विद्यमान अस्तित्वात असलेले सर्व मानव हे प्राणिमात्रांच्या एका मोठ्या ‘होमो’ या प्रजातीमध्ये मोडतात. त्यांना होमो सेपियन असे म्हणतात. या होमो सेपियनमधील विविध लोकगट आणि समूह जननिक तत्त्वावर आधारित लक्षणानुसार एकमेकांपासून स्वतंत्र वाटतात. या छोट्या छोट्या गटांना सर्वसाधारणपणे वंश असे मानले जाते. जननिक तत्त्वावर आधारित लक्षणे ही दोन प्रकारची असतात. पहिला, एकूण सर्वसाधारण दृग्गोचर लक्षणे. उदा., कातडीचा रंग, प्रकार, केस, चेहरा व शरीराची ठेवण इत्यादी. दुसरा, डोळ्याला न दिसणारी, परंतु जैव प्रकारातील लक्षणे. उदा., रक्तगट इत्यादी. विविध मानवी गट अथवा समूहात दिसणारी विविधता ही केवळ अनुवांशिक गुणधर्मांमुळे आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास प्राणिविज्ञानानुसार वंश म्हणजे जननिक किंवा नैसर्गिक निवडीमुळे इतर लोकगटांपासून स्पष्टपणे उठून दिसणारा निराळा लोकगट किंवा व्यक्तिसमूह होय. म्हणून कृत्रिम रीत्या एकत्रितपणे बांधला गेलेला किंवा एखाद्या लोकगटामधून बाजूला काढलेल्या व्यक्तींचा गट किंवा धार्मिक गट किंवा भाषिक गट किंवा राष्ट्रीय गट म्हणजे वंशगट नव्हे. वंश हा शब्द बऱ्याच वेळेला विविध अर्थाने वापरला जातो. राजकारणात गैर अर्थाने वापरला गेलेला आणि जगाच्या इतिहासात महत्त्वपूर्ण शब्द असलेला ‘वंश’ ही एक केवळ कल्पना आहे. ही कल्पना वस्तुस्थितीत आहे असे वाटण्यास किंवा त्याची अवस्तावता लक्षात येण्यास जीवशास्त्रीय घटक आणि त्यांची जाणच कारणीभूत आहे.

इंग्रजी भाषेत ‘वंश’ या शब्दाला ‘रेस’ असा शब्द रूढ आहे; परंतु ‘रेस’ हा शब्द प्रत्यक्षात कधी व कसा वापरात आला, याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही. अरबी भाषेतील रॅस (RAS) या शब्दापासून रेस हा शब्द आला असावा, असा एक विचारप्रवाह आढळतो. अरबी भाषेत ‘रॅस’या शब्दाचा अर्थ ‘शीर्ष’ वा ‘सुरुवात’ असा होतो. अरबी भाषेत एकदा हा शब्द रूढ झाल्यानंतर स्पॅनिश, इटालियन व इतर भाषांमध्ये तो रूढ झाला असावा. निरनिराळ्या वंशांची सुरुवात व उगम निरनिराळा–एकजननिक, अनेकजननिक असला पाहिजे, ही कल्पना या शब्दामागोमाग आली. निराळा उगम मानल्यानंतर ‘उच्च’ वा ‘नीच’ अशी विशेषणेही त्या मागोमाग आली.

अमेरिकेतील मानवशास्त्रज्ञांनी वंशाची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे : ‘जेणेकरून वातावरण, जमीन व भौगोलिक परिस्थितीनुसार स्थानिक लोकगटांत, त्यांच्या शारीरिक गुणधर्मात आणि त्यांच्या क्रियाशील वर्तनात जो फरक दिसतो, तो दुसरा तिसरा काहीही नसून ते लोकगट हे एकाच जातीच्या, उपजातीच्या किंवा भौगोलिक घटकांमुळे झालेला वंशप्रकार किंवा वंश असतो’.

वंश कल्पना ही प्रसिद्ध विचारवंत चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांच्या आधीपासून अस्तित्वात होती. वंश हे मानव जातीचे प्रमुख विभाजन असून जन्मजात शारीरिक वैशिष्ट्यांच्या आधारे ते ओळखले जाते. क्रोबर यांच्या मते, वंश ही जीवशास्त्रीय कल्पना आहे. अनुवंश, प्रजातीय गुण किंवा उपजाती यांच्याद्वारा वांशिक गटांचे संघटन होत असते. मुजुमदार यांच्या मते, जर एखादा मानव गट आपल्या समान अशा अनेक शारीरिक गुणविशेषांमुळे दुसऱ्या गटांहून भिन्न ठरविण्यात आला, तर अशा जीवशास्त्रीय गटातील सदस्य दूरवर पसरले असले, तरी त्यांचा एक वंश तयार होतो. वंशाच्या अनेक व्याख्या शास्त्रज्ञांनी मांडल्या असून वंश संकल्पनेचा सिद्धांत ज्याप्रमाणे बदलत गेला, त्याप्रमाणे वंशाच्या व्याख्याही बदलत गेल्या. बदलेल्या तीन व्याख्या पुढे दिल्या आहेत. सेल्टझेर यांच्या मते, ‘वंश म्हणजे मानवी समूहातील एक मोठा गट असून या समूहातील व्यक्ती एकमेकांसारख्या अगर एकमेकांजवळच्या शारीरिक घटक गुणांचे–लक्षणांचे–संयोजन दर्शविणाऱ्या असतात. या संयोजनामागे अनुवांशिकता महत्त्वाची मानली जाते’.

