ज्या रंगकामाकरिता पाणी हे माध्यम म्हणून वापरले जाते, त्यास जलरंग असे म्हणतात. जलरंगांचे प्रमुख दोन प्रकार आहेत : अपारदर्शक जलरंग आणि पारदर्शक जलरंग. अपारदर्शक जलरंगांत पांढऱ्या रंगाचा समावेश असतो. पोस्टर रंग (Poster Colour), चिकणरंग (Tempera) आणि स्थूल किंवा जाड जलरंगचित्रण (Gouache) हे अपारदर्शक जलरंग म्हणून ओळखले जातात. या तीनही रंगांत रंगद्रव्यविषयक (Pigment) फरक आहेत. हे सर्व अपारदर्शक जलरंगप्रकार वरील नावांनीच स्वतंत्रपणे ओळखले जातात. भारतीय पारंपरिक चित्रे ही प्रामुख्याने चिकणरंगांनी रंगविली जात असत. अजिंठ्याच्या भित्तिचित्रांपासून लघुचित्रांपर्यंत थोड्याफार तांत्रिक फरकाने चिकणरंग वापरले जात असत. यात विविध प्रकारची खनिज, वनस्पतिजन्य, प्राणिज रंगद्रव्ये ही खैराच्या डिंकाबरोबर खलामध्ये घोटली जातात.
पारदर्शक जलरंगांत पांढऱ्या रंगाचा वापर केला जात नाही. चित्रात जेथे पांढरा भाग हवा आहे, तेथे कागद रिकामा सोडला जातो. कागदाचा पांढरा भाग हाच पांढरा रंग म्हणून वापरला जातो. रंगाची फिकट छटा मिळवायची असेल, तर रंगात पाण्याचे प्रमाण वाढविले जाते आणि रंगाचा हात (Wash) कागदावर दिला जातो. चित्र रंगविताना फिकट छटेकडून गडद छटेकडे जात रंगकाम केले जाते. रंगाचे पातळ हात एकमेकांवर दिले जातात, तसेच ओल्या रंगात दुसरा रंग देऊन मनोहारी ओघळ (Flow) प्राप्त केले जातात. जलरंगांच्या चित्रात चुका सुधारण्यास फारसा वाव नसतो. जलरंग हे नलिका आणि वडीच्या स्वरूपात मिळतात. जलरंगाकरिता हातकागद हा चांगला मानला जातो. प्रत्यक्ष निसर्गात जाऊन निसर्गचित्रण करण्यासाठी हे रंग जास्त लोकप्रिय आहेत. अरबी गोंद आणि रंगद्रव्य यांच्या मिश्रणातून हे रंग बनविले जातात.
ब्रिटिश काळात तैलरंग (Oil colour) हे प्रमुख माध्यम होते, तर जलरंग हे दुय्यम माध्यम मानले जायचे. पण तरीही चित्रकार जलरंगात काम करीत असत. ब्रिटिश स्वच्छंदतावादी निसर्गचित्रकार जोझेफ टर्नर (१७७५–१८५१) यांची जलरंगातील चित्रे या माध्यमाच्या उच्च आविष्कारापर्यंत पोहोचलेली दिसतात. विशेष म्हणजे इंग्रजांनी स्थापन केलेल्या आर्ट स्कूलमधील अभ्यासक्रमात बराच काळ जलरंग समाविष्ट नव्हता. तथापि चिकणरंगातील लघुचित्रांची परंपरा असलेल्या भारतात पारदर्शक जलरंगात काम करण्याची सुरुवात मात्र ब्रिटिश काळात झाली. बंगाल आणि महाराष्ट्रातील कलाकार त्या बाबतीत अग्रेसर होते.
