भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील खेडा जिल्ह्यातील (Gujrat) शेतकऱ्यांचे एक वैशिष्ट्यपूर्ण आंदोलन. ⇨ महात्मा गांधी (२ ऑक्टोबर १८६९ – ३० जानेवारी १९४८) आणि सरदार ⇨ वल्लभभाई पटेल (३१ ऑक्टोबर १८७५ – १५ डिसेंबर १९५०) यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी अन्यायी सारावसुलीच्या विरोधात केलेले सामूहिक आंदोलन ‘खेडा सत्याग्रहʼ म्हणून प्रसिद्ध आहे.

खेडा जिल्ह्यात १९१८ मधील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या झोपड्या, गुरेढोरे, पिके आदींना या अतिवृष्टीची झळ बसली. जिल्ह्यातील बहुतेक खेड्यांत ही परिस्थिती होती. उत्पन्नाचा चौथाई भागसुद्धा शेतीतून ते मिळवू शकले नव्हते. त्यामुळे शेतकरीकुटुंबांसमोर उपासमारीची वेळ आली. त्यातच इंग्रज सरकारने सारावसुली सुरू केली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. ब्रिटिश शासनाच्या कायद्यानुसार पंचवीस टक्क्यांपेक्षा उत्पन्न कमी झाले असेल, तर साऱ्यात सवलत होती. म्हणून विविध गावांतील सुमारे २२,००० शेतकऱ्यांनी या प्रकरणी सरकारकडे एक याचिका दाखल केली. सरकारकडून कायदेशीर दिलासा मिळावा व सारावसुलीस मुदतवाढ मिळावी, अशी त्यांची रास्त मागणी होती. इंग्रज सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आणि पाहणी करून १०३ गावांमध्ये ४८ टक्के उत्पन्न झाल्याचे घोषित केले. पण उरलेल्या ५०० खेड्यांत काहीच पिकले नव्हते. तरीसुद्धा सरकारने जबरदस्तीने सारावसुली सुरूच ठेवली.

महात्मा गांधी यांनी वल्लभभाई पटेल यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांत पुढाकार घेण्यास सांगितले. पटेल यांनी शेतकऱ्यांचे मनोधैर्य टिकविण्यासाठी खेडा जिल्ह्यात दौरा काढला. जिह्यातील ६०० खेड्यांपैकी ४२५ खेड्यांत गांधी-पटेलांनी पदयात्रा काढली. अतिवृष्टीचे गंभीर स्वरूप पाहिले. पटेल यांनी प्रत्यक्ष शेतजमिनींवार भेटी देऊन पिकांची पाहणी केली आणि वस्तुस्थिती सरकारच्या निदर्शनास आणून दिली. तरीही सरकार बधले नाही. तेव्हा महात्मा गांधी यांनी २२ मार्च १९१८ रोजी खेडा सत्याग्रहाची घोषणा केली.

सरदार पटेल यांनी इंदुलाल याज्ञिक, मोहनलाल पंड्या आदींच्या साहाय्याने खेडा जिल्ह्यातील गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना संघटित केले आणि सांगितले की, ‘येतील त्या हालअपेष्टांना तोंड द्या, पण सारा भरू नका.ʼ या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो शेतकऱ्यांनी गावोगावी एकत्र जमून इंग्रज प्रशासनाचा निषेध केला व सारावसुलीस ठामपणे विरोध केला. तेव्हा इंग्रज सरकारने जुलूम-जबरदस्ती केली. आंदोलन दडपण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांच्या शेतजमिनी, मालमत्ता यांवर जप्ती आणली.जप्त केलेल्या शेतजमिनीतील पीक काढून घेतल्याबद्दल  सरकारने अनेक शेतकऱ्यांना तुरुंगात डांबले. तरीही शेतकऱ्यांनी शांततापूर्ण मार्गाने सरकारचा निषेध करत हे आंदोलन सुरूच ठेवले. दिवसेंदिवस या सत्याग्रहाची व्याप्ती वाढू लागली. गुजरातमधील इतर जिल्ह्यांतील शेतकरीही संघटितपणे इंग्रज सरकारचा निषेध करू लागले. अखेर इंग्रज सरकारने नमते घेऊन सारावसुलीत सूट दिली आणि नवी करवाढही रद्द केली. तसेच तुरुंगातील शेतकऱ्यांची सुटका करण्यात आली. वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखालील हा पहिला लढा यशस्वी झाला. महात्मा गांधींनी या विजयाचा मुक्तकंठाने गौरव केला.

संदर्भ :

  • Panjabi, Kewal  L. The Indomitable Sardar, Bombay, 1962.
  • Patel, P. U. Sardar Patel : India’s Man of Destiny, Bombay, 1964.
  • शिखरे, दामोदर नरहर, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री, पुणे, १९६३.

समीक्षक – सु. र. देशपांडे

प्रतिक्रिया व्यक्त करा