काश्मिरी केशर : (इं. सॅफ्रन क्रॉकस; लॅ. क्रॉकस सॅटायव्हस ; कुल – इरिडेसी). काश्मीरमधील १६०० ते १८०० मी. उंचीवरील पर्वतराजीत स्थानिक शेतकरी केशराची लागवड करतात. जगभरात केशराची मागणी मुख्यत्वे खाद्य पदार्थांना स्वाद आणण्यासाठी, सौंदर्य प्रसाधने आणि वैद्यकीय व्यवसायासाठी असते. श्रीनगर, बडगाम, पुलवामा इत्यादि ठिकाणी केशराची शेते आहेत; तर किश्तवाड हे केशरभूमी म्हणून ओळखले जाते. मध्य आशियातून आलेल्या प्रवाशांनी ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकात केशर येथे आणले, तेव्हापासून येथे शेती सुरू झाली. सन ६४७ मध्ये काश्मीरच्या राजाने चीनमधील सम्राटाला भेट म्हणून केशर दिल्याचा उल्लेख आढळतो.

केशर तीन प्रकारात उपलब्ध असते. १) लाच्छा केशर : कुक्षी फुलांपासून वेगळी केल्यावर प्रक्रिया न करता वाळवलेले, २) मोगरा केशर : कुक्षी वेगळी करून पारंपरिक प्रक्रिया केलेले आणि ३) गुच्छी केशर : कुक्षीचे गुच्छ करून धाग्याने जोडून हवाबंद डब्यात साठवलेले. या केशरांची किंमत प्रती ग्रॅम ८० ते ५०० रुपये असून जगातील इतर ठिकाणच्या तुलनेत दुप्पट ते तिप्पट महाग आहे. लांब आणि जाड कुक्षी (Stigma), नैसर्गिक गडद लाल रंग, दरवळून टाकणारा सुगंध, रसायन विरहित प्रक्रिया, रंग टिकण्याची क्षमता आणि किंचित कडवट चव (पिक्रो-क्रॉसीन; Picro Crosene) ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. काश्मिरी केशराला सन २०२० साली भौगोलिक ओळख देण्यात आली.


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.