एक प्रसिद्ध भारतीय सण व दीपोत्सव. पावसाळा संपून नवी पिके हाती आल्यानंतर हा सण येत असल्याने हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने कृषिविषयक आंनदोत्सवही आहे; तर सुख-समृद्धीचा उत्सव म्हणून व्यापारी, उद्योगपतींसह सर्व स्तरांतील लोक या सणाचे हर्षभराने स्वागत करतात. आश्विन वद्य त्रयोदशीपासून कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत प्रत्येक तिथीस आनंदकारक घटना घडल्या असल्यामुळे या पाचही दिवशी दीपमाला लावून हा उत्सव साजरा करतात. म्हणूनच दीपावली किंवा दिवाळी या नावाने हा सण ओळखला जातो.
काही लोकांची अशी श्रद्धा आहे की, चौदा वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले, ते याच दिवसांत. त्या वेळी अयोध्येतल्या प्रजेने दीपोत्सव केला आणि तेव्हापासून हा उत्सव दर वर्षी सुरू झाला. दिवाळीच्या उगमासंबंधी ऐतिहासिक कल्पना अशी आहे की, सम्राट अशोक यांच्या दिग्विजयाप्रित्यर्थ हा महोत्सव सुरू झाला. दुसरी कल्पना अशी की, सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य यांच्या राज्याभिषेक समारंभात जो दीपोत्सव करण्यात आला, तोच पुढे दर वर्षी साजरा करण्याची प्रथा पडली. भारतीय वाङ्मयात दीपावलीचे उल्लेख अनेक भिन्न भिन्न नावांनी आले आहेत. वात्स्यायनाच्या कामसूत्रात यक्षरात्रीनामक उत्सव म्हणजे दीपालिका उत्सव होय. श्रीहर्षाच्या नागानंद नाटकातील दीपप्रतिपदुत्सव म्हणजे दीपावालीचाच उत्सव आहे. नीलमतपुराणात यालाच दीपमाला उत्सव असे नाव दिले आहे. ज्ञानेश्वरी आणि लीळाचरित्र या ग्रंथांतही दिवाळी हा शब्द अनेकदा आढळतो.
या उत्सवात निरनिराळ्या दिवशी धार्मिक विधी केले जातात, ते असे :
धनत्रयोदशी : आश्विन वद्य त्रयोदशी. यमराजाने आपल्या दूतांना ‘या दिवशी जो दीपदान करील, त्याला अपमृत्यू येणार नाही’, असे सांगितल्याची कथा आहे. म्हणून या दिवशी मंगलस्नान करून दीप लावतात. आयुर्वेदाचा प्रवर्तक धन्वंतरी याचा जन्मही याच दिवशी झाल्याची कथा आहे. म्हणून वैद्य लोक या दिवशी त्याची जयंती साजरी करतात. धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी गोवत्सद्वादशी असते. यास ‘वसुबारस’ असेही म्हणतात. या दिवशी सुवासिनी सवत्स गाईची पूजा करतात. हा दिवसही दिवाळीचाच एक दिवस म्हणून मानला जातो.
नरकचतुर्दशी : आश्विन वद्य चतुर्दशीस नरकचतुर्दशी हे नाव आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध केला व त्याच्या बंदिवासात असलेल्या सोळा हजार स्त्रियांना बंधमुक्त केले. नरकासुराच्या रक्ताचा टिळा लावून कृष्ण सूर्योदयापूर्वी परत आला. त्या वेळी त्यास मंगलस्नान घालून ओवाळण्यात आले. याची स्मृती म्हणून सूर्योदयापूर्वी स्नान करून दिवे लावतात व आनंदोत्सव साजरा करतात. सत्यभामेने श्रीकृष्णाच्या साहाय्याने नरकासुराला मारले, अशीही एक कथा आहे.
लक्ष्मीपूजन : आश्विन वद्य अमावस्येच्या रात्री लक्ष्मीपूजन असते. या निमित्ताने अष्टदल कमलावर लक्ष्मीची स्थापना करून तिची पूजा करतात. लक्ष्मी हे सौंदर्याचे, प्रेमाचे व वैभवाचे प्रतीक आहे. संयमपूर्वक धन संपादन केले, तर मनुष्याचे कल्याण होते. यासाठी धनलक्ष्मीची या दिवशी पूजा केली जाते. लक्ष्मी या दिवशी सर्वत्र संचार करीत असते. जेथे स्वच्छता, मांगल्य, प्रकाश आढळेल, तेथे ती निवास करते, अशी समजूत असल्यामुळे या रात्री दिव्याची रोषणाई करतात. घरातील कचरा, घाण म्हणजे अलक्ष्मी दूर करणारी केरसुणी हिला लक्ष्मी मानून तिची पूजा करण्याची चाल काही ठिकाणी आहे.
जैन धर्मातही या दिवसाला महत्त्व आहे. या दिवशी महावीरांचे निर्वाण झाले. म्हणून जैन लोक या दिवशी सर्वत्र दिवे लावून हा दिवस पाळतात. महावीरांचा ज्ञानप्रकाश सर्वत्र पसरावा, हा उद्देश त्यामागे असावा.
बलिप्रतिपदा : कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हे नाव आहे. या दिवशी विष्णूने वामनावतार घेऊन बळिराजाला पाताळात लोटले. या दिवशी दीपदान करील त्याला यमयातना भोगाव्या लागणार नाहीत, असा वामनाने बळीला वर दिला. या दिवशी बलिपूजा करण्याचीही पद्धत आहे. बळीची अश्वारूढ प्रतिमा उंच जागी उभी करून तिच्या भोवती एकवीस दिवे मांडण्याचीही चाल आहे. बळीराजा देवांचा शत्रू असला, तरी तो दुष्ट नव्हता. अलोट दातृत्व आणि प्रजाहितदक्षता यांविषयी त्याची ख्याती होती. त्याचे राज्य हे सुराज्य होते. म्हणूनच ते पुन्हा प्रस्थापित व्हावे, अशी आकांक्षा या लोकाचारांत दिसते.
या दिवसापासून विक्रम संवत सुरू होतो. म्हणून याला दिवाळी पाडवा म्हणतात. हिंदूंच्या साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी हा अर्धा मुहूर्त आहे. या दिवशी पत्नीने पतीला ओवाळण्याची पद्धत आहे. गोवर्धनपूजा करण्याचीही प्रथा काही ठिकाणी आढळते. हा दिवाळीचा मुख्य दिवस मानतात.
भाऊबीज (यमद्वितीया) : कार्तिक शुद्ध द्वितीयेचे भाऊबीज हे नाव आहे. या दिवशी यम आपल्या बहिणीकडे गेला, तेव्हा तिने त्याला ओवाळले आणि आनंद व्यक्त केला. तेव्हापासून बहिणीने भावाला ओवाळण्याची चाल रूढ झाली, असे मानतात.
दिवाळीत विविध रंगीत आकाशदिवे लावण्याची प्रथा आहे. निरनिराळी मिष्टान्ने व फराळाचे पदार्थ करून त्यांचा देवांना नैवेद्य दाखवितात व आप्तजन आणि इष्टमित्र यांना फराळासाठी बोलावितात. फटाके, बाण, भुइनळे इ. उडवून सर्वजण या उत्सवाचा आनंद लुटतात. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण म्हणून मुले मातीचे किल्ले करतात.
संदर्भ :
- आर्यांच्या सणांचा इतिहास, व्ही. प्रभा आणि कंपनी, मुंबई, १९६४.
- ‘ऋग्वेदीʼ-दुभाषी, वामन मंगेश, आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास, वाई, १९७९.