भ्रमणध्वनी किंवा संगणकामधील महाजालकाची (Internet) जोडणी किंवा कोणत्याही आधुनिक संचामधून माहितीची बिनतारी देवाणघेवाण करण्यासाठी प्रामुख्याने वाय-फाय प्रणाली वापरली जाते. आधुनिक संदेशवहनामधील IEEE ८०२.११ या आंतरराष्ट्रीय मानाकांनावर आधारभूत असणारी २.४ आणि ५.८ गिगॅहर्ट्झ (Ghz) या तरंगलांबीचा वापर करून इलेक्ट्रॉनिकी संकेतांची (Electronic signal) देवाणघेवाण करणारे बिनतारी संदेशवहन प्रमाणीकरण (Wireless communication protocol) म्हणजे वाय-फाय प्रणाली होय.
नॅशनल कॅश रजिस्टर, एनसीआर आणि अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनी (ए. टी. अँड टी ) या संस्थांनी १९९१ मध्ये IEEE ८०२.११ या मानांकनावर आधारित या प्रणालीची सुरुवात केली. वाय-फाय विषयीचे सर्व नियम, त्यावरील मर्यादा, नवीन बदल वायफाय ॲलायन्स ही जागतिक संस्था ठरवते.
एक किंवा त्यापेक्षा अधिक संदेशवहन करणाऱ्या उपकरणांची जोडणी करून त्यामध्ये वाय-फाय प्रणालीच्या साहाय्याने महाजालक प्रस्थापित करता येते. महाजालक असलेल्या उपकरणांमध्ये जलद पद्धतीने संदेशवहन करण्यासाठी प्रामुख्याने या प्रणालीचा उपयोग केला जातो. वाय-फाय प्रणाली ही संदेशवहनाच्या अर्ध द्विपथ (Half duplex) प्रकारामध्ये मोडते. जालक क्षेत्रविद्या (Network topology) या जालाच्या अंतरानुसार केलेल्या वर्गीकरणामधील स्थानिक जालक (LAN), महानगरीय जालक (MAN), वॅन (WAN) यांमध्ये वाय-फाय प्रणाली वापरली जाते.
वाय–फाय नियामकाची रचना : सर्वदिशात्मक आकाशकाच्या (Omnidirectional antenna) साहाय्याने एका वेळी एक म्हणजे पारेषित किंवा ग्राही (Transmit or receive) बिनतारी माहिती विद्युत चुंबकीय लहरींमार्फत प्रथम अनुरूप (Analog) आणि नंतर अंकीय (Digital) संकेतामध्ये रूपांतरित होते. वाय-फाय नियामकाची (Module) आज्ञावली आणि हार्डवेअर यांचे अंत:स्थापित तंत्रज्ञानाच्या (Embedded technology) साहाय्याने चकती (Chip) प्रणालीमध्ये एकत्रिकरण केलेले असते. प्रत्येक नियामकाची एकमेव ओळख (Unique identity) जपण्यासाठी त्याला द्विअंकी (Binary) व अष्टदशांश (Hexadecimal) अंक वापरून एकमेव पत्ता (Address) दिलेला असतो. त्यासोबत मिडिया ॲक्सेस कंट्रोल, मॅक; गेट-वे हे इतर क्रमांक दिलेले असतात. कोणत्याही दोन वाय-फाय संचामध्ये ओ.एस.आय सप्तस्तराच्या (OSI Model) क्रमाच्या माध्यमातून नियामकामधील सॉफ्टवेअरशी जोडणी होऊन संदेशवहन पूर्ण होते.
वाय–फाय प्रणालीची प्रमुख वैशिष्ट्ये : (१) दोन वाय-फाय उपकरणांमधील संदेशवहनासाठी अंतर हे साधारणत: १५० फूट तसेच मोकळ्या ठिकाणी (Outdoor) ३०० फुटांपर्यंत असते. वाय-फाय प्रणालीत संदेशवहनाची गती मेगाबाइट प्रति सेकंद पासून गिगाबाइट प्रति सेकंद इतकी असते.
(२) IEEE ८०२.११ मध्ये ८०२.११ a/b/g/n/ac अशा काही उपप्रकारांप्रमाणे वाय-फाय नियामकामध्ये अंतर्गत रचना, आकाशकाची रचना, वेग आणि अंतर यांचे स्वरूप बदलत जाते. जास्त क्षमतेच्या अंतर आणि वेगासाठी वाय-मॅक्स मानकाचा उपयोग केला जातो.
