परिस्थितीचे आकलन करून घेऊन निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी व्यक्तीला केलेली मदत म्हणजे मार्गदर्शन. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्याकरिता मार्गदर्शनाची आवश्यकता असते. प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या कार्यात निश्चितच मार्गदर्शन घ्यावे लागते. मार्गदर्शन हे अनौपचारिक आणि प्रासंगिक असते. अनौपचारिक व अरचित पद्धतीने कोठेही, केव्हाही मार्गदर्शन करता येते. ते सल्ला, सूचना, आदेश, उपदेश अशा स्वरूपाचे असते. मार्गदर्शन हे वैदिक काळापासून करण्यात येत आहे. उदा., ‘श्रीकृष्णाने युद्धाच्या वेळी अर्जूनाला केलेले मार्गदर्शन आणि समुपदेश’.

रुथ स्ट्रँग यांच्या मते, ‘स्वत:ची व समाजाची उन्नती साधण्यासाठी स्वप्रयत्नाने सुप्त गुणसंशोधन करून विकास करण्यासाठी सहायक होणारी प्रक्रिया म्हणजे मार्गदर्शन होय’. माध्यमिक शिक्षण आयोगानुसार (मुदलीयार आयोग १९५२-५३) मार्गदर्शन हे केवळ व्यवसाय क्षेत्रापुरते मर्यादित नसून त्याचे अनेक विषयांमध्ये महत्त्व आहे. पैकी शिक्षणक्षेत्रात त्याचे मोठे योगदान आहे. विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याकरिता, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य आणि मार्गदर्शक या सर्वांच्या सहाकार्याने विचार-विनिमयातून-आकलनातून योग्य प्रकारे मार्गदर्शन दिले गेले पाहिजे. एकूणच विद्यार्थ्याला वा व्यक्तीला त्याच्या व्यक्तीगत, शैक्षणिक किंवा व्यावसायिक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी योग्य मार्गाची निवड करण्यासाठी दिलेला सल्ला, सुचविलेले मार्ग, केलेला उपदेश आणि दिलेली आज्ञा म्हणजेच मार्गदर्शन होय.

बदलती कुटूंब पद्धती, शहरीकरण, कृषी व औद्योगिक क्षेत्रातील क्रांती, बदलते शिक्षणप्रवाह, ताणतणाव इत्यादी घटकांचा प्रभाव व्यक्तिच्या जीवनावर होतो. त्यात उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याच्या हेतूने मार्गदर्शन केल्याने ती व्यक्ती निर्णय घेवू शकतो. त्याचा प्रमुख हेतू विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास घडवून आणणे, तो स्वत:ची समस्या निराकरण करण्यायोग्य क्षमता विकसित करणे, त्याच्या सुप्त गुणांना ओळखून त्यांच्या विकासासाठी साधनांची उपलब्धता करून देणे हा आहे.

मार्गदर्शनाचे स्वरूप : अध्यात्मापासून ते अंतराळ विज्ञानापर्यंत किंवा व्यक्तिगत जीवनात वाटचाल करताना अनेक समस्या येत असतात. त्यातून योग्य मार्ग मिळवा म्हणून त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ, अनुभवी, संशोधक, अधिकारी यांच्याकडून त्या कार्यक्षेत्राचे स्वरूप, त्यात येणाऱ्या संभाव्य अडचणी, समस्येवर मात कशी करायची? नियोजन, व्यवस्थापन, संघटन, कार्यपद्धती यात कोणते दोष निर्माण झाले ? ते दूर कसे करायचे? इत्यादी बाबतींत शास्त्रशुद्ध पद्धतीने मार्गदर्शन केले जाऊन पुनश्च कार्यरत होण्यासाठी प्रेरणा देणारा, मदत करणारा विचार जागृत केला जातो. मार्गदर्शन सक्तीऐवजी समस्येवर भर देते. ती सतत चालणारी प्रक्रीया असून त्यात साधारण व विशिष्ट प्रकारची सुविधा आहे. मार्गदर्शन हे वैयक्तिक तसेच सामूहिक स्वरूपात दिले जावून त्याद्वारे बालकांचा संपूर्ण विकास तसेच शैक्षणिक व व्यावसायिक समायोजनासाठी मदत होते. मार्गदर्शनाद्वारा व्यक्तीला समस्या निराकरण करण्यायोग्य बनविण्यावर भर असतो. मार्गदर्शन हे शालेय व्यवस्थेचे अभिन्न अंग आहे. मार्गदर्शन ही एक सतत चालणारी प्रक्रीया असून तिचा उद्देश व्यक्तीस स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत करणे हा असतो. त्यासाठी व्यक्तीस समायोजन करण्याची क्षमता प्राप्त होणे आवश्यक असते. समायोजन याचा अर्थ स्वत:शी, इतरांची व परिस्थीतीशी जुळवून घेणे होय.

