पेंढारकर, दामोदर ऊर्फ बाबूराव : (२२ जून १८९६ – ९ नोव्हेंबर १९६७). मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक. कोल्हापूर संस्थानचे तत्कालीन सहायक शल्यचिकित्सक गोपाळराव आणि राधाबाई पेंढारकर यांचे बाबूराव हे ज्येष्ठ सुपुत्र. त्यांचा जन्म कोल्हापूरात झाला व त्यांचे शालेय शिक्षणही कोल्हापूरात झाले. प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक भालजी पेंढारकर हे त्यांचे धाकटे भाऊ. तत्कालीन कोल्हापूरच्या कलासक्त वातावरणात कृष्णराव मिस्त्री, आबालाल रहिमान, अल्लादियाखाँ, मंजीखाँ यांच्यासारख्या कलाकारांना घडताना पाहत बाबूरावांवर कलेचे आणि रसिकतेचे संस्कार झाले.

बाबूराव पेंढारकर यांची एक भावमुद्रा

बाबूरावांनी चित्रमहर्षी बाबूराव पेंटर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’मध्ये प्रवेश करत सैरंध्री (१९२०) या पहिल्या मूकपटात विष्णूची लहानशी भूमिका करून अभिनयाचा श्रीगणेशा केला. पुढे सुरेखाहरण (१९२१), भक्त दामाजी (१९२२), वत्सलाहरण, सिंहगड (१९२३), कल्याण खजिना (१९२४) अशा मूकपटांच्या निर्मितीमध्ये बाबूरावांनी आपले सक्रिय योगदान दिले; पण १९२३ मधील एका कटू घटनेनंतर त्यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीला रामराम केला. १९२४ ते २९ हा काळ त्यांच्यासाठी अस्थिरतेचा होता. काही काळ पुण्यातल्या डेक्कन पिक्चर्स कॉर्पोरेशनमध्ये काढल्यानंतर त्यांनी भालजी पेंढारकर आणि पार्श्वनाथ आळतेकर यांच्याबरोबर मुंबईत ‘वंदे मातरम् फिल्म कंपनी’ची स्थापना केली (१९२६). या संस्थेचा भालजी पेंढारकर दिग्दर्शित वंदे मातरम् आश्रम हा चित्रपट केंद्रीय अभ्यवेक्षण मंडळाच्या (सेन्सॉर) बऱ्याच अडचणी पार करत प्रदर्शित झाला. १९२९ साली अस्थिरतेचा कालखंड संपून बाबूराव कोल्हापूरात नव्याने स्थापन झालेल्या प्रभात फिल्म कंपनीत व्यवस्थापकाच्या पदावर रुजू झाले आणि गोपाल कृष्ण (१९२९), राणी साहेबा अर्थात बजरबट्टू, खूनी खंजर, उदयकाल (१९३०), जुलूम, चंद्रसेना (१९३१) या मूकपटांच्या निर्मितीची बाजू त्यांनी सांभाळली. यातल्या बजरबट्टूमध्ये बाबूरावांना खलनायकाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. ती अतिशय चांगली वठली. बाबूरावांनी लिहिलेल्या उदयकालचे दिग्दर्शन व्ही. शांताराम यांनी केले होते.

