मानवशास्त्रामध्ये धर्म ही अभ्यासाची एक व्यापक संकल्पना आहे. आद्य मानवी संस्कृतीमध्ये धर्माचा उदय कसा झाला असावा, या विषयी विविध मते आहेत. धर्माच्या विकासाचे वेगवेगळे टप्पे किंवा अवस्था मानले असून त्यांतील सर्वात्मवाद, जीवितसत्तावाद आणि निसर्गवाद या तीन महत्त्वाच्या आहेत.

सर्वात्मवाद : सर्वात्मवादाला सर्ववस्तुचेतनवाद किंवा चित्तशक्तीवाद किंवा आत्मवाद असेही म्हणतात. सर्व वस्तुंच्या ठिकाणी चैतन्य असल्याची समजूत असते. आदिम लोकांचा आत्मा, भुतखेत इत्यादींवर श्रद्धा होती आणि याच श्रद्धेला उद्देशून सर्वात्मवाद किंवा सर्ववस्तुचेतनवाद असे म्हटले जाते. आजही अनेक आदिवासी जमातींमध्ये आत्मा, भूत यांवर श्रद्धा, विश्वास असल्याचे दिसून येते. माणसाचा अज्ञात शक्तींवरील विश्वास म्हणजे सर्वात्मवाद. ही शक्ती चैतन्यशील आहे. अज्ञात शक्ती पृथ्वीवरील प्राणिमात्राच्या आणि मानवाच्या वर्तनाचे नियंत्रण करते. यालाच चित्तशक्तीवाद असे म्हणतात. सर्व जड पदार्थात एक प्रकारची चेतना वास करीत असते. आत्मा, भुतखेत, पिशाच यांचाही यात समावेश होतो. मृत पितरांचे आत्मे छाया रूपाने वावरत असतात, अशी श्रध्दा आदिवासी जमातीत पाहायला मिळते.

जीवितसत्तावाद : सर्ववस्तुचेतनवादाचा प्रसार होण्यापूर्वीच्या अवस्थेत माणसाचा अज्ञातशक्तीवर विश्वास होता. याचे स्वरूप चैतन्यशील असे आहे. हा विचार अद्भुत शक्तीविषयीच्या कल्पनेशी जुळणारा आहे. या सिद्धांताला जीवितसत्तावाद किंवा जैवीसत्तावाद असे म्हणतात.

निसर्गवाद : धर्माच्या उत्पत्तीचे विवरण करणारा आणखी एक वाद निसर्गवाद या नावाने ओळखाला जातो. माणसाचे जीवन विशेषत: आदिकालिक लोकांचे जीवन पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होते. दिवस, रात्र, वादळ, पूर, पाऊस, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण इत्यादींबद्दल त्यांच्यात भितीयुक्त आदर होता. या निसर्गशक्तींना संतुष्ट केल्यास आपल्यावर कोणतेही संकट येणार नाही आणि आपले जीवन सुखी होइल, या कल्पनेतून निसर्गपुजेचा उदय झाला. जगातील सर्वच आदिवासी जमात आजही निसर्गपूजक असून ते निसर्गाचीच पूजा करतात. वैदिक काळातील धर्माचे स्वरूप असेच होते. आदिम जमातीतही असेच स्वरूप दिसून येते. नैसर्गिकशक्ती चेतनायुक्त मानली जाते.

संदर्भ :

  • मेहेंदळे, य. श्री., मानवशास्त्र (सामाजिक व सांस्क्रुतिक), पुणे, १९६९.
  • शारंगपाणी, म. मु., सामाजिक मानवशास्त्र, पुणे, १९७०.

समीक्षक : म. बा. मांडके