ईस्टर किंवा पास्का (Pascha) हा ख्रिस्ती भाविकांचा आध्यात्मिक दृष्ट्या सर्वांत महत्त्वाचा सण. यहुदी धर्मप्रमुखांनी व रोमन अधिकाऱ्यांनी पॅलेस्टाइन भूमीतील कालवारी टेकडीवर प्रभू येशू ख्रिस्त यांना क्रूसावर खिळून मारले. तो दिवस गुड-फ्रायडे (शुभ-शुक्रवार) म्हणून पाळला जातो. परंतु त्याच्या तिसऱ्या दिवशी मृत्यूवर विजय मिळवून येशू ख्रिस्त यांनी अगोदरच भाकीत केल्याप्रमाणे ते पुनरुत्थित झाला. त्यांचे स्मरण म्हणून त्यानिमित्त जगभर ईस्टरचा सण साजरा केला जातो.

येशू ख्रिस्त यांचे पुनरुत्थान : लाकडी चौकटवरील तैलचित्र (१४९९-१५०२), साऊँ पाउलू म्यूझीयम ऑफ आर्ट, ब्राझील.

यहुदी कालगणनेच्या ‘निसान’ (एप्रिल-मे) महिन्याच्या पौर्णिमेनंतर येणार्‍या पहिल्या रविवारी ईस्टर हा सण पहिल्या शतकापासून साजरा केला जातो. तो यहुद्यांच्या वल्हांडण तथा ओलांडण (Passover) सणाशी जोडलेला आहे. यहुदी लोकांनी मोझेस यांच्या नेतृत्वाखाली ईजिप्तमधून फारो राजाच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन स्थलांतर केले. त्याचे प्रतीक म्हणून वल्हांडण हा सण यहुदी लोक पाळतात. या वल्हांडण सणाच्या आदल्या शुक्रवारी येशू ख्रिस्त यांना क्रूसावर खिळण्यात आले. म्हणून त्यांचे पुनरुत्थान किंवा ईस्टर त्या सणाशी जोडला गेला आहे.

ईस्टर हा ख्रिस्ती श्रद्धावंतांसाठी त्यांचा ‘ख्रिस्ती’ असण्याचा खोलवर विचार करायला लावणारा सण. म्हणून भाविक ईस्टरची खरी तयारी त्याआधी चाळीस दिवसांच्या प्रायश्चित्तकाळाने किंवा उपवासकाळाने (Lent) करतात. ‘लेन्ट’ हा शब्द ‘लेन्क्टॉर्न’ या अँग्लो-सॅक्शन शब्दावरून आलेला असून त्याचा अर्थ ‘वसंत ऋतू’ असा आहे. आत्मचिंतन करून, देवापासून दूर नेणाऱ्या गोष्टींचा त्याग करून स्वत:ला आध्यात्मिक दृष्ट्या ‘नवे’ करण्याचा प्रयत्न ख्रिस्ती श्रद्धावंत या दिवसांत करतात.

अगदी सुरुवातीच्या काळात अतिशय कडकडीत उपवास पाळले जात असत. रात्रीचे एकच भोजन घेतले जाई. मांसाहार पूर्णपणे वर्ज्य केला जात असे. नंतर मात्र इ. स. ३२५ साली नायसिया या नगरीत भरलेल्या ख्रिस्ती विश्वपरिषदेपासून चाळीस दिवसांच्या उपवासाची परंपरा सुरू झाली. ईस्टरच्या चाळीस दिवस आधी ‘राखेचा बुधवार’ (Ash Wednesday) पाळला जाऊ लागला. त्या दिवशी धर्मगुरू ख्रिस्ती भाविकांच्या कपाळांवर राखेने क्रूसाचे चिन्ह रेखून त्यांना म्हणत ‘‘माणसा, माती तू आहेस आणि मातीत तू परत जाशील!’’ याद्वारे माणसाला जीवनाच्या क्षणभंगूरतेची आठवण करून दिली जाते व पश्चात्ताप करून देवाकडे वळण्याचे आवाहन केले जाते. या ‘राखेच्या बुधवार’पासून उपवासकाळाला सुरुवात होते. पूर्वी सलग चाळीस दिवस उपवास केला जायचा. नंतर फक्त शुक्रवारी उपवास पाळला जाई. अलीकडच्या बदलत्या काळात उपवासाचे निर्बंध आणखी शिथिल केले गेले आहेत. फक्त ‘राखेचा बुधवार’ व ‘गुड फ्रायडे’ हे दोनच दिवस उपवासाचे आहेत, असे चर्च आवाहन करते. इतर दिवशीचे उपवास ऐच्छिक ठेवण्यात आले आहेत. मात्र कित्येक भाविक संपूर्ण चाळीस दिवस एकभुक्त राहतात. कुणी मांसाहार पूर्ण वर्ज्य करतात. तर कुणी व्यसनांना आळा घालतात. त्यातून वाचलेली रक्कम गोरगरिबांना दान करतात. काहीजण या काळात वृद्धाश्रमांत, रुग्णालयांत जाऊन सेवाकार्य करतात.

