शहाणे, मनोहर :  (१ मे, १९३०). साठनंतरच्या काळातील मराठीतील महत्त्वाचे कादंबरीकार, कथाकार आणि नाटककार. नाशिक येथे सराफी व्यवसाय करणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म. बालपणी वडिलांच्या निधनानंतर आई-आजीने धुणीभांडी करून प्रपंच चालविला. आर्थिक परिस्थितीमुळे मॅट्रिकनंतर शिक्षण घेता आले नाही. शालेय जीवनात वार्षिक स्नेहसंमेलनासाठी क्रांती  ही नाटिका लिहिली. नाटकांमध्ये भूमिका, नकला, जादूचे प्रयोग केले. हस्तलिखिते- मासिके चालविली. रेशनिंग खात्यात तात्पुरते काम सुरू असतानाच पालवी  मासिक काढले. ही धडपड पाहून गांवकरीत मुद्रितशोधक म्हणून १९४९ मध्ये त्यांना संधी मिळाली. पुढे साप्ताहिक गांवकरी  व दिवाळी अंकाचे संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली. १९५५- ५६ मध्ये अ.वा.वर्टीं यांच्यासमवेत अमृत नियतकालिकाचे काम सुरू केले. मनोहर शहाणे यांनी अमृतचे संपादक म्हणून भरीव योगदान दिले.

सदस्यांचे मृत्यू जवळून पाहिल्याने शहाणे यांच्या व्यक्तिमत्त्वात संवेदनशीलता, हळवेपणा, तटस्थपणा आणि जीवन- मृत्यूविषयक असंख्य प्रश्न निर्माण झाले. यातून ते गंभीर लेखनाकडे वळले. माणूस, नियती, सुख-दुःखे व त्यांचा मानवी मनावर होणारा परिणाम यावर चिंतन सुरू झाले. मनुष्य म्हणजे नियतीच्या हातातील बाहुले असून त्याचे अस्तित्व क्षुद्र आहे, हा विचार त्यांच्या लेखनातून प्रकटला. त्यांच्या साहित्यातील व्यक्तिरेखा सर्वसामान्य असून तटस्थता, जिवंतता, प्रत्ययकारी आणि भेदकतेमुळे साठोत्तरी काळात मराठी कादंबरी जीवनाभिमुख बनविण्यात त्यांचे योगदान मोलाचे आहे.

मनोहर शहाणे यांचे वाङ्मय विविध स्वरूपी आहे. कथा, कादंबरी, एकांकिका याप्रकारांतून त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण निर्मिती केली. त्यांच्या अकरा कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. साठच्या सुमारास नाशकात सुरू झालेल्या अनामिक वाड़्मय मंडळात मंडळासाठी शहाणे यांनी लिहिलेल्या कथेचा विस्तार होऊन त्यांची पहिली कादंबरी धाकटे आकाश (१९६३) आकाराला आली. जन्म-मृत्यू, वेड- हळवी प्रीती, कामप्रवृत्ती, आर्थिक दैन्य, आजारपण अशा मानवी जीवनातील अटळ सत्याचे प्रकटीकरण या कादंबरीत आहे. कादंबरीतील नायकाचे मनोविश्लेषण चौकटीबाहेरचे व प्रभावी आहे. नवतेची अनेक लक्षणे या कादंबरीत असून ज्या लेखनामुळे मराठी कादंबरी समृद्ध व प्रौढ झाली, त्यात धाकटे आकाशचाही उल्लेख करण्यात येतो. झाकोळ (१९६५) या दुसऱ्या कादंबरीत पौगंडावस्थेतील मुलाच्या मनोवस्थेचा पट साक्षात झालाआहे. आर्थिक ओढाताण, वैचारिक संघर्ष, वैचारिक स्थित्यंतरे, मनोविश्लेषणाबरोबर दुसरे महायुद्ध, रेशन वस्तूंची टंचाई, काळाबाजार व राष्ट्रीय चळवळी या समकालीन घटनांचा पट कादंबरीतून साकारला आहे. नायकाची स्व-जाणीव आणि परात्मता शहाणे यांनी एकाचवेळी लक्षणीयरित्या रेखाटलेली आहे. देवाचा शब्द (१९६८) या कादंबरीत निपुत्रिक नायिका, तिचे जीवघेणे दुःख शहाणे तटस्थपणे रेखाटतात. विचार-अपेक्षा आणि नशीबाच्या पार्श्वभूमीवर मध्यमवर्गीय मूल्य स्वीकारातून निर्माण झालेली कोंडी आणि अस्वस्थचे प्रभावी चित्रण कादंबरीत आहे. नायिकेची असहाय्यता व दुःख परिणामकारक चित्रणातून कादंबरीतून नव-नैतिकतेचे प्रकटीकरण आहे.

