ईजिप्शियन सूर्यदेव रा याचे वाहन. यास सोलरबार्क, सूर्यजहाज, सौरनौका म्हणूनही ओळखले जाते. या जहाजात बसून रा प्रवास करीत असे. रा व हाथोर हे देव दररोज या जहाजाने आकाश पार करत. या सूर्यनौका दोन होत्या, ज्यामधून रा देवता स्वर्गातून प्रवास करत असे. त्यातील पहिल्या सूर्यनौकेला ‘ॲटेट’ किंवा ‘मॅटेट’ असे नाव होते, ज्यामधून तो सूर्योदय ते दुपारपर्यंत प्रवास करीत असे; तर ‘सॅकटेट’नामक सूर्यनौकेतून तो दुपारपासून ते सूर्यास्तापर्यंत प्रवास करीत असे.

या सूर्यनौकांसदर्भात विविध पौराणिक कथा आढळतात. प्राचीन ईजिप्शियन पौराणिक कथांनुसार रा देवतेवर हल्ला करण्यात आला होता. राचे हे जहाज, ज्याचा उल्लेख कूफू जहाज असाही आढळतो, ते १३३ फूट लांब होते. हे गीझा पिरॅमिडमध्ये बंद करण्यात आले होते. पुरातत्त्वशास्त्रज्ञ कमल अल्-मल्लख आणि निरीक्षक झाकी नूर यांनी मे ११९५ मध्ये हे जहाज पुन्हा शोधले. तोपर्यंत हे जहाज १,२२४ तुकड्यांमध्ये विखुरलेले होते. हे तुकडे पुन्हा एकत्र येण्यासाठी १० वर्षांचा कालावधी लागला. हे जहाज ठेवण्यासाठी जवळपास एक संग्रहालय तयार केले गेले. ईजिप्तमध्ये इतरही सहा सूर्यनौका अभ्यासकांना सापडल्या आहेत.

सौरनौका : नियोलिथिक पेट्रोस्लिफ्समध्येही सौरनौका दर्शविलेली आहे. सूर्यदेवतांशी संबंधित ईजिप्शियन देवता रा आणि होरस, हाथोर या सोलरबार्जमध्ये म्हणजेच सौरनौकेत बसल्याचे चित्रण केलेले दिसते. ईजिप्शियन दंतकथांमध्ये रा देवता दररोज रात्री पश्चिमेकडून पूर्वेकडे येण्यासाठी सौरनौकेवर स्वार होते. नक्षत्रांविषयीच्या ईजिप्शियन दंतकंथांमध्ये सौरनौकांचे उल्लेख आढळतात. राने वृद्धत्व आल्यावर स्वर्गात जाण्यासाठी सौरनौकेचा वापर केल्याचा उल्लेख आढळतो. तसेच तो संपूर्ण मानववंशावर नजर ठेवण्यासाठी सौरनौकेचा वापर करतो व तो या नौकेतून जेव्हा प्रवास करतो, तेव्हा त्या नौकेला ‘दी बोट ऑफ मिलियन ईयर्स’ असे म्हणतात. ‘ॲटेट’ या सौरनौकेमधून विहार करत विश्वाला प्रकाशित करण्याचे कार्य रा हा देव ॲमन-रे व हाथोर यांना सोबत घेऊन करतो, असा संदर्भ आहे. सौरनौकेतून देवतांनी स्वर्गातून पृथ्वीवर येण्यासाठी प्रवास केला होता, असेही म्हटले जाते.

ईजिप्शियन सूर्यदेवतांसंदर्भात ज्याप्रमाणे सूर्यनौका ही संकल्पना दिसते, त्याचप्रमाणे इतर प्राचीन संस्कृतींमध्येदेखील या नौकेला समांतर संकल्पना ही आपल्याला दिसतात. ग्रीक होलियस देवता (किंवा अपोलो) हीदेखील रथात स्वार होते. सोल इनव्हिक्टस राजाने रोमन नाण्यावरती चार पायांचे प्राणी प्रामुख्याने घोडे वाहतूक करतानाचे चित्रण केले आहे. वैदिक सूक्तांमधील सूर्य सात घोड्यांनी युक्त रथात स्वार झाला. चिनी संस्कृतीतही सूर्यरथ ही संकल्पना आढळून येते.

संदर्भ :

                                                                                                                                                                   समीक्षक : शकुंतला गावडे