(३) वाय-फाय नियामक ठरवून दिलेल्या मानांकनाप्रमाणे तयार केले जाते. यासाठी वाय-फाय प्रमाणन (Certification) केले जाते. प्रत्येक नियामक सर्व चाचण्या पूर्ण करून ते विक्रीसाठी उपलब्ध होते.
(४) वाय-फाय प्रणालीत अनधिकृतपणे वापरामुळे (Unauthorised access) माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता असते. वाय-फाय संदेशवहनामध्ये सुरक्षितता हा सुध्दा महत्त्वाचा भाग आहे. त्यासाठी विशेष तंत्रज्ञान म्हणजे वाय-फाय सुरक्षित साधन (Wifi Protected Access, WPA) वापरून अनधिकृत प्रवेशांना प्रतिबंध घातला जातो.
(५) वाय-फाय संदेशवहनाचा वेग पुढील बाबींवर अवलंबून असतो : (अ) प्रक्षेपण करणाऱ्या आकाशकाचा प्रकार, उंची आणि वर्धनता (Antenna gain); (आ) संदेशवहनासाठी आकाशकाला लागणारी वारंवारता (Frequency) आणि त्याची पट्टरुंदी (Bandwidth); (इ) वाय-फाय संदेशवहनाचे ठिकाण (मोकळे किंवा बंदिस्त); (ई) संदेशवहन मार्गातील इतर अडथळे; (उ) वापरल्या जाणाऱ्या नियामकाची अंतर्गत क्षमता; (ऊ) वाय-फायच्या नियामकाला लागणारा शक्ती पुरवठा.
वाय–फाय प्रणालीची उपयुक्तता : (१) संदेशवहन करण्यासाठी उपकरणे ही कोणत्याही दोन लांब अंतरांमध्ये किंवा चल (Movable) अवस्थेत असतील तर त्यांमध्ये संपर्क करताना बिनतारी संदेशवहन नेहमीच सोयीचे ठरते. यामुळे ही प्रणाली फार उपयुक्त ठरते.
(२) एक किंवा त्याहून अधिक उपकरणे जोडण्यासाठी विस्तृतीकरणाची (Expandable) क्षमता वाय-फायच्या प्रमाणीकरणामध्ये शक्य आहे.
(३) बिनतारी प्रकारचे संदेशवहन असल्याने गतिशीलता (Mobility) अधिक असते.
(४) भ्रमणध्वनी, संगणक व त्याची परिघीय यंत्रे (Peripheral devices) यांची एकमेकांमध्ये सहज जोडणी करता येते.
(५) सार्वजनिक ठिकाणे, उपाहारगृह, बस आणि रेल्वे स्थानक, महाविद्यालय, सरकारी कार्यालये या ठिकाणी कायम किंवा तात्पुरत्या (Hotspot) स्वरूपाचे महाजाल स्थापित करून त्याची एकमेकांना वाय-फायमार्फत जोडणी देता येते.
(६) औद्योगिक स्वयंचलित तंत्रज्ञान (Automation) आणि इंटरनेट ऑफ थिंग्स यांसारख्या तंत्रज्ञानामध्ये संदेशवहन करण्यासाठी वाय-फाय प्रणाली अतिशय महत्त्वाची ठरते.
वाय–फाय प्रणाली वापरताना घ्यावयाची दक्षता : (१) परवलीचा शब्द (Password) नसलेल्या मुक्त स्रोत (Open source) असलेल्या वाय-फायची जोडणी आपल्या वायफाय संचाबरोबर करू नये.
(२) वायफायचा वापर नसताना उपकरणामधील वाय-फाय बंद (Disable) पर्याय निवडून तो बंद ठेवावा.
(३) आपल्या वाय-फाय संचामधील परवलीचा शब्द ठराविक कालावधी नंतर बदलावा.
(४) सार्वजनिक ठिकाणी वायफाय आपल्या उपकरणाला जोडताना ते सुरक्षित असल्याची खात्री करून घ्यावी. तसेच ते अधिकृत जालकाला (Network) जोडलेले असावे.
(५) आभासी वैयक्तिक जालक (Virtual private network) या पर्यायाचा वापर केल्याने जोडल्या गेलेल्या वाय-फाय संचामधील माहितीची गोपनीयता राखली जाते. उदा., आयपी पत्ता, सर्व्हर, महाजाल सेवा प्रदाता (Internet Service Provider).
संदर्भ :
- http://standards.ieee.org
- https://www.ieee-pes.org
- wi-fi.org
- Gast, Matthew Wireless Networks: The Definitive Guide Book-802.11.
समीक्षक : श्रीमती शिंगरे