कागेरो निक्कि : जपानी साहित्यातील हेेेइआन काळातील एका लेखिकेची रोजनिशी. याच कालखंडात ह्या नवीन साहित्यिक शैलीची सुरुवात झाली. रोजनिशी लिहिताना जपानी लिपीचा वापर केला गेला. त्यामुळे कि नो त्सुरायुकिचा अपवाद वगळता सर्व रोजनिशी स्त्री लेखिकांकडून लिहिल्या गेल्या. प्रमुख सहा रोजनिशींमध्ये गणली जाणारी ही एक महत्त्वाची रोजनिशी आहे. कागेरो निक्किची लेखिका ही मिचित्सुनाची आई आहे. त्या कालखंडामध्ये स्त्रियांची ओळख कोणाची तरी मुलगी अथवा कोणाची तरी पत्नी अशी करून दिली जात असे. त्यामुळे लेखिकेचे खरे नाव दिलेले नाही तर मिचित्सुनाची आई म्हणूनच लेखिका प्रसिद्ध आहे.

इ.स.९३५ मध्ये लेखिकेचा जन्म झाला. तिचे वडील फुजिवारा नो तोमोयासु हे उच्चकुलीन कुटुंबियांपैकी होते. लेखिकेचे इ.स.९५४ मध्ये फुजिवारा नो कानेइए बरोबर लग्न झाले. त्यावेळी लेखिका १९ वर्षांची होती. कानेइएला ८ बायका होत्या असे सांगितले जाते. त्यामुळे लेखिका तिच्या कौटुंबिक जीवनामध्ये सुखी नव्हती. वाका ह्या जपानी कविता करण्यातले तिचे कौशल्य वाखााणण्याजोगे होते. तिने लिहिलेल्या वाका कविता सम्राटाच्या आज्ञेवरून संकलित केलेल्या कवितासंग्रहात समाविष्ट केल्या आहेत. सर्वसामान्य जपानी लोकांप्रमाणे तिला पण क्षणभंगुर गोष्टींचे आकर्षण होते. त्यामुळे तिने आपल्या रोजनिशीचे नाव पण क्षणभंगुर ह्या अर्थाने मे फ्लाय किंवा कागेरो (दोन दिवस जीवन असणारा कीटक अथवा कोळ्याच्या जाळ्याचे नाजुक धागे) असे ठेवले. ही रोजनिशी पण फार दिवस कोणी वाचणार नाही अशा अर्थाने हे नाव दिले गेले असावे असे समजले जाते. हेइआन कालखंडातील इतर रोजनिशीप्रमाणे कागेरो निक्किमध्येही गद्य आणि पद्य (वाका कविता) ह्यांचा वापर करून उच्चकुलीन स्त्रियांचे जीवन दाखवले आहे.

ह्या रोजनिशीचा पूर्वार्ध हा आत्मचरित्र असून उत्तरार्धामध्ये दैनंदिन नोंदी केल्या गेल्या आहेत. हेइआन कालखंडामध्ये श्रेष्ठ उच्चवर्गीय कुटुंबामध्ये कवितांचे संकलन करून त्यांच्या कौटुंबिक संग्रहामध्ये ठेवले जात असे. त्यामुळे अशी एक शक्यता मानली जाते की मिचित्सुनाच्या आईला तिचा पती फुजिवारा नो कानेइए ह्याने कवितांचे संकलन करायला सांगितले असावे. परंतु लेखिकेने स्वत:चे अनुभव तसेच तिने तिच्या पतीला पाठवलेल्या कविता आणि त्याने तिला पाठवलेल्या कवितांची भर घालून रोजनिशी लिहिली. ह्या रोजनिशीमध्ये तिचे पती बरोबरचे संबंध कसे वाढत गेले आणि त्याचा तिच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला हे दर्शवले आहे. हेइआन कालखंडामध्ये मैत्री वाढवण्यासाठी स्त्री पुरुष कविता लिहून एकमेकांना पाठवत असत. कागेरो निक्कि हेइआन कालखंडामधील लग्न संबंधावर प्रकाश पाडते. त्या कालखंडामध्ये पुरूषांना एकापेक्षा जास्त स्त्रियांबरोबर लग्न करता येत असे. पती आणि पत्नी वेगवेगळ्या घरांमध्ये राहत असत. पत्नी आपल्या माहेरी राहत असे. तिची मुले पण तिच्याच बरोबर राहत असत. बहुतांशी वेळा लग्न हे राजकारण, सत्ता,पैसा अशा कारणांसाठी होत असे. हेइआन कालखंडामध्ये घटस्फोट दिला जात नसे. तर पतीचे घरी येण्याचे प्रमाण कमी झाले की संबंध संपुष्टात आले असे समजले जाई. मिचित्सुनाच्या आईच्या म्हणजे लेखिकेच्या बाबतीत पण असे घडले. त्यामुळे झालेल्या दु:खातून मन रिझवण्यासाठी तिने वेगवेगळ्या धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. तिने बौद्ध भिक्षुणी होण्याचा मानस पण बोलून दाखवला होता. परंतु स्वत:च एकुलता एक मुलगा आणि दत्तक घेतलेली मुलगी यांच्यामुळे तिने हा विचार सोडून दिला. रोजनिशीच्या शेवटी लेखिका मुलांच्या बरोबर जीवन घालवत होती असा उल्लेख आहे. लेखिका तिच्या नोंदी लिहिताना स्वत:शी प्रामाणिक राहिली आहे. ह्या रोजनिशीचे The Gossamer Years ह्या नावाने इंग्रजी मध्ये भाषांतर झाले आहे.

संदर्भ :

                                                        समीक्षक : निस्सीम बेडेकर