पुत्र (१९७१) कादंबरीतून वडिलांचा धार्मिक देखावा आणि त्यामुळे कुटुंबीयांची झालेली वाताहत उपरोधिकपणे रेखाटलेली आहे. भावविवशता, सांकेतिकता आणि उपदेशप्रियता टाळत मध्यमवर्गीय जीवनातील कारूण्य उत्कटतेने मांडले आहे.  उपरोधशैलीच्या दर्शनबिंदूतून या कादंबरीला नवी परिमाणे लाभतात. ससे (१९७७) कादंबरीतून विकलांग ज्येष्ठ नागरिक आणि त्याच्या मुलीच्या ससेहोलपटीचे चित्रण आहे. स्वतःचे जन्मदाते घरात नकोसे होणे ही आजच्या कुटुंबव्यवस्थेची शोकांतिका कादंबरीद्वारे प्रकटली आहे. वृद्धत्वातील दुःख आणि त्याला लाभलेली दारिद्र्य पार्श्वभूमीमुळे कारूण्य उत्कट- प्रत्ययकारी पद्धतीने व्यक्त होते. लोभ असावा आणि एखाद्याचा मृत्यू  या दोन लघु कादंबऱ्या १९७८ मध्ये आल्या. लोभ असावामधून स्वप्न आणि वास्तवाचे अनेक मितीचे चित्रण आहे. बंगल्याचे स्वप्न बाळगणारा नायक व्यवहारात फसविला जाऊन स्वप्नभंगाचे अनुभव पत्रातून मांडतो. हे आशयसूत्र संवेदनशील, हळव्या आणि वास्तवाचे भान असलेल्या दृष्टिकोनातून येते. मार्मिक, सूचक, भेदक आणि अंत:र्मुख करणारी ही कादंबरी चटकदार वाक्ये व मौलिक तत्त्वज्ञानामुळे वेगळी ठरते. एखाद्याचा मृत्यूमधून सर्वसामान्य व्यक्ती मेल्यावर प्रकटणारा उपस्थितांचा शोक, आपुलकी निरर्थक व दांभिक असल्याचा अनुभव व्यक्त होतो. उत्तरक्रिया लवकरात लवकर आटोपून मोकळं होण्यावरचा कटाक्ष भयाण अनुभूती देतो. नातेसंबंधातील ताणेबाणे- वाद यामुळे मृत्यू म्हणजे मानवी जीवनाचे अंतिम- अटळ सत्य असल्याचेच माणूस विसरून जातो, याची जाणीव कादंबरी देते.

