अभिजात हिंदुस्थानी संगीत, नृत्य व नाट्य यांचे प्रशिक्षण देणारी व सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन करणारी कोल्हापूर (महाराष्ट्र) येथील विख्यात संगीतसंस्था. सुरुवातीस केवळ गाण्यावरील प्रेमापोटी विश्वनाथराव गोखले, त्र्यंबकराव दातार, गोविंदराव देवल, नातू फौजदार, भाऊसाहेब लिमये यांच्या पुढाकाराने १८८३ मध्ये ‘करवीर गायन समाज’ या संस्थेची स्थापना झाली. कोल्हापूर येथील राजाराम कॉलेजमधील दोन खोल्या मासिक वर्गणी चार आणे भाड्याने घेऊन या संस्थेचा प्रपंच सुरू झाला. केशवबुवा गोगटे, पखवाजी शिवरामबुवा शाळिग्राम, आप्पयाबुवा, बाळूबुवा गुळवणी, भाऊसाहेब कागवाडकर हे नियमितपणे येथे गान सेवा करीत. अष्टपैलू गायक-कलावंत व गायनाचार्य भास्करबुवा बखले यांच्या कोल्हापुरातील गाण्याचे आयोजन पहिल्यांदा येथेच झाले होते.
कालपरत्वे करवीर गायन समाजाची वाटचाल मंदावली. १८९३ मध्ये बाबा देवल, विसूभाऊ गोखले, त्र्यंबकराव दातार यांनी एक खोली भाड्याने घेऊन नव्याने गाण्याचे कार्यक्रम सुरू केले. संगीत रंगभूमीवरील कलावंतांसह चिन्नय्या स्वामी, रजब अली, अल्लादियाखाँ साहेब असे दिग्गजही तेथे येत असत. हळूहळू ही जागाही अपुरी पडू लागल्यामुळे लक्ष्मी थिएटरमागे (सध्याच्या दैवज्ञ बोर्डिंगमागे) लुकतुकेंच्या माडीवर गाण्यांच्या मैफली रंगू लागल्या. बाबा देवल तेथेच राहू लागले. त्यामुळे गाण्याच्या वेडामुळे एकत्र येण्याच्या या जागेला ‘देवल क्लब’ म्हणून ओळख मिळाली. १९४६ मध्ये करवीर गायन समाज आणि देवल क्लब यांचे एकत्रीकरण होऊन संस्थेचे ‘गायन समाज देवल क्लब’ असे नामकरण करण्यात आले. राजर्षी शाहू महाराजांसारख्या कलाप्रेमी द्रष्ट्या संस्थानाधिपतीने संगीताचे गौरीशंकर म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, अशा अल्लादियाखाँ साहेबांना जसे कोल्हापुरात आणले, तसेच देवल क्लबसाठी जागा व सहा हजार रुपयांची देणगीही दिली. संस्थेच्या वास्तूसाठी निधीची कमतरता भासू लागली तेव्हा बाबुराव पेंढारकर, भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम आदींनी माधवराव जोशी लिखित विनोद या नाटकाचे प्रयोग करून निधी उपलब्ध केला. तेव्हापासून देवल क्लबने अनेक संगीतमहोत्सव घडवून आणले.
भारतातील अनेक दिग्गज कलाकारांनी देवल क्लबच्या व्यासपीठावर आपली कला सादर केली असून भास्करबुवा बखले, गोविंदराव टेंबे (हार्मोनियम), केसरबाई केरकर अशा अनेक कलाकारांच्या कारकिर्दीची खऱ्या अर्थाने येथेच सुरुवात झाली.
आजही देवल क्लबच्या व्यासपीठावर प्रथितयश कलाकारांच्या जोडीने उदयोन्मुख कलाकारांना व्यासपीठ आणि उच्चप्रतीचा श्रोता मिळत आहे. बाबा देवल यांच्या नावाने सुरू असणाऱ्या या विद्यालयामध्ये अभिजात हिंदुस्थानी संगीत आणि नृत्य यांच्या शिक्षणाची व्यवस्था असून दरवर्षी सुमारे तीनशे विद्यार्थी येथे प्रवेश घेतात. नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एन.सी.पी.ए.), मुंबई; तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान, मुंबई; ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले विद्यापीठ (पुणे); कला व संस्कृती संचालनालय, गोवा शासन इत्यादी संस्थांसोबत ही संस्था मूलगामी कार्य करीत आहे. यांखेरीज गेल्या काही वर्षांपासून संस्थेतर्फे संगीतसम्राट अल्लादियाखाँसाहेब संगीतमहोत्सव, ‘उत्तराधिकार’ युवक संगीतोत्सव भरविले जात आहेत.
सांगीतिक कार्यक्रमांच्या आयोजनाबरोबरच संस्थेमार्फत ‘गोविंदराव गुणे’ हिंदुस्थानी ख्याल गायन स्पर्धा गेली २६ वर्षे सातत्याने घेण्यात येते आहे. दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र, मुंबई यांच्या सहसंयोजनाने गेली वीस वर्षे आंतर महाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धेचे आयोजन येथे करण्यात येते. तसेच याच काळात रंगभूमीवर घडणाऱ्या बदलांशी अभ्यासपूर्ण नाते जोडून देवल क्लब या संस्थेच्या नाट्यशाखेनेही समांतर मराठी रंगभूमीवर स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. केवळ राज्य नाट्यस्पर्धेपुरतेच काम न करता ही नाट्यशाखा वेगवेगळ्या आशयांचे आणि आकृतिबंधाचे प्रयोग सादर करीत असते. शिबिरांच्या आयोजनाद्वारे नवयुवकांना रंगभूमीचे सर्वंकष भान आणून देण्याचा या नाट्यशाखेने कसोशीने प्रयत्न चालविला आहे. गेली सात वर्षे पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन ए्कांकिका स्पर्धेचे आयोजन या नाट्यशाखेतर्फे केले जात आहे.
प्रयोगसिद्ध कलांच्या शिक्षणापासून प्रत्यक्ष सादरीकरणापर्यंत विविध सुविधा एकाच छताखाली देणारे भव्य कलासंकुल उभारण्याचे काम देवल क्लबने हाती घेतले आहे. कोल्हापूर येथील विख्यात हार्मोनियमवादक व संगीतरचनाकार गोविंदराव टेंबे यांच्या पणती ज्योत्स्ना टेंबे-खोडेकर व कुटुंबीय यांच्या आर्थिक पाठबळामुळे ‘गोविंदराव टेंबे रंगमंदिर’ साकार झाले. जुन्या इमारतीची पुनर्बांधणी करून तेथे गुरुकुल उभारण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे.
देवल क्लब या संस्थेला वेळोवेळी समर्पित कार्य करणारे उत्तमोत्तम कार्यकर्ते भेटले. म्हणूनच या संस्थेचा इतिहासच नव्हे तर भविष्यकाळही उज्ज्वल आहे.
समीक्षक – मनीषा पोळ