भारतीय चित्रपट बोलू लागल्याच्या नव्या वळणावर प्रभात ही संस्थाही बोलपटाकडे वळली. अयोध्येचा राजा (१९३२) या पहिल्या मराठी बोलपटात बाबूरावांना गंगानाथ महाजन या लोभी खलनायकाची भूमिका मिळाली. या पौराणिक चित्रपटात गोविंदराव टेंबे, नवोदित दुर्गा खोटे, मा. विनायक आणि बुवासाहेब हे त्यांचे सहकलाकार होते. या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीला नवे वळण दिले. व्यावसायिक दृष्ट्या तो अतिशय यशस्वी ठरल्याने प्रभातला स्थैर्य मिळाले. बाबूरावांची वरकरणी सुसंस्कृत पण अतिशय कपटी सावकाराची भूमिका इतकी परिणामकारक ठरली, की चित्रपटगृहात प्रेक्षक त्यांच्या या भूमिकेला शिव्याशाप देत असत. पूर्वीच्या चित्रपटातले खलनायक जोरजोरात हातवारे करून मोठ्याने गर्जत असत; पण बाबूरावांनी बारीकसारीक लकबींसह वेगळा खलनायक अभिनित केला. म्हणून बोलपटातली त्यांची ही पहिलीच भूमिका त्यांच्या उत्कृष्ट भूमिकांपैकी एक मानली जाते.अयोध्येचा राजा या चित्रपटासह अग्निकंकण (मराठी, जलती निशानी  – हिंदी, १९३२), मायामच्छिंद्र (१९३२), सिंहगड (१९३३), सैरंध्री (१९३३) आणि सीताकल्याणम् (१९३३) अशा सात बोलपटांची निर्मिती प्रभातमध्ये झाली. या सर्व चित्रपटांमध्ये बाबूरावांनी भूमिका केल्या. सीताकल्याणम् या तमिळ चित्रपटाचे दिग्दर्शन बाबूरावांनी स्वतंत्रपणे केले. हा चित्रपट यशस्वी झाला आणि तेव्हाच्या मद्रास प्रांतात बाबूरावांची ख्याती पसरली. पुढे प्रभातने आपले बस्तान पुण्याला हलवायचे ठरवले. तेव्हा संस्थेसाठीचे महत्त्वाचे व्यवहार करण्याची जबाबदारी बाबूरावांनी पार पाडली; पण प्रत्यक्षात कोल्हापूर सोडून पुण्याला बिऱ्हाड करणे परवडण्यासारखे नव्हते, म्हणून त्यांनी प्रभात सोडली.

कोल्हापूरचे छत्रपती राजाराम महाराज यांच्या पुढाकाराने ‘कोल्हापूर सिनेटोन’ या चित्रपटनिर्मिती संस्थेची कोल्हापूरात स्थापना झाली (१९३३). भालजी, बाबूराव, मा. विनायक आणि लीलाबाई पेंढारकर हे सर्वजण या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात सामील झाले. या संस्थेच्या आकाशवाणी या पहिल्या चित्रपटात बाबूरावांची प्रमुख भूमिका होती. त्यापुढच्या विलासी ईश्वर (मराठी, निगाह ए नफरत  – हिंदी, १९३५) या सामाजिक चित्रपटातही त्यांनी भूमिका केली. पुढे सरकारी नोकरशाहीला कंटाळून वरील सर्वजण या संस्थेतून बाहेर पडले. त्यानंतर बाबूराव, मा. विनायक आणि नावाजलेले छायाचित्रणकार पांडुरंगराव नाईक या तिघांनी मिळून ‘हंस पिक्चर्स’ या चित्रपटनिर्मिती संस्थेची स्थापना केली. वि. स. खांडेकरांच्या कथेवर आधारित छाया हा या संस्थेचा पहिला आणि मराठीतला पहिला सामाजिक शोकांत चित्रपट. त्यापुढचे धर्मवीर (१९३७) आणि प्रेमवीर (१९३९) हे आचार्य अत्रे लिखित कथांवरील चित्रपट यशस्वी झाले. त्यानंतरच्या ज्वाला चित्रपटामुळे ही संस्था डबघाईला आली. तेव्हा बाबूरावांनी न डगमगता ब्रह्मचारी (१९३८), ब्रॅंडीची बाटली (१९३९) यांसारखे एकाहून एक सरस चित्रपट निर्मिती करून संस्थेला पुन्हा सुस्थितीत आणले. त्यानंतरच्या देवता, सुखाचा शोध (१९३९) या चित्रपटांत त्यांनी नायकाच्या भूमिका तर अर्धांगी (१९४०) या चित्रपटात बेछूट, इरसाल खलनायकाची भूमिका केली. पुढे ‘हंस’चे रूपांतर ‘नवयुग चित्रपट’ या लिमिटेड कंपनीत झाले. त्यानंतरच्या लपंडाव (१९४०) आणि अमृत (१९४१) या चित्रपटांत त्यांनी प्रमुख भूमिका केल्या. त्यानंतर काही कालावधीतच अंतर्गत बेबनावामुळे ते ‘नवयुग‘मधून बाहेर पडले.

