राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी (१९०९–१९६८) रचलेले प्रसिद्ध काव्य. ग्रामविकासाच्या उत्कटतेतून ते प्रकट झाले आहे. विनोबा भावे, सोनोपंत दांडेकर, वि. स. खांडेकर, वि. भि. कोलते, ग. त्र्यं. माडखोलकर, संत गाडगेबाबा यांच्या प्रास्ताविकासह हे १९५५ मध्ये प्रकाशित झाले. साध्या, सोप्या, सरळ, ओघवत्या, रसाळ मराठीत तुकडोजी महाराजांनी भगवद्गीतेच्या तत्त्वांवर याची रचना केली. गांधीविचारांचा प्रभावही या काव्यावर असल्याने ‘भगवद्गीता + गांधीवाद = ग्रामगीता’ असे म्हटले जाते.

रचना : ग्रामगीतेत एकूण एक्केचाळीस अध्याय असून ४,६७५ ओव्या आहेत व अखेरच्या अध्यायाचा अपवाद वगळता पाच-पाच अध्यायांचे आठ ‘पंचक’ केले आहेत. या पंचकांचे विषयांनुरूप आठ विभाग केले आहेत, ते खालीलप्रमाणे :

  • सद्धर्ममंथन : देवदर्शन, धर्माध्ययन, आश्रम-धर्म, संसार-परमार्थ आणि वर्णव्यवस्था.
  • लोकवशीकरण : संसर्ग-प्रभाव, आचार-प्राबल्य, प्रचार-महिमा, सेवासामर्थ्य आणि संघटनशक्ती.
  • ग्रामनिर्माण : ग्रामरक्षण, ग्रामशुद्धी, ग्रामनिर्माणकला, ग्रामआरोग्य, गोवंशसुधार.
  • दृष्टिपरिवर्तन : वेषवैभव, गरिबी-श्रीमंती, श्रम-संपत्ती, जीवनशिक्षण, महिलोन्नती.
  • संस्कारशोधन : वैवाहिक-जीवन, अंत्यसंस्कार, सणोत्सव, यात्रा-मेळे, देव-देवळे.
  • प्रेमधर्मस्थापन : मूर्ति-उपासना, सामुदायिक प्रार्थना, प्रार्थना व विश्वधर्म, दलित-सेवा, भजन-प्रभाव.
  • देवत्वसाधन : संत-चमत्कार, संत-स्वरूप, अवतारकार्य, प्रारब्धवाद, प्रयत्न-प्रभाव.
  • आदर्श-जीवन : जीवन-कला, आत्मानुभाव, ग्राम-कुटुंब, भू-वैकुंठ, ग्रंथाध्ययन.

तुकडोजी महाराजांनी ४१ व्या अध्यायात ग्रामगीता या ग्रंथाचा महिमा वर्णिला आहे. त्यांच्या अंतरंगात घर करून राहिलेली ग्रामसंस्कृती ग्रामगीतेमध्ये शब्दरूप घेऊन समर्थपणे प्रकट झाली आहे. ग्रामगीतेतील तात्त्विक आशय खालीलप्रमाणे :

अद्वैती तत्त्वज्ञान : ‘ग्रामापासोनि पुढे वाढता| विश्वव्यापी व्हावे||’ अशा स्वरूपाचे वैश्विक दृष्टीचे अद्वैती तत्त्वज्ञान तुकडोजी महाराजांनी आपल्या ओव्यांतून सांगितले  आहे.

‘एकापासोनि अनेक व्हावे| अनेकासि एकत्वी आणावे|

हा आपला मूळ संकल्प देवे| चित्ती घातला सर्वांच्या||’

असा या काव्यरचनेचा हेतू त्यांनी सांगितला असून ‘प्रत्येक जीव देवाचा अंश’ असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला आहे. विश्वाकार होणे, विश्वकुटुंबकल्याणाची आस लागणे, विश्वात्मभावी वृत्ती राखणे त्यांना ग्रामगीतेत अभिप्रेत आहे.

