तुकडोजी महाराज : (३० एप्रिल १९०९—११ ऑक्टोबर १९६८). महाराष्ट्रातील एक आधुनिक संत, कवी, समाजसुधारक व राष्ट्रीय उत्थानाची सतेज भावना असलेले महामानव. मूळ नाव माणिक बंडोजी ठाकूर. त्यांचा जन्म बंडोजी व मंजुळामाता (वंशायाती ठाकूर, ब्रह्मभाट) या दांपत्यापोटी विदर्भातील यावली शहीद (जि. अमरावती) येथे झाला. भक्तीसंपन्न असलेल्या ठाकूर घराण्याची भक्ती पंढरपूरच्या विठोबावर. बालमाणिकाला आई-वडिलांनी वरखेडचे सिद्धपुरुष परमहंस श्रीसमर्थ आडकोजी महाराज यांच्या दर्शनाला नेले असता त्यांनी माणिकाला पोटाशी धरून जवळच्या ताटातील भाकरीचा लहानसा तुकडा त्याच्या ओठाला लावला व ‘तुकड्या-तुकड्या’ असा घोष सुरू केला. पुढे जन्मनाव माणिकऐवजी ‘तुकड्यादास’ हेच नाव सर्वत्र प्रसिद्ध झाले.

लेखनकार्यात मग्न असलेले तुकडोजी महाराज

बालमाणिकाला एकांती ध्यान, लोकांती भजन, गायन या गोष्टींची आवड होती. पोहणे, अश्वारोहण, योगासने आदी नव्या कला तो निर्भयपणे आत्मसात करत होता. वरखेड येथे मराठीत चवथीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्याने शाळा सोडली. समर्थ आडकोजी महाराजांच्या सेवेत असताना बालमाणिकाचे अंतरंग गुरूकृपेने, अध्यात्मशक्तीने फुलले. तेथे तुकड्यादास पंचपदीनंतर रोज अनेक संतांची भजने-अभंग गात असत. असाच एके दिवशी आडकोजी महाराजांजवळ बसून तो तुकोबारायांचे ‘तुका म्हणे, गुण चंदनाचे अंगी’ असे गात असताना आडकोजी महाराज म्हणाले, “तुका म्हणे, तू…का म्हणे? आता ‘तुकड्या म्हणे’ म्हण!” ही सद्गुरूंची आज्ञा मानून तुकड्यादास स्वकाव्य करू लागले व त्यातूनच पुढे असंख्य अभंग, भजने त्यांनी रचली. ईश्वरभक्ती, सद्‌गुणांचा उपदेश, सामाजिक जागृती, राष्ट्र-उन्नती, सर्वधर्मसमभाव, उद्योगशीलता इ. विषय त्यांनी आपल्या कीर्तनांतून, भाषण-प्रवचनांतून प्रखरतेने मांडले. दरम्यान १५ नोव्हेंबर १९२१ रोजी, कार्तिक पौर्णिमेच्या मध्यान्हास तुकडोजी महारांचे सद्गुरू आडकोजी महाराज समाधिस्थ झाले. गुरुविरहाने तुकड्यादासांचे मन अधिकच विरक्त झाले आणि त्यांनी तपश्चर्येसाठी अरण्याची वाट धरली. सालबर्डी (जि. बैतुल), रामटेक, नारायण टेकडी, कापुर बावडी (जि. नागपूर), रामदिघी, सातबहिणी डोंगर, ताडोबा, गोंदोडा (जि. चंद्रपूर) आदी अरण्यांत हिंस्र श्वापदांच्या सानिध्यात संचार करत त्यांनी तपसाधना केली.