उपवासकाळातील ‘चाळीस’ या आकड्याला बायबलचा संदर्भ आहे. ‘जुन्या करारा’त मोझेस तसेच एलिया यांनी चाळीस दिवस व चाळीस रात्री उपवास करून प्रार्थना केल्याचे वाचावयास मिळते. त्याचप्रमाणे ‘नव्या करारा’त येशू ख्रिस्त यांनीही आपल्या कार्याला सुरुवात करण्यापूर्वी चाळीस दिवस एका टेकडीवर एकांतात प्रार्थना व उपवास केले. या प्रायश्चित्तकाळात ख्रिस्ती भाविक बायबलवाचन व मनन-चिंतन यांद्वारे आपल्या आध्यात्मिक जीवनात डोकावून पाहतात. आपले आचरण सुधारण्याचा प्रयत्न करतात. अनिष्ट गोष्टी करणे टाळतात. गोरगरिबांना दानधर्म करतात. सत्कृत्ये करून येशू ख्रिस्त यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात.

भाविकांच्या आत्मचिंतनाला पूरक ठरावे असे अनेक उपक्रम चर्चमध्ये या दिवसांत राबविले जातात. ‘राखेच्या बुधवार’नंतरच्या प्रत्येक रविवारी चर्चमध्ये ‘पासाची भक्ती’ (मूळ लॅटिन शब्द ‘पास्सो’ म्हणजे क्लेश) आयोजित केली जाते. या वेळी येशू ख्रिस्त यांच्या दु:खसहनाच्या चौदा निवडक दृश्यांद्वारे भाविकांना आपले दैनंदिन जीवन तपासून पाहण्यासाठी ‘पवित्र क्रूसाची वाट’ (Stations of the Cross) ही भक्ती आयोजित केली जाते.

उपवासकाळाचा अखेरचा आठवडा हा ख्रिस्तसभेत पवित्र आठवडा (Holy Week) म्हणून पाळला जातो. ख्रिस्ती भाविक या आठवड्यात येशू ख्रिस्त यांच्या दु:खसहनावर अतिशय गंभीरपणे आत्मचिंतन करतात. पापांबद्दल पश्चात्ताप करतात. धर्मगुरूंकडे पापनिवेदन करून ईस्टरची आध्यात्मिक तयारी करतात.

येशू ख्रिस्त यांचे पुनरुत्थान त्यांनी मृत्यूवर विजय मिळवून अखिल मानवजातीला तारण मिळवून दिल्याने ख्रिस्ती धर्मीयांत एक विजयोत्सव म्हणून साजरे केले जाते. जगातील सर्व आबालवृद्ध ख्रिस्ती लोक ईस्टर हा सण अत्यंत उत्साहाने साजरा करतात. चर्चवर आकर्षक रोषणाई केली जाते. तसेच क्रूस, कोकरू, अंडी इ. कलात्मक धार्मिक प्रतीकेही या सणाप्रीत्यर्थ तयार केली जातात. नवीन वस्त्रे परिधान करून ख्रिस्ती भाविक शनिवारी मध्यरात्री चर्चमध्ये प्रार्थनाविधीसाठी एकत्र जमतात. देवाने मानवजातीच्या तारणसाठी आखलेल्या योजनेची बायबलमधील उताऱ्यांच्या वाचनाद्वारे उजळणी केली जाते. धर्मगुरू प्रबोधनाद्वारे येशू ख्रिस्त यांचे पुनरुत्थान, दैनंदिन जीवनात नव्या जाणिवांनी जगण्याचे आवाहन करतात. या वेळी त्यांच्या विजयोत्सवाची विविध गायने गायिली जातात. प्रार्थनेनंतर भाविक एकमेकांना भेटून ‘हॅपी ईस्टर’ म्हणून शुभेच्छा देतात आणि नंतर घरगुती मेजवानी करून ईस्टरचा आनंद साजरा करतात.

संदर्भ :

  • Glarier, Michael; Helwiig, Monika, The Modern Catholic Encyclopedia, Bengaluru, 1994.
  • Lovasik, Rev. Lawrence G., Scriptural Homily Notes : Sunday Gospels, Divine Word Missionary, Lowa, 1971.
  • दिब्रिटो, फादर फ्रान्सिस, ख्रिस्ती सण आणि उत्सव, वस‌ई, १९९७.
  • दिब्रिटो, फादर फ्रान्सिस, सुबोध बायबल, पुणे, २०१०.
  • पंडिता रमाबाई, भाषांतरकार, पवित्र शास्त्र जुना व नवा करार, केडगाव, पुणे, १९२४.

समीक्षक : फ्रान्सिस कोरिया