स्वभावनांची यथायोग्य जाणीव होणे, स्वत:ची व इतरांचीही आंतरिक मन:स्थिती ओळखता येऊन भावभावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. Emotions हा शब्द Emover या मूळ लॅटीन शब्दापासून व्युत्पन्न झाला असून Emover म्हणजे to stir किंवा to move म्हणजे ‘ढवळणे’ किंवा ‘हलविणे’ असा होय. मनामध्ये कालवाकालव होणे, मन अस्थिर राहणे या बाबी भावनेमध्ये येतात. मानवी मेंदू व भावना यांच्यातील विकास हा अर्भकाच्या टप्प्यापासूनच होत असतो आणि भावनिक बुद्धिमत्तेचा स्तर मानवी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर बदलत असतो.

सर्वप्रथम चार्ल्स रॉबर्ट डार्विन या विचारवंतांनी भावनिक बुद्धिमत्तेबाबत आपले विचार मांडले आहेत. भावनिक रित्या व्यक्त होणे हे तग धरून ठेवण्यासाठी आवश्यक आहे, असे ते म्हणतात. भावनिक बुद्धिमत्ता हा संशोधनात्मक व अभ्यासात्मक दृष्टीने नवीन विषय असून त्याचे मूळ डार्विन यांच्या सिद्धांतांमध्ये दिसून येते. त्यांच्या नंतर अनेक विचारवंतांनी भावनिक बुद्धिमत्तेवर आपले विचार मांडले आहेत. त्यामध्ये पीटर सॅलोव्हे आणि जॅक मेयर यांनी भावनिक बुद्धिमत्ता या संज्ञेचा वापर केला. त्यांनी स्वतःच्या व इतरांच्या भावभावनांवर नियंत्रण व नियमन करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय, असे आपले मत व्यक्त केले. डॅनिअल गोलमन यांच्या मते, ‘स्वत:च्या भावनांवर आणि त्यांच्या अभिव्यक्तीवर नियंत्रण ठेवता येणे, आपल्या जवळील व्यक्तींसोबत सुसंवाद साधता येणे, स्वयंप्रेरणेतून व जीवनात ठरविलेल्या उद्दिष्टांनुसार कार्य करणे, वागण्यात व स्वभावात लवचिकपणा असणे या सर्व गुणात्मक मिश्रणाला भावनिक बुद्धिमत्ता म्हणतात‘. विचार व कृती यांच्या मार्गदर्शनासाठी भावनांचा उपयोग करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. एकूणच कोणत्याही व्यक्तीची भावनांचा वापर करून संवाद साधण्याची, घडलेल्या व केलेल्या सर्व घडामोडी स्मरणात ठेवण्याची, एखाद्या प्रसंगाचे वर्णन करण्याची, एखाद्या घटनेतून बोध घेण्याची, इतरांचे मत समजून घेण्याची, व्यक्तींना पारखण्याची, भावना समजून सांगण्याची आंतरिक क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय.

भावनिक बुद्धिमत्तेचे घटक : भावनिक बुद्धिमत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वा व्यक्तींमध्ये भावनिक दृष्ट्या स्थैर्य (इमोशनल सटॅबिलिटी) आणि भावनिक परिपक्वता (इमोशनल मॅच्युरिटी) हे दोन घटक अप्रत्यक्ष कार्यरत असतात. यांव्यतिरिक्त भावनिक बुद्धिमत्तेचे प्रमुख पाच घटक आहेत.