राष्ट्रसंतांचे सामाजिक कार्य : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे स्वकर्तृत्वाने आदर्श पायंडा घालून देणाऱ्यांमधील एक आहेत. त्यांच्या लहानपणापासूनच त्यांनी प्रेमाने संघटन करून ग्रामोन्नतीची कामे सुरू केली. स्वराज्यानंतर सुराज्याची योजना करून त्यांनी ग्रामोन्नती-समाजोन्नतीविषयक विचारांचा प्रसार करण्यासाठी भजनाचा आधार घेऊन जागृती केली. आपल्या गद्य-पद्य लेखणीतून ‘खंजिरी’ या वाद्याच्या साहाय्याने भजनाच्या माध्यमातून परंपरागत अनिष्ट रुढी, जातिधर्मपंथभेद, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, हरिजन मंदिर प्रवेशबंदी इ. समाजघातक रुढींवर कठोर प्रहार करून त्यांनी ईश्वराचे विशुद्ध स्वरूप लोकांसमोर मांडले. त्यामुळे सर्व धर्मांचे, सर्व पंथांचे लोक त्यांच्याकडे आकृष्ट झाले. गावे स्वयंपूर्ण बनून तेथील लोक उद्योगशील व निर्व्यसनी कसे होतील याचे प्रात्यक्षिक त्यांनी करून दाखविले. त्यासोबतच बलसंवर्धन, शिक्षण, आयुर्वेद आणि कृषिसंवर्धनाचे धडे दिले. त्यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळ, गुरुकुंज आश्रम, जि. अमरावती या नोंदणीकृत संस्थेच्या शाखा श्रीगुरुदेव सेवामंडळ या नावाने गावोगावी स्थापन करून आदर्श समाजरचनेस साहाय्यभूत अशी संघटना निर्माण केली. ४ एप्रिल १९३५, गुढीपाडव्याच्या रोजी गुरुकुंज आश्रम (मोझरी) येथे आश्रमाची स्थापना केली. अखिल भारतीय गुरुदेव सेवामंडळाची स्थापना त्यांच्या कारकिर्दीत महत्त्वाची ठरली. त्यामुळे त्यांच्या विचारांचा वेगाने प्रसार होण्यास मदत झाली. १९४३ साली श्रीगुरुदेव मासिक या सेवमंडळाच्या मुखपत्राची सुरुवात झाली. त्याद्वारे समाजजागृतीचे अखंड सेवाव्रत सुरू झाले.

हातात खंजेरी घेऊन भजन गात असताना तुकडोजी महाराज

बाल व युवा हे राष्ट्राचे आधारस्तंभ असतात. त्यामुळे त्यांच्या शिक्षण व बलोपासनेसाठी त्यांनी सतत प्रोत्साहन दिले. महिलोन्नती, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छतेचा प्रसार यांवर त्यांचा विशेष भर होता. ग्रामोद्योग वाढीस लागावे व सामाजिक विषमता कमी व्हावी, यांसाठीही त्यांनी अनेक परिश्रम केले. विनोबा भावेंसोबत भूदान चळवळीत सहभाग घेऊन लोकांना भूदानास प्रोत्साहित केले. ७ दिवसांत त्यांनी ११,४०० एकर जमीन मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली. १९६२ मध्ये भारत-चीन व १९६५ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धांसमयी त्यांनी सीमेवर जाऊन सैनिकांची शुश्रूषा केली व प्रेरणादायी गीते गाऊन त्यांच्यात स्फूर्ती निर्माण करण्याचे कार्य केले. स्वतः रक्तदान करून व गुरुदेव सेवमंडळाच्या हजारो शाखांच्या मदतीने रक्तदान शिबिरांचे आयोजन करून त्यांनी सैनिकांना मदत केली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जलदगतीने होणाऱ्या ग्रामविकासाच्या सुधारणावादी कार्याने प्रभावित होऊन महात्मा गांधींनी त्यांना सहवास-सत्संग मिळावा म्हणून एक महिना साग्रह सेवाग्राम आश्रमात वास्तव्यास ठेवले. गांधींजींच्या सहवासात राजेंद्र बाबू, पं. नेहरू, मौलाना आझाद, सरदार पटेल, डॉ. राधाकृष्णन, जयप्रकाश नारायण, विनोबा भावे, अब्दुल गफार खान, गुलझारीलाल नंदा इत्यादी राष्ट्रनेत्यांशी त्यांचा परिचय झाला. त्यांच्या सुधारणावादी, राष्ट्रवादी आणि मानवतावादी विचाराने ते प्रभावित झाले. भारतातील जुलमी इंग्रजी सत्तेविरुद्ध त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे.

