सर्वसामान्यपणे संस्कार या शब्दाचा अर्थ ‘लहान मुलांना चांगले आचरण करण्यासाठी दिलेली शिकवण’ असा प्रचलित आहे. परंतु, योगदर्शनानुसार या शब्दाचा अर्थ निराळा आहे. चित्तामध्ये सूक्ष्म रूपाने असणारे विषय म्हणजे संस्कार होय. योगदर्शनानुसार संस्कार हे तीन प्रकारचे असतात, ते पुढीलप्रमाणे —

(१) व्युत्थान संस्कार : ज्यावेळी चित्तामध्ये वृत्ती (विचार) असतात ती अवस्था म्हणजे व्युत्थान अवस्था होय. एखाद्या वस्तूच्या/विषयाच्या संपर्कात आल्यानंतर चित्त त्या वस्तूसारखाच आकार धारण करते यालाच चित्ताची वृत्ती असे म्हणतात. चित्तामध्ये वृत्ती ही थोड्या काळापर्यंत राहते व नंतर ती नष्ट होते; मात्र नष्ट होण्यापूर्वी ती चित्तामध्ये संस्कार उत्पन्न करते. संस्कार कायम चित्तामध्ये राहतो; त्याचा कधीही नाश होत नाही. वृत्तीमुळे उत्पन्न होणाऱ्या संस्काराला व्युत्थान संस्कार किंवा वृत्तिजन्य संस्कार किंवा ज्ञानजन्य संस्कार असे म्हणतात. या संस्कारामुळे भविष्यात स्मृती उत्पन्न होते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने आकाशात इंद्रधनुष्य पाहिल्यावर त्याच्या चित्तामध्ये इंद्रधनुष्याच्या आकाराची वृत्ती उत्पन्न होते व त्या वृत्तीमुळे संस्कार उत्पन्न होतो. भविष्यात त्या व्यक्तीला इंद्रधनुष्य पाहिल्याचे स्मरण होते. चित्तात संस्कार असल्याशिवाय एखाद्या विषयाचे स्मरण होऊ शकत नाही. इंद्रधनुष्य पाहण्याचा अनुभव हा अगदी थोड्या काळापुरता असला तरीही त्यामुळे उत्पन्न होणारा संस्कार हा कायम चित्तात राहतो.

(२) निरोध संस्कार : ज्यावेळी चित्तामध्ये कोणतीही वृत्ती (विचार) उत्पन्न होत नाही, त्यावेळी वृत्ती नसली, तरीही चित्ताचे अस्तित्व असतेच. निर्विचार/निरुद्ध अवस्थेमध्ये चित्ताच्या केवळ असण्याने चित्तात एक संस्कार उत्पन्न होतो, त्यालाच निरोध संस्कार असे म्हणतात. ज्यावेळी निरुद्ध अवस्थेतून चित्त व्युत्थान अवस्थेत येते, त्यावेळी योग्याला जाणीव होते की ‘माझे चित्त इतक्या वेळेपर्यंत निरुद्ध झाले होते, माझ्या मनात एकही विचार नव्हता’. ही स्मृतिरूप जाणीव संस्काराशिवाय उत्पन्न होऊ शकत नाही. त्यामुळे निरुद्ध अवस्थेतही चित्तात संस्कार उत्पन्न होतात असे अनुमानाद्वारे जाणता येते. हे निरुद्ध संस्कार वृत्तीमुळे उत्पन्न होत नाहीत, तर निर्विचार अवस्थेत चित्ताच्या केवळ अस्तित्वाने उत्पन्न होतात. व्युत्थान संस्कार आणि निरोध संस्कार हे परस्पर-विरोधी असतात.

(३) कर्मजन्य संस्कार/आशय : कर्मसिद्धांताच्या नियमानुसार जीवाने केलेले कर्म हे जर अविद्या, अस्मिता, राग, द्वेष किंवा अभिनिवेश यांपैकी कोणत्याही एका क्लेशामुळे प्रभावित असेल, तर त्या कर्माचे चित्तामध्ये संस्कार उत्पन्न होतात आणि भविष्यात त्या कर्मसंस्काराद्वारे कर्म करणाऱ्या व्यक्तीला त्याचे विशिष्ट फळ मिळते. सर्व कर्मांचे फळ तत्काळ मिळत नसते. काही कर्मे शीघ्र फळ देतात, तर काही कर्मे विलंबाने फळ देतात. योगदर्शनानुसार कर्माचे फळ वर्तमान जन्मात तर कधी कधी पुढच्या जन्मातही मिळते. कर्म करण्यासाठी लागणारा कालावधी जरी थोडा असला तरी कर्मामुळे उत्पन्न होणारे संस्कार जोपर्यंत फळ मिळत नाही, तोपर्यंत चित्तामध्ये राहतात. योग्य देश, काल आणि निमित्त यांची प्राप्ती झाल्यावर चित्तामध्ये असणारे कर्माचे सूक्ष्म संस्कार त्या व्यक्तीला कर्माचे फळ देतात. या कर्मामुळे उत्पन्न होणाऱ्या संस्कारांनाच आशय असेही म्हणतात.

एखाद्या कर्माचे फळ मिळाल्यानंतर कर्मजन्य संस्कार निष्क्रिय होतात, परंतु व्युत्थान संस्कार आणि निरोध संस्कार एकदा स्मृती उत्पन्न केल्यानंतरही नष्ट होत नाहीत. त्या संस्कारांमुळे पुन्हा पुन्हा स्मृती उत्पन्न होऊ शकते. स्वत:च्या चित्तामध्ये कोणत्या प्रकारचे संस्कार आहेत याचे ज्ञान सामान्य व्यक्तीला होऊ शकत नाही. परंतु, विशिष्ट योगाभ्यास केल्यानंतर योग्याला चित्तामधील सूक्ष्म संस्कारांचे ज्ञान होऊ शकते. योग्याला विवेकख्यातीचे ज्ञान प्राप्त झाल्यावर ऋतंभरा प्रज्ञेच्या संस्कारांमुळे त्याने केलेल्या कर्मांचे संस्कार निष्क्रिय होतात व योग्याला कर्मफळ मिळत नाही.

सांख्य, योग आणि वेदान्त दर्शनांनुसार संस्कार हे चित्तामध्ये राहतात, परंतु न्याय आणि वैशेषिक दर्शनांनुसार संस्कार हे आत्म्यामध्ये राहतात.

                                                                                                                                                                                                                                       समीक्षक : कला आचार्य