बंगाली चित्रकार अवनींद्रनाथ टागोर यांनी जलरंगांत भरपूर काम केले. १८९५ च्या आसपासची त्यांची वॉशतंत्रातील चित्रे खूप गाजली. प्रवासाचा शेवट, भारतमाता ही त्यांतील महत्त्वाची चित्रे मानली जातात. वॉशतंत्रात जलरंगाचा पातळ हात कागदावर दिला जातो. तो वाळल्यावर कागद पाण्याखाली धुतला जातो. तेव्हा लेपन केलेल्या रंगाचा काही अंश कागदावर राहतो. त्यावरून पुन्हा दुसरा रंग लावला जातो आणि तोही धुतला जातो. अशी प्रक्रिया सातत्याने केल्यावर रंगछटांचा आल्हाद तयार होतो. हे तंत्र मूळचे चीन आणि जपानमधील आहे. बंगालमधील पुनरुत्थान चळवळीतील कलाकारांनी तैलरंगांना नाकारून भारतीय आणि पौर्वात्य परंपरा स्वीकारल्या. यात माध्यम आणि तंत्र यांचाही समावेश होता. जलरंगांतील वॉशतंत्र हे त्याचेच फलित होय. बंगाल स्कूलमधील गगनेंद्रनाथ ठाकूर (१८६७–१९३८), नंदलाल बोस (१८८२–१९६६) यांनी जलरंगांत भरपूर प्रयोगही केले. नंदलाल बोस यांनी चिकणरंग आणि वॉशमध्ये काम केले, तसेच दोहोंचे मिश्रणदेखील केले. रामकिंकर बैज, गोपाल घोष, विनोद बिहारी मुखर्जी या कलाकारांनी जलरंगांचा विविध पद्धतींनी शोध घेतला. विनोद बिहारी मुखर्जी यांनी जलरंगांतील निसर्गचित्रांबरोबरच पारंपरिक भारतीय भित्तिचित्रतंत्रात काम केले. जलरंगांत काम करणारे अनेक कलाकार बंगाल स्कूलमध्ये घडले. गणेश पायन (१९३७–२०१३) यांनी चिकणरंगमाध्यमात प्रभावी काम केले. अर्धपारदर्शक रंगांचे एकावर एक लेपन करून अनेक छटा प्राप्त करण्याचे नेहमीपेक्षा वेगळे तंत्र गणेश पायन यांच्या कामात दिसते. श्यामल दत्त राय (१९३४–२००५) यांनी आपल्या रचनाचित्राकरिता जलरंग हे मुख्य माध्यम म्हणून स्वीकारले. त्यांनी जलरंगांच्या शैलीदार हाताळणीत वॉशतंत्रासारखा रंगांचा आल्हाद चित्रात मिळविला. अलीकडच्या काळात जलरंगावर कमालीचे प्रभुत्व असणारे लोकप्रिय कलाकार म्हणून बंगालमधील समीर मोंडल (१९५२) ओळखले जातात. द इलेस्ट्रेटेड विकली ऑफ इंडियाकरिता त्यांनी केलेली जलरंगांतील व्यक्तिचित्रे विशेष लोकप्रिय झाली.
