रोग, कीड व तृण हे पिकांचे मुख्य शत्रू आहेत. यांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. त्यांच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशके, कीटकनाशके, तृणनाशके या पारंपरिक उपायांचा उपयोग केला जातो. परंतु, त्यामुळे पिकाचा उत्पादनखर्च वाढतो. शिवाय हवा व जमिनीचे प्रदूषण होते. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी अब्जांश तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो.

अब्जांश तंत्रज्ञान – कीटक नियंत्रण

रोग नियंत्रण : पिकावर विविध प्रकारचे रोग पडतात. उदा., टोमॅटोवरील करपा, द्राक्ष व गुलाब या पिकांवरील भुरी, गव्हावरील तांबेरा इत्यादी. या रोगांचे पारंपरिक पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी सामान्यत: रासायनिक व जैविक पद्धतींचा अवलंब केला जातो. रोग नियंत्रणासाठी वापरली जाणारी रसायने विषारी असतात. त्यांची पिकावर फवारणी करताना योग्य ती काळजी न घेतल्यास फवारणी करणाऱ्याला गंभीर स्वरूपाचे शारीरिक अपाय होऊ शकतात. प्रसंगी जिवासही धोका पोहोचू शकतो. पीक संरक्षणासाठी जैवनाशकांचा वापर हा एक पर्याय आहे. परंतु, ती पुरेशा प्रमाणात, स्वस्तात व बाजारात सहजरित्या उपलब्ध होत नाहीत.

कार्बन, चांदी, गारगोटी व ॲल्युमिनिअम सिलीकेट यांचे अब्जांश कण पिकावरील रोग नियंत्रणासाठी वापरले जातात. या अब्जाश कणांचे द्रावण तयार करून त्यांची फवारणी केली जाते. अनेक पिकावरील रोगांच्या नियंत्रणासाठी चांदीच्या अब्जांश कणांचा वापर केला जातो. लॅमसल यांनी १० पी.पी.एम. तीव्रतेच्या चांदीच्या अब्जांश कणांची गुलाबाच्या रोपांवर फवारणी केल्यास भुरी रोगाचे नियंत्रण होते, असे प्रयोगाद्वारे सिद्ध केले आहे (२०११). काळ्या मिरीवरील कवडी (Anthracnose) रोगाचे नियंत्रण १०० पी.पी.एम. तीव्रतेच्या चांदीच्या अब्जांश कणांच्या फवारणीने होते हेही त्यांनी दाखवून दिले.

झिंक ऑक्साइड व मॅग्नेशियम ऑक्साइड यांचे अब्जांश कण हे देखील जिवाणूनाशक आहेत. या अब्जाश कणांचे १०० पी.पी.एम. तीव्रतेचे द्रावण तयार करून त्यांची पिकावर फवारणी केली जाते. झिंक ऑक्साइड अब्जांश कण असलेल्या द्रावणाची फवारणी केल्याने बटाटा पिकावरील तुषारोग (Early blight of potato), डाळिंब व काकडी वर्गीय पिकांच्या पानावरील ठिपके, टोमॅटो पिकाची मुळकुज, केळी पिकावरील पनामा रोग इत्यादी रोगांचे नियंत्रण होते. टिटॅनियम ऑक्साइडचे अब्जांश कण काकडीच्या पिकावर फवारल्याने पानांवर त्यांचा पारदर्शक पातळ थर तयार होतो व ते जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य रोगांना प्रतिबंध करतात भात व मुग या पिकांवरील रोगांच्या नियंत्रणासाठी तांब्याच्या अब्जांश कणांचा वापर केला जातो.

कीड नियंत्रण : सिलिकाचे अब्जांश कण असलेल्या द्रावणाची फवारणी कीडग्रस्त पिकांच्या पानावर केल्यास अब्जांश कण किटकांच्या बाह्य आवरणामध्ये प्रवेश करतात. त्यामुळे किटकांचे बाह्यावरण विरघळून कीटकांच्या शरीरातील पाणी बाहेर जाते व किटक मरतात.

ऊसावरील ग्रब या किडीच्या नियंत्रणासाठी चांदीचे अब्जांश कण उपयुक्त ठरतात. टिटॅनियम ऑक्साइडचे अब्जांश कण हे भातावरील टोका तसेच मावा या किडींच्या नियंत्रणासाठी वापरले जातात. झिंक ऑक्साइडच्या अब्जांश कण फवारणीने शीतगृहातील पांढऱ्या माशीचे यशस्वीरित्या नियंत्रण होते असे सिद्ध झाले आहे. झिंक ऑक्साइड व ॲल्युमिनिअम ऑक्साइड यांचे अब्जांश कण २ मिग्रॅ. प्रती किग्रॅ. या प्रमाणात गहू, ज्वारी, बाजरी व इतर धान्यामध्ये मिसळल्यास साठवलेल्या धान्यातील किडींचे नियंत्रण होते

तृण नियंत्रण : अब्जांश कणांचा वापर केल्याने तृणनाशकांची क्षमता वाढून पीक उत्पादनात वाढ होते. जमिनीतील तृणांच्या बिया नष्ट करणे व त्यांच्या रुजण्यासाठी जेव्हा हवामान व जमिनीची अवस्था पोषक असेल तेव्हा त्यांना रुजण्यापासून प्रतिबंध करणे हा तृणांचा समूळ नायनाट करण्याचा एक सरळ सोपा मार्ग आहे. यासाठी ‘अब्जांश तृणनाशके’ वापरली जातात. ही तृणनाशके बनवताना अब्जांश कणांची कुपी तयार करून त्यामध्ये तृणनाशके भरतात. त्यांना ‘कुपिजन्य (Encapsulated) अब्जांश तृणनाशके’ म्हणतात. ती नैसर्गिक वातावरणात सुरक्षित राहतात व जेव्हा पाऊस होईल तेव्हा क्रियाशील होतात. या तृणनाशकांचा वापर माती, खत किंवा पाणी याद्वारे केला जातो. तसेच यांचा वापर करणाऱ्यास कोणताही शारिरीक धोका पोहोचत नाही. अब्जांश तृणनाशके पर्यावरणास हानी पोहोचवत नसल्याने ती पर्यावरणपूरक आहेत.

पहा : बीजविज्ञान आणि पीक उत्पादन.

संदर्भ :

  • Gogoi R., Dureja,P., and Singh, P.K. Indian Farming, 59(8): 7- 12, 2009.
  • Lamsal  K., Kim S. W.,  Jung J. H., Kim Y. S., Kim K. S. and Lee Y. S. Mycobiology 39(3): 194-199, 2011.
  • Shah M. A. and Towkeer A. Principles of nanosciences and nanotechnology,  Narosa Publishing House, New Delhi, 2010.

                                  समीक्षक : वसंत वाघ