कर्नल याकोब पेत्रुस : (२४ मार्च १७५५ – २४ जून १८५०). भूतपूर्व ग्वाल्हेर संस्थानमधील लष्करी अधिकारी. त्याचा जन्म दिल्लीत झाला. वडील पीटर (पेत्रुस) हे येरेवान (सध्याच्या आर्मेनिया राष्ट्राची राजधानी) येथील आर्मेनियनवंशीय व्यापारी होते. त्याची आई जोआना ही इराणमधील इस्फहान येथील न्यू जुल्फा या आर्मेनियनबहुल भागातील एल्ची जोहानेस नावाच्या एका आर्मेनियन व्यापाऱ्याची मुलगी होती. पीटर यांचा मृत्यू दिल्लीतच झाला. पीटर यांच्या मरणोत्तर याकोबला त्यांच्या संपत्तीतील ५००० रुपये, जोआनाला ५००० रुपये व याकोबच्या दोन बहिणींना मिळून ५००० रुपये असे वाटे आर्मेनियन वारसाहक्काच्या कायद्यानुसार मिळाले. जोआनाचा मृत्यू ६ फेब्रुवारी १८०२ रोजी झाला व तिचे आग्रा येथील लष्करपूरमधील आर्मेनियन स्मशानभूमीत दफन करण्यात आले. याकोबच्या दोन बहिणींचेही याच स्मशानभूमीत दफन करण्यात आले.

याकोबने वडिलांच्या मृत्यूनंतर लष्करी पेशाकडे मोर्चा वळवला. वारसाहक्काने मिळालेल्या संपत्तीतून काही सैनिकांची एक तुकडी तयार करून भारतीय शासकांतर्फे लढणे हे त्या तुकडीचे काम होते. विशेषत: भरतपूरच्या राजाकडे असताना तीन वर्षे या तुकडीची भरभराट झाली व अनेक सैनिक तीत समाविष्ट झाले. त्यानंतर एकदा मोठ्या आजारपणामुळे याकोबला बराच काळ अंथरुणावर पडावे लागले. सैनिकी तुकडीची जबाबदारी या काळात त्याच्या एका मेहुण्याकडे होती. मेहुण्याला लष्करी व्यवसायाचा अनुभव नसल्याने या काळात बऱ्याच सैनिकांनी तुकडीतून अन्य शासकांच्या पदरी जाणे पसंत केले. याकोब बरा झाल्यावर उरलेल्या सैनिकांनिशी डिबॉईन या फ्रेंच अधिकाऱ्याच्या हाताखाली महादजी शिंद्यांच्या पदरी रुजू झाला (१७८०). महादजींच्या मृत्यूनंतर ग्वाल्हेरच्या गादीवर आलेल्या दौलतराव शिंद्यांच्याही पदरी त्याने नोकरी केली. विशेषत: १८०१ मधील उज्जैनच्या लढाईत त्याने गाजवलेल्या शौर्यामुळे दौलतरावांनी त्याला कर्नलचा दर्जा देऊन पहिल्या ब्रिगेडचा मुख्याधिकारीही नेमले. या ब्रिगेडमध्ये पायदळाच्या १२ रेजिमेंट्स, घोडदळाच्या ४ रेजिमेंट्स व १५० तोफा असलेली तोफखान्याची १ ब्रिगेड यांचा समावेश होता. त्याचा पगार दरमहा ३००० रुपये व त्याखेरीज दोन गावांचे उत्पन्नही मिळत होते. त्याच्या अधिकाराखालील सैन्याच्या पगारासाठी कोतवाल, भिंड व अंबा हे तीन परगणे वेगळे काढून दिले होते. यांचे वार्षिक उत्पन्न जवळपास १८ लाख रुपये होते.

शिंदेशाही लष्कराच्या १८३३ मधील मोजदादीत याकोब व त्याचा मुलगा यांच्या संयुक्त अधिकारात प्रत्येक रेजिमेंटमध्ये ६०० सैनिक असलेल्या ११ रेजिमेंट्स असल्याची नोंद सापडते. १८४३ साली ग्वाल्हेरमधील राज्यक्रांतीत याकोबच्या हाताखालील ब्रिगेडमधील एका बटालियनने बंड केल्याचा उल्लेखही सापडतो. महाराजपूर व पुन्नियारच्या लढायांनंतर शिंदेशाही लष्कर बरखास्त करण्यात आले आणि त्यानंतर बहुतांश आर्मेनियन लोकांनी ग्वाल्हेर सोडले व लष्करी पेशाचाही त्याग केला.

काही काळ याकोबच्या प्रत्येक पलटणीत किमान १००० सैनिक होते व लष्करी अधिकाऱ्यांची संख्या ४० असून ते सर्व आर्मेनियन असल्याचीही नोंद सापडते. याकोब वयाच्या ९५व्या वर्षी मरण पावल्यावर त्याला ९५ तोफांची सलामी देण्यात आली. त्याचे थडगे ग्वाल्हेरच्या आर्मेनियन स्मशानभूमीत असून, त्यावर आर्मेनियन, फारसी व इंग्लिश या तीन भाषांतील मजकूर आहे. याकोबची पत्नी हेलेनचे थडगेही ग्वाल्हेरमध्येच आहे.

मरणोत्तर याकोबची संपत्ती जवळपास सहा लाख रुपये आणि त्याखेरीज जमीनजुमला असल्याचा उल्लेख तत्कालीन एका आर्मेनियन साधनात आढळतो. त्याचे डेव्हिड व ओवेन हे दोन पुत्र त्याच्याच हाताखाली अनुक्रमे मेजरच्या हुद्द्यावर दरमहा १८०० रुपये व कॅप्टनच्या हुद्द्यावर दरमहा ९०० रुपये पगारावर नोकरी करीत. १९ सप्टेंबर १८४८ रोजी डेव्हिडचा मृत्यू ग्वाल्हेरमध्ये झाला. १८५० नंतर ओवेन ग्वाल्हेर सोडून आग्र्यात राहू लागला. १८५७ च्या धामधुमीत त्याचा खून झाला. डेव्हिडच्या वंशजांना ग्वाल्हेर दरबारकडून ठरावीक निवृत्तीवेतन मिळत असे.

याकोब मोठा धार्मिक होता. त्याने स्वकमाईने एक आर्मेनियन चर्च ग्वाल्हेरमध्ये उभारले व एक पाद्रीही नेमला होता. आर्मेनियातील चर्चच्या नियामक संस्थेच्या जाहीरनाम्यांमध्ये (Holy See of Etchmiadzin) त्याचे नाव अनेकदा नमूद केले दिसते.

संदर्भ :

  • Seth, Mesrovb Jacob, Armenians in India, Calcutta, 1937.
  • Seth, Mesrovb Jacob, History of the Armenians in India from the earliest times to the present day, London, 1937.

                                                                                                                                                                                 समीक्षक : प्रमोद जोगळेकर