यादव, आनंद :  (३० नोव्हेंबर १९३५ – २७ नोव्हेंबर २०१६). मराठीतील सुप्रसिद्ध साहित्यिक. कथा, कविता, कादंबरी, ललितगद्य, समीक्षा इ. अनेक साहित्यप्रकारांमध्ये लक्षणीय स्वरूपाचे लेखन करणारे सव्यसाची लेखक म्हणून आनंद यादव यांचे नाव मराठी वाचकांना सुपरिचित आहे.  वैविध्यपूर्ण आणि कसदार साहित्य लिहिणारे फार थोडे लेखक मराठी साहित्यात आहेत. त्यांच्यात यादवांची गणना करावी लागते. १९७५ नंतर त्यांनी सुरू केलेल्या ग्रामीण साहित्य चळवळीमुळे मराठी साहित्यात नवा यादवकाळ सुरू झाला आहे, असा उल्लेख गं. ना. जोगळेकर यांनी केला होता.

आनंद यादव यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यात कागल येथे शेतमजूर कुटुंबात झाला. रत्नाप्पा जकाते हे त्यांचे वडील. पूर्वजांच्या जकात गोळा करण्याच्या व्यवसायावरून त्यांना जकाते हे पडनाव मिळालेले होते तर यादव हे त्यांचे आडनाव आहे. वडील रत्नाप्पा यांची स्वतःच्या मालकीची शेती नव्हती. एका जमीनदाराच्या शेतावर ते कूळ म्हणून सहकुटंब राबत असत. घरात शिक्षणाची कुठलीही परंपरा नसल्याने यादवांना अनेक हालअपेष्टा सोसत शिक्षण पूर्ण करावे लागले. वडिलांचा शिक्षणाला पूर्ण विरोध होता ; परंतु केवळ आईच्या प्रोत्साहनामुळेच ते शिकले आणि पुढे प्राध्यापक झाले. अनेक ठिकाणी नोकऱ्या केल्यानंतर पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागप्रमुख पदावरून निवृत्त झाले. एका सामान्य शेतमजुराच्या घरात जन्मलेल्या, शिक्षण आणि साहित्याची कुठलीही परंपरा न लाभलेल्या व्यक्तीने मारलेली ही मजल स्तिमित करते. यादवांनी वेगवेगळे वाङ्मयप्रकार हाताळले, क्वचित वेगवेगळे अनुभव मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु ग्रामीण जीवन हाच त्यांच्या साहित्याचा प्रधान विषय राहिला. एकाच वेळी सर्जनशील साहित्यिक आणि चिकित्सक वाङ्मयविमर्शक या दोन्ही बाजू त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एकवटल्या असल्याचा अनुभव वाचकांना आला.

यादवांनी आपल्या लेखनाची सुरुवात काव्यलेखनाने केली. हिरवे जग  हा त्यांचा पहिला कवितासंग्रह १९६० मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर ते वाचकांसमोर आले ते कथाकार म्हणून. या दृष्टीने त्यांचा खळाळ  हा कथासंग्रह लक्षणीय ठरला. खळाळ मधील कथा ग्रामीण माणसांच्या अंतर्मनात डोकावते. आदिताल मध्ये यादवांच्या कथेने मानवी मनातील आदिम कामभावनांचा शोध घेतला. या कथेचे स्वरूप यादवांच्या एकूणच कथात्मक साहित्यात वेगळे ठरले. डवरणी हे यादवांच्या कथेचे नवे वळण म्हणता येईल. उखडलेली झाडे  हा या नवे वळण घेतलेल्या कथेचा पुढील प्रवास म्हणता येईल. या कथेचे विकसित रूप झाडवाटा, भूमिकन्या आणि उगवती मने  या कथासंग्रहातून दिसून येते. यादव यांनी ग्रामीण विनोदी कथाही लिहिली. तथापि या स्वरूपाचे कथालेखन नंतरच्या काळात यादवांनी पूर्णपणे थांबविले. कथालेखन असो किंवा कादंबरीलेखन असो ग्रामीण साहित्याचे माध्यम म्हणजे भाषा ही ग्रामीणच असली पाहिजे असा आग्रह त्यांनी धरला आणि ग्रामीण भाषेतूनच आपल्या कथा – कादंबरीचे आविष्करण केले. व्यक्त होऊ पाहणारा जीवनानुभव कथेऐवजी कादंबरीसारख्या विस्तृत वाङ्मयप्रकाराची मागणी करीत आहे, असे जाणवताच त्यांनी कादंबरीलेखन केले. त्यांची गोतावळा  ही कादंबरी त्यादृष्टीने फार महत्त्वाची ठरली. या कादंबरीने मराठी साहित्यात आपले अनन्यसाधारण असे स्थान निर्माण केले असून ग्रामीण साहित्याच्या पुढील विकासाच्या दृष्टीने तिचे महत्त्व निर्विवाद आहे. एका शेतगडी म्हणून काम करणाऱ्या तरुणाचे कोल्हापुरी बोली भाषेत अभिव्यक्त झालेले आत्मप्रकटीकरण या कादंबरीत आहे. बदलत्या ग्रामवास्तवाचा लक्षणीय वेध म्हणून या कादंबरीचे महत्त्व निर्विवाद आहे. थोडक्यात गोतावळाने मराठी कादंबरीत आपले वैशिष्टपूर्ण स्थान निर्माण केले असून, आदिम कामप्रेरणांचा शोध घेण्याचा चिंतनशील प्रयत्न म्हणून माऊली या  कादंबरीचे स्थानही अनन्यसाधारण असेच आहे.

