ब्र : कविता महाजन यांची ब्र ही पहिली कादंबरी. कविता महाजन ह्या मराठी साहित्यात स्त्रीवादी जाणीवेच्या कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या भिन्न, कुहू या कादंबऱ्यादेखील लक्षणीय आहेत. अस्सल आणि जिवंत अनुभवातून अभिव्यक्त झालेली त्यांची ब्र ही कादंबरी शीर्षकापासूनच लक्षवेधक ठरली. त्यांनी या कादंबरीत समकालीन समाजवास्तव निर्भिडपणे मांडले आहे. स्वानुभवातून ती आकारास आल्यामुळे या कादंबरीतील आशय परिणामकारकरित्या आविष्कृत झाला आहे. निर्बंधाचे झुगारलेपण आणि सामाजिक संकेतांचे उल्लंघन यादृष्टीने ही कादंबरी अर्थपूर्ण आहे. परंपरेविरुद्ध स्त्रियांनी तोंडातून ‘ब्र’ही काढू नये असा संकेत येथील व्यवस्थेत रुजला आहे. त्याला छेद देण्याच्या अनुषंगानेच कविता महाजन यांनी ब्र हे शीर्षक योजले आहे.

या कादंबरीची नायिका प्रफुल्ला आहे. तिच्याबरोबर मुकणेबाई, वेणूताई, शेवली बाई, कडूबाई, चांदणी, चान्नी, शामीबाई, ताऊबाई, कालबाई, राधाबाई, नवलीबाई, कावेरीबाई अशा अनेक स्त्रियांच्या कहाण्या या कादंबरीत आहेत. ‘बायकांचे पाय भूतासारखे उलटे असतात, कुठेही जात असले तरी ते घराकडेच वळत असतात….’ हे एक वाक्य या कादंबरीत आलं आहे, या वाक्यावरून स्त्रीजाणीवेचा आणि जगण्याचा पट या कादंबरीत उलगडला असल्याचे लगेच लक्षात येते.

‘ब्र’ या कादंबरीमध्ये आदिवासी महिलांचे राजकारण आणि स्वयंसेवी संघटनांचे कामकाज याविषयीचे चित्रण आले आहे. प्रथमत:च राजकारणात आलेल्या आदिवासी महिलांसमोरच्या अडचणी, समस्या व त्यावर कणखरपणे मात करत त्यांनी दिलेला लढा या कादंबरीचा मुख्य विषय आहे. सरपंचपदी काम करणाऱ्या यातील काही स्त्रियांचे अनुभव भयावह आहेत. पारंपरिक राजकारण्यांनी सत्ताकारणासाठी त्यांना अमानुषपणे छळल्याची अनेक उदाहरणे या कादंबरीत येतात. प्रफुल्ला या नायिका या आदिवासी जगाशी समरस होते. या आदिवासी स्त्रियांच्या न्याय हक्कासाठी धडपडते. आरोग्यविषयक जाणीव-जागृती करते.

प्रफुल्लाच्या वैयक्तिक जीवनानुभवही समांतरपणे आला आहे. स्वत: प्रफुल्ला ही घटस्फोटीत आहे. तिच्या नवऱ्याने दूसरे लग्न केले आहे. तरिही तो तिच्यावरचा हक्क शाबूत ठेवतो. तिचा संपूर्ण वर्तनव्यवहार त्याने नियंत्रित केलेला असतो. साहेबाच्या संमतीशिवाय तिला काही करता येत नाही. या त्रासातून,दु:खातून ती भींगरीप्रमाणे तो कोष फोडून बाहेर पडते. प्रगत या स्वयंसेवी संघटनेच्या कामात गढून जाते. शेवटी ती प्रगतचा अधिकारी सुमेधचा दांभिकपणा उघड करुन नोकरीचा त्याग करते. स्वत:च्या सोयीसाठी जवळ आलेल्या मुलासही परत पाठवण्याचा कणखरपणा दाखवते. प्रफुल्ला बरोबर अनेक आदिवासी स्त्रियांच्या उपकथा या कादंबरीत आल्या आहेत त्यामुळे रुढ अर्थाने ही कादंबरी नायिकाप्रधान न ठरता ती समूहलक्ष्यी ठरते.

कविता महाजन यांनी हा सर्व जीवनानुभव वैशिष्ट्यपूर्ण भाषेतून साकारल्यामुळे ही कादंबरी भाषिक पातळीवरही महत्त्वाची ठरते. आदिवासींच्या वेगळ्या संस्कृतीचे, नीतीमत्तेचे दर्शन या भाषेतून घडते. त्यांचे संवेदनविश्व साकारण्यासाठी अनुरुप अशा शब्दरुपांची योजना त्यांनी केली आहे. आदिवासींची उच्चाररुपेही प्रमाण मराठीपेक्षा वेगळी आहेत. म्हणी, वाक्यप्रचार, अलंकारांचाही त्यांनी सर्जक वापर केला आहे. काव्यात्मकता, संवादबहुलता व पत्रात्मक कथनशैलीमुळे अनुभवद्रव्याला ठाशीव आकार प्राप्त झाला आहे. एकूणच आशय व आविष्कारदृष्ट्या ही एक मराठीतील महत्त्वाची कादंबरी आहे.

संदर्भ : महाजन कविता, ब्र,राजहंस प्रकाशन,पुणे.