इहयात्रामधून (१९८६) आपण का जगतो आहोत, असा प्रश्न पडल्यावर आत्मशोध घेत इतरांपासून तुटत जाणारा व स्वतःचे अस्तित्व गमावून बसणारा प्राध्यापक भेटतो. एकीकडे अस्तित्ववाद, दुसरीकडे टोकाचे आत्मकेंद्रीपण या दोन द्वंद्वांमध्ये तो समाजसंकेत व सामाजिक बंधने पाळण्यात कमी पडून मृत्यूच्या काठावर पोहोचतो. आधुनिक कादंबरी म्हणून या कादंबरीकडे पाहता येते. आरसे (१९९०) ही लघुकादंबरी वृद्ध आईसह नैराश्यात जगणाऱ्या अविवाहित नायकावर बेतलेली आहे. तो असंख्य प्रश्नांमध्ये अडकून सर्वांशी तुटक- विक्षिप्त व बेफिकीर वागतो. आत्मशोधाचे प्रतीक म्हणून वापरला जाणारा आरसा कादंबरीतून सुत्ररूपाने येतो. संचित (१९९७) ही कादंबरी ब्लॅक कॉमेडी स्वरूपाची आहे. श्रीमंताचे विसंगत वर्तन, त्यांचा मृत्यू, मृत्यूनंतर जमलेली गर्दी, गर्दीचे वाद-संवाद आणि मागे उरलेल्यांचे विविध प्रश्न यांतून मानवी जीवनाचे अस्तित्व व निरर्थकता नोंदविली आहे. आधुनिकतेचा पेच मांडताना शहाणे त्याला भारतीय सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक वस्तुनिष्ठतेची जोड देतात. मात्र हे मांडताना रूढ- पारंपरिक साधने, तपशील व शैलीत नवनवे प्रयोग करतात. लेखकाच्या अनुभवविश्वाची समृद्धता अभिव्यक्त करणारी ही कादंबरी आहे. एकाचवेळी परात्मता, आधुनिकता, अस्तित्ववाद आणि तात्त्विकता मांडणारी ‘नव- कादंबरी’ म्हणून संचित महत्त्वाची आहे. उलूक (२००५) मध्ये श्रीमंत व्यक्तीला मृत्यूची चाहूल लागल्यावर अमर होण्यासाठीची त्याची धडपड, देवाचे मंदिर बांधल्यावर आपला मृत्यू होणार नाही, ही त्याची भावना फोल ठरून शेवटी मृत्यू. यातून गूढवाद- अस्तित्ववाद आणि मृत्यूविषयक गंभीर चिंतन प्रकटते. माणूस, त्याचा जन्म, त्याच्या जगण्याचे कार्यकारणभाव, धर्मकारण त्याच्या हातात नसतात. आपले बाहुलेपण टाकुन तो स्वत:चे आकाश, क्षितिज निर्माण करू पाहण्याची शक्यता आणि त्यातून निर्माण होणारा अपरिहार्य संभ्रम यावर शहाणे समर्पक-मार्मिक भाष्य करतात.

मनोहर शहाणे यांनी कथालेखनही केले.  मनुष्यजीवन, त्यातील सुख-दुःख, प्रेम- प्रेमभंग, अस्वस्थता, दारिद्र्य, वेश्या/ भिकार जीवन, ज्येष्ठ नागरिक, मृत्यू असे गंभीर, भेदक व मार्मिक विषय हाताळले. शहाणेंच्या बहुतेक कथा मानवी जीवन- जगण्यातील, वर्तनातील अस्वस्थपण रेखाटतात. लेखनाची मर्यादा राखत बीभत्सरसाचे दर्शनही घडवितात. शहाण्यांच्या गोष्टी (१९६१), अनित्य (१९८७), ब्रह्मडोह (१९९९) आणि उद्या (२००८) या कथासंग्रहात मिळून त्यांच्या पंचेचाळीस कथा आहेत. आरोपी दादासाहेब देशमुख ? (१९९९) हे नाटक आणि तो जो कुणी एक (२००३) यातील चार एकांकिकांतूनही विविध विषय त्यांनी हाताळले आहेत. वैविध्यपूर्ण आविष्कारशक्तीचा प्रत्यय त्यांच्या एकांकिका देतात.

२००५ साली त्यांना महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सर्वोत्कृष्ट साहित्य पुरस्कार त्यांना मिळाले. शहाणे यांच्या एकांकिकांचे फ्रेंच आणि इंग्रजीभाषेत अनुवाद झाले. त्यांच्या पुत्र  नाटकास १९७८ मध्ये राज्य नाट्यस्पर्धेची सर्व पारितोषिके मिळाली. लिटिल मॅगझीन ऑफ इंडिया या संस्थेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. तब्बल पाच दशके अमृत  या लोकप्रिय मासिकाचे संपादन त्यांनी केले.

मराठीतील प्रयोगशील गद्यलेखक म्हणून गेल्या सहा दशकात विपुल साहित्यचिंतन आणि कसदार लेखन करणाऱ्या शहाणे यांने लिहिलेल्या कथा- कादंबऱ्या- एकांकिका गंभीर, तात्त्विक व जीवनासंबंधीचे चिंतन करायला लावतात. वाचकांना स्तिमित करताना माणसाच्या एकूणच जगण्याचा व त्याच्या वर्तनाचा सखोल विचार करतात. मानवी जीवनाचा विविध अंगाने शोध प्रामाणिकपणे घेत राहतात.

संदर्भ :

  • गणोरकर, प्रभा, टाकळकर उषा आणि सहकारी, संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश (१९२० -२००३), मुंबई, २००४.