ग्रामीण तमाशा कलावंताच्या उपेक्षित जीवनाचा आविष्कार करणारी नटरंग  ही कांदबरी ही समकालीन समाजजीवनाचा वाङ्‌मयीन दस्तऐवज ठरतो. तमाशा कलावंत गुणाची शोकांतिका तमाशा कलावंतांची प्रातिनिधिक कथा ठरते. या कादंबरीवरील ‘नटरंग’ हा चित्रपटही लोकप्रिय ठरला. तर झोंबी, नांगरणी, घरभिंती आणि काचवेल  या कादंबऱ्यांच्या रूपाने यादवांनी आत्मचरित्रात्मक कादंबरीचा नवा मानदंड निर्माण केला. कारण या स्वरूपाचे कादंबरीलेखन यापूर्वी मराठी साहित्यात झालेले नव्हते. आत्मचरित्रात्मक कादंबरी असा नवाच आकृतिबंध या कादंबऱ्यांनी निर्माण केला. या कादंबऱ्यांनी नवा आकृतिबंध निर्माण केला तसा गोतावळा  या कादंबरीने ग्रामीण कथात्मक साहित्याला आणि ग्रामीण बोलीभाषेच्या आविष्कार माध्यमाला महत्त्व मिळवून दिले. हे गोतावळाचे ऐतिहासिक महत्त्वाचे कार्य आहे. कथात्मक लेखनाबरोबरच आनंद यादव यांनी ललितगद्यलेखनही केले आहे. या लेखनात प्राधान्याने ग्रामीण अनुभवांचा आविष्कार आहे. ललितलेखन करीत असताना ते साहित्य व्यवहाराशी निगडित असलेल्या अनेक प्रश्नांचे चिंतन करीत होते. त्यातून त्यांचे समीक्षालेखन आणि वैचारिक स्वरूपाचे लेखन निर्माण झाले. अशाप्रकारे एकाच वेळी ललितलेखन आणि समीक्षालेखन या दोन्ही आघाड्या यादवांनी यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. या संदर्भात यादवांच्या रूपाने ग्रामीण साहित्याला चांगला भाष्यकार मिळाला आहे असा निर्देश गो. म. कुलकर्णी यांनी केला आहे. थोडक्यात, मूलभूत सामाजिक जाणिवा व्यक्त करणारे साहित्यलेखन आणि साहित्यसमीक्षेत महत्त्वाची भर घालणारे समीक्षालेखन या वैशिष्ट्यांमुळे आधुनिक काळातील म्हणून आनंद यादव यांची दखल मराठी साहित्येतिहासाला घ्यावी लागेल यात शंका नाही.