प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ अर्नेस्ट आल्बर्ट हूटन यांच्या मते, ‘मानवी समूहातील एक मोठा गट म्हणजे वंश होय. या गटातील व्यक्ती थोड्याफार फरकाने निराळ्या असल्या, तरी एकाच समूहाचे प्रतिनिधीत्त्व करित असतात.’ हूटन यांच्या व्याख्येनुसार मानवमात्रांचे वर्गीकरण वंश या गटात केलेले असून प्रत्येक वंशातील प्रत्येक सदस्य जरी आपले वेगळेपण दाखवत असला, तरीही वंशाच्या प्रत्येक सदस्यात काही गुणधर्म, रचना अथवा शारीरिक मोजमापे सामाईक असतात आणि ती पिढ्यांपिढ्यातून संक्रमित होत आलेली असतात.

डब्ल्यू. सी. बॉइड यांच्या मते, ‘एक किंवा अनेक गुणसुत्रांमुळे एका व्यक्तीसमूहाचे दुसऱ्या व्यक्तीसमूहापासून जे वेगळेपण दृष्टोत्पत्तीस येते, त्यामुळे एकमेकांपासून वेगळ्या असलेल्या व्यक्तींच्या समूहास वंश असे म्हणता येईल’. थोडक्यात, वंश ही जीवशास्त्रीय कल्पना असल्यामुळे समान शारीरिक लक्षणे असलेल्या लोकांचा वंश तयार होतो असे मानले गेले. असे असले, तरी वंश कल्पनेविषयी काही अपसमजुती अथवा भ्रामक कल्पना आहेत. वंश कल्पना ही राष्ट्रीयत्त्व, भाषा, धर्म, प्रांत अथवा भौगोलिक घटकांपासून पूर्ण वेगळी आहे.

मानववंशाची निर्मिती कशी झाली आणि त्यांच्यातील शारीरिक भेदाचे कारण काय असावे, हे प्रश्न वंश अभ्यास करताना प्रथम पुढे येतात. या दृष्टीने क्रोबर यांचे निरीक्षण महत्त्वाचे मानले जाते. उदा., भूतलावर पसरलेले मानववंश एकमेकांपासून वेगळे का व कसे झाले असावेत? कोणत्या ठिकाणी त्यांना आपली शारीरिक वैशिष्ट्ये मिळाली असावीत? त्यांचे उपवंश केव्हा व कसे निर्माण झाले असावेत? या वंशासंबंधीत प्रश्नांविषयी पुढील मत आहेत :

एकवंशीय सिद्धांत : या मतानुसार मानवाची निर्मिती एकाच ठिकाणी झाली असून कालांतराने तो त्या ठिकाणाहून सर्व जगभर स्थलांतरीत झाला आहे. नंतर त्या त्या भौगोलिक परिस्थितीत राहील्यामुळे, त्यांच्या वेगवेगळ्या आहार-विहारामुळे वेगवेगळ्या वंशांची निर्मिती होऊन मानवांत वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे अथवा वैशिष्ट्ये निर्माण झाली. यांशिवाय नैसर्गिक निवड पद्धतीमुळे परिस्थितीशी संघर्ष करून यशस्वी होणाऱ्या गुणधर्मांचा अनुवांशिकतेद्वारे संक्रमण चालू राहते आणि त्यातून वंशांची निर्मिती होते. काही अभ्यासकांच्या मतानुसार अंतःस्रावक ग्रंथींच्या कार्यानुसार वंशभिन्नत्त्व निर्माण होते; तर काहींच्या मते, आकस्मितपणे होणाऱ्या परिवर्तनामुळे वंश निर्मिती होते. भौगोलिक कारणाने विभागले गेलेले मानवी समूह किंवा समाज एकमेकांपासून वेगवेगळे अथवा अलग होतात. त्यामुळे त्यांच्यात अलगता (आयसोलेशन) निर्माण होऊन त्यांच्या शारीरिक लक्षणात फरक दिसू लागतो. अलगतेमुळे व स्थलांतरामुळे वेगवेगळे समूह एकमेकांच्या जवळ येऊ लागले, एकमेकांत मिसळू लागले व रोटीबेटी व्यवहारातून त्यांच्यात संकर, वांशिक संकर होऊ लागला आणि नवीन गुणधर्म प्रत्ययास येऊ लागले.

बहुउत्पत्ती सिद्धांत : वंशांची निर्मिती कोणत्याही एका कारणाने झाली नसून ते वेगवेगळ्या पूर्वजांपासून वेगवेगळ्या ठिकाणी झाली असावी; परंतु या मतालाही फारसा शास्त्राधार नाही.

वरील दोन्ही सिद्धांत वंशनिर्मितीची निश्चित उकल करू शकत नाही.

वंशाचे वर्गीकरण प्रामुख्याने तीन घटकांद्वारे केले जाते. एक, जे गुणधर्म नुसत्या डोळ्याने दिसू शकतात, आकलन होऊ शकतात अशी लक्षणे अथवा गुणधर्म. दोन, ज्याच्या अनुवांशिक गुणधर्माविषयी माहिती असून रक्तगटासारखे, शरीर क्रियाविषयक असतात. तीन, दुर्मिळ शारीरिक गुणधर्म किंवा काही वैगुण्य. उदा., रातांधळेपणा इत्यादी.

