शिंदे, दत्ताजी : ( ? १७२३ — १४ जानेवारी १७६०). उत्तर पेशवाईतील मराठ्यांचे शूर सेनापती व विश्वासराव पेशवे यांचे कारभारी. सातारा जिल्ह्यातील कण्हेरखेड (ता. कोरेगाव) येथील शिंदे घराण्यातील राणोजी शिंदे यांचा दूसरा मुलगा व महादजींचा सावत्रभाऊ. जयाप्पा हा त्यांचा मोठा सख्खा भाऊ. जयाप्पाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जनकोजी यास शिंदे घराण्याची सरदारी मिळाली होती. परंतु तो वयाने लहान असल्याने दत्ताजीच सगळा कारभार पाहत. या दोघांनी खूप पराक्रम केले आणि उत्तर हिंदुस्थानातील अनेक प्रांत मराठा साम्राज्यास जोडले.

दत्ताजी सिंदखेड मोहिमेत विश्वासराव पेशवे यांचा कारभार पाहत होते. विश्वासराव यांचे वय अवघे सोळा वर्षांचे होते, म्हणून त्यांच्या जोडीला दत्ताजी यांना मुख्य सेनापती नेमले होते. या लढाईत दत्ताजी यांनी पराक्रम गाजवून निजामाचा पराभव केला. या लढाईने निजामाचा बिमोड होऊन २५ लाखांचा मुलूख मराठी राज्यास जोडला गेला.

१७५८ मध्ये दत्ताजी शिंदे पुन्हा उत्तरेतील मोहिमेवर निघाले. याच वर्षी श्रीगोंदे येथे त्यांचा विवाह भागीरथीबाई यांच्याशी झाला. दत्ताजींनी उज्जैन येथे सैन्याची जमवाजमव करून हरगडचा मोगल शासक गुमानसिंग याचा पराभव केला. राजस्थानातील खेचीवाडा, राजगड, पाटण व बुंदिकोटा येथील खंडणी घेऊन पुढे माधवसिंगाकडून वीस लाखाची खंडणी घेऊन ते दिल्लीला पोहोचले. तेव्हा तेथे त्यांचा मुक्काम यमुनेच्या काठावर मजनूचा टिळा येथे होता. दत्ताजी याचवेळी लाहोर प्रांताची व्यवस्था लावून यमुनातीरी आले. याच वेळी दिल्लीत अटक, फतेलष्कर व किल्ला कुशाद अशा तीन नामांकित तोफा होत्या. त्या दत्ताजी यांनी गाजीउद्दीनखानाकडे मागितल्या. मात्र या तोफा दिल्लीतून हलवू नयेत, अशी गाजीउद्दीनची इच्छा होती. दत्ताजींचा  या तोफा नेऊन बीजेसिंगाचे नागोर हे शहर उद्ध्वस्त करावे, असा मानस होता. यामागे एक महत्त्वाचे कारण असे होते की, दत्ताजींचे थोरले बंधू जयाप्पा जेव्हा मारवाडवर चालून गेले तेव्हा त्यांनी नागोर येथे वेढा घातला होता. बीजेसिंगाने जयाप्पाच्या छावणीत मारेकरी पाठवून दग्याने त्यांचा खून केला. तेव्हा मरताना जयाप्पांनी जखमी अवस्थेत दत्ताजींना सांगितले की, तू शत्रूचा सूड घे आणि हीच सूडाची भावना दत्ताजींच्या उरी भडकत होती. बीजेसिंगचा पाडाव करण्यासाठी दत्ताजी एकच मोठी तोफ सोबत घेऊन मार्च १७५९ मध्ये पंजाबमध्ये गेले. तोफ उज्जैनला पाठवत असताना चंबळ नदीत अडकून पडली. दरम्यान पेशव्यांनी दत्ताजींस बंगालवर स्वारी करून पन्नास-साठ लाखांची खंडणी वसूल करावी आणि शुजाउद्दौलाकडून काशी, अयोध्या आणि प्रयाग घ्यावे असे सांगितले होते. परंतु उत्तरेतील मराठ्यांचे वर्चस्व न मानून  नजीबखान रोहिला दुटप्पी राजकारण करत होता. नजीबखान हा रोहिलखंडाचा मोगलांचा शासक होता. त्याने एकीकडे अफगाण शासक अहमदशहा अब्दाली यास पत्र पाठवून तातडीने हिंदुस्थानावर मराठ्यांच्या समाचारासाठी बोलवले. दुसरीकडे दत्ताजी यांना गंगेवर पूल बांधून देण्याच्या भूलथापा देऊन शुक्रताल परिसरात गुंतवून ठेवले. मात्र नजीबाचे कपट लक्षात येताच दत्ताजी नजीबावर चालून गेले. यावेळी झालेल्या लढाईमध्ये हणमंतराव शिंदे व त्यांचे पुत्र मृत्युमुखी पडले, तर स्वत: दत्ताजी जखमी झाले.

