अस्थिसुषिरता या आजाराचा प्रतिबंध, निदान आणि उपचार यांबाबत जनजागृती करण्यासाठी २० ऑक्टोबर हा दिवस जागतिक अस्थिसुषिरता दिवस म्हणून जगभरामध्ये साजरा करतात.

आंतरराष्ट्रीय अस्थिसुषिरता प्राधिकरण (International Osteoporosis Foundation, IOF) या संस्थेद्वारे १९९७ पासून जागतिक अस्थिसुषिरता दिवस हा कार्यक्रम राबवण्यात येतो.

युनायटेड किंग्डम येथील राष्ट्रीय अस्थिसुषिरता संस्थेतर्फे २० ऑक्टोबर १९९६ रोजी प्रथमच हा दिवस साजरा करण्यात आला. यूरोपीयन कमिशनने या कार्यक्रमाला दुजोरा दिला. १९९८-९९ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने या उपक्रमाचे सहप्रायोजक म्हणून पद भूषवले. १९९९ पासून या दिवसाची रूपरेखेवर आधारित कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येऊ लागले.

अस्थिसुषिरता या आजारामध्ये कॅल्शियम व जीवनसत्त्व ड यांची कमतरता तसेच हॉर्मोन असंतुलन या प्रमुख कारणांमुळे हाडे ठिसूळ होतात. बैठी जीवनशैली (Sedentary lifestyle), मधुमेह, पचनसंस्थेसंबंधित विकार, धूम्रपान, मद्यपान या कारणांमुळे अस्थिसुषिरता या आजाराला बळी पडण्याची शक्यता वाढते. संतुलित आहार आणि शारीरिक व्यायामातील सातत्य यांद्वारे आपण हाडांचे आरोग्य राखू शकतो. जागतिक अस्थिसुषिरता दिवसाच्या निमित्ताने अस्थिसुषिरता या आजाराबाबत माहितीपर कार्यक्रम केले जातात. यासाठी दूरदर्शन, आकाशवाणी, वर्तमानपत्रे अशा विविध प्रसारमाध्यमांचा वापर केला जातो. विविध व्यायामप्रकार आणि अस्थिआरोग्‍य तपासणी (Bone tests) शिबिरांचे आयोजन केले जाते.

जागतिक अस्थिसुषिरता दिवसानिमित्त आखलेल्या काही रूपरेखा (Theme) पुढीलप्रमाणे : अस्थिसुषिरता : प्राथमिक निदान (१९९९); पुरुषांमधील अस्थिसुषिरता (२००४); पहिल्या अस्थिभंगाचा प्रतिबंध (२००२); अस्थिसुषिरता : पोषण (२००६); अस्थिसुषिरता : धोरणात्मक बदलांचे समर्थन (२००८-०९) प्रतिबंधात्मक त्रिसूत्री : कॅल्शियम, जीवनसत्त्व ड आणि व्यायाम (२०११); हीच अस्थिसुषिरता (२०१९).

पहा : अस्थिसुषिरता.

संदर्भ :