लाड, गणपती दादा : ( ४ डिसेंबर १९२२ – १४ नोव्हेंबर २०११ ). महाराष्ट्रातील प्रख्यात स्वातंत्र्यसेनानी व समाजवादी विचारसरणीचे कृतिशील पुरस्कर्ते. क्रांतिअग्रणी जी. डी. लाड, तसेच जी. डी. बापू लाड या नावाने परिचित. त्यांचा जन्म भूतपूर्व औंध संस्थानातील कुंडल (जि. सांगली) येथे एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दादा आणि आईचे नाव सारजा. गावात या कुटुंबाकडे वडिलोपार्जित सहा-सात एकर जमीन होती. जी. डी. लाड यांना एक भाऊ व एक बहीण होती. वडिलांच्या अकाली निधनानंतर आईने त्या सर्वांचे संगोपन केले. १९४२ च्या चले जाव चळवळीच्या भूमिगत आंदोलनाच्या रणधुमाळीत २५ मे १९४५ च्या मध्यरात्री सशस्त्र पोलिसांच्या गराड्यात आणि सज्ज स्वातंत्र्यसैनिकांच्या उपस्थितीत कुंडल येथे त्यांचा विवाह येलुर (जि. सांगली) येथील बोगर-पाटलांची एकुलती कन्या नवसाबाई हिच्याशी गांधीप्रणीत पद्धतीने झाला. लग्नानंतर नवसाबाईचे नाव विजया करण्यात आले. अरुण, उदय, प्रकाश, किरण आणि दिलीप ही त्यांच्या मुलांची नावे.
जी. डी. लाड कुंडलच्या प्राथमिक शाळेतून सातवी इयत्ता पास झाले (१९३६). त्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी ते बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथे म. गांधींच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या सिक्का बोर्डिंगमध्ये विद्यार्थी म्हणून दाखल झाले. मात्र मॅट्रिकच्या वर्षी ते औंधच्या श्री श्री विद्यालयात दाखल झाले. त्या विद्यालयातून ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले (१९४०). त्यानंतर त्यांनी पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या आयुर्वेद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला (१९४१). पुण्यात ते शिवाजी मराठा वसतिगृहात राहत होते. त्या ठिकाणी ते सेवादलाची शाखा चालवत होते. त्या वेळचे महाराष्ट्रातील सेवादलाचे प्रमुख, समाजवादी नेते एस. एम. जोशी होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना पुण्यात राष्ट्रीय चळवळीची थोडी व्यापक ओळख झाली. १९४२ साली त्यांनी चले जाव चळवळीत भाग घेण्यासाठी पुण्यातील शिक्षण अर्धवट सोडून दिले आणि गावी कुंडलला येऊन स्वातंत्र्य आंदोलनात उडी घेतली.
कुंडल हे गाव स्वातंत्र्यवादी औंध संस्थानातील असल्यामुळे तेथे स्वातंत्र्य चळवळीला पोषक वातावरण होते. त्या वेळी क्रांतिसिंह नाना पाटील सातारा जिल्ह्यामधील राष्ट्रीय चळवळीचे प्रतीक आणि लोकप्रिय नेते बनले होते. त्यांनी १९३०-३२ ते १९४२ सालापर्यंत सातारा आणि दक्षिण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनावर सातत्याने आपल्या प्रभावी वक्तृत्वाने प्रखर राष्ट्रीयत्वाचे विचार बिंबवले होते. १९३२ सालापासून जी. डी. लाड नाना पाटील, म. गांधी, म. फुले यांच्या शिकवणुकीने भारावून गेले.