मार्गदर्शनाची गरज : शिक्षण, उद्योग, व्यापार, कृषी, सहकार, संशोधन इत्यादी क्षेत्रांत प्रवेश करताना अथवा ते क्षेत्र निवडताना मनाशी एक ध्येय, लक्ष्य निश्चित करून एक कार्य पद्धती अंगीकारणे, त्या कार्याचे नियोजन-व्यवस्थापन करणे, आवश्यक ती संसाधने संघटित करणे यांकडे लक्ष द्यावे लागते; मात्र हे सर्व करूनसुद्धा जर कार्यात यश मिळत नसेल, तर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची गरज असते. त्यामुळे कार्यक्षेत्र निवडण्यापासून ते त्या क्षेत्रात यशस्वी होण्यापर्यंतच्या वाटचालीत मार्गदर्शनाची गरज निर्माण झाली आहे.

व्यक्तिगत दृष्टीकोनातून : शैक्षणिक विकास, व्यावसायिक परिपक्वता, अभिरुची, अभियोग्यता, कौशल्य इत्यादी बाबी विकसित करण्यासाठी व्यक्तिगत व सामाजिक विकास, स्व आकलन व समायोजनासाठी मार्गदर्शनाची गरज असते.

सामाजिक दृष्टीकोनातून : उत्तम जीवनासाठी, चांगली मूल्ये आणि शिष्टाचारयुक्त चांगले नागरिक निर्माण होण्यासाठी, मानवी बळाचा योग्य उपयोग होण्यासाठी, राष्ट्राच्या सेवेसाठी मार्गदर्शनाची गरज असते.

शैक्षणिक दृष्टीकोनातून : वैयक्तिक भेदांनुसार शिक्षण देण्यासाठी, संपादणूक पातळी टिकविण्यासाठी, शिस्त टिकवून ठेवण्यासाठी, गळती व स्थगनाची समस्या निराकरणासाठी मार्गदर्शनाची गरज असते.

मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून : व्यक्तिमत्त्व विकासासाठी, व्यक्तिगत भेदाचे महत्त्व समजण्यासाठी, मानसिक आरोग्यासाठी मार्गदर्शनाची गरज असते.

शहरी दृष्टीकोनातून : शैक्षणिक सुविधांचा लाभ होण्यासाठी, मनोरंजनाचा योग्य दृष्टीकोन विकसित होण्यासाठी, योग्य व्यवसायाची निवड आणि नियोजन करण्यासाठी मार्गदर्शनाची गरज असते.

ग्रामीण दृष्टीकोनातून : आर्थिक विकासासाठी, अंधविश्वास नष्ट करण्यासाठी, सामाजिक गतीशिलता राखण्यासाठी, राजनैतिक जागरुकता निर्माण होण्यासाठी मार्गदर्शनाची गरज असते.

राजनैतिक दृष्टीकोनातून : लोकशाहीची मूल्ये विकसीत होण्यासाठी, राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्यासाठी, आंतरराष्ट्रीय सामंजस्य विकसीत होण्यासाठी मार्गदर्शनाची गरज असते.

