इंग्लंडच्या उत्तरमध्य भागतील साउथ यॉर्कशर या परगण्यातील एक महानगरीय बरो आणि प्रगत औद्योगिक शहर. लोकसंख्या – शहर ५,८४,८५३; महानगर १५,६९,००० (२०१९ अंदाज). लंडनच्या वायव्येस २६० किमी., तर मँचेस्टरपासून पूर्वेस ६४ किमी.वर हे शहर आहे. पेनाइन या उच्चभूमीच्या पूर्व पायथ्याशी, निसर्गरम्य टेकड्यांच्या प्रदेशात हे शहर वसले
आहे. या शहराच्या परिसरातच डॉन नदीला तिच्या शीफ, पोर्टर ब्रुक, रिव्हेलिन व लॉक्सा या चार उपनद्या येऊन मिळतात. यांपैकी या शहरातून वाहणाऱ्या शीफ नदीवरून या शहराला शेफील्ड हे नाव देण्यात आले आहे. टेकड्याटेकड्यांचा प्रदेश आणि नद्यांची खोरी यांमुळे भौगोलिक दृष्ट्या हे शहर विखुरलेल्या स्वरूपात आहे. येथील हवामान थंड व आर्द्र असते. पश्चिमेस पेनाइन उच्चभूमी असल्यामुळे पश्चिमी वाऱ्यांपासून शहराचे संरक्षण झाले आहे. येथील वार्षिक सरासरी कमाल व किमान तापमान अनुक्रमे २०.८° से. (जुलै) व १°.६° से. (जानेवारी व फेब्रुवारी) असते. वार्षिक सरासरी पर्ज्यन्यमान ८२ सेंमी. आहे. इ. स. १८९३ मध्ये याला शहराचा दर्जा मिळाला.
हॉलमशरचे लॉर्ड विल्यम दे लव्ह्टॉट यांनी बाराव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात येथे एक किल्ला व पॅरिश चर्च बांधले. त्यांनाच शेफील्डच्या स्थापनेचे श्रेय दिले जाते. मध्ययुगापासून या परिसरात मिळणारे लोहखनिज वितळविण्यासाठी इंधन म्हणून सभोवतालच्या जंगलातून मिळणाऱ्या लाकडांपासून तयार केलेला लोणारी कोळसा वापरला जाई. लोहारकाम करणारे आणि चाकू, सुऱ्या इत्यादी तयार करणारे कटलरी व्यावसायिक धार लावण्याची चाके तयार करण्यासाठी स्थानिक रित्या उपलब्ध होणाऱ्या उत्तम प्रकारच्या वालुकाश्मांचा वापर करीत असत. चौदाव्या शतकापासून उत्तम प्रतीच्या चाकू, सुऱ्या इत्यादींच्या उत्पादनासाठी हे प्रसिद्ध ठरले आहे. पंधराव्या शतकात कटलरी वस्तुंची घडण आणि त्यांना धार लावणारी यंत्रे चालविण्यासाठी लागणारी ऊर्जा या श्हरात एकत्र आलेल्या प्रवाहांपासून मिळविण्यास सुरुवात झाली. कटलरी वस्तू उत्पादकांचे नियामक मंडळ म्हणून काम पाहणाऱ्या ‘कटलरी कंपनी’ची इ. स. १६२४ मध्ये येथे स्थापना करण्यात आली. सतराव्या शतकात कटलरी वस्तुंच्या निर्मितीत शेफील्ड अग्रेसर होते; परंतु त्या वेळी येथील उद्योगांना लंडनच्या उद्योगांशी तीव्र स्पर्धा करावी लागत होती. तरीही कटलरी वस्तुनिर्मितीत लंडनवर मात करत शेफील्डने आपली मक्तेदारी प्रस्थापित केली.
