कमीतकमी जागेत भरभक्कम पायावर काँक्रीटचा उत्तुंग इमारती मनोरा (Tower)  म्हणजे शिकागोतील मरीना शहर होय.

पार्श्वभूमी : १९६० च्या दशकात अमेरिकेतील शिकागो उपनगरात एक लघुनगररचना (Mini township)  फक्त ३ एकर जमिनीवर निर्माण करण्यात आली. ही लक्षवेधी रचना अमेरिकन वास्तुरचनाकार बर्ट्रंड गोल्डबर्ग (Bertrand Goldberg) यांनी प्रत्यक्षात आणली. विंडी सिटी किंवा सिटी विदीन सिटी अशी मरीना सिटीची स्वतंत्र ओळख आहे. दैनंदिन जीवनातील काम, घर आणि विरंगुळा या तीन गोष्टींचा एकत्रित संगम आपल्या वास्तुरचनेत गोल्डबर्ग यांनी केला आहे.

विल्यम मॅकफेट्रिज (मध्यभागी) आणि विकसनकार चार्ल्स स्विबेल (उजवीकडे) यांच्यासोबत बर्ट्रंड गोल्डबर्ग (डावीकडे)

मरीना शहर प्रकल्पाचे नियोजन :  सन १९५९ मध्ये शिकागो नदीकिनारी अंदाजे ९०० स्थानिक नागरिकांसाठी दोन उत्तुंग इमारती बांधण्याची योजना गोल्डबर्ग आखली. तीन एकर जागेत ६५ मजले आणि  ५८७  फूट उंची असणारे दोन गोलाकार इमारती उभारायच्या होत्या. इमारतीची रचना गोलाकार असेल, तर उंचीवरील वाऱ्याचा दाब अंदाजे ३०% कमी होतो. या गृहप्रकल्पासाठी ३६ मिलियन अमेरिकन डॉलर खर्च अपेक्षित होता. प्रत्येक मनोऱ्याचे वजन १० मिलियन पौंड म्हणजे अंदाजे  ४,५०० टन इतके भरत होते. या प्रकल्पाची रचना आणि संरचना करण्यासाठी २५० हून अधिक तज्ञांनी शेकडो रचना बनवल्या. त्यात वास्तुरचनाकार, अभियंते, सल्लागार, विकसनकार, बांधकाम साहित्य पुरवठादार (Suppliers) इत्यादी संबंधित व्यक्तींचा सहभाग होता.

मरीना शहराचा आराखडा : मरीना शहराची अंतिम रचना म्हणजे एक गोलाकार फुलाची पाकळी होती. मध्यभागी गाभा (Central core), त्याभोवती फिरणारे १६ बीम स्तंभ (Column) आणि बाह्यभागात गोलाकार सज्जा (Balcony) अशी आहे.

मरीना प्रकल्प आराखडा

मरीना शहराच्या बांधकाम प्रकल्पाची सुरुवात २२ नोव्हेंबर १९६० रोजी  करण्यात आली. भूगर्भातील नमुन्यात प्रथमत: माती, दगडगोटे आणि ११० फूट खोलवर सुस्थितीतील चुनखडी (Lime stone) आढळली. शेजारी नदी असल्याने खोदकाम करताना पाण्याची पातळी वरपर्यंत होती. पाया बनवण्यासाठी तीन रास ‍छिद्रक यंत्र (Pile drilling machine) आणण्यात आले. प्रत्येक मनोऱ्यासाठी दीड मीटर व्यासाच्या ४० पाईल तीन वर्तुळांमधे समाविष्ट करण्यात आल्या. पाण्यामुळे अनेकदा २४ तास रास छिद्रण (Pile drilling) आणि ट्रेमी (Tremie) काँक्रीट करावे लागत होते. काँक्रीटची गुणवत्ता तपासण्यासाठी त्यावेळी ध्वनिकीय चाचण्या (Ultrasonic tests) घेण्यात आल्या. पाईलच्या वरील भागात लोखंडी आधारक पट्टी (Base plate) वितळजोडाने (Welding) बसवून तराफा संस्तरण (Raft foundation) करण्यात आले. त्यानंतर जमिनीवरील स्तंभ, तुळई लादी (Beam slab) या कामाची सुरुवात झाली.