महाराष्ट्रात जलरंगांत काम करण्याची मोठी परंपरा आहे. मुंबईत सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून शिक्षण घेतलेले कोल्हापूरचे आबालाल रहिमान (१८६०?–१९३१) हे जलरंगातील निसर्गचित्रांकरिता प्रसिद्ध होते. सुरुवातीच्या काळात दृश्यतपशील चितारण्यावर त्यांचा भर होता, तर पुढे जलरंगांचा मुक्त वापर त्यांच्या चित्रांत दिसतो. पन्हाळा, संध्यामठ, रावणेश्वर अशा चित्रांनी त्यांनी रसिकांची मने जिंकली; शिवाय तज्ज्ञांच्या कौतुकास ती पात्र ठरली. लक्ष्मण नारायण तस्कर (१८७०–१९३७) यांनी जलरंगात दर्जेदार निसर्गचित्रण आणि प्रसंगचित्रे निर्माण केली. जलरंगामध्ये पांढरा रंग वापरणे निषिद्ध मानले जाते. कारण कागद कालांतराने पिवळा पडतो आणि अशा चित्रात जर पांढरा रंग वापरला असेल, तर तो डागासारखा दिसू लागतो. आबालाल रहिमान यांनी तर अशा पद्धतीने केलेली चित्रे जाळून टाकली होती. पण अशी तांत्रिक शुद्धता तस्करांनी बाळगली नाही. घाटावरील स्त्रिया, बाजार, उभा हनुमान अशा चित्रांत त्यांच्या रचनाकौशल्याबरोबरच जलरंगात बारकावे चितारण्याचे त्यांचे कसबही दिसते. पुढील काळात सावळाराम लक्ष्मण हळदणकर (१८८२–१९६८) आणि त्यांचे सुपुत्र गजानन सावळाराम हळदणकर (१९१२–१९८१) यांनी जलरंगात प्रभावी व्यक्तिचित्रे केली. एम. आर. आचरेकर (१९०७–१९७९), एम. एस. जोशी (१९१२–२००१) यांनीही जलरंगांत अत्यंत दर्जेदार निर्मिती केली. रत्नागिरीच्या प्रल्हाद धोंड (१९०८–२००१) यांनी निसर्गचित्रांत सागरकिनारे चित्रित केले. तपशिलापेक्षा जलरंगातील प्रवाहीपणाला ते महत्त्व देत. रंगांच्या फटकाऱ्यांतून निसर्गातील हालचाली त्यांनी चित्रांत टिपल्या. आयुष्याच्या शेवटच्या काळात त्यांनी केरळमधील निसर्ग चितारला. कलानगरी कोल्हापुरातील गणपतराव वडणगेकर (१९१२–२००४) यांनी जलरंगाची तजेलदार आणि हळुवार हाताळणी केली. त्यांची जलरंगातील व्यक्तिचित्रे याची साक्ष देतात. कोल्हापुरातील दुसरे कलाकार ग. ना. जाधव (१९१७–२००४) यांची पारदर्शक आणि अपारदर्शक जलरंगांवर हुकमत होती. मुखपृष्ठावरील चित्राकरिता पोस्टर रंग माध्यमात रंगलेपनाची अनेक तंत्रे त्यांनी हाताळली. दीनानाथ दलालांच्या मुखपृष्ठावरील चित्रांनी जनमानसात मोठी ख्याती प्राप्त केली होती. पुठ्ठ्यावर पोस्टर रंग माध्यमात अनेक शैलीत त्यांनी काम केले. पाते (blade) किंवा सुरी (knife) यांच्या साहाय्याने पोस्टर रंगाचे घट्ट रंगलेपनदेखील त्यांनी केले. अब्दुलरहीम आपाभाई आलमेलकर (१९२०–१९८२) यांनी भारतीय लघुचित्रपरंपरेतून प्रेरणा घेऊन पुठ्ठ्यावर अपारदर्शक जलरंगात काम केले. त्यांच्या शैलीला मोठ्या प्रमाणात अनुयायी मिळाले.