राष्ट्रसंतांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान : १९३० सालच्या जंगल सत्याग्रही शिबिरातून त्यांनी अनेक क्रांतिकारक तयार केले. त्यामुळे ब्रिटिश सरकारद्वारा त्यांच्या बंदीचा असफल प्रयत्न झाला व त्यांच्या भजनांवर बंदीचा फर्मान काढण्यात आला. १६ ऑगस्ट १९४२ रोजी आष्टी, चिमूर, यावली, बेनोडा, चंद्रपूरसहित मध्य भारतात झालेल्या सत्याग्रहात महाराजांच्या भजनांनी क्रांतिगीतांचे स्वरूप धारण केले.

‘अब काहेको धूम मचाते हो दुखवाकर भारत सारे, आते है नाथ हमारे।

झाड झडूले शस्त्र बनेंगे, भक्त बनेगी सेना। पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, नाव लगेगी किनारे।।’

अशा गीतांनी छोडो भारत चळवळीच्या उठावाची ठिणगी पडली. परिणामी, ब्रिटिश सरकारने २७ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांना चंद्रपूर येथून पहाटे ४ वाजता अटक करून नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात २१ सप्टेंबर १९४२ पर्यंत स्थानबद्ध केले. त्यानंतर झालेल्या जनाक्रोश उद्रेकामुळे त्यांना गुपचूपपणे रायपूर येथे स्थानांतर केले गेले आणि चार महिन्यानंतर वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यांत बंदीचा फर्मान काढून त्यांची सशर्त सुटका करण्यात आली.

राष्ट्रसंतांचे सर्वधर्मप्रबोधनात्मक कार्य : सर्वधर्मीयांच्या संमेलनात, उत्सवात ते समश्रद्धेने, समप्रेमाने सहभागी झाले. दिल्लीतील जैन संमेलन, २५०० व्या बुद्ध जयंतीनिमित्त केलेले सक्रिय समायदान सप्ताहाचे आयोजन, अकोल्यातील शीख संमेलन, गया (बिहार) येथील मुस्लिमांचे जमियते उल्मा-ए-हिंद परिषद, वारकरी परिषद, वीरशैव संमेलन, पारशी महोत्सव, ख्रिस्त धर्माचा उत्सव इ. सगळीकडे त्यांनी मानवतेकडे लक्ष वेधले. आपल्या प्रभावी मार्गदर्शनाने त्यांनी वेदांत परिषद, अमृतसर; युनेस्को परिषद, दिल्ली; अनुव्रत परिषद, दिल्ली अशा परिषदा गाजविल्या. १९६४ मध्ये मुंबई येथे झालेल्या विश्व हिंदू परिषदेचे ते संस्थापकीय सदस्य होते, तसेच १९६६ मध्ये प्रयाग व १९६७ मध्ये नाशिक येथील विश्व हिंदू परिषदांच्या संमेलनांचे ते अध्यक्ष होते. सामुदायिक प्रार्थनेच्या मदतीने त्यांनी समाजात शिस्तप्रियता व बंधुभाव वाढविण्यास मदत केली. त्यांनी अखिल भारतीय साधू समाजाची स्थापना केली. त्याचे ते प्रथम अध्यक्षही होते. सर्व धर्मांतील मातब्बरांनी एकत्र येऊन समाजशांतीसाठी प्रयत्न करावेत, मानवाची संकुचित वृत्ती दूर करून विशुद्ध प्रेमभावना वाढवावी, हा त्यामागचा हेतू होता.