प्रत्येक लादीचे क्षेत्रफळ अंदाजे १२ हजार चौ. फूट भरत होते. साचेकामासाठी (Formwork) हलक्या वजनाचे फायबर ग्लास साहित्य वापरण्यात आले. मध्यभागी असणाऱ्या प्रबलित सिमेंट क्राँक्रीटयुक्त दंडाचे (RCC shaft) तीन मजले पूर्ण झाल्यानंतर पहिल्या लादीची सुरुवात झाली. पुढे दंड आणि त्यानंतर मजल्यांची लादी या क्रमाने प्रबलित सिमेंट काँक्रीटचे काम पूर्ण झाले. जगातील सर्वांत उंच बुर्ज खलिफा मनोऱ्यासाठी हाच क्रम होता. प्रत्येक मजल्याचे प्रबलित सिमेंट क्राँक्रीटचे काम पाच दिवसात पूर्ण होत असे. लादीसाठी  प्रथम साचेकाम  त्यानंतर स्टील, इलेक्ट्रिकल, नळकाम (Plumbing), धातवीय पत्रा (Sheet metal) आणि काँक्रीट असा क्रम होता. काँक्रीटसाठी ग्रेड ५० चा वापर त्यावेळी केल्याने पृष्ठभागाचे अंत्यरूपण (Finishing) आजही लक्षवेधी आणि अबाधित आहे. बांधकामात मनोरा यारी (Tower crane), पाडबांधणी (Scaffolding), उद्वाहक (Lift), सरकते पट्टे, कंपित्र (Vibrator), मिश्रक (Mixer), प्लावक (Floator) इत्यादी यंत्रांचा वापर करण्यात आला. फायबर ग्लास साचेकामाचा ६७ वेळा पुनर्वापर करण्यात आला. आजचे ॲल्युमिनियम साचेकाम लोकप्रिय होण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्याचाही असाच पुनर्वापर करता येतो. साचेकाम आणि काँक्रीट दर्जेदार असल्याने बाह्यभागात कोठेही प्लॅस्टर करावे लागले नाही. चार वर्षांच्या कालावधीत सन १९६४  मध्ये दोन्ही मनोरे पूर्ण झाले. काँक्रीटचा वापर केलेली त्या काळातील जगातील सर्वांत उंच रहिवासी इमारत म्हणून मरीना शहराची गणना झाली. उंच इमारतीसाठी मनोरा यारीचा वापर जगात पहिल्यांदा होण्याची ही सुरुवात होती.

मरीना शहर : काही दृश्ये

मरीना शहरातील इतर सुविधा : मरीना शहरात दोन्ही मनोरे मिळून ९०० इमारतींचा समावेश आहे. तळ मजल्यावर ७०० बोटींसाठी मरीना, पहिल्या मजल्यावर दुकाने, उपाहारगृहे आणि मद्यगृहे (Restaurant & Bar), दूरदर्शन कलागृह (TV Studio), स्केटिंग पृष्ठ (Skating rink), प्लाझा उद्यान, रंगमंडल (Amphitheatre), जलतरण तलाव (Swimming pool), प्रेक्षागृह (Auditorium), जलसा गृह (Concert hall), शिकागो बॅंक, ऑफिस इत्यादी गोष्टींसाठी जागा ठेवण्यात आली आहेत. दुसऱ्या मजल्यापासून एकोणिसाव्या मजल्यापर्यंत चक्राकार प्रवणमार्गाद्वारे (Ramp) चारचाकी गाड्यांसाठी ८९६ वाहनतळ (Parking) आहेत. त्याला वॅले पद्धतीने वाहनतळाची (Valet parking) सुविधा आहे. विसावा मजला फक्त धुलाई यंत्रणेसाठी (Laundry) राखीव आहे. २१ ते ६० मजल्यापर्यंत रहिवासी दालन (Apartment) आहेत. ६१ व्या मजल्यावरील गच्ची आणि प्रत्येक दालनाच्या सज्जातून दिसणारे शिकागो शहराचे विहंगम दृश्य वेगवेगळे असते. लघुमार्गामधून (Lobby) प्रत्येक दालनाला स्वतंत्र प्रवेश दिला आहे. दालनांमधे गॅस वापरला जात नाही. इमारतीला केंद्रिय यंत्रणा न ठेवण्याचा निर्णय विकसनकाराने घेतला होता. त्यामुळे प्रत्येक दालनामध्ये गरम पाणी, तापक (Heater), वातानुकूलित यंत्रणा, विद्युतीकरण सुविधा स्वतंत्रपणे पुरविल्या जातात. संपूर्णत:  विजेवर चालणारी जगातील पहिली इमारत म्हणून मरीना शहर ही इमारत गणली गेली. इमारतीतील शक्तिशाली उद्वाहकाने ६५व्या मजल्यापर्यंत फक्त ३५ सेकंदात जाता येते.

शिकागो हे अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि लॉस अँजेलीस नंतर तृतीय स्थानावरील महत्त्वाचे शहर म्हणून गणले जाते. या शहरातील उंच इमारती आणि त्यांची वास्तुरचना हे आलेल्या सर्व पर्यटकांचे विशेष आकर्षण असते. पर्यटकांसाठी तेथे बोटीतून वास्तुदर्शन सहली (Architecture tour) आयोजित केल्या जातात. त्यावेळी सिअर्स, ट्रॅम्प, वॉटर, फाईन आर्ट, मरीना, प्रुडेंशियल प्लाझा, नॉर्थ मिशिगन, जॉन हॅन कॉक, फ्रॅंक्लीन इत्यादी अनेक प्रसिद्ध मनोऱ्यांचे एकत्रित दर्शन घडते. सन २०१४ हे मरीना शहर प्रकल्पाने सुवर्ण महोत्सवी वर्ष होते.

संदर्भ : https://www.chicagobusiness.com/article/20150707/CRED03/150709875/bertrand-goldberg-s-marina-city-to-come-up-for-landmark-vote