मित्रा, सुब्रता : ( १२ ऑक्टोबर १९३० – ७ डिसेंबर २००१). प्रसिद्ध भारतीय चलचित्रणकार / प्रकाशचित्रणकार (Cinematographer). भारतीय सिनेसृष्टीतील महत्त्वाच्या चलचित्रणकारांमध्ये त्यांचे नाव प्राधान्याने घेतले जाते. चलचित्रणातील ‘परावर्तित प्रकाशयोजना’ (bounce lighting) या संकल्पनेचे ते जनक मानले जातात.

मित्रा यांचा जन्म पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात झाला. त्यांच्या आईचे नाव शांती आणि वडिलांचे नाव सुधांगशु भूषण मित्रा होते. त्यांचे शालेय शिक्षण कोलकात्यामधील बल्लीगंज शासकीय विद्यालयामध्ये झाले. त्यांनी विज्ञान शाखेतून पदवीचे शिक्षण घेतले. प्रसिद्ध फ्रेंच दिग्दर्शक झां रेन्वाँ (Jean Renoir) हे द रिवर  या चित्रपटाचे चित्रण करण्यासाठी कोलकाता येथे आले होते. त्यावेळी द रिवर  चित्रपटाच्या चमूबरोबर सुब्रता हे ही होते. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांना चलचित्रणकलेचा अनुभव मिळाला.

मित्रा यांची त्यावेळचे तरुण होतकरू दिग्दर्शक सत्यजित राय यांच्याशी भेट झाली आणि त्यांच्या पहिल्या पथेर पांचाली  या चित्रपटाचे चलचित्रण करण्याची संधी त्यांना मिळाली (१९५५). त्यांनी अथक परिश्रम आणि अभ्यासाअंती पथेर पांचाली  या चित्रपटात चलचित्रणासाठी नैसर्गिक प्रकाशाचा वापर केला. त्या काळातील भारतीय चित्रपटांत हा नवीनच प्रयोग होता. भारतीय चित्रपटसृष्टीला नवे वळण देणाऱ्या पथेर पांचालीचे जगभरात कौतुक झाले. पुढे सुब्रता मित्रा यांनी सत्यजित राय दिग्दर्शित अपराजितो, पारश पथ्थर, जलसाघर, अपूर संसार, देवी, कांचनजंघा, महानगर, चारुलता आणि नायक या नऊ चित्रपटांचे चलचित्रण केले. तसेच द हाऊसहोल्डर, शेक्सपियर वाला, द गुरू, बॉम्बे टॉकी (चारही चित्रपटांचे दिग्दर्शक – जेम्स आयव्हरी), द आर्क (दिग्दर्शक – तांग शु शुएन), तिसरी कसम (दिग्दर्शक – बासू भट्टाचार्य), न्यू दिल्ली टाइम्स (दिग्दर्शक – रमेश शर्मा) या चित्रपटांचे आणि इस्माईल मर्चंट दिग्दर्शित महात्मा अँड द मॅड बॉय या लघुपटाचे चलचित्रणकार म्हणूनही काम पाहिले आहे.

चित्रपटात घडणारी गोष्ट खोटी न वाटता वास्तवात घडते आहे, असा आभास प्रेक्षकांसमोर निर्माण करण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न असतो. त्यासाठी चलचित्रणकाराने चित्रपटाचे चलचित्रण करताना नैसर्गिक प्रकाशाचा योग्य वापर करून वास्तवाचा आभास निर्माण करण्यास दिग्दर्शकाला मदत केली पाहिजे, असे मित्रा यांचे मत होते. वास्तवतेचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांनी अपराजितो या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी ‘परावर्तित प्रकाशयोजना’ या संकल्पनेचा शोध लावला. त्या काळी स्टुडियोच्या आत चित्रित करण्यात येणाऱ्या दृश्यांचे चलचित्रण करताना विद्युतदिव्यांचा प्रकाश थेटपणे पात्रांच्या चेहऱ्यावर सोडला जात असे. अशाप्रकारे चित्रित करण्यात आलेली दृश्ये पडद्यावर पहाताना प्रेक्षकांना कृत्रिम वाटत असत. मित्रा यांनी हा विद्युतदिव्याचा प्रकाश आधी एका पांढऱ्या रंगाच्या कापडावर सोडून त्यावरून परावर्तित झालेला प्रकाश पात्रांच्या चेहऱ्यावर पडेल अशी योजना केली. अशाप्रकारे परावर्तित झालेल्या प्रकाशयोजनेमुळे दृश्याच्या खरेपणाचा आभास वाढण्यास मदत झाली. सुब्रता यांनी केलेला प्रकाशयोजनेचा हा प्रयोग त्यानंतर जगभरातील अनेक चित्रपटांमध्ये करण्यात येऊ लागला. मित्रा यांनी निर्माण केलेली ही शैली वास्तवाशी अधिक प्रामाणिक आणि आधुनिक विचारांची होती. मित्रा कृष्णधवल प्रकाशचित्रणात पारंगत होते, तसेच त्यांनी रंगीत चित्रपटांचेही चलचित्रण केले आहे. या कलेत स्वतःची अशी कलात्मक शैली निर्माण केल्यामुळे त्यांचे नाव एक महान चलचित्रणकार म्हणून आजही जगभरात नाव घेतले जाते.

मित्रा यांना १९८६ साली न्यू दिल्ली टाइम्स चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चलचित्रणकाराचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. तसेच त्याच वर्षी भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ हा उच्च नागरी सन्मान प्रदान करून त्यांच्या कलेचा गौरव केला. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीच्या सन्मानार्थ ‘इस्टमन कोडॅक लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड’ ने त्यांना गौरविण्यात आले (१९९२).

चित्रपट क्षेत्रातून संन्यास घेतल्यानंतर मित्रा यांनी १९९७ सालापासून त्यांच्या मृत्युसमयीपर्यंत कोलकाता येथील ‘सत्यजित राय फिल्म्स अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’ येथे चलचित्रणकलेचे प्रशिक्षण देण्याचे काम केले. त्यांचे कोलकता येथे निधन झाले.

संदर्भ :

समीक्षक : निखिलेश चित्रे