नवयुगमधून बाहेर पडल्यावर बाबूरावांनी शेठ गोविंदराम सक्सेरिया, ‘फिल्म इंडिया’चे बाबूराव पटेल, डी. के. पारकर यांच्यासोबतीने ‘न्यू हंस’ या चित्रपटनिर्मिती संस्थेची स्थापना केली. संस्थेचे विश्राम बेडेकर लिखित-दिग्दर्शित पहिला पाळणा (१९४१), भक्त दामाजी, पैसा बोलतो आहे (मराठी, नगद नारायण – हिंदी) हे चित्रपट त्यातल्या नावीन्यपूर्णतेमुळे प्रेक्षकांनी उचलून धरले. पण पुढे पटेलांशी विसंवाद झाल्याने बाबूरावांनी राजीनामा दिला. यानंतर त्यांनी बाहेरच्या चित्रपटांत कामे स्वीकारायला सुरुवात केली. इथून त्यांच्या अभिनय कारकीर्दीला नव्याने बहर आला. पहली नजर (१९४५), विक्रमादित्य (१९४६) असे चित्रपट करताकरता डॉ. कोटणीस की अमर कहानीमधला सहृदय जनरल त्यांनी साकारला आणि त्यांच्या चरित्रभूमिकांचे पर्व सुरू झाले. वाल्मिकी, जीना सीखो, रुक्मिणी स्वयंवर (१९४६), जीवनयात्रा (१९४७), शिलंगणाचे सोने (१९४९), मी दारू सोडली, कल्याण खजिना, संत कान्होपात्रा (१९५०), थोरातांची कमळा (१९६३), इये मराठीचिये नगरी (१९६५), आम्रपाली (१९६६) इत्यादी मराठी-हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. छत्रपती शिवाजी (१९५२), श्यामची आई (१९५३), महात्मा फुले (१९५४) या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. आचार्य अत्रेंच्या महात्मा फुले  या चित्रपटाचा मुहूर्त ३१ जानेवारी १९५४ रोजी डॉ. आंबेडकरांच्या हस्ते झाला. बाबूरावांनी व्रतस्थ राहून या भूमिकेसाठी जो अभ्यास आणि व्यासंग केला तो अभिनयाच्या विद्यार्थ्यांसाठी एक वस्तुपाठ समजला जातो. आचार्य अत्रेंनी या भूमिकेसंदर्भात ‘‘मला आपल्यासमोर साक्षात ‘ज्योतिबा’ आहेत, असा भास झाला’’ असे गौरवोद्गार काढले आहेत. त्यानंतर आलेल्या व्ही. शांताराम दिग्दर्शित आणि अभिनित दो आँखे बारह हाथ  (१९५६) या चित्रपटामध्ये त्यांनी कर्तव्यदक्ष तुरुंग अधीक्षकाची भूमिका केली. पुढे या दोघांनी मिळून ‘रंगमंदिर’ या नाट्यसंस्थेची स्थापना केली आणि केशवराव दाते दिग्दर्शित शिवसंभव (१९५९) या वैभवशाली नाटकाचे प्रयोग धडाक्याने सुरू केले. १९६० साली महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या दिवशी शिवनेरी किल्ल्यावर लाखो लोकांच्या समोर शिवसंभवचा प्रयोग करून ‘रंगमंदिर’ ने एक नवा इतिहास घडवला.

