अमोघवर्ष, पहिला : (सु. ८०८ ? – ८८० ?). राष्ट्रकूट वंशातील एक राजा. तिसरा गोविंद ह्याचा एकुलता एक मुलगा. पित्याच्या मृत्यूनंतर हा बालवयातच राजपदावर आला. त्या वेळी राजधानी मयूरखंडीहून मान्यखेट (मालखेड) ह्या म्हैसूर राज्यातील गावी हलविण्यात आली. अमोघवर्षाच्या बालपणी सर्व राज्यकारभार त्याच्या कर्क (हा गुजरातच्या शाखेचा त्या वेळी प्रमुख शासक होता) नावाच्या चुलतभावाने पाहावा, अशी व्यवस्था तिसऱ्‍या गोविंदाने केली होती. त्याप्रमाणे कर्क राज्यकारभार पाहत असे. शांततेची काही वर्षे सोडता अमोघवर्षाला आयुष्यभर अंतर्गत कारस्थानांना तोंड देत राहावे लागले.

सत्ताविस्ताराच्या दृष्टीने त्याची राजवट विशेष प्रसिद्ध नाही; तथापि सांस्कृतिक क्षेत्रात त्याने केलेली कामगिरी महत्त्वाची आहे. त्याने शास्त्रे, विद्या, साहित्य इत्यादींस उत्तेजन दिले; त्याचप्रमाणे अनेक विद्वानांना व लेखकांना तसेच विद्वान कानडी कवींना आणि जिनसेन व महावीराचार्य ह्या जैन पंडितांना त्याने राजाश्रय दिला. कविराजमार्ग नावाचा काव्यशास्त्रावरील कन्नड भाषेतील प्रसिद्ध ग्रंथ त्याने लिहिला किंवा लिहवून घेतला असावा. जिनसेन ह्या जैन पंडितामुळे अखेरच्या दिवसांत तो जैन धर्माकडे आकर्षिला झाला होता; मात्र त्याने हिंदुधर्माचा त्याग केल्याचा कुठेही उल्लेख आढळत नाही. हा वयाच्या बहात्तराव्या वर्षी मरण पावला.