चले जाव आंदोलनाच्या उघडपर्वात तत्कालीन सातारा जिल्ह्यातील तासगाव आणि इस्लामपूर येथील तहसील कचेरीवर काढण्यात आलेल्या मोर्चात जी. डी. लाड यांचा सक्रिय सहभाग होता. १९४३ सालापासून ते भूमिगत राहून कार्य करीत होते. नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हातात शस्त्र घेऊन व शस्त्रधारी तुफान सैनिक संघटना निर्माण करून ते ब्रिटिशांच्या विरुद्ध लढत राहिले. त्यांनी अनेक साहसी योजना आखल्या. त्यामध्ये स्वत: सहभागी होऊन त्या यशस्वी केल्या. त्यांनी सशस्त्र संघर्षासाठी गोवा, कोल्हापूर संस्थान येथून शस्त्रास्त्रे गोळा केली. स्वातंत्र्याचा भूमिगत लढा चालविण्यासाठी लागणारा पैसा मिळविण्यासाठी त्यांनी जिवावर उदार होऊन सहकाऱ्यांच्या मदतीने १९४३ साली कुंडल बँकेवर दरोडा घातला आणि पगारासाठी पैसा घेऊन जाणारी ब्रिटिशांची रेल्वे शेणोली स्थानकानजीक लुटली. १९४४ सालच्या एप्रिल महिन्यात जी. डी. लाड, नागनाथ नायकवडी, उत्तमराव पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने खानदेशात धुळे येथील साडेपाच लाख रुपये रकमेचा सरकारी खजिना लुटला. त्या लुटीतून मिळालेला पैसा जी. डी. लाड यांनी सातारा प्रतिसरकारच्या तुफान सैनिक दल निर्मितीसाठी वापरला. त्यांनी भूमिगत अवस्थेत असतानाच आपल्या सहकाऱ्याच्या ब्रिटिशांच्या कैदेत असणाऱ्या व उपचारासाठी पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या पत्नीची, लीलाताई पाटील यांची यशस्वीरीत्या सुटका केली.
सातारा जिल्ह्यातील भूमिगत चळवळीच्या मार्गात जिल्ह्यात उघडपणे वावरणाऱ्या काही गुन्हेगार दरोडेखोरांच्या टोळ्यांनी अडसर निर्माण केला होता. गुन्हे करताना काँग्रेस, म. गांधी, नाना पाटील यांच्या जयजयकाराच्या घोषणा करून ते टोळीवाले स्वातंत्र्यचळवळ बदनाम करत होते. तेव्हा त्या गुन्हेगारांचे वैचारिक प्रबोधन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न जी. डी. लाड यांनी केला; तथापि त्यामध्ये त्यांना अपयश आले. त्यानंतर मात्र भूमिगत कार्यकर्ते आणि तुफान सेनादलाच्या शूरवीरांनी जी. डी. लाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील गुन्हेगार दरोडेखोरांच्या टोळ्यांचा निपात केला.
चले जाव आंदोलनाच्या काळात देशात फक्त चार-पाच ठिकाणी स्थापन झालेल्या प्रतिसरकारांपैकी सातारा जिल्ह्यातील प्रतिसरकार सर्वाधिक काळ कार्यरत होते. सातारा जिल्ह्यातील प्रतिसरकार नाना पाटील यांच्या नावाने व मार्गदर्शनाखाली अस्तित्वात आले होते. त्याच्या स्थापनेत जी. डी. लाड यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. त्यांनी कुंडल येथे भूमिगत कार्यकर्त्यांसाठी लष्करी प्रशिक्षण केंद्र आणि जनतेला न्यायदान करण्यासाठी जनता न्यायालय यांची स्थापना केली. प्रतिसरकारच्या चळवळीअंतर्गत युद्ध मंडळ, धोरण समिती, न्यायनिवाडा, प्रौढशिक्षण, ग्रामसफाई, विधायक कामे, शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण इत्यादी बाबींसाठी नियोजनबद्ध कार्यप्रणाली तयार करण्यात त्यांचे योगदान होते. ब्रिटिशधार्जिणे सत्ताधारी, ब्रिटिश सरकारचे हस्तक, पोलिसांचे खबरे, सावकारी-साठेबाजी-काळा बाजार करणारे समाजकंटक, स्त्रियांवर जुलूम करणारे अशा गुन्हेगारांना शिक्षा करणाऱ्या जनता न्यायालयात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. प्रतिसरकारच्या तुफान सेनेचे फिल्ड मार्शल म्हणजे सरसेनापती म्हणून त्यांनी गौरवशाली कामगिरी बजावली.
