विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात पॅरिस येथे स्थापित झालेला एक आधुनिक कलासंप्रदाय. ही शैली सुरू करण्याचे श्रेय विसाव्या शतकातील श्रेष्ठ स्पॅनिश कलावंत पाब्लो पिकासो (१८८१-१९७३) आणि विख्यात फ्रेंच चित्रकार जॉर्ज ब्राक (१८८२-१९६३) ह्यांच्या, सपाट प्रस्तरावर (2D Surface) त्रिमित आकारांच्या मांडणीच्या प्रयोगाला आहे. वास्तववादी शैलीला विरोध नोंदवून चित्रनिर्मितीतल्या समस्या सोडविण्यासाठी घनवादी शैलीची सुरुवात झाली. फ्रान्समध्ये सु. १९०७ च्या दरम्यान सुरू झालेल्या या प्रयोगाला चित्र, शिल्प, स्थापत्य आणि साहित्य या सर्व कलाप्रकारांमध्ये कमीजास्त प्रमाणात स्थान मिळाले. भारतात या काळात स्वातंत्र्यचळवळ जोरात होती आणि इंग्रजी राजवटीने प्रस्थापित केलेल्या कला शाळांच्या माध्यमातून वास्तववादी चित्रशैलीचा आणि नंतर छायाचित्रणाचा पुरस्कार होत होता.

पॉल सेझान (१८३९-१९०६) या उत्तर दृकप्रत्ययवादी (post impressionist) फ्रेंच चित्रकाराने चित्रांमध्ये घनवादी चित्रणाचे बीजारोपण केले, असे मानले जाते. त्याचे दृश्यांच्या मांडणीसाठी केलेले प्रयोग म्हणजे सर्व आकारांना चौकोन, त्रिकोण आणि वर्तुळ या प्राथमिक आकारांमध्ये विभागणे. एखाद्या झाडाच्या खोडाकडे पाहताना आपल्याला सिलेंडरचा आकार ठळकपणे दिसतो, जो चित्रात मांडणीसाठी सुसूत्र (simplified) असतो. याचेच प्रगत आणि जटिल प्रयोग घनवादी चित्रणामध्ये आढळतात. एऱ्हवी वास्तवातील माणसे किंवा वस्तू पाहताना आपल्या डोळ्यांना एकच बाजू दृष्टीस पडते; पण त्याची दुसरी न दिसणारी बाजू काही नाहीशी होत नाही. मग या न दिसणाऱ्या पण वास्तवात असणाऱ्या बाजूचे चित्र एकाच सपाट प्रस्तरावर कसे मांडायचे,  ह्याच प्रश्नाला उत्तर म्हणून जे प्रयोग झाले, त्याला घनवादी चित्रपद्धती असे म्हणण्यात आले.

अविज्ञोन येथील तरुणी (Les Demoiselles d’Avignon), १९०७

१९०७ ते १९१४ हा साधारणत: घनवादाच्या भरभराटीचा काळ मानला जातो. १९०८ मध्ये फ्रेंच कलासमीक्षक लुई व्हाक्सेल्स याने मातीसच्या एका चित्राविषयी लिहिताना क्यूब्ज हा शब्द वापरला होता. त्यावरून क्यूबिझम (Cubism) ही संज्ञा प्रचलित झाली. पिकासो आणि ब्राक यांच्याप्रमाणेच झां मेटझिंगर, अल्बर्ट ग्लेझ, फेर्नांड लेजर, रॉबर्ट दलोने, हेन्री फॉकोनियेर हेही चित्रकार घनवादी शैलीतील प्रमुख कलावंत होत. पिकासोच्या ‘अविज्ञोन येथील तरुणी’ (इं. शी., १९०७, Les Demoiselles d’Avignon) या आफ्रिकेतल्या आदिवासी कलेपासून प्रेरित होऊन केलेल्या चित्राला घनवादाचे प्रथम चित्र मानले जाते. यात वातावरणाचा अभ्यास टाळून तासलेल्या पृष्ठांसारख्या दिसणाऱ्या मनुष्याकृती रंगविल्या आहेत. प्रामुख्याने पिकासोच्या या चित्रनिर्मितीपासूनच घनवादी चित्रनिर्मिती बहरली.

घनवादी चित्रकारांनी चित्रात निसर्गाच्या अनुकरणाला विरोध केला आणि चित्राच्या द्विमितीय गुणांना महत्त्व दिले. यासाठी वस्तूंच्या आकारांना भौमितिक रीत्या विघटित करून त्याची हवी तशी पुनर्मांडणी करणे हा त्यामागचा उद्देश होय. घनाकाराच्या ६ बाजूंपैकी नेहमी कोणत्याही दोन किंवा तीनच बाजू दिसतात. सर्व बाजूंना एकाचवेळी पाहायचे असेल, तर पोकळ घन उघडून द्विमित (२D) करून पाहावे लागेल. तरीदेखील पूर्ण घनाच्या सर्व बाजू आतून आणि बाहेरून एकाच वेळेला दिसू शकत नाहीत. चित्रात मांडताना या चित्रकारांनी त्यासाठी शोधलेले उपाय म्हणजे घनवाद.