वंशीय वर्गीकरणाची वैशिष्ट्ये :

  • कातड्याचा रंग : मानवाच्या कातड्याच्या रंगाचे अनेक प्रकार आढळतात. रंगानुसार त्यात छटा निर्माण होतात. पॉल ब्रोका यांनी कातड्याच्या रंगाचे एकूण ३४ प्रकार असल्याचे म्हटले आहे.
  • केस : सरळ, कुरळे किंवा लोकरीसारखे हे केसांचे प्रकार आहेत. केसांचे विविध रंग असून त्याच्या वेगवेगळ्या छटा आढळतात. उदा., जाडेभरडे, मध्यम किंवा पातळ केस; तुरळक, अति कमी, मध्यम, विपुल, दाट केस इत्यादी. वंशीय वर्गिकरणामध्ये मानवाच्या डोक्यावरचे, छातीवरचे, दाढी आणि अंगावरचे केस लक्षात घेतात. त्याप्रमाणे केस आडवा कापला असता त्याचा होणारा गोलाकार किंवा लंबवर्तुळाकार छेद विचारात घेतला जातो.
  • डोक्याचा आकार : मानवशास्त्रामध्ये डोक्याच्या (मानवी कवटी) आकारमानाविषयी सखोल अभ्यास झाला आहे. डोक्याची लांबी, रुंदी, घेर अशी मोजमापे करून त्या आधारे लांब डोक्याचे, रुंद डोक्याचे, मध्यम डोक्याचे अशी वर्गवारी करता येते आणि वंशीय वर्गवारी केली जाते.
  • चेहरा : मानवी चेहऱ्याची लांबी, रुंदी मोजून त्याचे परस्परांशी असलेले प्रमाण लक्षात घेतले जाते. चेहऱ्याच्या निर्देशकांवरून रुंद चेहरा, मध्यम चेहरा, अरुंद चेहरा अशी चेहऱ्याची वर्गवारी करून वंशीय वर्गीकरण केले जाते.
  • नाक : मानवी नाकाची खोली, लांबी आणि रुंदी मोजून नाकाचा निर्देशांक काढला जातो. नाकाचेसुद्धा रुंद आणि पसरट नाक, मध्यम आकाराचे नाक आणि अरुंद चाफेकळी प्रकारचे नाक असे प्रकार असून त्यावरूनही वंशीय वर्गीकरण केले जाते.
  • डोळा : मानवी डोळ्याचा आकार, डोळ्याचा रंग, डोळ्याच्या पापणीवर असलेली घडी ही वैशिष्ट्ये वंशीय वर्गीकरणासाठी विचारात घेतली जातात; परंतु यावरून वर्गीकरण करणे अत्यंत अवघड असून ते चुकण्याची शक्यता असते. डोळ्याच्या पापणीवरील घडी ही प्रामुख्याने मंगोलॉइड लोकांत दिसते.

रक्तगट : मानवामध्ये ए., बी., एबी., ओ., आरएच. असे सकारात्मक (पॉझिटिव्ह) व नकारात्मक (निगेटिव्ह) रक्तगट आहेत. त्याप्रमाणेच इतरही काही रक्तगट पद्धती आहेत. रक्तगटांचे संक्रमण हे अनुवांशिकतेद्वारे होते. हवामान, अन्न, आजार या कोणत्याही घटकांमुळे त्यात कधीही बदल होत नाही. भूप्रदेशानुसार रक्तगटांचे काही प्रमाणात अधिक्य दिसते. त्यामुळे रक्तगटाचा उपयोग हा वांशिक वर्गीकरणासाठी केला जातो. अशा विविध घटकांचा विचार करून मानवी समाज विविध वंश, उपवंश यात विभागून वंश वर्गीकरण केले जात असे.

वांशिक गट : मानवी रंग, डोळे, नाक, डोके (कवटी) इत्यादींच्या आधारे निग्रो, मंगोल आणि युरोपियन सदृश असे वांशिक गट प्रथम मानण्यात आले. क्रोबर यांनी त्वचेच्या रंगारून गौरवर्णीय, पितवंशीय आणि कृष्णवर्णीय असे प्रकार मानले. यांशिवाय काही प्रकार हे अनिश्चित स्वरूपाचे आहेत; कारण त्याची वैशिष्ट्ये ही गुंतागुंतीची असल्याने त्याचे निश्चित वर्गीकरण शक्य होत नाही. हक्सली, हॉबेल यांनीही असेच वंश वर्गीकरण केले आहे. भाषाशास्त्रानुसार विविध भाषिक समूह किंवा भाषिक वर्गीकरणातून बोलीभाषेनुसार वंशांचे वर्गीकरण केले जाते. त्याचप्रमाणे मानवाच्या शरीराचा बांधा, हातापायांचे तळवे, बोटांवरील ठसे, त्यावरील शंख, चक्र, कमानी अशा खुणांवरूनही वांशिक वर्गीकरण केले जाते.

भारतातील मानवीय वंशात भौगोलिक रचनेनुसार शारीरिक विविधता पाहावयास मिळते. सर हर्बर्ट रिस्ले व प्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ बी. एस. गुहा यांनी वेगवेगळ्या पद्धतींद्वारे भारतीय समाजाचे वंश वर्गीकरण केलेले आहे; परंतु प्रागैतिहासिक काळापासूनच वंशांची सरमिसळ झालेली दिसते. रिस्ले यांनी इ. स. १९०१ च्या भारतीय जनगणनेच्या वेळी मानवी डोके (मास्तिष्कांक) व नाक (नासिकांक) यांच्या मोजमापाच्या आधारे भारतातील लोकांचे वांशिक वर्गीकरण केले आहे; तर गुहा यांनी इ. स. १९३१ च्या जनगणनेच्या अनुषंगाने वंश वर्गीकरण केले. या सर्व गटांचे उपप्रकारही आहेत; परंतु या प्रकार आणि उपप्रकारातून निश्चित आणि ठोस असे वर्गीकरण होऊ शकत नाही. कित्येक गुणधर्म हे ठराविक गटातच दिसतात असेही नाही. शिवाय या गुणधर्मांची एकमेकांत इतकी सरमिसळ झाली आहे की, यातून निर्णायक अभ्यास होऊ शकत नाही.