१९४६ साली देशात प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुका झाल्या. मुंबई प्रांतात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. काँग्रेस सरकारने चले जाव आंदोलनातील भूमिगत कार्यकर्त्यांवर असलेली पकड वॉरंट्स रद्द केली. नाना पाटील आणि सातारा जिल्ह्यातील सर्व भूमिगत कार्यकर्ते ५ मे १९४६ रोजी कराड तालुक्यातील कोणेगाव येथे प्रकट झाले.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वतंत्र झाला. त्यानंतर हैदराबाद संस्थानातील रझाकारांच्या अन्याय-अत्याचाराने जी. डी. लाड यांचे लक्ष वेधून घेतले. मराठवाड्यात रझाकारांच्या अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी एक दल स्थापन करण्याचे त्यांनी ठरवले. त्यासाठी त्यांनी आपल्या निवडक सहकाऱ्यांसह मराठवाड्याचा दौरा केला. तेथील स्थानिक तरुणांना आपल्याकडची शस्त्रास्त्रे दिली आणि रझाकार, निजामी राजवट यांविरुद्ध लढण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे त्यांना दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली. डिसेंबर १९४८ ते डिसेंबर १९५० या काळात येरवडा, नाशिक, सांगली येथील तुरुंगात असताना त्यांनी कार्ल मार्क्स, लेनिन यांचे वाङ्मय, शास्त्रीय समाजवाद, तसेच जगभरातील प्रमुख क्रांत्यांचा मूलगामी अभ्यास केला. तेव्हापासून ते साम्यवादी मार्गाकडे आकर्षित झाले. पुढे ते शेतकरी कामगार पक्षात सामील झाले.
स्वातंत्र्योत्तर काळात ते गोवा मुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढा यांमध्ये सहभागी झाले. शिवाय शेतकरी, शेतमजूर, कामगार, दुष्काळग्रस्त यांच्या लढ्यांचे त्यांनी नेतृत्व केले. त्यांनी स्थापन केलेले नाना पाटील वसतिगृह आणि १९४५ साली स्थापन केलेली म. गांधी शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून कुंडल परिसरात शिक्षण प्रसाराचे त्यांचे कार्य अखंड चालू आहे. २००२ साली त्यांनी कुंडल येथे क्रांती सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. अल्पावधीत कारखाना परिसरात सहकारी तत्त्वावर अनेक शेतीपूरक उद्योग प्रकल्प कार्यान्वित झाले. त्यामुळे त्यांना क्रांती शैक्षणिक व उद्योग समूहाचे शिल्पकार असे म्हटले जाते.
जी. डी. लाड तासगाव (जि. सांगली) मतदारसंघातून विधानसभा सदस्य (१९५७-६२) आणि शे. का. पक्षाचे विधानपरिषद सदस्य होते (१९६२-६८). शेतकरी कामगार पक्षाच्या सरचिटणीसपदी त्यांची निवड झाली होती (मे १९६०). १९७८ ते १९८५ या काळात ते महाराष्ट्र किसान सभेचे अध्यक्ष व संघटक होते. १९८५ साली त्यांची अखिल भारतीय किसान सभेच्या अध्यक्षपदी निवड झाली.
जी. डी. लाड यांचे पेटलेले पारतंत्र्य व धुमसते स्वातंत्र्य (१९८६), जी. डी. बापू लाड : आत्मकथन : एक संघर्षयात्रा (२०१५) हे दोन ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यांना ‘सांगली भूषण’ पुरस्कार (२०१०), तसेच शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्याकडून डी. लिट. ही सन्माननीय पदवी देऊन गौरविण्यात आले (२०११).
पुणे येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- पोवार, विलास, क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड जीवन व कार्य, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, २०१७.
- लाड, जी. डी. जी. डी. बापू : आत्मकथन : एक संघर्षयात्रा, लोकवाङ्मय गृह, मुंबई, २०१५.
- लाड, जी. डी. पेटलेले पारतंत्र्य व धुमसते स्वातंत्र्य, भारती विद्यापीठ प्रकाशन, पुणे, १९८६.
समीक्षक : अवनीश पाटील