समाजातील मूलभूत समस्यांना जाणून त्यावर उपाय करणे, हे राष्ट्रसंतांच्या कार्याचे वैशिष्ट्य होय. त्यांचे कार्यक्षेत्र प्रामुख्याने विदर्भात असले, तरीही संपूर्ण देश भ्रमण करून त्यांनी वेळोवेळी राष्ट्रसेवा केली. त्यामुळे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसादांनी गुरुकुंज आश्रम येथे त्यांना ‘राष्ट्रसंत’ या उपाधीने गौरवले. तसेच २००५ मध्ये नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव देऊन विद्यापीठाचा नामविस्तार केला गेला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुकुंज आश्रम, मोझरी येथे महानिर्वाण पावले. आजही राष्ट्रसंतांच्या साहित्याद्वारे व त्यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाच्या कार्यकर्त्यांद्वारे त्यांचे समाजप्रबोधनाचे कार्य अखंड सुरू आहे. दरवर्षी त्यांचा पुण्यतिथी महोत्सव हा अश्विन वद्य पंचमीला ‘मानवता दिन’ म्हणून गुरुकुंज आश्रम येथे साजरा केला जातो.

राष्ट्रसंतांचे तत्त्वज्ञानविषयक विचार : तुकडोजी महाराजांनी वेगवेगळ्या विषयांवर केलेले भाष्य खालीलप्रमाणे :

  • ब्रह्म : तुकडोजी महाराजांनी ब्रह्माची व्याख्या वेदांताप्रमाणेच निराकार, निरामय, ‘नेती नेती’ अशीच केली आहे. ‘ब्रह्म सत्यम, जगत मिथ्या’ या तत्त्वावर ते विश्वास ठेवतात.
  • नाशिवंत देह : भौतिक देहाचे अस्तित्व जरी मिथ्या असले, तरी सर्वसामान्यांच्या दृष्टीने तेच सत्य आहे; कारण ते दृश्यमान आहे आणि त्याचाच आधार घेऊन मानवास वास्तविक सत्याकडे जाता येते. म्हणून भौतिक देहाचे अस्तित्व राष्ट्रसंतांनी महत्त्वपूर्ण मानले आहे.
  • संसार व परमार्थ : ‘छोडे नही घरबार पर, हो मस्त गुरू चरणार मे’ या पंक्तीतून हे स्पष्ट होते की, संसारात राहूनही परमार्थ साधता येतो; कारण आदर्श व सत्याचरणपूर्ण संसार हाच परमार्थ आहे. तुकडोजी महाराजांनी लिहिलेली ग्रामगीता (१९५५) ही अशाप्रकारच्या आदर्श जीवनासाठीची गुरूकिल्ली आहे.
  • मानवी प्रयत्न : परमतत्त्व हे जगतचालक, जगतनियंत्रक असले, तरीही मनुष्याने त्याच्या भरवशावर स्वस्थ बसणे तुकडोजी महाराजांना मान्य नाही. भविष्य बघणे, बुवाबाजी करणे, हे सारे थोतांड आहे. चांगले कर्म मनुष्याचे भविष्य बदलू शकते, हा त्यांचा विचार आहे. महाराजांनी प्रयत्नवादी कर्मच श्रेष्ठ मानले आहे. ते ग्रामगीतेत म्हणतात :

‘क्रियेवीण मार्गचि नाही। कर्तव्य नरा देवपद देई।

तुकड्या म्हणे बना निश्चयी। प्रयत्नवादी।। (अ. ३४ ओ. १०२)

  • ईश्वर : अद्वैत वेदांताप्रमाणे तुकडोजी महाराज संपूर्ण विश्वात एकच तत्त्व आहे, असे मानतात.

हर देश मे तू, हर भेष मे तू।

तेरे नाम अनेक, तू एकही है।।

यावरून तुकडोजी महाराजांचे ईश्वरासंबंधीचे विचार स्पष्ट होतात. त्यांना ईश्वरसत्ता मान्य असली, तरीही देवभोळेपणा, अंधश्रद्धा यांच्या ते तीव्र विरोधात होते.