वांशिक वर्गीकरण तक्ता

अ.क्र मानवशास्त्रज्ञांचे नाव त्यांनी केलेले वांशिक वर्गीकरण
१. बी. एस. गुहा निग्रिटो, प्रोटो ऑस्ट्रेलॉईड, मंगोलॉईड, मेडिटेरॅनियन, नॉर्डीक
२. सर हर्बर्ट रिस्ले तुर्को-इराणीयन, इंडो-आर्यन, सिथो-द्रविडीयन, आर्यो-द्रविडीयन, मंगोलो-द्रविडीयन, मंगोलॉईड, द्रविडीयन
३. कूव्हिए कॉकेशियन (गोऱ्या वर्णाचे), मंगोल (पिवळ्या वर्णाचे), निग्रो (काळ्या वर्णाचे).
४. ब्लूमेनबाख कॉकेशियन, मंगोल, इथिओपियन, अमेरिकन, मलेयन.
५. हक्सली ऑस्ट्रेलॉईड, निग्रॉईड, मंगोलॉईड, झँथोक्रॉईक, मेलॅनोक्रॉईक.
६. डकवर्थ ऑस्ट्रेलियन, अंदमानी, यूरेशियाटिक, पॉलिनीशियन, ग्रीन लॅडिश, साऊथ आफ्रिकन, आफ्रिकन निग्रो.
७. ग्राफ्टन एलियट स्मिथन ऑस्ट्रेलियन, निग्रो, मंगोल, नॉर्डिक, अल्पाईन, मेडिटरेनियन.
८. योहान फ्रीड्रिख ब्लूमेनवाख कॉकेशियन, मंगोलियन, इथिओपियन, अमेरिकन, मलेयन.

 

औद्योगिक क्रांतीनंतर जसे युरोपियन लोक युरोप बाहेर पडून जगाची सफर करू लागले, तसतसे मानवाची विविधता, वेगळेपण लक्षात येऊ लागले. त्यातून वंश, वांशिकता, ज्येष्ठ, कनिष्ठ इत्यादी गोष्टींना चालना मिळू लागली. त्यातूनच वंशश्रेष्ठतावाद वाढीस लागला.

मानवशास्त्राच्या सुरुवातीच्या काळात दोन समाजातील शारीरिक लक्षणे अभ्यासून त्यांच्यातील जवळीक पाहणे, वंशवर्गीकरण करणे अशी प्रथा होती. यातूनच वंशश्रेष्ठतावाद, शुद्ध रक्ताचा वंश इत्यादी कल्पना उदयास आल्या. ज्यू आणि आर्यन वंश कल्पनेतून जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटले गेले. प्रत्यक्षात ज्यू वंश ही कल्पनाच चुकीची होती. मानवशास्त्रात होणाऱ्या वंशाच्या सखोल अभ्यासामुळे या शास्त्राला मानववंशशास्त्र असे म्हटले जाऊ लागले; परंतु विसाव्या शतकाच्या मध्यानंतर वंश ही संकल्पनाच नामशेष होऊ लागली आणि वर्गीकरणाचे महत्त्वही संपले. मानवशास्त्राला मानववंशशास्त्र म्हटल्याने मानवशास्त्राच्या व्यापकतेला मर्यादा येतात. त्यामुळे मानववंशशास्त्राऐवजी मानवशास्त्र ही संकल्पना अधिक विस्तृत आहे, असे मानवशास्त्रज्ञांनी अभ्यासाअंती निश्चित केले आहे.

गेल्या कित्येक वर्षांपर्यंत भौतिकी अथवा शारीरिक मानवशास्त्रात वंश संकल्पनेचा विचार मानवामानवांतील विविधता समजण्यासाठी आणि त्या विविधतेच्या स्वरूपाचे वर्णन करण्यासाठी एक उपयुक्त व निश्चित साधन म्हणून केला जात होता; परंतु अगदी अलीकडच्या काळामध्ये वंश ही संकल्पना कुचकामी आणि तकलादू मानली जाऊ लागली; कारण भौगलिक दृष्ट्या स्वतंत्र मानल्या गेलेल्या निरनिराळ्या वंशांतील महदंतर निश्चितपणे समजून येत नाही, उलट सध्या अस्तित्त्वात असलेल्या कित्येक मानवी गटांचे वंश वर्गीकरणाच्या उपलब्ध असलेल्या निकषांच्या आधारे शास्त्रीय दृष्ट्या वर्गीकरणही करता येत नाही. तसेच एखाद्या लक्षणाच्या आधारे एखाद्या गटाचे वंश वर्णन निश्चितपणे करता येईल, ही खात्री देता येत नाही. यामुळे शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेले वंश वर्गीकरण म्हणजे कित्येक वेळेला स्थानिक लोकगटांचे शतकानुशतके चालत आलेले सामाजिक वर्गीकरण असते. अशा अनेक कारणांमुळे वंश संकल्पनेवर टीका होऊ लागली. समीक्षकांच्या मते, ही संकल्पना संशोधनासाठी उपयुक्त नसून त्यामुळे मानवामानवांतील विविधता समजण्यासाठी अनेक अडथळे येतात. इतकेच नव्हे, तर त्यामुळे समाजावर दूरगामी दुष्परिणाम होण्याचे अधिक संभावना असते.

