एका बाजूला तीव्र उतार किंवा तुटलेला कडा आणि दुसऱ्या बाजूला मंद वा सौम्य उतार असलेल्या भूरूपाला क्वेस्टा म्हणतात. याला एकनतीय कटक असेही म्हणतात. हे भूरूप विशेषत: विचलित झालेल्या गाळाच्या खडकांच्या थरांमध्ये आढळते. माथ्यावरील टोपीसारखा कठीण थर आणि त्याखाली कडा निर्माण करणारा मऊ थर यांची वातावरणक्रियेने वा अपक्षरणाने भिन्न प्रमाणांत झीज होऊन हे भूरूप निर्माण होते; कारण मऊ थराची अधिक जलदपणे झीज होते. ४०० ते ४५० नती वा उतार असलेल्या क्वेस्टांना ‘वराहपृष्ठ’ (हॉगबॅक) म्हणतात.

क्वेस्टा तुटलेले कडे कापले जाण्याच्या क्रियेने खडबडीत, टेकड्या असलेला मुल्लुख (प्रदेश) तयार होतो. त्याच्यात अनेक घळी व तीव्र उताराच्या दऱ्या असतात; कारण तीव्र उताराच्या पृष्ठभागावरून कमी लांबी असणारे जलप्रवाह खाली वाहत जाऊन झीज जलदपणे होते. मागील उतार सामान्यपणे सौम्य वा सफाईदार असतात. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत क्वेस्टा सामान्यपणे आढळतात. उदा., ऍरिझोना व न्यू मेक्सिको, तसेच अटलांटिक व गल्फ समुद्र किनाऱ्यालगत ते सामान्यपणे आढळतात.

एका बाजूस तीव्र उताराद्वारे संपणाऱ्या मंद उताराच्या क्वेस्टा या सपाट प्रदेशाची दुसरी टोकाची स्थिती म्हणजे क्षितिजसमांतर स्तरांमध्ये क्वेस्टा हा मेसा वा टेबललँड होतो.

समीक्षक : वसंत चौधरी