शेफील्डचे प्रसिद्ध कटलरी टॉमस बोल्सव्हर यांनी अंदाजे इ. स. १७४२ मध्ये तांबे आणि चांदी यांच्या मिश्रणाने मुलामा करण्याची प्रक्रिया शोधून आपल्या ‘शेफील्ड प्लेट’ची निर्मिती केली. या प्लेटपासून विविध वस्तुंची निर्मिती केली जाई. लोह-पोलाद उद्योगातील महत्त्वपूर्ण नव्या कल्पनांचा शोध आणि नव्या तंत्रज्ञानाचा विकास यांमुळे औद्योगिक क्रांतीच्या काळात या शहराने महत्त्वाची भूमिका पार पाडली. येथील धातुकर्म उद्योगांत वेगवेगळ्या नव्या कल्पनांचे प्रयोग केले जात. त्याचा फायदा येथील उद्योगांच्या विकासास झाला. इ. स. १७४० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात बेंजामीन हंट्समन यांनी पोलादनिर्मितीत मूस (क्रुसिबल) पद्धती विकसित केली. कटलरी वस्तुंच्या निर्मितीसाठी लगणाऱ्या पोलाद निर्मितीतील ही भरंवशाची पद्धत ठरली. त्यामुळे इ. स. १८३० मध्ये जगातील उच्च दर्जाच्या पोलादनिर्मितीचे केंद्र म्हणून शेफील्डची ओळख झाली. त्यामुळेच शेफील्डचा ‘स्टील सिटी’ म्हणून उल्लेख केला जाऊ लागला. हेन्री बेसेमर यांनी पोलाद निर्मितीत आपली नवीन बेसेमर पद्धत शोधून काढली. बेसेमर पद्धतीची पहिली चाचणी इ. स. १८५६ मध्ये येथील पोलाद कारखान्यात घेतली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर स्वस्त पोलाद तयार करणे शक्य झाले. या यशस्वी प्रयत्नामुळे त्यांच्या अवजड पोलाद उद्योगाची प्रचंड भरभराट झाली. निष्कलंक पोलाद (स्टेनलेस स्टील) तयार करण्याची प्रक्रियासुद्धा येथेच सुरू झाली (इ. स. १९१२). शेफील्डच्या ओतीव पोलादाच्या गुणवत्तेची कीर्ती यूरोप-अमेरिकेत दूरवर पसरली होती. त्यामुळे एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत येथील तीक्ष्ण हत्यारे आणि कटलरी उत्पादनांना अधिक पसंती दिली जात होती.
विसाव्या शतकाच्या अखेरीस येथील औद्योगिक विकासाची गती काहीशी मंदावली होती; मात्र आजही पोलाद, कटलरी वस्तू आणि यंत्रसामग्री यांच्या निर्मितीत हे ब्रिटनमधील प्रमुख केंद्र आहे. त्याशिवाय शहरात चांदीचे पट्ट, चांदीच्या मुलाम्याची भांडी, विद्युत विलेपनयुक्त वस्तू, तोफखाना व रेल्वेसाठीचे साहित्य, अन्नप्रक्रिया, मेवामिठाई, कापड, कागद, सायकली, रंग व रसायननिर्मिती इत्यादींचे उद्योग येथे आहेत. एकविसाव्या शतकातही येथील विकासाची गती कायम आहे.
शेफील्ड शहराच्या बाहेरील महानगरीय परगण्यात उपनगरे, खुला ग्रामीण भाग आणि पीक डिस्ट्रिक्ट हे राष्ट्रीय उद्यान आहे. शहराचे निसर्गसुंदर परिसरातील स्थान, तसेच शहर व परिसरातील अनेक प्रेक्षणीय स्थळे यांमुळे पर्यटनाच्या दृष्टीनेही या शहराला महत्त्व आहे. शहरातील आकर्षक सार्वजनिक इमारती, आधुनिक व्यापारी व औद्योगिक संकुले, विविध सांस्कृतिक संस्था, विभागीय वस्तुभांडारे, बुटीक, वेधशाळा (स्था. इ. स. १८८२), संग्रहालये, मॅपीन व ग्रेव्हज कलावीथी, किल्ला, पॅरिश चर्च (बारावे शतक), नगरभवन (इ. स. १८९७), शेफील्ड विद्यापीठ (इ. स. १९०५), शेफील्ड तंत्रनिकेतन, विविध वित्तसंस्था, संशोधन संस्था इत्यादी उल्लेखनीय आहेत. रस्ते, लोहमार्ग, हवाई मार्ग, अंतर्गत जलवाहतूक या सुविधा उत्तम आहेत. शहरातील बहुतांश इमारतींना गरम पाण्याचा पुरवठा केला जातो. शहरात सुमारे अडीचशेवर विहारोद्याने, १७० वनराजींचे प्रदेश, ७८ सार्वजनिक उद्याने आणि १० सार्वजनिक बागा आहेत. इंग्लंडमधील सर्वाधिक हिरवेगार शहर म्हणून या शहराला ओळखले जाते.
शहराला खेळाचा मोठा वारसा आहे. फुटबॉल, स्नूकर (बिल्यर्ड्झ), बर्फावरील हॉकी हे येथील लोकप्रिय खेळ असून त्यांचे अनेक संघ (क्लब) येथे कार्यरत आहेत.
समीक्षक : माधव चौंडे