जीवाला ज्या भावनेचा अनुभव अप्रिय वाटतो, अशी प्रतिकूल भावना म्हणजे दु:ख होय. दु:खाचा अनुभव सर्वच जीवांना प्रत्यक्ष रूपाने येत असल्यामुळे त्याचे अस्तित्व कोणीच नाकारू शकत नाही. दु:खाचा अनुभव बाह्य इंद्रियाद्वारे होत नाही, तर केवळ मनाद्वारे होतो. ज्या कारणामुळे उत्पन्न होते, ती कारणे तीन प्रकारची असल्यामुळे दु:खही तीन प्रकारचे आहे असे म्हटले जाते. सांख्यदर्शनामध्ये वर्णन केलेली तीन प्रकारची दु:खे पुढीलप्रमाणे आहेत –

(१) आधिभौतिक दु:ख : जे दु:ख अन्य जीवांपासून (भूत = जीव) उत्पन्न होते, ते आधिभौतिक दु:ख होय. अन्य व्यक्तींमुळे किंवा पशू, पक्षी अथवा झाडे यांमुळे होणारे दु:ख आधिभौतिक होय. सर्पदंश, अन्य व्यक्तींकडून होणारी हिंसा, झाडाचे काटे टोचून होणारे दु:ख इत्यादी सर्व आधिभौतिक दु:ख होय.

(२) आधिदैविक दु:ख : जे दु:ख निसर्गातील तत्त्वांपासून उत्पन्न होते, ते आधिदैविक दु:ख होय. वादळ, वारे, अत्याधिक थंडी किंवा उष्णता, पाऊस यांमुळे होणारे दु:ख आधिदैविक होय.

(३) आध्यात्मिक दु:ख : जे दु:ख अन्य कोणामुळे उत्पन्न होत नाही, जीवाच्या स्वत:मुळेच उत्पन्न होते, ते आध्यात्मिक दु:ख होय. सर्वसाधारणपणे प्रचलित व्यवहारात आध्यात्मिक शब्द अध्यात्म, उपासना, साधना यांच्याशी संबंधित समजला जातो. परंतु, संस्कृत व्युत्पत्तीनुसार आध्यात्मिक शब्दाचा वास्तविक अर्थ ‘स्वत:शी संबंधित’ असा होतो. जे दु:ख स्वत:च्या शरीरामुळे किंवा मनामुळे उत्पन्न होते ते आध्यात्मिक दु:ख होय. शरीरातील वात, पित्त आणि कफ यांमध्ये दोष निर्माण झाल्याने रोग उत्पन्न होतात व जीवाला दु:खाचा अनुभव येतो. हे शारीरिक (आध्यात्मिक) दु:ख होय. मनामध्ये असणाऱ्या चिंता, द्वेष, क्रोध, लोभ इत्यादी विकारांमुळे होणारे दु:ख हे मानसिक (आध्यात्मिक) दु:ख होय. अशा प्रकारे आध्यात्मिक दु:खाचे शारीरिक आणि मानसिक असे दोन प्रकार करता येतात.

सांख्यदर्शनानुसार सत्त्वगुणाचा संबंध सुखाशी, रजोगुणाचा संबंध दु:खाशी आणि तमोगुणाचा संबंध मोहाशी (अज्ञानाशी) आहे. रजोगुण हा क्रियाशीलता, इच्छा, आकांक्षा, आसक्ती यांचा द्योतक आहे. त्यामुळे जेथे आसक्ती आहे, जेथे इच्छा-आकांक्षा आहेत, तेथे दु:ख स्वाभाविक रूपाने आहे. कारण इच्छा अपूर्ण राहिल्या, तर दु:ख उत्पन्न करतात आणि त्या पूर्ण झाल्या तरीही त्या आहे त्यापेक्षा अधिक प्राप्त करण्याची आसक्ती निर्माण करतात.

महर्षी पतंजलींनी ‘परिणाम-ताप-संस्कार-दु:खैर्गुणवृत्तिविरोधाच्च दु:खमेव सर्वं विवेकिन:।’ (योगसूत्र २.१५) या सूत्रामध्ये वरील तीन प्रकारांपेक्षा दु:खाचे अन्य तीन प्रकार वर्णिलेले आहेत –

(१) परिणामदु:ख : एखाद्या वस्तूचा अनुभव चित्तामध्ये सुख उत्पन्न करितो; परंतु सुखाचा अनुभव आल्यामुळे चित्तामध्ये त्या वस्तूचा पुन्हा पुन्हा उपभोग घेण्याची आसक्ती उत्पन्न होते व त्या आसक्तीमुळे भविष्यात दु:ख उत्पन्न होते. म्हणजे वर्तमानकाळात मिळणाऱ्या सुखाचा परिणाम कालांतराने दु:खात होतो, म्हणून त्याला परिणामदु:ख असे म्हटले जाते. जी वस्तू सुख देते, त्या वस्तूचा पुन्हा पुन्हा उपभोग घेतल्यामुळे तृष्णा शांत होत नाही, उलट वाढत जाते. अधिकाधिक भोग घेतल्याने इंद्रियांची तृप्ती होत नाही, तर त्यांची उपभोग घेण्याची क्षमता वाढतच जाते.

