मानसिक स्वास्थ्याबद्दल जनजागृती करण्यासाठी  १० ऑक्टोबर हा दिवस जगभरामध्ये जागतिक मानसिक स्वास्थ्य दिवस म्हणून साजरा करतात. सामाजिक स्तर उंचावण्याकरिता मानसिक स्वास्थ्य आवश्यक असते.

मानसिक स्वास्थ्य जागतिक परिषद (World Federation for Mental Health, WFMH) या संस्थेद्वारे ही संकल्पना राबवण्यात आली. मानसिक स्वास्थ्य जागतिक परिषदेचे उपसचिव (Deputy Secretary General) रिचर्ड हंटर (Richard Hunter) यांना ही संकल्पना प्रथम सुचली. १९९२ मध्ये हा दिवस प्रथम साजरा करण्यात आला. १९९४ मध्ये संस्थेचे महासचिव (Secretary General) युजीन ब्रुडी (Eugene Brody) यांनी या उपक्रमाकरिता ‘जागतिक मानसिक स्वास्थ्य विकसन’ ही पहिली रूपरेखा दिली.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) मानसिक स्वास्थ्याची व्याख्या पुढीलप्रमाणे करता येते : मानसिक स्वास्थ्य म्हणजे व्यक्तीने स्वत:ची कार्यक्षमता जाणून मानसिक ताणावर मात केली पाहिजे. त्यामुळे वैयक्तिक कार्यशीलतेमध्ये वृद्धी होते आणि सामाजिक प्रगतीसाठी व्यक्ती योगदान देऊ शकते.

आर्थिक अडचणी, खाजगी संबंधांतील बेबनाव तसेच व्यावसायिक ताणतणाव ही मानसिक अस्वास्थ्याची काही महत्त्वाची कारणे आहेत. असंतुलित मानसिक स्वास्थ्य हे चिरकालीन/दीर्घकालीन आजारांचे मूलभूत कारण आहे.  तसेच चिरकालीन आजारांना कंटाळून देखील व्यक्तीचे मानसिक स्वास्थ्य बिघडते. हे जाणून मानसिक स्वास्थ्य आणि चिरकालीन शारीरिक व्याधी (Mental Health and Chronic Physical Illness) या विषयावर २०१० मध्ये रूपरेखा (Theme) आखण्यात आली. सद्यस्थितीत कोव्हिड- १९ या जगद्व्यापी साथीमुळे (Pandemic) मानवी जीवनशैली प्रभावित झाली असून पर्यायाने याचा सामाजिक जीवनावरील प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अशा परिस्थितीत मानसिक आरोग्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे २०२० मध्ये Mental health for all या रूपरेखेद्वारे ‘मानसिक स्वास्थ्य हा मानवी हक्क आहे’, असा संदेश देण्यात आला आहे.

जागतिक मानसिक स्वास्थ्य दिवसानिमित्त कुमार, तरूण आणि प्रौढ वयातील व्यक्तींमध्ये मानसिक स्वास्थ्य संतुलनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी वेळोवेळी विविध रूपरेखा आखल्या जातात. तसेच विविध सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यांपैकी काही महत्त्वपूर्ण रूपरेखा पुढीलप्रमाणे : स्त्रिया आणि मानसिक स्वास्थ्य (१९९६); मानसिक स्वास्थ्य आणि मानवी हक्क (१९९८); मानसिक आघात आणि हिंसा यांचा लहान आणि किशोरवयीन मुलांवर होणारा परिणाम (२००२); परिवर्तनीय वातावरणातील मानसिक स्वास्थ्य : संस्कृती आणि विविधता यांचा प्रभाव (२००७); मानसिक स्वास्थ्य : प्राथमिक दक्षता (२००९); छिन्नमानसता (Schizophrenia) सहजीवन (२०१४); कार्यस्थळी मानसिक स्वास्थ्य (२०१७); मानसिक स्वास्थ्य प्रोत्साहन आणि आत्महत्या प्रतिबंध (२०१९).

पहा :