आर्थर जोन्स यांच्या मते, बदलत्या कौटुंबिक परिस्थितीमुळे, औद्योगिकीकरणामुळे, शिक्षणातील गळतीच्या कारणासाठी, फुरसतीच्या वेळेचा सदुपयोग होण्यासाठी, शैक्षणिक व्यवस्थेत बदल होत असल्यामुळे, त्या बदलांना समजून घेण्यासाठी, सामाजिक परिस्थतीत परिवर्तन होत असल्याने मार्गदर्शनाची गरज भासते.

मार्गदर्शनाचे पैलू : (१) मार्गदर्शन व्यक्तीला स्वत: विषयी आणि परिसराविषयीचे यथार्थ आकलन करण्यास मदत करते. (२) व्यक्तीच्या शैक्षणिक, व्यावसायिक व व्यक्तिगत समस्या सहजतेने सोडविण्यास मदत करते. (३) मार्गदर्शन व्यक्तिला स्वत:ची क्षमता, बुद्धिमत्तेचा स्तर, अभिरुची, अभियोग्यता, अस्मिता, मूल्ये आणि परिपक्वतेचा स्तर इत्यादी जाणून घेण्यास मदत करते. (४) व्यक्तीला अधिक उपयुक्त आणि अपेक्षित मार्गाने आपल्या गरजा पूर्ण करण्यास मदत करते. (५) व्यक्तिसमोर असणाऱ्या विविध पर्यायांमधून शहाणपणाने योग्य पर्याय निवडण्यास मदत करते. (६) व्यक्तीला बाहेरील जगताबद्दलची तार्किक, यथार्थ व शाश्वत माहिती प्राप्त करून देते. (७) व्यक्तीला स्वत:च्या क्षमता कमाल पातळीपर्यंत उंचावण्यास मदत करते. (८) व्यक्तीला अधिक उपयुक्त आणि अपेक्षित मार्गाने आपल्या गरजा पूर्ण करण्यास मदत करते. (९) व्यक्तीस समाधानी होण्यास मदत करते. (१०) व्यक्तीला त्याच्या क्षमता आणि पात्रतेनुसार शहाणे बनविण्यास मदत करते. (११) व्यक्तीच्या स्व प्रयत्नांना उत्तेजन देते.

मार्गदर्शनाची माध्यमे : (१) व्यक्ती : गुरू किंवा मार्गदर्शक यांचे स्थान आणि मार्गदर्शन अनन्य साधारण आहे. प्रत्येक क्षेत्रात नामवंत, अनुभवी, संशोधक, तज्ज्ञ अशा व्यक्ती असतात. त्यांच्याकडे त्यांच्या सोयीनुसार प्रत्यक्ष जाऊन आवश्यक ते मार्गदर्शन प्राप्त करू शकतो. अनेकदा अशा तज्ज्ञांची आपल्या क्षेत्रातील वा संस्थेतील सर्वांना उपयोगी होईल असे मार्गदर्शनपर व्याख्यानही आयोजित करून सामुहिक मार्गदर्शनाचा लाभ घेता येतो.

(२) लिखित साहित्य : प्रत्यक्ष मार्गदर्शकाकडे न जाता ग्रंथसाहित्यातूनही मार्गदर्शन प्राप्त केले जाते. पूर्व सुरींनी विविध विषयांवर लिहिलेले ग्रंथ, महापुरूषांचे चरित्र, अनेक क्षेत्रात नेत्रदीपक यश प्राप्त करणाऱ्या व्यक्तींची आत्मचरित्रे इत्यादी साहित्यांतून प्रेरणा, मार्गदर्शन प्राप्त करता येते. शालेय, महाविद्यालयीन, स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या त्या विषयांच्या मार्गदर्शिका उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे मार्गदर्शकाकडे न जाता आपल्या सवडीनुसार ग्रंथातून मार्गदर्शन मिळविता येते.