दत्ताजींच्या पराक्रमाविषयी सांगताना त्या काळी लोक असे बोलत की, अब्दालीसारखा शत्रू दत्ताजींना कस्पटासमान वाटत होता. उत्तरेतील बहुतांश राज्यकर्त्यांना मराठ्यांचा उत्तरेतील हस्तक्षेप मानवत नव्हता. हे लोक मराठ्यांचे पारिपत्य कधी घडते यांची वाट पाहत होते.

दत्ताजी नजीबखानाच्या पाठलागावर असतानाच अब्दाली कुरुक्षेत्रावर आल्याची बातमी मिळाली. दत्ताजींनी जनकोजी यांना बायकामुलांना घेऊन दिल्लीच्या रोखाने पाठवून स्वत: फौज घेऊन अब्दालीच्या रोखाने निघाले. पण तोपर्यंत अब्दाली यमुनापार होऊन नजीबखानास मिळाला. तेव्हा दत्ताजींनी दिल्लीजवळ यमुनेच्या आठ मैलापर्यंतचे सर्व उतार अडवून धरले. मात्र असे असूनही १० जानेवारी १७६० रोजी अब्दालीच्या सैन्याने चार ठिकाणी यमुना ओलांडली. या दिवशी मकर संक्रांत होती. दिल्लीच्या मुख्य घाटावर मालोजी शिंदे उभे होते. दत्ताजींनी याच ठिकाणी हत्ती यमुनेत उतरवून पाण्याचा अंदाज घेतला होता. मात्र तेथे अंदाज आला नाही. मजनूच्या टिळ्यानजीकच्या घाटावरसुद्धा तीच परिस्थिती होती. त्याच्या पलीकडे उत्तरेस जगतपूर घाटावर स्वत: दत्ताजी होते. या दिवशी भल्या सकाळी युद्धास तोंड फुटले. पौष महिन्याच्या थंडीत कुंद हवा व धुके असल्याने दृश्यमानता कमी होती. तीन घटका दिवस वर आल्यावर दत्ताजी संक्रांतीचा तिळगूळ वाटून आणि सामानसुमान तयार करून शत्रूवर चालून गेले.

बुराडी घाटावर जानराव वाबळे होते. तेथे खूप मोठी चकमक होऊन अंदाजे दीडशे शिपाई मारले गेले. तेव्हा बायाजी शिंदे  बुराडी घाटावर धावले. मात्र नदीतील शेरणीच्या बेटातून शत्रूसैन्याने गोळीबार केला. एक गोळी लागून बायाजी पडले. हे वृत्त कळताच दत्ताजी घोड्यावर बसून बुराडी घाटावर निघाले. तेवढ्यात घाटावर झाडीत दडून बसलेल्या अफगाण सैन्याने तोफा, बंदुका यांचा मारा सुरू केला. त्यास मराठी फौजांनीही कडवा प्रतिकार केला. दत्ताजी घोड्यावर बसून लढत असताना एक गोळी लागून ते घोड्यावरून खाली पडले. दत्ताजी बुराडी  घाटावर जखमी अवस्थेत पडले असताना कुत्बशाहने विचारले की, “क्यो पटेल लढोगे क्या?” त्यावर दत्ताजी उद्गारले, “बचेंगे तो और भी लढेंगें.” हे उत्तर ऐकल्यावर कुत्बशाहने दत्ताजींना ठार केले.

दत्ताजी पडताच शिंदेंच्या गोटात गोंधळ उडाला. शिंदेंची छावणी लुटली गेली. यमुनेच्या काठी दत्ताजींच्या मृतदेहास अग्नी देऊन तीस हजार रुपये दानधर्म खैरात वाटली गेली. दत्ताजींची पत्नी भागीरथीबाई  व शिंद्यांचे लोक शिताफीने निसटून कोटपुतळी गावास आले. त्यावेळी भागीरथीबाई गरोदर होत्या. तेथे त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले, मात्र तो पुत्र जास्त दिवस जगला नाही. कोटपुतळीहून ही मंडळी सबळगडास आली आणि तेथे चंबळतीरी दत्ताजींचा तेरावा दिवस घातला.

दत्ताजींचे शीर कापणाऱ्या आणि ते फौजेत मिरविणाऱ्या कुत्बशाहला जेव्हा कुंजपुऱ्यात पकडण्यात आले, तेव्हा दत्ताजींच्या अपमानाचा आणि अवहेलनेचा बदला म्हणून सदाशिवराव भाऊंनी कुत्बशाहाचे मस्तक कापून, भाल्यावर खोचून मराठी फौजेत मिरविण्यास सांगितले, जे नेमके कुत्बशाहने दत्ताजींच्या बाबतीत केले होते.

संदर्भ :

  • फाळके, आनंदराव भाऊ, संपा., शिंदेशाही इतिहासाची साधने : भाग १, ग्वाल्हेर, १९३०.
  • शेजवलकर, त्र्यं. शं. पानिपत :१७६१, आवृ-९. पुणे, २०१८.
  • सरदेसाई, गोविंद सखाराम, रियासत : मध्य विभाग ३ : पानिपत प्रकरण, पुणे, १९२२

                                                                                                                                                                समीक्षक : कौस्तुभ कस्तुरे