१९२० च्या दरम्यान ‘बाँबे रिव्हायव्हलिस्ट स्कूलʼ ही कलाचळवळ उदयास आली. या कलाचळवळीत सुरुवातीच्या काळात पातळ जलरंगांचा वापर करून वॉशतंत्राच्या आधारे अनेक चित्रकारांनी दर्जेदार कलानिर्मिती केली. त्यांत जी. एच. नगरकर, आर. जी. चिमलकर, एस. जी. जांभळीकर असे अनेकजण चित्रनिर्मिती करीत होते. पुढे जी. एम. अहिवासी यांनी या कलाचळवळीत चिकणरंगपद्धतीने काम सुरू केले. तसेच शंकर पळशीकर यांनीही त्यात नवीन प्रयोग केले. प्रोग्रेसिव्ह ग्रूपचे सैयद रझा (१९२२–२०१६) यांनी सुरुवातीच्या काळात अपारदर्शक जलरंगांत मुंबईची चित्रे काढली. त्यांच्या चित्रांतील कुंचल्याचे उत्स्फूर्त फटकारे दृक्प्रत्ययवादी कलावंतांच्या कामाची आठवण करून देतात. पुढे जलरंगांतील निसर्गचित्रणाच्या परंपरेत नाशिकमधील शिवाजी तुपे (१९३५–२०१३) यांनी प्रभावीपणे नव्या वाटा चोखाळल्या. नाशिक घाटाचे चित्रण हा त्यांचा प्रमुख विषय होता. ऊनसावल्यांचा वास्तूवरील खेळ त्यांनी जलरंगांत चितारला. नाशिकच्याच सावंतबंधूंनी ही परंपरा राखली आहे. वासुदेव कामत आणि जॉन फर्नांडिस यांनी व्यक्तिचित्र आणि निसर्गचित्र या दोहोंमध्ये पारदर्शक जलरंगांतील प्रभावी काम केले आहे, तर मिलिंद मुळीक यांनी केलेले कोकणाचे जलरंगांतील चित्रण लोकप्रिय झाले आहे. जलरंगांत निसर्गचित्रण करण्याचा मोठा प्रघात असला, तरी लक्ष्मण श्रेष्ठ यांनी जलरंगात अमूर्त चित्रे केली. पोस्टर रंग या माध्यमाला मुख्य माध्यम म्हणून वापरण्याच्या भानगडीत चित्रकार पडत नसले, तरीही प्रभाकर कोलते यांनी बराच काळ पोस्टर रंगमाध्यमात अमूर्त चित्रे केली.
पारदर्शक जलरंगांत काम करण्याची परंपरा प्रामुख्याने बंगाल आणि महाराष्ट्रात असली, तरीही या माध्यमात भारतभर काम झाले आहे. बडोदा, हैदराबाद, केरळ, राजस्थान येथील कलाकारांनीदेखील जलरंगांत काम केले आहे. तसेच प्रथितयश कलाकारदेखील गरजेनुसार जलरंगांत काम करीत असतात. गुलाम मोहंमद शेख यांनी चिकणरंग माध्यमात काम केल्याचे दिसते. लक्ष्मा गौड यांनीही आपल्या चित्रांकरिता कधीकधी जलरंगमाध्यम स्वीकारल्याचे दिसते. एम. एफ. हुसेन यांनी छत्र्यांची चित्रमालिका जलरंगांत केली. तसेच अतुल दोडिया यांनी गांधीजींवरील चित्रमालिकेकरिता मोठ्या आकारात जलरंगांत काम केले. मोठ्या आकारात कागद उपलब्ध असल्याने अगदी ४ फूट X ६ फूट अशा आकारातही जलरंगांत काम होत आहे. अम्लसह (acid proof) कागदांमुळे कागदाच्या पिवळे पडण्याच्या गुणधर्माला दीर्घ काळ रोखले जाऊ शकते. तसेच विविध परदेशी कंपन्यांचे दर्जेदार जलरंग भारतीय बाजारात सहजपणे उपलब्ध होत आहेत. जवळपास पावणेदोन शतकांत अनेक अर्थांनी जलरंग या माध्यमात भारतीय कलाकारांनी नव्या शक्यता शोधल्या आहेत.
संदर्भ :
- Buchan, Jack; Baker, Jonathan Gouache, London, 1993.
- Ghosh, Mrinal, Sojourns of a Painter Shyamal Dutta Ray and his times, Ahmedabad, 2001.
- Gwynn, Kate, Painting in Watercolour, London, 1982.
- बहुळकर, सुहास; घारे, दीपक, संपा. आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण –शिल्पकार चरित्रकोश, खंड : ६, दृश्यकला, मुंबई, २०१३.
- भगत, रा. तु. रंगसम्राट आबालाल रहिमान, कोल्हापूर, १९९३.
अतिशय अभ्यासपूर्ण आणि बारकाव्यांसह लिखाण केले आहे
भारतीय कलेतील दाखले दिल्याने मुद्ये स्पष्ट पणे कळतात. जलरंग या माध्यमातील इतर प्रकारांची पण माहिती या लिखाणातून झाली.