थ्रेओज केंद्रकीय अम्ल (TNA; Threose Nucleic Acid) हा एक कृत्रिमरित्या बनवलेला बहुवारिक रेणू आहे. हे संश्लेषी जीवविज्ञानातील एक महत्त्वाचे उदाहरण आहे. या रेणूची निर्मिती ॲल्बर्ट ॲशेनमोसर (Albert Eschenmoser) या स्वीस रसायनवैज्ञानिकांनी केली. डीएनए व आरएनए या केंद्रकीय अम्लांच्या रेणूंमध्ये आढळणाऱ्या रायबोज (Ribose) शर्करेचा उगम कसा झाला याचा शोध घेताना ॲशेनमोसर यांनी थ्रेओज (Threose) या चार कार्बन अणू असलेल्या शर्करेचा वापर केला. थ्रेओजचे रासायनिक सूत्र C4H8O4 असे आहे. फॉस्फोडायईस्टर बंध (Phosphodiester bond) वापरून या शर्करेपासून जो थ्रेओज केंद्रकीय अम्लाचा कृत्रिम रेणू बनवला त्यात डीएनए व आरएनए रेणूंप्रमाणेच जनुकीय संकेत साठवता येतात हे त्यांनी दाखवून दिले.
सजीवाच्या उगमासंबंधी एक सिद्धांत कल्पना अशी आहे की, डीएनए रेणूच्या अगोदर जनुकीय संकेत आरएनए रेणूंमध्ये होते आणि त्याच्याही आधी सजीव पूर्वजगात (Pre-biotic world) थ्रेओज केंद्रकीय अम्लाप्रमाणे रेणू असू शकतील. याचे कारण म्हणजे दोन कार्बन अणूंच्या घटकांपासून थ्रेओज या चार कार्बन अणू असलेल्या शर्करेचे रेणू (Tetrose) सहज तयार होऊ शकतात. थ्रेओज शर्करा असलेल्या न्यूक्लिओटाइडपासून थ्रेओज केंद्रकीय अम्लाचे बहुवारिक रेणू बनतात. इतकेच नाही तर थ्रेओज केंद्रकीय अम्लाच्या रेणूंचे डीएनए रेणूच्या एका धाग्याशी बंधही तयार होतात असे दिसून आले आहे. संश्लेषी जीवविज्ञानातील या संशोधनामुळे आरएनए व डीएनए रेणूंच्या उत्क्रांतीसंबंधी नवीन माहिती हाती येऊ लागली आहे. तसेच रोगांवरील उपचारांसाठी नाविन्यपूर्ण औषधी घटकांची निर्मिती करण्याची शक्यता वाढली आहे.
पहा : केंद्रकीय अम्ले, डीऑक्सिरायबोन्यूक्लिइक अम्ल (डीएनए), जनुकीय संकेत, रायबोन्यूक्लिइक अम्ल (आरएनए), संश्लेषी जीवविज्ञान.
संदर्भ :
- Chim, N., Shi, C., Sau, S.P. et al. Structural basis for TNA synthesis by an engineered TNA polymerase. Nat Commun 8, 1810 (2017). https://doi.org/10.1038/s41467-017-02014-0
- Dunn Matthew R. and John C. Chaput 2016. Reverse Transcription of Threose Nucleic Acid by a Naturally Occurring DNA Polymerase, ChemBioChem 17: 1804- 1808, DOI: 10.1002/cbic.201600338
- Eschenmoser, Albert (2007). “The Search for the Chemistry of Life’s Origin”. Tetrahedron 63 (52): 12821–12844. doi:10.1016/j.tet.2007.10.012.
- https://www.sciencedaily.com/releases/2012/01/120109103029.htm
समीक्षक : योगेश शौचे