काही अभ्यासकांनी घनवादाची वैश्लेषिक (Analitic) आणि संश्लेषित (Sythetic) अशा दोन उपशैलींमध्ये विभागणी केली आहे. तर काही अभ्यासकांनी तीन उपशैली मांडल्या आहेत. त्या म्हणजे पूर्व घनवाद, उच्च आणि उत्तर घनवाद. १९१० ते १९१२ या काळात पिकासो आणि ब्राक यांच्या प्रदीर्घ चित्रनिर्मितीतून विश्लेषणात्मक अशी जी मीमांसा घडली, त्याला घनवादाचा वैश्लेषिक किंवा विश्लेषण काळ असे म्हटले जाते. या काळात या दोघांनी आकारांना मोठ्या प्रमाणात अमूर्त केले. त्यांच्या मांडणीमध्ये अनेक आयाम, विच्छेदित आकार, करड्या रंगांचा वापर असे प्रमुख विशेष दिसतात. चित्रांचे मुख्य विषय स्थिर-वस्तुचित्रण (still life), संगीत, वाद्य, मडके, खेळावयाचे पत्ते, वृत्तपत्रे, बाटल्या हे आहेत. एकंदर वास्तवाकडे बघण्याचा आणि चित्रनिर्मितीच्या प्रक्रियेला मोठा धक्का देण्याचा कसोशीने प्रयत्न या घनवादी चित्रकारांनी केल्याचे दिसते.

या काळात चित्रविषयांत फार ठळक बदल झाले नाहीत; तर त्यांच्या मांडणीच्या दृश्यभाषेत प्रमुख बदल झाले. आकार, अवकाशयोजना, आकारमान, सादृश्य चित्रणाविषयीचा विरोध, तिरस्कार, नूतन चित्रभाषेची चिकित्सा या साऱ्यांतून घनवाद हा पुरोगामी आणि आधुनिक कलाप्रवाहाला दुजोरा देणारा कलाविचार म्हणून त्याच्याकडे पाहिले गेले.

अविज्ञोन येथील तरुणी ह्या चित्रात दिसणाऱ्या पाच नग्नावस्थेतील वेश्यांचे चित्रण पिकासो याने तैलरंगात मोठ्या कॅनव्हासवर रंगवले. आफ्रिकेतील आदिवासी कलेपासून प्रेरित होऊन चेहऱ्यांवरती मुखपट्ट्यांचा (मास्कचा) वापर केला. अवयवांची रचना करताना त्यांचे भौमितिक तुकडे निरनिराळ्या पद्धतीने जोडून संभ्रम तयार केलेले आहेत. १९१६ मध्ये पहिल्या सार्वजनिक प्रदर्शनात या चित्राला तत्कालीन समाजाने अश्लील मानले. त्यावेळी हे चित्र अतिविवादास्पद ठरले असले, तरी कालांतराने मात्र पूर्व घनवादातील आघाडीचा प्रयोग म्हणून हे चित्र प्रस्थापित झाले.

पिकासो आणि ब्राक हे दोघे भिन्न व्यक्तिमत्त्वाचे होते. एक धाडसी, नेहमी चल किंवा चंचल क्रियेतून काम करणारा, तर दुसरा स्थिर, एकाच विषयाला सावकाश चिंतन करत गिरवणारा. या फरकामुळेच त्यांच्या घनवादी चित्रांना वेगळी दिशा मिळत गेली. पहिल्या महायुद्धाच्या वेळी ब्राकला फौजेत सामील व्हावे लागले. त्यामुळे दोघांच्या एकत्र कामाला पूर्णविराम मिळाला. युद्ध संपल्यावर ब्राकने घनवादी शैलीतच काम सुरू ठेवले; पण पिकासो मात्र इतर प्रयोगांत मग्न होता.

सुमारे १९१२ ते १९१४ या काळात संश्लेषित घनवाद, चित्रातल्या ठळक बदलाच्या आधारे विभागला गेला. कागदी कात्रणापासून नवीन रचना, निरनिराळ्या वस्तू एकत्र चिकटवून तयार झालेले चिक्कणितचित्रण (कोलाज) अशा प्रकारची चित्रे पाहायला मिळतात. अर्थात यामध्ये मूळ घनवादी विचारांपेक्षा विविध पोत, आकार, माध्यम, रंग यांना एकत्र आणून दृश्यनिर्मितीस प्राधान्य देण्यात आले. पिकासो, ब्राक आणि युआन ग्री व काही प्रमाणात लेजर हे संश्लेषित घनवादाचे आघाडीचे चित्रकार मानले जातात.