सर्वप्रथम वंश संकल्पनेला इ. स. १९४२ मध्ये ॲश्ली माँटेग्यू यांच्या मॅन्स मोस्ट डेंजरस मीथ : द फॅलिसी ऑफ रेस या ग्रंथरूपाने आव्हान केले. १९६० पर्यंत माँटेग्यू यांनी या संकल्पनेविरुद्ध एकाकी लढले. या काळात वंश संकल्पनेच्या विश्लेषणावर अनेक निबंध प्रसिद्ध होत होते; परंतु प्रत्यक्षात माँटेग्यू यांना कुणीही साथ दिली नाही. च्यांच्या मताशी अप्रत्यक्ष सहमत असणाऱ्यांनीही १९७० पर्यंत त्यांचा फारसा पाठपुरावा केला नाही; परंतु १९७० च्या आसपास विविध क्रमिक पाठ्यपुस्तकांमध्ये या नवीन संकल्पनेसंबंधीचे चित्र एकदम पालटून गेले आणि वंश संकल्पनेच्या फोलपणाची ही दुसरी बाजूही विचारात घेतली जाऊ लागली. हा वैचारिक बदल अनेक कारणानी उपयुक्त ठरला. भौतिकी मानवशास्त्रात शास्त्रशुद्ध व पारखून घेतलेले मतच प्रमाणभूत धरते, हे त्याचे पहिले व महत्त्वाचे कारण होय. त्याशिवाय मानवशास्त्रज्ञांनी लिहिलेली क्रमिक पुस्तके लोकमतावर खूप मोठा प्रभाव पाडतात. यामध्ये शिक्षक, त्यांचे विद्यार्थी आणि परिणामी समाज अंतर्भूत होतो. साहजिकच जुनाट कल्पना मागे पडतात. विशेषतः राजकीय क्षेत्रावरही याचा अप्रत्यक्षपणे प्रभाव पडतो. या कारणांमुळे वंश संकल्पनेत क्रांती घडवून आणणारे बदल महत्त्वाचे मानले पाहिजेत.

शास्त्रीय दृष्ट्या वंश संकल्पनेचा विचार तीन निरनिराळ्या कालखंडात केला गेला. त्यांपैकी पहिल्या कालखंडामध्ये वंशोप्तत्तीसंबंधी विचार केला गेला. वंश जरी निरनिराळे दिसत असले, तरी त्यांचा उगम एकच आहे की अनेक? हा महत्त्वाचा मुद्दा चर्चिला गेला व अनेक जननिक उगमाच्या विचाराला मान्यता मिळून त्यातून वांशिक उच्चनीचतेचा उगम झाला. हा सर्व भाग एकोणिसाव्या शतकापर्यंत येतो. एकोणिसाव्या शतकाच्या दुसऱ्या कालखंडामध्ये वांशिक भेदाभेव व एक जननिक विरुद्ध अनेक जननिक असे वाद सुरू झाले व या पार्श्वभूमीवर असमानतेच्या मुद्याला धरून असणाऱ्या लोकमताला विसाव्या शतकाच्या सुरुवातीला आव्हान देण्यास सुरुवात झाली. या शास्त्रीय चर्चेचे पडसाद सामाजिक जीवनावर होऊन, ‘प्रत्येक वंश आपापल्या परीने श्रेष्ठच आहे’, या मताची धारणा झाली. विसाव्या शतकाच्या मध्यात वंश संकल्पनेच्या मूळ कल्पनेलाच आव्हान दिले गेले आणि होमो सेपियनचे (म्हणजे मानवाचे) असे वंश असू शकतात काय? असे प्रश्न विचारण्यात येऊ लागले. याला ज्यांनी होकारार्थी उत्तर दिले, त्यांना फुटीर व अशास्त्रीय मानण्यात येऊ लागले. यांपैकी कून, गार्न, बर्डसेल व डोबझान्स्की हे महत्त्वाचे शास्त्रज्ञ होत. याउलट, याला ज्यांनी नकारार्थी उत्तर दिले व ‘वंश संकल्पना ही शास्त्रशुद्ध नाही’, असा विचार प्रगट केला, त्यांना प्रगत समजण्यात येऊ लागले. ही वंश संकल्पनेची अत्याधुनिक बाजू झाली. याबरोबरच वंश संकल्पनेची पहिली बाजू काय होती, तीही पहाणे उद्‌बोधक ठरेल.