 • आत्मप्रचिती (सेल्फ अव्हेरनेस) : यामध्ये स्वतःच्या भावना जाणणे, स्वतःची अभिरुची, मर्यादा, बलस्थाने यांची जाणीव असणे, आपले निर्णय घेण्यासाठी भावनांमधील प्राधान्यतेचा वापर करणे, स्वतःच्या क्षमतांचे वास्तव व यथायोग्य मूल्यमापन करणे, ठाम आत्मविश्वास असणे इत्यादी आत्मप्रचिती या घटकात येतात. या घटकामध्ये भावनांची जाणीव किंवा ओळख, अचूक आत्मपरीक्षण आणि आत्मविश्वास हे तीन उपघटकही येतात.
 • आत्मनियमन (सेल्फ रेग्युलेशन) : यामध्ये स्वतःच्या विद्रोही, विघातक भावनांवर नियंत्रण ठेवणे, सुयोग्य पद्धतीने भावनांची हाताळणी करणे, नैराश्यातून व्यवस्थितपणे बाहेर पडणे, कोणताही निर्णय सद्सद्विवेकबुद्धिने घेणे, प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेणे इत्यादी बाबी आत्मनियमन या घटकात येतात. या घटकामध्ये आत्मनियंत्रण, विश्वासार्हता, जबाबदारीची जाणीव, अनुकूलन क्षमता आणि नवोपक्रमशीलता या पाच उपघटकांचाही अंतर्भाव होतो.
 • प्रेरणा (मोटिव्हेशन) : यामध्ये आपल्या जीवनाची ध्येये ठरविणे, ध्येयांचा प्राधान्यक्रम ठरविणे, उच्च ध्येये गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे, मनोबल टिकविणे, निराशा, निरुत्साहावर मात करणे, अनुकूल गोष्टींवर भर देणे म्हणजेच आशावादी राहणे इत्यादी बाबींचा अंर्तभाव होतो. यात संपादन उर्जा, बांधिलकी आणि पुढाकार व पर्याप्तता या तीन उपघटकांचा समावेश होतो.
 • समानानुभुती (इम्पॅथी) : यामध्ये इतरांच्या भावना, संवेदना समजून घेणे, त्याबद्दल जाणीव असणे, एखाद्या प्रसंगाकडे इतरांच्या दृष्टीने पाहता येणे किंवा त्या दृष्टीने विचार करता येणे, समाजातील विविध प्रकारच्या भिन्नतेची जाणीव होणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. या घटकात इतरांचे आकलन, सेवाभावाचा उद्गम, वैविध्याचा समतोल, इतरांचा विकास आणि राजकीय भान ही पाच उपघटक आहेत.
 • सामाजिक कौशल्ये (सोशल स्किल) : यामध्ये घटकांतर्गत निकोप व निरोगी जीवनासाठीचा सर्व कौशल्यांचा समावेष होतो. उदा., समाजातील विविध प्रसंग, घटना यांची अचूकपणे जाणीव, नातेवाईक व समाजातील अन्य व्यक्तींबरोबर सुरळीत संबंध, परिणामकारकतेने संप्रेषण, मन वळविण्याची तंत्रे, श्रवणकौशल्य, नेतृत्त्व, वादविवाद, सहकार्य, सांघिक कार्य इत्यादींचा समावेष होतो. यात प्रभाव, संघर्ष व्यवस्थापन, नेतृत्त्व, समाज परिवर्तनाचा उत्प्रेरक आणि संप्रेषण ही पाच उपघटक आहेत.

भावनिक बुद्धिमत्तेचे वरील पाचही घटक विद्यार्थांमध्ये रुजविण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करणे, विविध भावना प्रकट करणारे चित्रांचे प्रदर्शन करणे, विविध भावभावना प्रकट करणारे चित्रपट, चित्रफिती दाखविणे, भावनांचे उन्नयन होण्यासाठी विविध शिबिरे, सहली, क्षेत्रभेटीचे आयोजन करणे, नाट्यीकरण, कविता गायन-वाचन, कथाकथन इत्यादी स्पर्धांचे आयोजन करणे, वर्तमान पत्रातील बातम्यांवर चर्चा करणे व त्याबाबत विद्यार्थ्यांना त्यांचे विचार प्रकट करण्यास सांगणे, वर्ग अध्यापनात भूमिकापालन, क्रीडनपद्धती, समस्या निराकरणपद्धती, गटचर्चा अशा विविध अध्यापन पद्धतींचा समावेश करणे, विविध स्तरातील, क्षेत्रातील, वर्गातील स्त्री-पुरुषांच्या मुलाखतींचे आयोजन करणे, विद्यार्थ्यांना संदर्भ पुस्तके, पुरक पुस्तके वाचण्यास प्रेरीत करणे, वर्ग अध्यापनात विद्यार्थ्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यास पुरेशी संधी देणे इत्यादी उपक्रम राबविणे गरजेचे आहेत.