 हे सारे गावचे धन। असो काया, वाचा, बुद्धी, प्राण।।

ऐसे असे जयाचे धोरण। तो नास्तिकही प्रिय आम्हा।।

तो तत्त्वतः नास्तिकही नोहे। जो सर्वांसी सुखविताहे।।

तो ‘देव देव’ जरी न गाये। तरी देवसेवाची त्या घडे।। (ग्रामगीता)

असे प्रखर विचार तुकडोजी महाराजांनी ईश्वरासंबंधी मांडले आहेत. एकूणच त्यांचे तत्त्वज्ञान नास्तिकतेमध्ये नक्कीच गणले जाणार नाही; परंतु निसर्गोपासना, मुल्योपासना यांना त्यांनी ईश्वरोपासनेपेक्षाही जास्त महत्त्व दिले आहे. बहुतांश वेळा ईश्वराचा उल्लेख सकारात्मक शक्ती, आत्मशांती, मनोबलवृद्धीसाठी केल्याचा दिसून येतो.

  • विश्वधर्म : इथे त्यांना कुठलाही नवा धर्म उभारण्याचे अभिप्रेत नसून, मानवाने केवळ मानव म्हणून एकमेकांकडे पाहावे, श्रद्धेच्या नावावर असूया नसावी, तर एकमेकांच्या श्रद्धेचा आदर करावा, सर्वांप्रती विशुद्ध प्रेम असावे, हे अभिप्रेत आहे. भारतीय संस्कृतीची मानवोपकारक मूल्ये जगभर पसरावीत यासाठी त्यांनी जपानमधील पंचम विश्वशांती परिषदेत १९५५ साली भारताचे प्रतिनिधित्व केले व तेथे ‘वसुधैव कुटुंबकम’ ही शिकवण दिली. त्यांच्या भजनाने तसेच ‘मानवताही धर्म मेरा, इन्सानियतही पक्ष मेरा।’ या विचाराने अनेक पाश्चात्त्य व पौर्वात्य विद्वान मोहित झाले. विश्वधर्म सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून एकमताने त्यांची निवड करण्यात आली. त्यांच्या ‘हर देश मे तू, हर भेष मे तू। तेरे नाम अनेक, तू एकही है।।’ या उद्घाटनावेळी गायलेल्या भजनास येथे मानवतागीत म्हणून गौरविण्यात आले.
  • प्रार्थना : सर्वधर्मीय समाजारोग्यासाठी सामुदायिक प्रार्थना आवश्यक आहेच, हा सत्याकडे नेणारा सर्वांत सोपा उपायही आहे. राष्ट्रसंतांनी सांगितलेली सामुदायिक प्रार्थनापद्धती अतिशय शिस्तबद्ध, सोपी आणि विशेष म्हणजे सर्वधर्मसमावेशक आहे. सामुदायिक ध्यान व सायंप्रार्थना ही भौतिक जीवनातील परमार्थाची एक पायरी आहे. आत्मशुद्धी, मनःशांतीसाठी ती अतिशय आवश्यक आहे, असे तुकडोजी महाराज मानतात. १९४३ साली विश्वशांती सप्ताहाचे आयोजन करून त्यांनी सर्वधर्मीयांसाठी आदर्श प्रार्थनाष्टक रचले. त्यात ते सर्वव्यापी श्रीगुरुदेवास मागतात,

‘है प्रार्थना गुरुदेवसे यह स्वर्गसम संसार हो।

अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो।।’

याच प्रार्थनेत ते ‘हो चिढ झुठी राह की, अन्याय की अभिमान की।’ असेही निक्षून सांगतात.

  • सर्वांगीण विकास : केवळ आध्यात्मिक उन्नतीवर भर न देता मनुष्याच्या सर्वांगीण विकासावर भर देणे, हे राष्ट्रसंतांचे वैशिष्ट्य. ग्रामगीता ही त्यासाठी लिहिलेली सर्वसमावेशक सूची. सत्याकडे जाणारा मार्ग हा भौतिकातून जातो, तो स्वर्गसम असावा, हा यामागील उद्देश.

