वीझो शिखर. आल्प्स पर्वताच्या नैर्ऋत्य भागातील कॉतिअन पर्वतश्रेणीतील सर्वोच्च शिखर. शिखराची उंची सस. पासून ३,८४१ मी. आहे. हे शिखर इटलीमध्ये फ्रान्सच्या सीमेजवळ आहे. एकाकी असलेले हे शिखर पिरॅमिडसदृश्य आकारासाठी विशेष प्रसिद्ध आहे. त्याच्या सभोवतालचा परिसरही अतिशय रमणीय आहे. त्यामुळेच इटालियन तसेच इतरही अनेक साहित्यिकांनी आपल्या लेखन साहित्यात माँट वीझोचा उल्लेख केलेला आढळतो. प्राचीन काळी या शिखराला ‘व्हेसूलस’ असे संबोधले जाई.

नवाश्मयुगीन जेडाइट खनिजाने बनविलेली कुऱ्हाड, आयर्लंड पुरातत्त्वीय राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय.

सभोवतालच्या शिखरांपेक्षा सुमारे ५०० मीटरने याची उंची अधिक असल्याने दूरवरून हे शिखर स्पष्ट दिसते. पीडमाँट पठार, लांघे टेकड्यांचा प्रदेश, त्सेर्मात स्की प्रदेशातील थीओडलपास आणि माँ ब्लां गिरीपिंडातील शिखरांवरून माँट वीझो सहज दिसते. आकाश निरभ्र असताना मिलान येथील मिलान कॅथीड्रल (चर्च) वरूनही हे शिखर दिसते. इटलीतील पो या सर्वांत लांब नदीचा व तिच्या शीर्षप्रवाहांचा उगम माँट वीझोच्या उत्तर उतारावर होतो. अमेरिकेतील पॅरामाऊंट या प्रसिद्ध चित्रपट निर्मितीगृहाचे बोधचिन्ह घेण्याची स्फूर्ती ज्या पर्वत शिखरांवरून मिळाली, त्यांपैकी माँट वीझो एक आहे. या पर्वतशिखराच्या आसमंतातील राखीव जीवसृष्टी परिसराचा विस्तार इटली आणि फ्रान्समध्ये झालेला आहे. २९  मे २०१३ पासून या शिखराचा व त्याच्या परिसराचा समावेश जागतिक वारसास्थळांत करण्यात आला आहे.

माँट वीझोच्या २,००० ते २,४०० मी. उंचीवरील भागात नवाश्मयुगीन जेडाइट खनिजांचे साठे आहेत. या खनिजाचा उपयोग कुऱ्हाडी तयार करण्यासाठी केला जात असे. इ. स. पू. ५००० च्या दरम्यान या खनिजाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जात असावे. अशा कुऱ्हाडी पश्चिम यूरोपभर आढळत असत. डब्लिन येथील आयर्लंड पुरातत्त्वीय राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयात या प्रकारची एक कुऱ्हाड पाहायला मिळते.

३० ऑगस्ट १८६१ रोजी पहिल्यांदा हे शिखर विल्यम मॅथ्यू, फ्रेडरिक जॅकोंब, जीन-बाप्टिस्ट क्रोझ आणि मिशेल क्रोझ यांनी सर केले.

समीक्षक : वसंत चौधरी