पोर्ट्रेट ऑफ पाब्लो पिकासो, १९१२, झां ग्रीस

पूर्व घनवाद, उच्च आणि उत्तर घनवाद ही विभागणी डग्लस कूपर (१९११–१९८४) या ब्रिटिश कलेतिहासकार व कलासमीक्षकांनी कलाकारांच्या हालचाली आणि चित्रातल्या संकल्पनेत झालेल्या बदलांच्या आधारावर केली. पूर्व घनवाद हा टप्पा म्हणजे पिकासो, ब्राक यांच्या प्रारंभिक प्रयोगाचा काळ. उच्च घनवाद ह्या काळात पिकासो, ब्राक, ग्रीस आणि लेजर ह्यांच्या व्यतिरिक्त स्वतंत्र काम करणारे, झां मेटझिंगर, अल्बर्ट ग्लेझ, फेर्नांड लेजर, रॉबर्ट दलोने, हेन्री फॉकोनियेर, मार्सेल द्यूशां आणि दिएगो रिव्हिएरा देखील सहभागी होते. घनवाद मोठ्या प्रमाणात चित्रकलेशी निगडित असला तरी, शिल्पकलेत याचा परिणाम अलेक्सान्डर अर्चिपेंको, रेमंड द्यूशां विलाँ, जॅक लीपशीत्स या पुरोगामी शिल्पकारांच्या कामांतूनही पाहायला मिळतो. पिकासो आणि इतर कलाकारांनी स्वतंत्र भूमिका मांडून मूर्तअमूर्ताची रचना विविध पद्धतीने केली. बहुतांशी चित्रकार अमूर्त भौमितिक रचनांचा पुरस्कार करताना आढळतात. उत्तर घनवाद या टप्प्यात १९१३ साली न्यूयॉर्क येथे भरलेले आरमारी शो (शस्त्रागार प्रदर्शन), फ्रान्स येथे भरविण्यात आलेले सालों दे इंडिपेंडेंट्स या प्रदर्शनांमधून त्यांबरोबरच विविध दैनिकांमधून यूरोपमध्ये सर्वत्र घनवाद व त्या पाठोपाठ अप्रतिरूप अभिव्यक्तिवाद (abstract expressionism) या पारंपरिक वास्तववादी पद्धतीच्या आणि रंगभारवाद (fauvism), नवकालवाद (futurism) अशा पुरोगामी कलाप्रकारांचा प्रसार झाल्याचे आढळते. या टप्प्यात पिकासोसहित अनेक चित्रकारांनी सपाट आकाररचनेत ठळक, उजळ रंगांचा वापर करून घनवादाला एक नवीन आयाम प्राप्त करून दिला. यात डग्लस कूपर यांच्याप्रमाणे जन्माने जर्मन असलेला फ्रेंच कलासंग्राहक व व्यापारी डॅनियल हेन्री काहनवेलर (१८८४–१९७९); ग्विलोम अपॉलिनेर, आंद्रे सॅलमन सारखे लेखक आणि प्रदर्शनस्थळ या सर्वांचा वाटा महत्त्वाचा आहे. तत्कालीन समाजाने आज पुरोगामी मानलेल्या कलेला विरोध केला. फ्रान्समध्ये या अशा विद्रुप कलेच्या प्रदर्शनासाठी सार्वजनिक वास्तूंचा आणि निधीचा वापर करण्याविषयी विवाद निर्माण झाले. यातून एका अर्थी घनवादी आणि त्या नंतरच्या अग्रेसर – आव्हा गार्दे –(avant  garde) कलाप्रवाहांना प्रसिद्धी व कालांतराने मान्यता मिळण्याची सोय झाली. भारतातही नवकलेला मिळालेली मान्यता ही बहुतांशी दुसरे पर्यायी कलाप्रवाह प्रबळ नसल्याने, नवकलेतील चित्रभाषेसंदर्भातील गोंधळ आणि कालांतराने पश्चिमेला अनुकरण करण्याची वृत्ती यांतून प्राप्त झाली असावी. यूरोपमध्ये या विरोध-मान्यता प्रक्रियेला सलग धारा आहे, जी प्रबोधन काळापासून ( renaissance) प्रवाहीत आहे.

घनवादी चित्रशैलीचा प्रभाव दीर्घकाळ आणि जगभर पसरल्याचे कलेतिहासातून पाहायला मिळते. भारतात १९४० च्या दरम्यान गगनेंद्रनाथ टागोर, फ्रान्सिस सोझा, रामकुमार, सदानंद बाकरे, जहांगीर साबावाला, पिलू पुचकनवाला अशा अनेक पुरोगामी चित्रकारांनी, शिल्पकारांनी या नव्या दृश्यभाषेचा वापर केला. एवढेच नाही, तर स्वत:चे निरनिराळे अर्थ लावून स्थानिक भारतीय गुण आणि मर्यादा असणारे घनवादी स्वरूप तयार केले. यूरोपप्रमाणेच भारतातील घनवादी प्रभावाचे रूपांतर अमूर्त कला आणि तांत्रिक कलेत झाल्याचे आढळते. आजही जगभरात आणि भारतात घनवादाचे अनुयायी कमीजास्त प्रमाणात आढळतात.

समीक्षक : महेंद्र दामले; मनीषा पोळ