशोधन केले.

दरम्यान ग्लासगो येथे विषाणूंवर संशोधन करणारी एक संस्था उघडण्यात आली. ज्यात त्यांनी तेथे पॉलिमा (Polima)च्या विषाणूवर संशोधन सुरू केले. त्यांच्या असे लक्षात आले की, या विषाणूंमधील डीएनएमुळे चांगल्या पेशींचे कर्करोगात रूपांतर होते. त्यांच्या संशोधनातील तळमळ पाहून पाश्चर संस्थेचे संचालक पद जॅक्युस मोनाड त्यांनी विषाणूंच्या खास संशोधन विभागाचे प्रमुख पद ल्युक मॉन्टेग्नीअर यांना दिले.

सदरील काळात रॉबर्ट गॅलो हे देखील कॅन्सरच्या विषाणूंचा शोध घेत होते. त्यात त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी IL – 2 (Interleukia-2) चा शोध लावला. ज्यामुळे कर्करोगग्रस्त पेशी व त्यासाठी कारणीभूत विषाणू यांची प्रयोगशाळेत वाढ करणे शक्य झाले. ल्युक यांनी स्तनाच्या कर्करोगास कारणीभूत असणाऱ्या विषाणूतील तत्त्वाचा शोध लावला आणि सदरील विषाणूंचे डीएनए हे श्वेतपेशींमध्ये प्रादुर्भाव करतात हे दाखवून दिले.

ल्यूक यांनी एड्स विषाणूंच्या संशोधनाला सुरुवात केली. त्यांच्या सहकारी फ्रेन्कोइज ब्रून व्हेलीनेट यांनी ल्युक यांना रोगप्रतिकारशक्तीस कारणीभूत असलेले हफ नोडमध्ये विषाणू संशोधन सुरू करायचा सल्ला दिला. या रोगावर अमेरिकेत असताना सुजलेल्या हाफ नोडस वर अभ्यास करत असलेल्या रोझेनबम यांच्याशी त्यांनी विचारविनिमय केलेला होता. हा अभ्यास करताना त्यांना रुग्णाच्या रोगकारक अवयवाचा (Biopsy) तुकडा मिळाला. या प्रयोगाअंती पेशींमधून प्राप्त झालेला विषाणू एचटीएलव्ही (HTLV) च्या विषाणूशी साधर्म्य दाखवत होता. हा वेगळा विषाणू आहे का यावर पुढे काम सुरू झाले. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक यंत्राद्वारे केलेल्या अभ्यासातून सदरील विषाणू हा मेंढरांना होणाऱ्या रोगाच्या विषाणूसारखा वाटला पण ते एचएलटीव्हीपेक्षा वेगळेच असल्याचे लक्षात आल्यावर परत संशोधन सुरू झाले. या संशोधनातून त्यांनी या विषाणूंचे नाव एलएव्ही (LAV- Lymphadenopathy Associated Virus) असे ठेवले कारण तो विषाणू सूज आलेल्या कोशिकार्बुद असलेल्या रोग्याच्या शरीरातून शोधला होता. त्याचप्रमाणे पूर्ण एड्स (Full blown AIDS) च्या शरीरातून देखील त्यांनी विषाणू शोधून काढला. ज्याचे नाव त्यांनी इम्युनो डेफिशियन्सी अँसोसिएटेड व्हायरस (Immunodeficiency associated virus) असे ठेवले. रॉबर्ट गॅलो आणि जय लेव्ही यांनी ल्युक मॉन्टेग्नीअर त्यांचे संशोधन मान्य केले. शिवाय रॉबर्ट गॅलो यांनी सदरील संशोधनाला बळकटी देण्याचे काम केले. यात त्यांनी हा विषाणू जेथून रोगास सुरुवात करतो त्या सीडी-४ या मुख्य रेसेप्टोर (receptor) घटकाचा शोध लावला.

त्यांना २० पेक्षा अधिक महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त झाले. ज्यात वैद्यकीय विज्ञानाचा २००८ सालचा नोबेल पुरस्कार फ्रांस्वा बार-सिनौसी (Francoise Barre-Sinoussi ) यांच्याबरोबर विभागून मिळाला तो, लस्कर. लुईस जेनेट, कींग फेजल आणि सच्चील पुरस्कार आहेत.

संदर्भ :

समीक्षक : रंजन गर्गे