बाबुराव मोकाशी पुणेकर : (१९०० – १० डिसेंबर १९८५) महाराष्ट्रातील प्रसिद्ध वगनाट्य लेखक. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील कोंढवे या गावी एका शेतकरी कुटुंबामध्ये झाला. आईचे नाव ममताई. वडिलांचे नाव मारुती. बाबुराव पुणेकर यांचे वडील काही काळ ब्रिटिश आर्मीमध्ये होते. ते कोंढवे गावचे इनामदार होते. त्यांचे शालेय शिक्षण पाचवीपर्यंत झाले होते. आजूबाजूच्या गावांमध्ये यात्रे – जत्रेच्या निमित्ताने तमाशा फड यायचे. त्यांच्यामध्ये भेदिक सामने व्हायचे. ते पाहून बाबुराव पुणेकरांना भेदिक लावण्या गाण्यांचा छंद लागला होता. ही बाब वडिलांना पसंत नव्हती. त्यामुळे भेदिक लावण्या गाणे त्यांना बंद करावे लागले. १९१४ साली त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर बाबुराव पुण्यामध्ये आपल्या आजोळी – कसबा पेठेत राहावयास आले.
पुण्यामध्ये त्यांची सुप्रसिद्ध पुढारी आणि सामाजिक कार्यकर्ते केशवराव जेधे यांच्याशी ओळख झाली. बाबुरावांचा आवाज आणि देखणे रूप पाहून केशवरावांनी त्यांना एका उत्तम नाचकाम करणाऱ्या कलावंतांची शिकवणी लावली. थोड्याच कालावधीत बाबुरावांनी नाचकाम ही कला आत्मसात केली. त्यानंतर ते सत्यशोधक चळवळीचा प्रचार करणाऱ्या रामचंद्र घाडगे यांच्या जलाशात काम करू लागले. १९२० – २१ च्या दरम्यान रामचंद्र घाडगे यांचा जलसा बंद झाला. त्यानंतर बाबुराव पुणेकर यांनी तुकाराम जीनगर, पेठे नेर्लेकर, रामा भिलडीकार, पांडुरंग कुरकुंभकर यांच्या तमाशाफडातून कामे केली. सन १९२४ – २५ मध्ये बाबुराव पुणेकर सह अहमदसाहेब इस्लामपूरकर या नावाने त्यांनी स्वतःचा तमाशाफड सुरु केला. बाबुराव पुणेकर यांनी स्वतःचा तमाशाफड सुरू केल्यानंतर वग – लेखनाला सुरुवात केली. त्यांनी आपल्या तमाशाच्या कारकिर्दीत १५० फार्स आणि २५० च्या आसपास वग लिहिलेले आहेत. त्यापैकी जहरी प्याला, गवळ्याची रंभा, मल्हारराव होळकर, दख्खनचा राजा, दाभाड्याची बोलती पगडी, सारंगपुरची होळी, माझे गाव माझी सत्ता हे त्यांचे वग गाजलेले आहेत. १९२५ ते १९५० या काळात महाराष्ट्रातील बरेचसे तमाशाफड पट्ठे बापूरावच्या लावण्या, गण, गवळण आणि बाबुराव पुणेकरांचे वग सादर करीत होते. वगनाट्यांबरोबर त्यांनी शाहिरी कवनेही लिहिली होती; पण १२ जुलै १९६१ साली पानशेत धारण फुटले आणि त्यावेळी मुठा नदीला आलेल्या महापुरात त्यांची अनेक वगनाट्ये आणि शाहिरी कवने वाहून गेली.
वगाचा तमाशा विकसित करण्यांमध्ये बाबुराव पुणेकर यांचा सिंहाचा वाटा आहे. वग बघणारा प्रेक्षकवर्ग तयार करणाऱ्यांमध्ये त्यांनी महत्वाची कामगिरी केलेली आहे. त्यांच्या तमाशात अश्लीलता नव्हती. सर्व कुटुंबांनी एकत्रित बसून बघावा असा त्यांचा तमाशा होता. लोकांच्या मनामध्ये देशभक्ती, देशप्रेम निर्माण व्हावे या हेतूने ते स्फूर्तिदायक, प्रेरणादायक पोवाडे – गाणी सादर करीत होते. लोकांना आपला इतिहास कळवा म्हणून ऐतिहासिक वग लिहून लोकांसमोर सादर करीत होते. बाबुराव पुणेकर ज्या काळात वगलेखन आणि शाहिरी करीत होते त्या काळात अनेक फडप्रमुख हे अडाणी – निरक्षर होते अशा तमाशा कलावंतांना बाबुराव पुणेकर मोफत वग लिहून देत होते, शिवाय वग कसा सादर करावा याबाबतही मार्गदर्शन करीत होते. वगसाठी गाणी लिहून त्यांना चाली लावून देत होते. म्हणून अनेक तमाशा कलावंतांना आपला तमाशा फड चालविणे शक्य झाले.
वगनाट्याच्या संदर्भात अतिशय बहुमोलाचे काम बाबुराव पुणेकरांनी केलेले होते. त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी मराठी नाट्यपरिषदेने ५८ व्या नाट्यसंमेलनात त्यांना सन्मानपत्र देऊन सत्कार केला होता. १९७७ साली महाराष्ट्र शासनाने त्यांना सांस्कृतिक पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. हा पुरस्कार त्यांना महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपालांच्या हस्ते देण्यात आला होता. व्ही. शांताराम, विश्राम बेडेकर, दाजी भाटवडेकर, रणजित देसाई, शंकरराव मोहिते – पाटील या पुरस्कार निवड समितीने बाबुराव पुणेकरांची राज्य पुरस्कारासाठी निवड केली होती. बाबुराव पुणेकरांनी प्रदीर्घकाळ तमाशाकलेची सेवा करून तमाशाला आणि तमाशातील वगनाट्याला प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे तमाशा करून अश्लीलतेशिवाय तमाशा करता येतो हे त्यांनी दाखवून दिले आहे. दर्जेदार तमाशा कलावंत आणि उत्तम वगनाट्यलेखक म्हणून तमाशा क्षेत्रात सर्वानींच त्यांना मान्यता दिलेली आहे. संपूर्ण आयुष्य तमाशासाठी समर्पित करणाऱ्या बाबुराव पुणेकरांचे वयाच्या ८५ व्या वर्षी कोंढवे येथे राहत्या घरी निधन झाले.
संदर्भ : क्षेत्र संशोधन