‘स्थितप्रज्ञ’, संतपुरुष, अवतार : ‘सरळ विवेक, सत्कार्य-संतोष| संतापाशी पाहावा||’ असा विचार आहे. ‘संत’ कोण हेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ‘संसारी असून व्यवहारी आदर्श राहून ठेवावा. बुवा न म्हणविताही जे सद्गुरूचा अधिकार बाळगतात’, अशा स्थितप्रज्ञांस ‘चमत्कार हे क्षुद्र खेळ वाटतात’. द्वंद्वापलीकडे जाऊन ते आत्मवत् सर्वांस पाहतात व मेघवर्षावासारखा आपपरभाव न राखता सर्वांस उपदेश करतात. सर्वत्र चैतन्य ओततात. ते ज्ञान आणि कार्यस्फूर्तीचा मूर्तिमंत झरा असतात. स्वत: आघात सोसून इतरांस शांती देतात. ते जेव्हा सेवाकार्य प्रकट करतात, तेव्हा भूलोकी त्यांना अवतार मानले जाते. शांति-अवतार व क्रांति-अवतार या दोहोंचे कार्य भिन्न असते. एक सद्बोध करून देतो, तर दुसरा निर्णय घेत कार्यरत राहतो. वृत्तीवरून अथवा सद्गुण पाहून त्यांचे ‘संत’पण दिसते. त्यावरून ‘समाज-सौंदर्य’ कळते. ‘सकळ जीवांचे कल्याणकर्म’ हा संतांचे एकमेव धर्म असतो. ती भगवंताची चालती-बोलती मूर्ती असते. ‘समाजी उत्तमाची वाढ करणे’ हे त्यांचे एकमेव ध्येय असते. स्वार्थ सोडून ते विश्वस्वार्थ आपला मानतात. मात्र त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत.

‘हे आत्मविकासाचे बळ | मानवी प्रयत्नाचेचि फळ ||

देव होवोनि करील सकळ | लोकचि देव ||’

मूल्ये : दुसर्‍या अध्यायात तुकडोजी महाराजांनी पारंपरिक आश्रमव्यवस्था अधोरेखित केली आहे. देवाच्या नावे कुकर्म न करता देव म्हणजे ‘अतिमानव| मानवाचा आदर्श गौरव व स्फूर्तिस्थान’ अशी विसाव्या शतकाला साजेशी संकल्पना त्यांनी मांडली व ‘देव’च नव्हे, तर ‘धर्म’, ‘धार्मिक’ ह्या रूढ संकल्पनांची कालसुसंगत मांडणीही त्यांनी केली. त्याग, अहिंसा, सत्य, अपरिग्रह, ब्रह्मचर्य, तारतम्य, शांती, दया, क्षमा, नम्रता, प्रामाणिकपणा, सरळपणा, प्रेमळता, अभय ही मूल्ये व सद्गुण सांगून सहकार्य, नैष्ठिक ब्रह्मचर्य, धर्मनिष्ठा, स्वावलंबन, समानता, श्रमविभागणी, सेवाभाव, स्वदेशी, संयम या मूल्यांची त्यांनी जोड दिली.

महत्त्वाच्या संकल्पना : ‘जीवन-कला’ ही ग्रामगीतेतील महत्त्वाची संकल्पना आहे. ‘गावाप्रती आमचे कर्तव्य कोणते?’, ‘आम्हीच झुरून काय होईल?’, ‘गावी कोणी ऐकेना’, आमुचे आचरण जरी भले| परि लोक दुसर्‍यांनी दिपविले| न ऐकती ते||’

या सर्व व्यावहारिक समस्यांचा ऊहापोह करून त्यावर तुकडोजी महाराजांनी मार्ग सांगितला आहे. ‘सत्यचि प्रभावी सर्वांहून’ अशी त्यांनी ग्वाही दिली आहे. गावी भिन्न-भिन्न संप्रदाय असतात, त्यांचे देव, धर्म, उत्सव निराळे असतात.