वाङ्‌मयप्रकारानुसार विचार केला तर यादवांनी मराठी साहित्यात खळाळ (१९६७), घरजावई (१९७४), माळावरची मैना (१९७६), आदिताल (१९८०), डवरणी (१९८२), उखडलेली झाडे (१९८६), झाडवाटा (२०००), भूमिकन्या (२००१), शेवटची लढाई (२००२), उगवती मने (२००३) इत्यादी कथासंग्रहांची मौलिक भर घातली आहे. तर गोतावळा (१९७१), नटरंग (१९८०), एकलकोंडा (१९८०), माऊली (१९८५), झोंबी (१९८७), नांगरणी (१९९०), घरभिंती (१९९२), काचवेल (१९९७) , कलेचे कातडे (२००१), लोकसखा ज्ञानेश्वर (२००५), संतसूर्य तुकाराम (२००८) इत्यादी अनेक कादंबऱ्यांची मौलिक भर घातली आहे. याशिवाय हिरवे जग (१९६०), मळ्याची माती (१९७८) हे कविता संग्रह तर मायलेकरं (१९८९) हा दीर्घ कवितासंग्रह, माती खालची माती (१९६५) हा व्यक्तिचित्रसंग्रह तर रात घुंगुरांची (१९७७) हे वगनाट्य तसेच, स्पर्शकमळे (१९७८), पाणभवरे (१९८२), साहित्यिकाचा गाव (२००४) हे ललित लेखसंग्रह इ. साहित्य त्यांच्या नावावर जमा आहे. त्यांनी लिहिलेली समीक्षा आणि वैचारिक साहित्य लक्षात घेता ग्रामीण साहित्य : स्वरूप आणि समस्या (१९७९), ग्रामीणताः साहित्य आणि वास्तव (१९८१), मराठी साहित्य, समाज आणि संस्कृती (१९८५), साहित्याची निर्मिती प्रक्रिया (१९८९), ललित गद्याचे तात्त्विक स्वरूप आणि मराठी लघुनिबंधाचा इतिहास (१९९५)  आत्मचरित्रमीमांसा (१९९८), ग्रामसंस्कृती (२०००) आणि १९६० नंतरची सामाजिक स्थिती आणि साहित्यातील नवे प्रवाह (२००१) अशा अनेक ग्रंथांची नोंद घ्यावी लागेल. मातीतले मोती (निवडक ग्रामीण कथा, १९७०), निळे दिवस (प्रभाकर पाध्ये यांच्या कथा, १९७६), तिसऱ्या पिढीची ग्रामीण कथा (बाबा पाटील यांच्या सहकार्याने, १९८१), बाबुराव जगताप यांच्या आठवणी, माझ्या आठवणी आणि अनुभव (विठ्ठल रामजी शिंदे, १९९९), मराठी ग्रामीण कथा (सहकार्याने, २००२) हे त्यांचे संपादित ग्रंथही लक्षणीय ठरले.

आनंद यादव यांनी महाराष्ट्रातील विविध साहित्य संमेलनांची अध्यक्षपदे भूषविली आहेत. त्यात, जुन्नर, असोदा, विटा, बेळगाव, भंडारा, नाशिक, औदुंबर, जळगाव, पुणे, मुंबई अशा अनेक ठिकाणी भरलेल्या साहित्य संमेलनांचा उल्लेख करता येईल. त्यांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांचीही नोंद घेणे आवश्यक ठरेल. त्यांना शिवाजी सावंत पुरस्कार, पु. य. देशपांडे स्मृती पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार, लाभसेटवार पुरस्कार असे अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या झोंबी  या आत्मचरित्रात्मक कादंबरीला १९९० मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच या कादंबरीला अन्य आठ पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या साहित्याला महाराष्ट्र राज्य सरकारची एकूण दहा पारितोषिके मिळाली आहेत. राष्ट्रीय हिंदी अकादमीचा (कोलकाता) उत्कृष्ट साहित्य निर्मिती बद्दलचा पुरस्कार त्यांना १९९४ मध्ये प्राप्त झाला आहे. यादवांचे साहित्य महाराष्ट्रासह महाराष्ट्राबाहेरील विद्यापीठांमधूनही अभ्यासले गेले आहे. त्यांच्या साहित्यावर अनेक संशोधकांनी एम. फिल. आणि पीएच. डी. चे संशोधन केले आहे. तसेच त्यांच्या साहित्याची कन्नड, तेलगु, हिंदी, इंग्रजी, जर्मन इ.भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. सृजनशीललेखन आणि समीक्षालेखन करीत असतानाच यादवांनी महाराष्ट्र साहित्य पत्रिका  आणि विचारभारती  या नियतकालिकांचे संपादनही केले आहे.

पुणे येथे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.

संदर्भ : ठाकूर,रवींद्र, साहित्यिक आनंद यादव, बळीवंश प्रकाशन, नांदेड.