प्राचीन व आधुनिक यूरोप आणि आशिया खंडांतील निरनिराळ्या देशांमध्ये एकेकाळी मोठ्या प्रमाणावर विषमता होती. त्याची कारणे मुख्यत्वे मानवामानवातील वैषम्य अगर उच्चनीचता, सामाजिक गटांतील सलोख्याचा अभाव, धार्मिकतेच्या नावाखाली आढळून येणारी असमानता अशा स्वरूपाची होती. या कारणांमुळे संघर्ष झाले; परंतु ‘वंशभेद’ असा प्रकार पूर्वी विरळच होता. पूर्वी ज्या लढाया झाल्यात वा एकमेकांविरुद्ध बलाबल वापरले गेले, त्याचे उद्दिष्ट नवीन प्रदेश बळकाविणे व त्याद्वारा आपले प्राबल्य वाढविणे इतपत मर्यादित होते. राष्ट्राच्या वा धर्माच्या प्रेमाखातर हौतात्म्य पतकरल्याची अनेक उदाहरणे आहेत. राज्यकर्त्यांच्या जुलमी कारभाराला कंटाळून त्यांच्याविरुद्ध उठाव केल्याचीही उदाहरणे आहेत. फ्रेंच राज्यक्रांतीतही वंशभेदाऐवजी जुलमी राज्यकर्ते व तथाकथित उच्च सामाजिक गटांविरुद्ध उठाव केलेला दिसतो; परंतु वरीलपैकी अगर वरील उदाहरणांसारख्या इतर प्रकारांमध्ये वंशाच्या उच्चनीचतेमुळे अगर शारीरिक गुणधर्माच्या विषमतेमुळे झगडे झालेले दिसत नाहीत. वंश संकल्पनेचा विचार तसा हीन व कमीपणाचा मानला जात होता. मग या वंशाची कल्पना उदयाला आली कशी? ‘आर्य वंशीय’ या संज्ञेचा प्रथमोच्चार सुप्रसिद्ध जर्मन भाषाअभ्यासक मॉक्समूलर यांनी केला. त्यातील विनाशात्मक अर्थ लक्षात आल्यानंतर सावरासावर करताना त्यांनी या उक्तीचा वापर सर्रास करू नये, असा सल्ला दिला. ‘वास्तविक, आर्य हे वंश नसून तो एक भाषा प्रकार आहे आणि ती भाषा वापरणारा जो गट तो आर्य वंशीय’, असा आपल्या म्हणण्याचा अर्थ असल्याचे स्पष्टीकरण मॉक्सम्यूलर यांनी दिले. माँटेग्यू यांच्या मते, हा शब्दप्रयोग ही एक ठळक दुर्दैवी घटना होती.

माँटेग्यू यांच्या मते, ज्या वेळी अमानवी कारवायांविरुद्ध चळवळी सुरू झाल्या, त्याच वेळी उच्च आणि नीच वंशकल्पनांचा उगम झाला असावा. असाहाय्य परिस्थितीतील लोकांना यूरोपातील अनेक व्यापाऱ्यांनी गुलामासारखी वागणूक देऊन आपले इप्सित साध्य करून घेण्यात अमानुष कृतींचा अवलंब केला. या अन्यायाविरुद्ध ज्या वेळी मोठ्या प्रमाणावर चळवळी सुरू झाल्या, त्या वेळी निसर्गानेच तुम्हाला नीच बनविले, त्यात आमचा काय दोष? अशा प्रकारचा सोयीस्कर युक्तिवाद सुरू झाला. नीचतेची लक्षणे काय? तर काळा रंग, दारिद्र्य व त्या मागोमाग येणारे अज्ञान इत्यादी; परंतु पुढे हा युक्तिवाद जेव्हा लंगडा पडू लागला, तेव्हा शारीरिक गुणावगुणांची उदाहरणे देण्यात येऊ लागली. गोरे लोक रंगाने गोरेपान, उंच, सरळ व लांबसडक नाकाचे, निळ्याभोर डोळ्याचे वगैरे लक्षणांचे असून निग्रो म्हणजे काळ्या रंगाचे, खुजे व काळ्याभोर डोळ्यांचे, बसक्या–रुंद व आखूड नाकाचे असल्याचे दाखले दिले गेले. या फरकांमुळे गोरे लोक म्हणजे उच्चवंशीय व बुद्धिमान मानले जाऊन निग्रो लोक नीच वंशीय व मंदबुद्धीचे मानले जाऊ लागले. या युक्तिवादाला समर्थपणे उत्तरे न देता आल्याने काहींनी हा युक्तिवाद मानला आणि गुलामी ही पत्करली. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, ग्रेगर मेंडलच्या आनुवंशिक शास्त्रातील मूलभूत संशोधनामुळे शारीरिक गुणधर्म हे आनुवांशिकता आणि वातावरणाचा परिणाम या दोन्ही गोष्टींवर अवलंबून असतात हे सिद्ध होऊन परत एकदा वंशभेदाविरुद्धच्या चळवळींना जोर आला. विसाव्या शतकाच्या मध्यापासून हे चित्र बऱ्याच प्रमाणात पालटत गेले.

पिढ्यांपिढ्या एकाच भौगोलिक वातावरणात राहात असलेल्या वंशाच्या लोकांत येणाऱ्या आनुवंशिकी लक्षणांचा व नैसर्गिक वातावरणाचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध असतो. त्यामुळे अतिउष्ण प्रदेशातील उष्णता सहन करण्याची ताकद अगर कडाक्याची थंडी सहन करण्याची क्षमता त्या त्या विशिष्ट वंशगटात भिन्न भिन्न असते; मात्र या घनिष्ट संबंधाचा सांस्कृतिक वर्तणुकीशी फारसा संबंध दिसत नाही. त्यामुळे एकाच वंशातील लोक जरी एकाच वातावरणात राहत असले, तरी मुलांच्या वाढीशी संबंधित असणाऱ्या वर्तवणुकीत फरक दिसतो; मात्र आनुवंशिकी लक्षणांमध्ये ज्याचे अस्तित्व जनुकामुळेच केवळ शक्य आहे, तेवढीच लक्षणे येतात. ज्या गोष्टी सहजासहजी पाहून, निरखून शिकता येतात, अशी लक्षणे या संबंधात नाहीत. उदा., भाषा, रुढी, प्रथा, सामाजिक गोष्टी अगर वैयक्तिक वर्तणूक इत्यादी. ही लक्षणे वंशगट जरी एकच असला, तरी व्यक्तिपरत्वे बदलू शकतात.