‘भिन्न भिन्न झाले गट| वेगवेगळे पडले तट||

आकुंचित मते शिकविती रोगट| समाजासि||’

यासाठी अलग न राहता समुदायात निर्भय होऊन मिळोनि जावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

संघटनशक्तीने जनजागृती घडून येते, ग्रामशत्रू फिके पडतात; त्यासाठी न्यायाची चाड व गावसेवेची आवड असणार्‍यांची संघटना राखून, सज्जनांच्या सहयोगाने, थोरांच्या नेतृत्वाने, ग्रामोन्नतीचा कारभार चालवावा, असे तुकडोजी महाराज म्हणतात. ‘बाह्य वस्तूंचे भडकपण| हे आतल्या उणिवेचे प्रदर्शन’ असा उपदेशही त्यांनी केला आहे. कष्टकरी येथे ‘ग्रामनाथ’ किंवा ‘जनता-जनार्दन’ रूपात अवतरतो. गांधीजींप्रमाणे ‘सर्वोदय’ हे त्यांचे उद्दिष्ट आहे.

‘दुर्जनतेसि निवारावे सज्जन करोनि सोडावे| प्रेमबळे|’ तसेच ‘द्वेष पापाचा करावा; पाप्याचा नव्हे’, हे तुकडोजी महाराजांचे म्हणणेही गांधीविचारांशी नाते सांगणारे आहे. गांधीजींचा सत्याग्रही व ग्रामगीतेतील ‘प्रचारक’ यांच्यात साम्य आहे. ‘ग्रामराज्यचि रामराज्य|  स्वावलंबन हेचि स्वराज्य|’ असे ते सांगतात. पुढे ‘बोलिले महात्मा विश्वपूज्य’ असा गांधीजींचा उल्लेख त्यांनी केला आहे. गांधीजींप्रमाणेच ज्ञानेश्वरादी संत, वामन-श्रीधरादी पंतकवी, शंकराचार्यांसारखे व मार्क्स-सॉक्रेटीस यांसारखे तत्त्वज्ञ, झरथुष्ट्र-मुहंमद पैगंबर यांसारखे धर्मसंस्थापक, मीराबाई-मुक्ताबाई, ॲनी बेझंट व निवेदिता यांचे चारित्र्य समाजास ‘समजोनि द्यावे’ असे त्यांनी म्हटले आहे; कारण सर्वांची ध्येयधोरणे सर्वोद्धाराची आहेत.

समाज-जीवन : पूर्वजांनी जो हेतू योजिला, तो समजून घेऊन त्यानुसार सणवार, संस्कार अवडंबर न माजवता झाले पाहिजेत. हा आग्रह सर्व सण-समारंभांत ‘तत्त्वानुसंधान’ असावे, ही अपेक्षा व ‘उत्सव ही आहे निर्मळ सेवा| उजळावया अंतरीचा दिवा||’ ही भूमिका ग्रामगीतेत त्यांनी विशद केली आहे. ‘अनंत तत्त्वी एकत्वी पावणे’ शिरोधार्य मानले असून त्यासाठी प्रार्थना–सामुदायिक प्रार्थना–करण्यास सांगितले आहे. शिक्षण, आरोग्य, विवाह, सणवार, पाहुणचार, शिशुसंगोपन ही सामायिक रीतीने करण्याचे धडे त्यांनी दिले आहेत. विश्वशांतीचा उपाय म्हणून ‘समन्वयकारी प्रार्थना’ व ‘सहनशील बुद्धी’ त्यांनी सांगितली आहे.

प्रयत्नशील मानव :

‘मानव सृष्टीहूनि थोर| तो ईश्वराचा अंशावतार||

अचूक प्रयत्न, दैवी हत्यार| निर्मू शके प्रतिसृष्टी||’

अशी मानवाची संकल्पना तुकडोजी महाराजांनी मांडली आहे. स्त्री-पुरुष या दोन्ही घटकांची किंवा लिंगभावनिरपेक्ष उन्नती त्यांना अभिप्रेत आहे. ‘वैराग्य म्हणजे आसक्तित्याग’ अशी व्याख्या देऊन ‘सर्वांसह उद्धरोनि जावे’ आणि ‘आपापले कार्य सांभाळावे| जीवमात्रासि संतुष्ट करावे’ असा मंत्र त्यांनी दिला आहे.

संदर्भ :

  • सावरकर, स्व. सुदाम, संपा. ग्रामगीता, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे, २०१६.

                                                                                                                                                                     समीक्षक : नारायण गडदे