(३) महाजाल व दृक-श्राव्य साधने : आज दृक-श्राव्य माध्यमे, संवाद माध्यमे, महाजाल इत्यादी नवनवीन तंत्रज्ञानावर ज्ञानाचा विपूल साठा उपलब्ध आहे. त्यामुळे एक टिचकी (क्लिक) मारताच आपल्या कार्याशी संबधीत मार्गदर्शन महाजालकावर उपलब्ध होऊ शकते. या माध्यमांचा आज मोठ्या प्रमाणात मार्गदर्शनपर वापर होत आहे.

(४) मार्गदर्शन केंद्रे : नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनात वृद्धी कशी करायची, याचे विविध विषयाच्या संदर्भात मार्गदर्शन गावपातळीपर्यंताच्या व्यक्तींना होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने आज शासनाने जिल्हा, तालुका पातळीवर विविध विषयाच्या संदर्भात मार्गदर्शन केंद्राची उभारणी केली आहे. खाजगी स्तरावर देखील औद्योगिक मार्गदर्शन केंद्र, कृषी मार्गदर्शन केंद्र इत्यादी स्थापन झाली आहेत. या मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून त्या त्या क्षेत्रातील कार्यकर्त्याला मार्गदर्शन देण्याची सोय उपलब्ध झालेली आहे.

(५) प्रकल्प वा क्षेत्र भेट : एखादी शाळा आदर्श करायची असेल, तर आदर्श शाळा म्हणून ज्या शाळांनी लौकिक प्राप्त केला आहे अशा शाळाना भेट दिल्यास उत्तम मार्गदर्शन व प्रेरणा मिळू शकते. नवे ज्ञान, तंत्रज्ञान, वापरून सृजनशील व्यक्ती किंवा एखादी संस्था त्या त्या क्षेत्रात नाविण्यपूर्ण प्रयोग, प्रकल्प राबवीत असतात. त्या त्या प्रयोग, प्रकल्पांची माहिती आज सहज उपलब्ध होवू शकते. अशा प्रकल्पांना भेटी देऊन मार्गदर्शन प्राप्त करता येते.

मार्गदर्शनाचे प्रकार : व्यक्तीचा व समाजाचा विकास, व्यक्ती व समाजामध्ये समन्वय यांमुळे शैक्षणिक मार्गदर्शन, शैक्षणिक समुपदेशन, कौटुंबिक, नागरिकत्व, व्यावसायिक, आरोग्य, समाजसेवा, धार्मिक व तत्त्व चिंतनात्मक, करमणूक, स्वच्छता, नीतीयुक्त, सांस्कृतिक, संवर्धन इत्यादी मार्गदर्शन प्रकार समाजजीवनात दिसून येतात.

आज ज्ञान आणि तंत्रविज्ञानाच्या युगात क्षेत्रात क्रांती घडून आलेली आहे. त्यातून एक स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले आहे. अशा वेळी अडचणी, समस्यावर मात करून ध्येय सिद्धी करायची असेल, तर मार्गदर्शक व  मार्गदर्शनाशिवाय पर्याय नाही.

संदर्भ :

  • दुनाखे, अरविंद, शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन आणि समुपदेशन, पुणे, २०१५.
  • भंगाळे, शैलजा; महाजन, संगिता, मार्गदर्शन आणि समुपदेशन, जळगाव, २०१७.
  • भंगाळे, शैलजा; महाजन, संगिता, समुपदेशन मानसशास्त्र, जळगाव, २०१५.
  • सपकाळे, आरती; कोरडे, वैशाली, मार्गदर्शन आणि समुपदेशन, जळगाव, २०१७.
  • सरवदे, शशी, शैक्षणिक मार्गदर्शन आणि समुपदेशन, पुणे, २००८.

समीक्षक : अनंत जोशी; के. एम. भांडारकर