वरील लक्षणांमुळे वंशाची व्याख्या करण्यासाठी अगर वंशाचे स्वरूप ठरविण्यासाठी निकषाची गरज भासू लागली व त्यासाठी खूप प्रयत्न झाले. सध्या उपलब्ध असलेल्या निकषांचे सोयीच्या दृष्टीने दोन गटांत वर्गीकरण केले जाते. पहिला, जुने म्हणून गणलेले वंश निकष आणि दुसरा, नवीन निकष. साधारणपणे जुने व नवे यांची सांगड आनुवंशिकीच्या प्रगतीपूर्वीच्या व नंतरच्या निकषांनी घातली जाते. जुन्या मानल्या गेलेल्या निकषांमध्ये रंग (कातडीचा, डोळ्याचा, केसांचा वगैरे), केसांचा प्रकार, मानवमितीची काही मोजमापे, डोळे, नाक, ओठ या बाबतची अवलोकने इत्यादींचा समावेश होतो. नवीन निकष रक्तगट व त्यावर अवलंबून असणारी प्रकृती अगर विकृती याच्यांशी निगडित आहेत. यामुळे ए., ओ., बी., एबी. या रक्तगटांची विशिष्ट वंशातील टक्केवारी विचारात घेतली जाते. तसेच इतरही रक्तगट व त्यांचे शरीरातील प्रमाण व त्यांचा परिणाम इत्यादी गोष्टीही विचारात घेतल्या जातात. या नवीन निकषांमुळे वंशगटांच्या अभ्यासपद्धतीही बदलल्या. प्रयोगशाळेत निकष पडताळून घेतले जाऊ लागले. यामुळे मिश्रवंश समजणे सोपे गेले, तर मिश्रवंशात किती प्रमाणात मिश्रण आहे, तेही ठरविता येते. केवळ रक्तगटांचाच नव्हे, तर रक्तरुग्णांचाही अभ्यास करण्यात येऊ लागला व त्यामुळे विकृतीवस्थांची माहिती व त्यांची आनुवंशिकता समजून येऊ लागली. अशा अवस्था वंशप्रकार समजण्यास सोयीस्कर ठरतात. या पार्श्वभूमीवर दुसऱ्या महायुद्धाच्या परिणामांवर तोडगे शोधण्याच्या दृष्टीने युनेस्कोची स्थापना झाली. इ. स. १९४९ मध्ये विविध देशातील मानवशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञाची परिषद भरविण्यात आली व त्यांच्या निवेदनाद्वारे परिषदेचे निष्कर्ष प्रसिद्ध केले.

युनेस्कोचे निवेदन : वंशासंबंधीच्या अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांवर चर्चा करून वंशाचे स्वरूप काय असावे? व वांशिक भेदाभेद कोणकोणत्या तत्त्वानुसार प्रमाण मानावयाचे? हे ठरविण्यासाठी भौतिकी मानवशास्त्रज्ञांची व आनुवंशिकीविज्ञांची एक बैठक झाली. त्यांनी वंशांबाबत जे सविस्तर निवेदन तयार केले, ते प्रमाण मानण्यात येऊ लागले. त्यातील महत्त्वाचे व ठळक मुद्दे :

  • (१) सध्या हयात असेलेले सर्व मानव होमो सेपियन या एकाच जातीचे असून सर्वजण समाईक साठ्यामधून निर्माण झाले आहेत; मात्र समाईक साठ्यातून ते कधी व कसे वेगळे होत गेले; याबाबत दुमत आहे.
  • (२) गटागटांतील काही शारीरिक विषमता आनुवंशिकी संरचनेमुळे व काही वातावरणाच्या परिणामामुळे दिसून येते.
  • (३) राष्ट्रीय, धार्मिक, भौगोलिक, भाषिक व सांस्कृतिक गटांचा वंशगटांशी तसा काहीही संबंध नाही. निदान सांस्कृतिक लक्षणांचा असा संबंध दाखविणारा एकही दाखला देता येत नाही.
  • (४) निरनिराळ्या भौतिकी मानवशास्त्रज्ञांनी वंशवर्गीकरणाचे प्रयत्न केले आहेत. मुख्यतः तीन वंशगट असले पाहिजेत, असे सर्वानुमते ठरले. ते तीन गट म्हणजे कॉकेसॉईड, निग्रॉईड व मंगोलॉईड होत.
  • (५) मानसिक लक्षणांचा वापर वंशवर्गीकरणासाठी होऊ शकत नाही, असे सर्व मानवशास्त्रज्ञांनी मान्य केले आहे. बुद्धिगुणांक व व्यक्तीची प्रकृती यांसाठी प्रत्येकाच्या ठायी असणारी क्षमता व वातावरणाचा परिणाम याच महत्त्वाच्या गोष्टी ठरतात. हे एकाच वंशातील व्यक्तींचा अभ्यास करून दाखवून देण्यात आले आहे.
  • (६) आनुवंशिकी तत्त्वानुसार चालत आलेल्या गुणांमधील विषमतेचा, सांस्कृतिक विषमतेशी एक महत्त्वाचा घटक म्हणून काही संबंध नाही.
  • (७) शुद्ध वंश म्हणावा असा कोणताही पुरावा अद्याप उपलब्ध झालेला नाही.
  • (८) मानवी एकतेच्या दृष्टीकोनातून असे सुचविले जाते की, जन्मतःच सर्वजण समान असतात. नंतर जी असमानता दिसते, त्यासाठी उपलब्ध संधी, सामाजिक बंधने, कायद्याची बंधने इत्यादी गोष्टी जबाबदार असतात.

आजचा मानव हा होमो सेपियन असून ‘होमो’ या प्रजातीचा घटक आहे. एक प्रजात म्हणजेच त्यातील कोणत्याही विरुद्धलिंगी सदस्यात, जैविक संकर घडून निर्मितीक्षम प्रजा उत्पन्न होऊ शकते. याच जीवशास्त्रीय सिद्धांतामुळे वंश कल्पनेतील मर्यादा स्पष्ट होतात.

