अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस : (आयटक). भारतातील कामगार संघटना. ३१ ऑक्टोबर १९२० रोजी या संघटनेची स्थापना झाली. ब्रिटनच्या ट्रेड युनियन काँग्रेसच्या धर्तीवर स्थापन झालेल्या या संघटनेचे ध्येय कामगार हित होते. या संघटनेच्या स्थापनेला एक शतक पूर्ण झाले आहे. ही भारतातील सर्वांत जुनी कामगार संघटना आहे. विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात भारतात कामगारसंघ आणि संघटना उदयास येत होत्या. त्यांची मध्यवर्ती संस्था म्हणून ही संघटना ओळखली जाते. आयटक हे या संघटनेचे संक्षिप्त नाव आहे. व्हर्सायच्या तहान्वये १९१९ मध्ये आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेची स्थापना झाली होती. ब्रिटीश भारत या संघटनेचा संस्थापक सदस्य होता. वाशिंग्टन येथे संघटनेच्या पहिल्या परिषदेला भारतीय सदस्य उपस्थित होता. त्यानंतर जिनिव्हा येथे दरवर्षी भरणाऱ्या या संघटनेच्या परिषदेकरिता भारतीय कामगार प्रतिनिधी निवडण्यासाठी मध्यवर्ती संस्थेची आवश्यकता होती. हे काम आयटकने केले. थोडक्यात प्रतिनिधित्वासाठी ही संघटना स्थापन झाली होती. आरंभी प्रतिनिधीत्वासाठी ही संघटना स्थापन झाली. कामगार प्रतिनिधित्व, कामगारांचे आर्थिक व राजकीय हितसंबंध, सनदशीर मार्ग, मध्यम मार्ग, सुधारणावादी मार्ग, क्रांतिकारी मार्ग असे वैचारिक बदल या संघटनेमध्ये होत गेले आहेत. विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात ही संघटना सनदशीर मार्गाने काम करत होती. काँग्रेसचा मध्यममार्ग संघटनेने स्वीकरला होता. संघटनेने पदेशातील सर्व कामगार संघटनांशी सहकार्य करणे, निरनिराळ्या संघटनांच्या कार्यवाहीत सुसूत्रता आणणे, वेगवेगळ्या उद्योगधंद्यांतील आयटकशी संबद्ध अशा कामगारसंघांना मार्गदर्शन करणे आणि कामगारांच्या मागण्यांसाठी संघटित स्वरूपाची चळवळ उभारणे ही तिची उद्दिष्टे होती. प्रारंभापासूनच आयटकने कामगारांच्या आर्थिक, सामाजिक व राजकीय हितसंबंधांचा पाठपुरावा केला. पहिल्या महायुद्धानंतर संघटना साम्यवादाकडे वळली. लाला लजपतराय हे आयटकचे पहिले अध्यक्ष होते.  सी. आर. दास, सरोजिनी नायडू, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस इत्यादींनी या संघटनेचे अध्यक्षपद भूषविले आहे. लाहोर (१९२३), कोलकाता (१९२४), मुंबई (१९२५), चेन्नई (१९२६), दिल्ली (१९२७), कानपूर (१९२७) या ठिकाणी या संघटनेची अधिवेशने पार पडली होती, या अधिवेशनांची अध्यक्षपदे अनुक्रमे सी. आर. दास ,दत्तोपंत ठेंगडी, व्ही. व्ही. गिरी, चंद्रिका प्रसाद, दिवान चमनलाल यांनी भूषविले. आयटकशी संबधित अनेक कार्यकर्ते काँग्रेसमध्येही कार्यरत होते. ना. म. जोशी यांनी संघटनेचे महासचिवपद सांभाळले होते.  प्रारंभी आयटक व राष्ट्रीय काँग्रेस यांच्यात सलोख्याचे संबंध होते (१९१८- १९३०). १९३० नंतर मात्र हे संबंध संघर्षाचे झाले.  दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएत युनियन आणि ब्रिटिश यापैकी कोणाला पाठिंबा द्यावा यामुळे सुधारणा आणि क्रांतीकारी असे गट निर्माण झाले. ही आयटकमध्ये पहिली दुफळी पडली होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर या संघटनेतून साम्यवादी विचारसरणीच्या विरुद्ध असणारे गट बाहेर पडले. त्यामुळे या संघटनेवर साम्यवादी विचारांचे वर्चस्व निर्माण झाले. आयटकचे प्रधान कार्यालय नवी दिल्ली येथे आहे. आयटकच्या संलग्न संघांच्या प्रतिनिधींची परिषद वेळोवेळी भरते. ती आयटकचे धोरण निश्चित करते आणि पदाधिकाऱ्यांची व एका साधारण मंडळाची निवड करते. ह्याशिवाय एक कार्यकारी मंडळ असते. भारतातील प्रत्येक राज्यात आयटकच्या शाखा आहेत. आयटकने कापडउद्योग, ज्यूट, खाणकाम आदी उद्योगधंद्यांसाठी संघसमूह (फेडरेशन्स) बनविले आहेत. वर्ल्ड फेडरेशन ऑफ ट्रेड युनियन्स ह्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील साम्यवादी गटाच्या महासंघाशी आयटक संलग्न आहे. आयटक ट्रेड युनियन रेकॉर्ड  नावाचे पाक्षिक प्रसिद्ध करते. नव्वदीच्या दशकापासून संघटनेने जागतिकीकरणाविरोधात राजकीय प्रतिकाराचा मार्ग वापरला आहे.  एकविसाव्या शतकाच्या दोन्ही दशकांमध्ये संघटनेची सभासद संख्या कमी झालेली आहे. समकालीन दशकात ही संघटना कामगार कायद्यांच्या संरक्षणासाठी राजकीय प्रतिकार करत आहे.

संदर्भ :

  • Bhargava, P. P. Trade Union Dynamism,  Printwell, Jaipur, 1995.
  • Goswami, Dharani, Trade Union Movement in India: Its Growth and Development, New Delhi,1983.
  • Mehta, B. L. Trade Union Movement in India, Delhi, 1991.