सुखाचा संबंध सत्त्वगुणाशी आहे. त्यामुळे सुखाचा अनुभव घेणे यात काही गैर नाही, परंतु तो आसक्तिरहित असला पाहिजे. आसक्तीमुळे सुखरूप सत्त्वगुणाचा परिणाम रजोगुणात होतो व दु:ख प्राप्त होते.

(२) तापदु:ख : ज्या वस्तूचा अनुभव दु:ख उत्पन्न करतो, त्याविषयी चित्तामध्ये द्वेषाची भावना उत्पन्न होते. दु:ख देणाऱ्या वस्तूचा अनुभव पुन्हा घेण्याची कोणालाच इच्छा नसते. परंतु, काही अपरिहार्य कारणामुळे त्या वस्तूचा अनुभव घ्यायची वेळ आली तरी पूर्वी घेतलेल्या दु:खाच्या अनुभवामुळे चित्त त्या वस्तूचे ग्रहण द्वेषभावनेनेच करते. याप्रमाणे वर्तमानकाळात मिळणाऱ्या दु:खाचा परिपाक भविष्यामध्येही दु:खातच होतो, त्यामुळे याला तापदु:ख असे म्हणतात.

(३) संस्कारदु:ख : सुख प्रदान करणारी वस्तू प्राप्त करण्यासाठी व दु:ख प्रदान करणाऱ्या वस्तूचा त्याग करण्यासाठी जीव कर्म करतो. कर्म केल्यानंतर त्या कर्माचे सूक्ष्म संस्कार चित्तामध्ये उत्पन्न होतात व योग्य देश काल प्राप्त झाल्यावर जीवाला त्या कर्माचे फळ मिळते. सत्कर्माचे फळ सुखाच्या रूपात मिळते व दुष्कर्माचे फळ दु:खाच्या रूपात मिळते. पुन्हा जीव कर्म करतो व पुन्हा संस्कार उत्पन्न होतात. अशा पद्धतीने जीवाला कर्मबंधन उत्पन्न होते व त्यामुळे दु:ख प्राप्त होते. कर्मांच्या संस्कारांमुळे प्राप्त होणारे दु:ख म्हणजे संस्कार-दु:ख होय. निष्काम कर्म केल्याने त्याचे संस्कार उत्पन्न होत नाहीत व त्या कर्माचे काही फळही मिळत नाही.

याप्रकारे अनादि काळापासून कर्मबंधनाने उत्पन्न होणाऱ्या दु:खाची जाणीव झाल्यानंतर योगी या कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी, ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो. सत्त्व, रज आणि तम हे त्रिगुण सतत परिवर्तनशील असल्यामुळे सुखरूपी सत्त्वाचे प्राधान्य नेहमी राहणार नाही, याची त्याला जाणीव होते; त्यामुळे योग्यासाठी सर्व काही दु:खरूपच असते.

दु:खापासून मुक्ती सर्वच जीवांना हवी असते. परंतु, जे दु:ख आधीच भोगून संपले आहे, अशा अतीत (भूतकाळातील) दु:खाचा त्याग करता येऊ शकत नाही. जे दु:ख वर्तमानात अनुभवाला येत आहे, त्याचाही त्याग करता येऊ शकत नाही. कारण त्यापासून मुक्त होण्यासाठी जोपर्यंत उपाय मिळत नाही, तोपर्यंत ते दु:ख अनुभवाला येतच राहणार. त्यामुळे अनागत (भविष्यात) येणारे दु:ख आहे, अशा दु:खाचा त्याग करता येणे शक्य आहे – ‘हेयं दु:खं अनागतम् |’ (योगसूत्र २.१६)

गौतम बुद्धांनीही दु:खाची आर्यसत्यांमध्ये गणना केली आहे – ‘सर्वं दु:खं दु:खम्’ | सर्वच दर्शनांनी दु:खाचे अस्तित्व मानले आहे, परंतु त्याचबरोबर सर्वांनी दु:खाचा नाश करता येऊ शकतो हेही मानले आहे. दर्शनांनी दु:ख उत्पन्न होण्याची कारणे वेगवेगळी मानलेली असली तरीही सर्वांच्या मते कोणत्या न कोणत्या रूपात अविद्या हेच दु:खाचे मूळ कारण आहे. यथार्थ ज्ञान प्राप्त झाले असता अविद्या / अज्ञान नष्ट होते व दु:खाचाही कायमस्वरूपी व संपूर्ण नाश होतो. हीच अवस्था दर्शनांनी म्हणजेच मोक्ष, मुक्ती, कैवल्य, नि:श्रेयस, अपवर्ग, निर्वाण इत्यादी शब्दांनी सांगितलेली आहे.

पहा : क्लेश, दु:खत्रय.

                                                                                                समीक्षक : कला आचार्य