मानवजात ही सर्व एकच असून सर्व मानव होमो सेपियनचेच वंशज आहेत. निरनिराळ्या मानव गटात दिसणारे भेद हे भिन्न भौगोलिक परिस्थिती, भिन्न विकास प्रक्रिया यांमुळे दिसतात. जीवशास्त्रीय दृष्ट्या विचार करता या मानवाच्या वेगवेगळ्या गटात दिसणारे गुण हे त्यांच्या आनुवांशिक रचनेमुळेच असतात. यात जरी फरक असले, तरी साम्यही तितकेच असते. या मानवगटांत आंतरविवाह होणे सहज शक्य असले, तरी भौगोलिक, सांस्कृतिक अडथळ्यांमुळे ते होऊ शकत नाहीत. केवळ त्यामुळेच भिन्नभिन्न शारीरिक लक्षणे आढळतात. प्रत्येक समूहाचा जैविक इतिहास भिन्न असल्यामुळे त्यांची लक्षणे अबाधित राहतात. वंश कल्पनेमुळे समान शारीरिक गुणधर्माचा मानव गट अपेक्षित असला, तरीही हे गुणधर्म केवळ भौगोलिक, सांस्कृतिक विभिन्नतेमुळेच असतात. हे सर्व अगदी स्पष्ट आणि तर्कशुद्ध आहे. तरीही लौकिकार्थाने वंश म्हणजे एखादा राष्ट्रीय, धार्मिक, प्रादेशिक, भाषिक गट असे मानले जाते; परंतु असा शब्दप्रयोग करणे चुकीचे आहे. त्यामुळे या गटांना वंश म्हणण्याऐवजी ‘एथनिक ग्रुप’ म्हणजेच वांशिक गट म्हणता येऊ शकेल.

मानसिक वैशिष्ट्य, स्वभाव वैशिष्ट्य, व्यक्तिमत्त्व, चारित्र्य यांचा वंशाशी काहीही संबंध नाही. जगात शुद्ध असा वंश सापडणे अशक्य आहे; कारण वंश मिश्रण हे अखंडपणे चालू आहे. आनुवंशिकतेद्वारे जरी गुणधर्मांचे जतन होत असले, तरी वंश ही सामाजिक बाब असून जीवशास्त्रीय नाही. जीवशास्त्रीय दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या मनुष्य हा पृथ्वीतलावर एकच आहे.

युनेस्कोच्या या ठरावामुळे वंश कल्पना ही वस्तुस्थितीस धरून नसून ती पोकळ आणि अवास्तव कल्पना आहे हे नक्की, म्हणूनच मानवाच्या या सर्वांगीण अभ्यासाला मानववंशशास्त्र असे न म्हणता मानवशास्त्र म्हणणेच संयुक्तिक आहे.

संदर्भ :

  • आठवले, दिपाली, भारतीय समाजाचे मानवशास्त्र, मुंबई, १९९९.
  • मेहेंदळे, य. श्री., मानवशास्त्र : सामाजिक सांस्कृतिक, पुणे, १९६९.
  • शारंगपाणी, म. यु., सामाजिक मानवशास्त्र, पुणे, १९८०.
  • शौनक, कुलकर्णी, आदिम, पुणे, २००२.
  • Alice, Littlefield; Leonard, Libermann; Larry. T. Reynalds, The Potential Demise of Concept in Physical Anthropology, Current Anthropology. Vol. 23, No. 6,  Chicago, 1982.
  • Beals, R. L.; Hoijer, Harry, An Introduction to Anthropology, New York, 1959.
  • Benedict, Ruth, Race, Science and Politics, New York, 1959.
  • Cavalli−Sforza, L. L.; Bodmer, W. F. The Genetics of Humsn Populations, London, 1971.
  • Comas, Juan, Manual of Physical Anthropology, Springfild (III.), 1960.
  • Coon, C. S., The Origin of Races, London, 1962.
  • Coon, C. S., Living Races of Man, London, 1966.
  • Das B. M.,Outline of Physical Anthropology, Delhi, 1985.
  • Konopinski, Natalie, Doing Anthropological Research, London, 2014.
  • Garn, S. M., Readings on Race, Springfield, 1968.
  • Garn, S. M., Human Races, Springfield, 1969.
  • Hooton, E. A., Up from the Ape, New York, 1947.
  • King, J. C., The Biology of Race, New York, 1971.
  • Levin, M. G.; Michael, H. N., Ethnic Origins of the Peoples of Northeastern Asia, Toronto, 1963.
  • Lowie, R. H., The History of Ethnological Theory, London, 1966.
  • Majumdar, D. N., Races and Cultures of India, Bombay.1958.
  • Mead, Margaret etal, Science and the Concept of Race, New York, 1968.
  • Montagu, M. F. Ashley, Culture and Evolution of Man, Oxford, 1962.
  • Montagu, M. F. Ashley, Race and I. Q., London, 1975.
  • Oakley, K. P., The Problem of Man’s Antiquity: an Historical Survey, London, 1966.
  • Sarkar, R. M., Fundamental of Physical Anthropology, Calcutta, 1970.
  • Sharma R. N.; Sharma, R. K., Social Anthropology and Indian Tribes, Mumbai, 1987.
  • Shibutani, T.; Kwan, K. M., Ethnic Stratification, London, 1965.
  • UNESCO, Statement on Race, Washington, 1951.

 

समिक्षक : सं. ग्या. गेडाम