चित्रपट पत्रकार व अभिनेते अप्पा पेंडसे (गोविंद मोरेश्वर पेंडसे) या स्नेह्यांचा आग्रह, नवीन आव्हान आणि एका उपयुक्त संस्थेला मदत म्हणून बाबूरावांनी नाटकात काम करण्यास होकार दिला आणि त्यांच्या आयुष्यातले नवे पर्व सुरू झाले. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या मदतीसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या नाट्यमहोत्सवात बेबंदशाही या नाटकामधली संभाजीची भूमिका त्यांनी परिणामकारकपणे वठवली. त्यानंतर झुंजारराव या नाटकात नटवर्य चिंतामणराव कोल्हटकरांसारखे अनुभवी आणि कुशल दिग्दर्शक आणि स्नेहप्रभा प्रधान, कुसुम ठेंगडी, राजा परांजपे, के. नारायण काळे आणि वसंत ठेंगडी असे सहकलाकार बाबूरावांना लाभले. या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळाला (१९४९). तेथून बाबूरावांच्या मनात नाट्यनिर्मितीचे आकर्षण नव्याने निर्माण झाले आणि त्यांनी १९५३ मध्ये ‘नवनाट्यमंदिर’ या संस्थेची स्थापना केली. मग झुंजाररावबरोबर भावबंधन आणि एकच प्याला या नाटकांचेही दौरेही जोरात होऊ लागले. पण नाट्यगृहांचे भाडे आणि तेव्हाचा करमणूक कर इत्यादीमुळे व्यवसायाचे गणित फसले, तेव्हा बाबूरावांना ही संस्था बंद करावी लागली.

बाबूरावांनी चित्र आणि चरित्र  हे आत्मचरित्र आणि मनःशांतीची कबुतरे अशी दोन पुस्तके लिहिली. त्यांच्या चित्र आणि चरित्र या आत्मकथनात त्यांनी आपल्या चित्रपटसृष्टीचा इतिहास सांगितला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचा ऐतिहासिक दस्तावेज असणाऱ्या या आत्मचरित्राला महाराष्ट्र राज्य शासनाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे.

बाबूरावांचा विवाह कुमुदिनी रावल यांच्याशी झाला होता. त्यागराज, सुरेखा कागी, श्रीलेखा पेंडसे आणि श्रीकांत पेंढारकर ही बाबूरावांची चार मुले. त्यागराज पेंढारकर मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत छायाचित्रणकार म्हणून नावाजलेले होते. श्रीकांत पेंढारकर यांनी बाबूराव नावाचे झुंबर  हे पुस्तक संपादित केले. शशिकांत श्रीखंडे यांनी अभिनयसम्राट व दिग्दर्शकांचे दिग्दर्शक बाबूराव पेंढारकर या पुस्तकातून त्यांचा जीवनप्रवास उलगडून दाखवला आहे.

पंचेचाळीस वर्षांच्या कारकीर्दीमध्ये बाबूरावांच्या नावावर सात मूकपट, एकोणपन्नास मराठी आणि एकवीस हिंदी चित्रपट आणि पाच नाटके आहेत. ज्या काळात चित्रपट हे माध्यम भारताला फारसे परिचित नव्हते, तेव्हा कोणतीच अनुकूलता, प्रशिक्षण आणि आर्थिक पाठबळ नसताना कलानिर्मितीच्या ध्यासाने झपाटलेल्या भालजी पेंढारकर, मास्टर विनायक आणि व्ही. शांताराम यांना जोडणारा एक दुवा म्हणून बाबूराव पेंढारकर मार्गदर्शकाच्या रूपाने कार्यरत झाले. या दिग्गज व्यक्तिमत्त्वांनी कलापूर्ण मूकपट, मग बोलपट आणि रंगीत चित्रपट निर्माण करून भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अतिशय मोलाची भर घातली. किंबहुना पुढच्या काळात आलेल्या सामाजिक चित्रपटांच्या लाटेमागे या सर्वांचा चित्रपटसृष्टीची दिशा बदलण्याचा एक जाणीवपूर्वक विचार निश्चितच पथदर्शी होता. कलेला समर्पित जीवन जगलेल्या सर्जनशील व्यक्तिमत्त्वाच्या बाबूरावांचे मिरज येथे कर्करोगाने निधन झाले.

संदर्भ :

  • पेंढारकर, प्रभाकर, निर्मिती : दो आँखे बारह हाथ, २०१३.
  • पेंढारकर, बाबूराव, चित्र आणि चरित्र, आवृत्ती तिसरी, मुंबई, २०१८.
  • व्ही. शांताराम चलचित्र शास्त्रीय अनुसंधान व सांस्कृतिक प्रतिष्ठान, शतक महोत्सवी मराठी चित्रसंपदा (१९१३-२०१३ ), मुंबई, २०१४.

समीक्षक : अरुण पुराणिक