विभुते, बापूराव विरूपाक्ष : ( ७ ऑक्टोबर १९३० मृत्यू – ३ जुलै १९६० ). सुप्रसिद्ध राष्ट्रीय शाहीर. शाहीर बापूराव विरुपाक्ष विभुते हे राष्ट्रीय शाहीर गणेश दत्तात्रय दीक्षित यांचे शिष्य होत. शाहीर विभुते केवळ गाणारे शाहीर नव्हते तर उत्तम रचनाकारही होते. देशात आणि परदेशात त्यांनी महाराष्ट्रातील राष्ट्रीय शाहीरीचा लौकिक वाढविला. त्यांचा जन्म बुधगाव (सांगली) येथे झाला. त्यांना आजोबांपासून भेदिक शाहिरीचा वारसा लाभला होता. क्रांतिशाहीर गणेश दत्तात्रय दीक्षित यांचेकडून राष्ट्रीय शाहिरीचे शिक्षण घेऊन त्यांनी १९५१ पासून स्वतंत्र कार्यक्रम सुरु केले. राष्ट्रीय शाहिरीचा वसा त्यांनी वयाच्या ७६ व्या वर्षापर्यंत अखंडपणे चालू ठेवला.
सत्तावन्न वर्षाच्या आपल्या कलाजीवनात त्यांनी विपुल लेखन केले. त्यामध्ये १०४ पोवाडे, १५ शाहिरी फटके, २५ आध्यात्मिक विषयांवरील गायले जाणारे पाळणे, ३००० लोकगीते, भजने, लावण्या, त्याचबरोबर सहा वगनाट्य (जी वगनाट्य महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध काळूबाळू यांनी सोळा वर्ष त्यांच्या फडामध्ये गाजवली) असे साहित्य त्यांनी निर्माण केले. शाहीर बापूराव विभूते यांची शाहिरी जशी राष्ट्रीय विचारांनी प्रेरित झाली होती. तशी ती संस्कारशील देखील होती. या शाहिरीवर कलगीतुऱ्याच्या सांप्रादायिक शाहिरीचा प्रभाव होता. अध्यात्मिक उद्बोधन, सामाजिक प्रबोधन आणि लोकरंजन ही शाहीर बापूराव विभुते यांच्या शाहिरीची बलस्थाने होती. पांडुरंगाचा पोवाडा, सत्यवान सावित्रीची कथा, नलदमयंतीची कथा अशा पौराणिक कथा शाहीर विभुते पोवाड्यातून सादर करीत. इतकेच नव्हे तर विविध पाळणागीते सादर करीत. त्याशिवाय छत्रपती शिवराय, तानाजी मालसुरे, बाजीप्रभू देशपांडे, झाशीची राणी, तात्या टोपे, भगतसिंग असे राष्ट्रीय पुरुषांचे पोवाडे शाहीर विभूते सादर करीत. पोवाड्यांबरोबर काही लोकगीते आणि लौकिकगीतेही शाहीर विभूते सादर करीत. ‘ वेगळं मला दिसतंयार दादा वेगळं मला दिसताया ‘ हे शाहीर बापूराव विभुते यांचे लोकगीत त्यांच्या शिष्यांनी पुढील काळात अतिशय लोकप्रिय केले. शाहीर दीक्षित यांचा गण प्रत्येक कार्यक्रमात शाहीर विभुते सादर करीत असत. शाहिरी सादर करताना ते एखादया योद्धासारखा पवित्रा घेत. छातीवर ढाल पकडावी तसा ते छातीवर डफ धरीत. दिमडी आणि डफ यांचे कौशल्यपूर्ण वादन हा शाहीर विभुते यांच्या शाहिरीचा विशेष होते.
शाहिरी क्षेत्रात काम करत असताना त्यांनी अनेक शाहीर घडवले. त्यांचे ६४ शिष्यगण सध्या महाराष्ट्रात कार्यरत आहेत. छत्रपती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे त्यांनी मानद शिक्षक म्हणून पोवाडा प्रशिक्षणाचे काम केले. १९८१ साली शाहीर बापूराव विभुते यांना जपानच्या टोकियोमध्ये आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सवात कार्यक्रम करण्याची संधी प्राप्त झाली. ज्येष्ठ नाटककार, गीतकार आणि लोककलेचे अभ्यासक अशोकजी परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली टोकियोला महाराष्ट्राचे पथक गेले होते. त्यात शाहीर बापूराव विभुते यांच्यासोबत लोकशाहीर विठ्ठल उमप, पांडुरंग घोटकर आणि प्रभा काळे पंढरपूरकर या कलावंतांचाही सहभाग होता. इंडियन नॅशनल थिएटर लोकप्रयोज्य कला संशोधन केंद्रातर्फे छबिलदास नाट्यगृह दादर, मुंबई येथे शाहीर विभुते यांचा शाहिरीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच संस्थेतर्फे पंढरपूर येथे आयोजित झालेल्या भक्तिसंगीत महोत्सवात शाहीर बापूराव विभुते यांनी पांडुरंगाचा पोवाडा स्वतः रचून सादर केला होता. मुंबई दूरदर्शन वरील अनेक कार्यक्रमांमध्ये शाहीर विभुते यांनी पोवाडे सादर केले .
भारतातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये त्यांनी शाहिरी कला सादर केली. त्यांना ७० हून अधिक पुरस्कार मिळालेले आहेत, अत्यंत महत्वाचे म्हणजे महाराष्ट्र शासनाचा पहिला शाहिरी क्षेत्रातील पुरस्कार (१९९३) आणि पुणे महानगरपालिकेचा पठ्ठे बापूराव पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. आळंदी येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनात कार्यक्रम सादर करण्याची संधी बापूराव विभुते यांना प्राप्त झाली. ३ जुलै २००७ रोजी शाहिर बापूराव विभुते यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्च्यात त्यांचे सुपुत्र शाहीर अवधूत विभुते, शाहीर आदिनाथ विभुते, नातू शाहीर प्रसाद विभुते, शाहीर शुभम विभुते, तसेच शाहीर शाहीर हिंदुराव लोंढे, शाहीर सुरेश सूर्यवंशी आणि शाहीर देवानंद माळी यांच्यासारखे अनेक शिष्य ही राष्ट्रीय शाहिरीची परंपरा पुढे नेत आहेत.
संदर्भ : क्षेत्रसंशोधन