ज्या विद्यार्थ्यामध्ये वा व्यक्तीमध्ये भावनिक बुद्धिमत्ता सुदृढ असते, तो जीवनात यशस्वी व समाधानी असतो. त्यांच्यात आनंद, परिपूर्णता, स्वायतत्ता, स्वातंत्रता, स्वनियंत्रण, मैत्री, जागरुकता, प्रशंसा, मानसिक शांतता, इच्छा, समाधान अशा अनेक भावनांचा निरोगी समतोल दिसून येतो. याउलट, ज्या विद्यार्थ्याची वा व्यक्तिची भावनिक बुद्धिमत्ता कमी असते असे विद्यार्थी वा व्यक्ती एकटेपणा, भिती, दडपण, निराशा, राग, चिडचिड, आळस, अस्थिरता, रिकामेपणा, बांधिलकी, परावलंबी इत्यादी भावनांच्या मिश्रणाला त्यांना सामना करावा लागतो. त्यामुळे आनंदी व गुणवत्तायुक्त जीवन जगण्याकरिता उच्च भावनिक बुद्धिमत्ता तयार करणे गरजेचे असते. ज्याप्रमाणे विद्यार्थ्याला आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी स्वत:च्या भावनिक बुद्धिमत्तेची आवश्यकता असते; त्याचप्रमाणे एखाद्या ठिकाणी प्रभावीपणे व परिणामकारक काम करण्यासाठीही व्यक्तीला भावनिक बुद्धिमत्तेची आवश्यकता असते. एखाद्या सरकारी कार्यालयातील अथवा खाजगी उद्योगातील वरीष्ठ अधिकाऱ्याने आपल्या सहकारी कर्मचाऱ्याची गुणवत्ता तपासताना, त्याचे मूल्यमापन करताना स्वत:कडे असलेल्या भावनिक बुद्धिमत्तेचा उपयोग करावा अथवा आपल्या भावनिक बुद्धिमत्तेला महत्त्व द्यावे.

विद्यार्थ्याचे वा व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व घडविण्यात भावनिक बुद्धिमत्ता हे महत्त्वाची भूमिका बजावीत असते. विद्यार्थ्याच्या वा व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा समतोल विकास हा मोठ्या प्रमाणवर त्याच्या भावनिक बुद्धिमत्तेवर अवलंबून असते. भावनिक दृष्ट्या स्थैर्य आणि भावनिक दृष्ट्या परिपक्व असणारा विद्यार्थी वा व्यक्ती नेहमी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवूनच समाजामध्ये वावरत असतात. अशा व्यक्ती स्वयंप्रेरणेतून कार्य करत असून कोणत्याही परिस्थितीत समायोजन साधण्यात तत्पर असतात. आजच्या स्पर्धात्मक काळात अनेक समस्या, ताणतणाव येत असतात. त्या सोडविण्यासाठी ‘स्व समायोजन क्षमता’ अंगी असणे गरजेचे आहे. भावनिक बुद्धिमत्तेमुळे विद्यार्थ्यातील वा व्यक्तितील कार्य करण्याची शक्ती, उर्जा, उत्साह हे मजबूत होत असते.

संदर्भ :

 • करंदीकर, सुरेश, अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र, कोल्हापूर.
 • जगताप, ह. ना., शैक्षणिक व प्रायोगिक मानसशास्त्र, पुणे.
 • नानकर, प्रभाकर; शिरोडे, सुबोध, शैक्षणिक व प्रायोगिक मानसशास्त्र, पुणे, २००७.
 • सिंह, दलिप, भावनिक बुद्धिमत्ता, एक व्यवसायिक मार्गदर्शन, पुणे, २०१०.
 • Greenberg, H. M., Teaching with Feeling, Indiana. 1975.
 • Mangal, S. K., Psychological Foundations of Education, Ludhiyana, 1975.
 • Munn, N. L., Introduction to Psychology, Calcutta, 1967.

 

समीक्षक : बाबा नंदनपवार