आपल्या मतांच्या प्रचारार्थ त्यांनी विपुल ग्रंथरचना केली. ४१ अध्यायांचे, ४,६८० ओवीसंख्या असलेले ग्रामगीता हे त्यांचे प्रसिद्ध काव्य होय. त्यांनी हिंदी व मराठी अशा दोन्ही भाषांत काव्यरचना केली. त्यांचे कवित्व जातिवंत असून ते आधुनिक संतप्रवृत्तीचे निदर्शक आहे. सर्व धर्म, पंथ, जाती यांच्या पलीकडे असलेल्या ईश्वराचे स्वरूप ते आपल्या भजनांतून प्रकट करीत. ईश्वराचे ज्ञान करून घेऊन व्यक्तीविकास व समाजजागृती केली पाहिजे, असे ते म्हणत. धार्मिक एकात्मता निर्माण करण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला.

तुकडोजी महाराजांनी मराठी आणि हिंदी भाषांमधून लिहिलेली ग्रंथसंपदा खालीलप्रमाणे :

  • मराठी ग्रंथ (पद्य) : आनंदामृत (१९२७), आत्मप्रभाव (१९२७), अनुभव सागर भजनावली : भाग-१, २ (१९३४), स्फूर्ती तरंग (१९४४), माझी आत्मकथा (१९४४), आदेश रचना (१९४४), सामुदायिक प्रार्थना व निवडक भजने (१९४४), अनुभवामृत अभंगगाथा (१९४५), जीवन जागृती भजनावली (१९४६), समाज संजीवनी भजनावली (१९४९), ग्रामगीता (१९५५), राष्ट्रीय भजनावली (१९५५), क्रांतिवीणा भजनावली (१९५६), दिव्यदर्शन भजनावली (१९५८), नवजागृती भजनावली (१९५८), विवेक माधुरी भजनावली (१९५९), अरुणोदय भजनावली (१९६८), भक्तीकुंज भजनावली (१९८१), संस्कार साधना (२००८), तुकड्यादास भजनामृत सागर (२०१४).
  • मराठी ग्रंथ (गद्य) : सुविचार स्मरणी (१९४४), विश्वशांतियोग (१९५०), युगप्रभात (१९५०), गीता प्रसाद (१९६५), राष्ट्रसंतांची प्रवचने (१९६५), राष्ट्रसंतांची पत्रे (१९६५), राष्ट्रसंतांची भाषणे (१९६५), भागवत प्रवचने (१९६५), हितबोध (१९६८), श्रीगुरुदेव लेख व भाषण संग्रह.
  • हिंदी ग्रंथ (पद्य) : स्वानंदामृत भजनावली (१९२९), लहर की बरखा : भाग-१, २, ३ (१९३४), अनुभव प्रसाद भजनावली : भाग-१, २ (१९३६), अनुभव प्रकाश भजनावली (१९३९), जीवन ज्योती भजनावली (१९४६), सुधा-सिंधु भजनावली (१९५६), क्रांतिदिप (१९५६), ज्ञानदीप भजनावली (१९५९), राष्ट्रनौका भजनावली (१९६०), आत्मप्रभाव भजनावली (१९६१), सदविचार प्रवाह (१९६१), विवेक-सरिता भजनावली (१९६२), वाचावल्ली भजनावली (१९६५), भजनकुंज भजनावली (१९६५), राष्ट्रीय भजनावली (१९६८), गांधी गीतांजली (१९६८), मेरी जीवन यात्रा (१९७०), ज्ञान कुंज भजनावली (१९८२), भक्ती सुधा भजनावली (१९८२), तुकड्यादास भजनामृत सागर : भाग-१, २ (२०१४).
  • हिंदी ग्रंथ (गद्य) : मेरी जपान यात्रा (१९५६), भारत साधू समाज की सेवासाधना (१९५६), सुधा-सिंधु की लहरे, श्रीगुरुदेव लेख व भाषण संग्रह.

संदर्भ :

  • गावडे, प्र. ल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, पुणे, २०१०.
  • सावरकर, सुदाम, जीवनयोगी, खंड १ ते ११, अमरावती, १९९०.
  • http://www.gramgeeta.org

                                                                                                    समीक्षक : सुनीता इंगळे