ईजिप्शियन पपायरसांवरील थडग्यांतील सुशोभित हस्तलिखिते. ईजिप्शियन बुक ऑफ द डेड किंवा मृतात्म्याचे पुस्तक म्हणजे काही विशिष्ट मंत्रांचा संग्रह असून तो मृतात्म्याला मृत्यूनंतरच्या आयुष्यात मार्गनिर्देशन करतो, असे मानले जात असे.

अठारव्या वंशाच्या काळातील पपायरसच्या पानावरील ‘बुक ऑफ द डेड’ हस्तलिखित : ईजिप्शियन वस्तुसंग्रहालय, तुरीन, इटली.

ह्या संग्रहाला बुक ऑफ द डेड हे शीर्षक काही पाश्चात्त्य संशोधकांनी दिले. ह्या संग्रहाचे मूळ शीर्षक पाहता त्याचा शब्दशः अनुवाद ‘दिवसा परत पुढे यायचे पुस्तक’ आणि योग्य अर्थ ‘ईजिप्शियन जीवनाचे पुस्तक’ असा होतो. काहीजण ह्या संग्रहाला प्राचीन ईजिप्शियन बायबलदेखील म्हणतात; पण हा संग्रह त्यांचे मुख्य पवित्र पुस्तक नसून दोन्हीत काहीही साम्य नाही.

‘बुक ऑफ द डेड’ संकल्पनेचा उगम थडग्यावरील चित्रे आणि काही ईजिप्तमधील तिसऱ्या वंशाच्या (इ.स.पू. २६७०–२६१३) काळातील हस्तलिखितांवरून झाल्याचे दाखले मिळतात. बाराव्या वंशाच्या (इ.स.पू. १९९१–१८०२) काळात ह्या संग्रहातील मंत्र पपायरसच्या पानांवर लिहून ते मृतांच्या थडग्यात ठेवण्यात येत असत. ईजिप्तमध्ये अठराव्या वंशाच्या फेअरोंनी (इ.स.पू. १५३९‒१२९२) बुक ऑफ द डेडच्या अनेक प्रती नकलून ठेवल्याचे आढळते. त्यात तत्कालीन देव-देवता, प्रार्थना, थडगी, मम्मी यांबद्दल नोंदी आहेत.

अभ्यासकांच्या मते एखाद्या थडग्यात बुक ऑफ द डेड असणे म्हणजे मृत्यूनंतर प्रवासाची किल्ली हातात असणे होय. मृत्यूनंतर स्वर्गात जाण्याचा मार्ग, मार्गातून जाताना येणाऱ्या संकटांवर वेगवेगळ्या पशुंचे रूप घेऊन मात कशी करायची, स्वर्गातील देवतांशी संवाद साधण्याची योग्य पद्धत, कधी काय बोलावे, तिथे मृतात्म्याचे आचरण कसे असावे ह्या आणि इतर अनेक गोष्टींबद्दल ह्यात मृतात्म्याला मार्गदर्शन केल्याचे दिसून येते.

ईजिप्शियन ‘बुक ऑफ द डेड’ या हस्तलिखितातील देखावा

न्यू किंगडम (इ.स.पू. १५७०–१०६९) काळापूर्वी बुक ऑफ द डेड फक्त राजवंशातील आणि उच्च वर्गातील काही खास व्यक्तींपुरतेच मर्यादित होते.

एका लोकप्रिय ईजिप्शियन आख्यायिकेनुसार मृतात्म्याच्या मृत्यूपश्चात त्याच्या पापपुण्याचा न्यायनिवडा होत असताना ओसायरिस देवता तिथे हजर असते. न्यू किंगडमच्या काळात ओसायरिसचीही आख्यायिका आणि बुक ऑफ द डेड इतके लोकप्रिय झाले की, सर्वच ईजिप्शियन आपले स्वतःचे बुक ऑफ द डेड असावे असा आग्रह धरू लागले.

ईजिप्शियन लोक ज्या व्यक्तीची ऐपत असेल, त्याच्या प्रत्येकासाठी यथाशक्ती स्वत:साठी असे खास वेगळे बुक ऑफ द डेड बनवून घेत असत. इच्छुक व्यक्ती आपल्या ऐपतीनुसार बुक ऑफ द डेडमध्ये कमीजास्त मंत्रांचा समावेश करणे, आपल्याला एकूण किती प्रकरणे हवीत ते ठरवणे, लेखनासाठी वापरलेल्या पपायरसची गुणवत्ता ठरवणे, आपल्याला कोणती वर्णने, दृष्टांत आणि उदाहरणे हवीत, ते ठरवणे वगैरे प्रकारचे बदल करू लागले.

टॉलेमी (टोलेमिक) वंशाच्या काळातील एका स्त्रीच्या बुक ऑफ द डेडमध्ये इसिस व नेफ्टिसचे विलाप (The Lamentations of Isis and Nephthys) ची संहिता होती; जी इतर कोणत्याही बुक ऑफ द डेडमध्ये आढळली नव्हती.

पण एक मंत्र मात्र बुक ऑफ द डेडच्या प्रत्येक संग्रहात अनिवार्यपणे सापडतो. एका आख्यायिकेनुसार ओसायरिस देवतेच्या सत्याच्या न्यायालयात मृतात्म्याच्या हृदयाचे वजन होत असे. त्या वेळी मृतात्म्याने ओसायरिस देवतेशी कसा संवाद साधावा ह्याविषयी अतिशय स्पष्टपणे सूचना ह्या मंत्रात केलेल्या आहेत.

संदर्भ :

  • Willis, Roy, World Mythology, London, 1993.
  • https://www.ancient.eu/Egyptian_Book_of_the_Dead/

                                                                                                                                                                   समीक्षक : शकुंतला गावडे