(१७ वे शतक). एक शिवकालीन शाहीर. अगिनदास ह्या नावानेही ते ओळखला जातात. ते पुण्याचे राहणारे. त्यांच्या गुरूचे नाव नारायण असावे. अफझलखानाच्या वधावर त्यांनी  लिहिलेला पोवाडा उपलब्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केल्यानंतर झालेल्या आनंदोत्सवाच्या प्रसंगी त्यांनी हा गाऊन दाखवला आणि त्याबद्दल महाराजांनी त्यांना एक घोडा व शेरभर सोन्याचा तोडा बक्षीस दिला, असा उल्लेख या पोवाड्याच्या शेवटी आला आहे. हा पोवाडा सदतीस चौकांचा असून त्यात महाराजांच्या राज्यातील गड व महाल यांची नावे आहेत. उपलब्ध पोवाड्यांत हा सर्वांत जुना होय. त्यांच्या अन्य काही रचना उपलब्ध नाहीत.