एखादी व्यक्ती उभी राहिल्यानंतर किंवा बसल्यानंतर त्याच्या किंवा तिच्या शरीराची जी अवस्था धारण करते, त्या शरीराच्या अवस्थेला शारीरिक ठेवण असे संबोधले जाते.

प्रकार : शारीरिक ठेवणीचे दोन प्रकार आहेत : (१) गतिमान (Dynamic) शारीरिक ठेवण आणि (२) स्थिर (Static) शारीरिक ठेवण.

(१) गतिमान शारीरिक ठेवण : चालणे, धावणे, एखादी वस्तू उचलणे इत्यादी हालचाली करत असताना शरीराची ठेवण या प्रकारामध्ये अपेक्षित आहे.

(२) स्थिर शारीरिक ठेवण : बसणे, उभे राहणे, झोपणे अशा स्थिर स्थितींमध्ये असताना शरीराची ठेवण या प्रकारामध्ये अपेक्षित आहे.

आदर्श शारीरिक ठेवण : शरीराच्या आदर्श ठेवणीमध्ये उभे असताना आणि दोन्ही पायांवर समान वजन असताना, एक सरळ रेष मानवी शरीराच्या गुरुत्वीय मध्यातून जाऊन शरीराला दोन तंतोतंत समान भागात विभाजित करते.

विचलित शारीरिक ठेवण : दैनंदिन कामामुळे व चुकीच्या सवयींमुळे ठराविक एका बाजूचे स्नायू अखडले जातात आणि इतर/दुसऱ्या बाजूचे स्नायू ताणले जातात, कमकुवत होतात तेव्हा शरीराची ठेवण बिघडते. उदा., पोक काढून बसणे, मोबाइलचा किंवा संगणकाचा अतिरिक्त वापर करणे, एकाच जागेवर खूप वेळ बसून राहणे किंवा उभे राहणे इत्यादी. साधारणत: शेतकरी, विद्यार्थी, स्तनदामाता, संगणक वापरकर्ता, गरोदर स्त्रिया, लठ्ठ व्यक्ती, वाहनचालक इ. मध्ये चुकीची शारीरिक ठेवण दिसून येते. काही विचलित शारीरिक ठेवणीचे प्रकार पुढीलप्रमाणे :

  • पार्श्ववक्रता (Scoliosis) : सरळ उभ्या रेषेपासून एका बाजूला वक्रता येणे.
  • कुब्जता (Kyphosis) : वक्षीय (Thoracic) भागामध्ये कुबड येणे.
  • कटिवक्रता (Lumbar lordosis) : मेरुरज्जूला आतील बाजूकडे वक्रता येणे.

तसेच अयोग्य शारीरिक ठेवणीचे पश्चदोलन (Swayback) आणि अग्रदिशिक शीर्ष (Forward head) असे इतर प्रकारही दिसून येतात.

शारीरिक ठेवण आणि आरोग्य : शरीराची ठेवण ऐच्छिक किंवा अनैच्छिकही असू शकते. अनेकदा असे दिसून येते की, शरीराची ठेवण ऐच्छिक व चुकीच्या सवयींमुळे झालेली असते. अनैच्छिक ठेवण ही चिरकालीन अस्थिरोगांशी तसेच जन्मजात व्यंगाशी संबंधित असू शकते. शरीराची चुकीची ठेवण ही शरीरातील अनेक स्नायू, सांधे व ऊतींच्या अस्थिरतेसाठी/आजारांसाठी कारणीभूत ठरते. तसेच शरीरातील स्नायू, सांधे व ऊतींची अस्थिरता/आजार हे देखील शरीराची सामान्य ठेवण बिघडवू शकतात.

वारंवार किंवा प्रदीर्घ कालावधीसाठी चुकीच्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या शारीरिक कार्यांमुळे शरीरातील स्नायू, अस्थी व सांध्यांशी निगडित अनेक तक्रारी उद्भवतात.

अयोग्य शारीरिक ठेवणीमुळे उद्भवणाऱ्या समस्या : अयोग्य शारीरिक ठेवण असल्याने आरोग्याला पुढीलप्रकारे हानी पोहोचते : (१) मेरुरज्जूवर (Spinal cord) ताण येणे, (२) मान, खांदा आणि पाठ हे अवयव दुखणे, (३) शरीराची लवचिकता कमी होणे, (४) सांध्यांच्या हालचालीवर परिणाम होणे, (५) शरीराच्या संतुलनावर परिणाम होणे, (६) अन्नपचन क्रियेमध्ये बिघाड होणे, (७) श्वसनास अडथळा निर्माण होणे इत्यादी.

भौतिकोपचार : दैनंदिन कामे करत असताना जाणीवपूर्वक शरीराची स्थिती सांभाळणे; शारीरिक ठेवण योग्य राखण्याकरिता आवश्यक व्यायाम उदा., योग वगैरेंचा अवलंब करणे; योग्य वजन राखणे या सवयींद्वारे योग्य शारीरिक ठेवण मिळवता येते.

पहा : अंगस्थिती.

संदर्भ :

https://www.physio-pedia.com/Posture

• Gardiner, M. D. The principles of exercise therapy, 1957.

• Kendall. H. O.; Kendall, F. P. Wadsworth, G. E. Muscles, Testing and Function Americal Journal of Physical Medicine & Rehabilitation, 1973.

• Kisner, C.; Colby, L. A. Therapeutic exercise : Foundations and techniques, F. A. Davis Company, 2012.

• Levangie, P. K.; Norkin, C. C. Joint structure and function : A Comprehensive analysis, F. A. Davis Company, 2011.