विठ्ठल उमप : (१५ जुलै १९३१ – २६ नोव्हेंबर २०१०). महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोककलावंत. लोकशाहीर, लोकगायक, गीतकार, नाट्य – चित्रपट क्षेत्रातील कलावंत, गझल गायक असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे पूर्ण नाव विठ्ठल गंगाराम उमप असे असून त्यांचे मूळ घराणे विदर्भातले होते कालांतराने ते अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील चिखली येथे स्थायिक झाले. उमप यांच्या वडिलांकडे कलगी – तुरा परंपरेचा गायनाचा वारसा होता. मुंबईत नायगाव परिसरात त्यांचे वडील नोकरी धंद्याच्या निमित्ताने स्थायिक झाले. विठ्ठल उमप यांच्यावर बालवयातच गायनाचे संस्कार झाले. ते गिरणगावातील भजनांमधून अभंग, गौळणी गावू लागले. आंबेडकरी जलशांचाही फार मोठा प्रभाव त्यांच्यावर होता. वयाच्या आठव्या वर्षांपासूनच त्यांना गायनकलेची आवड निर्माण झाली. १९५६ पासून ते आंबेडकरी जलशांमध्ये कव्वाली गायन करू लागले. सुमारे ५० वर्षे त्यांनी आकाशवाणीवरील विविध कार्यक्रमात गायन केले.
तब्बल ३० वर्षे त्यांनी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र एड्स नियंत्रण मंडळ अशा शासकीय संस्थांच्या प्रचार मोहिमांमधून समाज प्रबोधनपर गायन केले. एच. एम. व्ही., व्हीनस, टी सिरीज, सरगम, स्वरानंद, सुमित आदी ध्वनिमुद्रिका कंपन्यांसाठी त्यांनी लोकगीते, कोळीगीते, पोवाडे, भारुडे, गोंधळ गीते अशा विविध स्वरूपाचे गीतगायन केले. लोकशाहीर विठ्ठल उमप यांची २०० च्या वर ध्वनीमुद्रित गीते उपलब्ध आहेत. फू बाई फू, लग्नाला चला, नेसते नेसते पैठणी साडी, चिकना चिकना माव्हरा माझा, ये दादा आवार ये, माझ्या भीमरायाचा मळा, होता तो भीम माझा, बोबडी गवळण, आज कोळी वाऱ्यात अशी अनेक लोकगीते त्यांनी गाऊन लोकप्रिय केली आहेत .
उमाळा हा गझल संग्रह, गीत पुष्पांजली, माझी वाणी, भीमा चरणी, असा मी झालॊ आंबेडकर, पहिल्या धारेची, माझी आई भीमाई, रंगशाहिरीचे, फू बाई फू ही त्यांची प्रकाशित साहित्य संपदा आहे. लोकशाहीर विठ्ठल उमप केवळ गझलकार, गीतकार, लोकगायकच नव्हते तर ते उत्तम अभिनेते होते. लोकाविष्कारांवर आधारित नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविला . इंडियन नॅशनल थिएटर लोकप्रयोज्य कला संशोधन केंद्रातर्फे रंगभूमीवर आलेल्या अबकडुबक, खंडोबाचं लगीन, जांभूळ आख्यान, अरे रे संसार, मातीचं स्वप्न या नाटकांतून त्यांनी सूत्रधारासह अनेक महत्वाच्या भूमिका साकार केल्या. खंडोबाचं लगीन मधील सूत्रधार आणि जांभूळ आख्यान मधील द्रौपदी या त्यांच्या भूमिका मराठी रंगभूमीवरील अविस्मरणीय भूमिका ठरल्या. विठो रखुमाई, मुजरा घ्या सरकार, गाढवाचं लग्न, दार उघड बया दार, देवमाणूस, जिंजीहून सुटका, हर हर महादेव, हैदोस, गुण्या गोविंदाने, बुद्धम सरणम अशा अनेक नाटकांमधून त्यांच्या अभिनय कौशल्याचे दर्शन घडले. आहेर, पायगुण, अन्यायाचा प्रतिकार, भीमगर्जना, अश्व, कंकण, जन्मठेप, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, बळीचं राज्य येऊ दे, टिंग्या, विहीर, नटरंग, गलगले अशा अनेक चित्रपटांमधून लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी काम केले.
कॉर्क आयर्लंड येथे १९८३ साली आयोजित झालेल्या २५ राष्ट्रांच्या लोककला महोत्सवात लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी सहभाग घेतला होता. १९६७ झाली इंदिरा गांधी यांच्यापुढे त्यांनी हिंदी भाषेत मागासवर्गीयांच्या मागण्या सादर केल्या होत्या. १९७७ साली तालवाद्य सम्राट अण्णा जोशी यांच्या ‘महाराष्ट्राचं लोकसंगीत’ या कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. १९८७ साली नागालँड येथे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे तत्कालीन संचालक प्रा. कमलाकर सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम सादर करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली होती. १९८९ साली भारत सरकार द्वारा आयोजित अपना उत्सवात त्यांनी कार्यक्रम सादर केला. दिल्लीच्या विज्ञान भवनात स्वरचित लोकनाट्य सादर केले. सोलापूर येथे आयोजित झालेल्या अखिल भारतीय नाट्य संमेलनात लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी फू बाई फू या भारुडासह त्यांची लोकप्रिय लोकगीते सादर केली.
मधुकर पाठक, श्रीनिवास खळे, राम कदम, श्रीधर फडके, अमर हळदीपूर, राम लक्ष्मण, दत्ता डावजेकर, अच्युत ठाकूर, यशवंत देव अशा संगीत दिग्दर्शकांसोबत काम करण्याची, गायनाची संधी लोकशाहीर विठ्ठल उमप यांना प्राप्त झाली. १९९६ साली त्यांना महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त झाला. दादू इंदुरीकर स्मृती पुरस्कार आणि पद्यश्री दया पवार स्मृती पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. सन २०१० साली भारत सरकारचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार, अण्णाभाऊ साठे पुरस्कार, २००५ साली जांभूळ आख्यान नाटकासाठी मटा. सन्मान पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. विठ्ठल उमप यांना दोन मुली आणि चार मुले आहेत. त्यांचे पुत्र भास्कर, आदेश, उदेश, संदेश, नंदेश, हे विठ्ठल उमप यांची शाहिरीची परंपरा पुढे चालवित आहेत. दोन मुली संगीता आणि कविता. त्यांचे दोन विवाह झाले होते. लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी आपल्या समर्थ लोकगीत गायनातून तसेच शैलीदार अभिनयातून मराठी रंगभूमीवर, लोकरंगभूमीवर तसेच रुपेरी पडद्यावर आपला स्वतंत्र ठसा उमटविला आहे.
नागपूर येथे खाजगी वाहिनीच्या उद्घाटन समारंभात भीमगर्जना आणि बुद्धवंदना करीत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
संदर्भ : मुलाखत