अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी अलास्का राज्य तसेच कॅनडातील यूकॉन व नॉर्थवेस्ट टेरिटरी हे केंद्रशासित प्रदेश यांच्या उत्तरेस स्थित असलेला समुद्र. आर्क्टिक महासागराचा हा एक बाह्यवर्ती समुद्र आहे. बोफर्ट समुद्राचा विस्तार अलास्काचे अगदी उत्तर टोक असलेल्या पॉइन्ट बॅरोपासून ईशान्येस प्रिन्स पॅट्रिक बेटावरील लँड्स एंडपर्यंत आणि पूर्वेस बँक्स बेटापासून पश्चिमेस चुक्ची समुद्रापर्यंत झालेला आहे. या समुद्राच्या पृष्ठभागाचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ४,७६,००० चौ.किमी., सरासरी खोली १,००४ मी. आणि सर्वाधिक खोली ४,६८१ मी. आहे. ब्रिटिश आरमारातील अधिकारी रिअर ॲडमिरल आणि जलालेखतज्ज्ञ सर फ्रान्सिस बोफर्ट यांच्या नावावरून या समुद्रास हे नाव देण्यात आले आहे. कॅनडातील सर्वाधिक लांबीची मॅकेंझी नदी, तसेच अलास्कामधून वाहत येणारी काँगाकूट या बोफर्ट समुद्राला मिळणाऱ्या प्रमुख नद्या आहेत.

बोफर्ट समुद्रातील सागरमग्न खंडभूमी अरुंद आहे. विशेषत: पॉइन्ट बॅरोच्या जवळ आणि पूर्वेस ती बरीच अरुंद आहे. मॅकेंझी नदीमुखाच्या उत्तरेस ती काहीशी रुंद होत गेलेली आहे; परंतु १४५ मी. पेक्षा ती कोठेही जास्त नाही. सागरमग्न खंडभूमीची खोली उत्तरेकडे वेगाने वाढत जाऊन तिचे रूपांतर संपुंजित मंचात झालेले आढळते. तेथे ही खोली १,५२४ ते १,९८१ मी. पर्यंत खाली गेलेली आहे. या समुद्रात रेतीयुक्त लहान बेटे बरीच आहेत. तसेच काही भाग हा उथळ स्वरूपाचा पाहायला मिळतो. मॅकेंझी नदीच्या मुखाच्या पश्चिमेस काही मोठी बेटे आहेत. उदा., हर्शल बेट (१८ चौ.किमी.), बार्टर बेट (१३ चौ.किमी.). मॅकेंझी नदीच्या त्रिभुज प्रदेशात खूप कमी प्रमाणात आणि लहान आकाराची बेटे आणि बँक्स आढळतात.

सागरांतर्गत अनेक दऱ्यांमुळे या समुद्रातील खंडान्त उतार खंडित झाला आहे. बँक्स बेटाच्या पश्चिमेस १,९८१ ते ३,०४८ मी. खोलीवर बोफर्ट पठार आहे. बोफर्ट समुद्राच्या तळाची भूशास्त्रीय संरचना पाहिली, तर तेथे एक विशाल स्वरूपाचा संपुंजित मंच आहे. कॅनडियन द्रोणी आणि महासागरप्रमाणे येथील भूकंपीय स्थिती आढळते.

बोफर्ट समुद्राच्या किनारपट्टीचा प्रदेश हा सखल असून त्याची कमाल उंची २५० ते ७५० मी. पर्यंत आहे. ही किनारपट्टी टंड्रा प्रदेशाने व्यापली आहे. मॅकेंझी नदीच्या पश्चिमेस ब्रुक्स पर्वतश्रेणीच्या सोंडी किनाऱ्यापर्यंत पसरलेल्या दिसतात. येथील बँक्स आणि प्रिन्स पॅट्रिक बेटे कमी उंचीची (कमाल २७४ ते ७४६ मी.) आहेत.

बोफर्ट समुद्र जवळजवळ वर्षभर हिमाच्छादित असतो. केवळ ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये किनाऱ्याजवळील काही भाग खुला असतो. या समुद्रात चार जलराशी आढळतात. सुमारे १०० मी. खोलीपर्यंतच्या पहिल्या पृष्ठीय जलराशीचे साधारण तापमान उन्हाळ्याच्या अखेरीस – १.४° से. आणि हिवाळ्यात – १.८° से. असते. दुसरी उपपृष्ठीय जलराशी बेरिंग सामुद्रधुनीतून वाहत येणाऱ्या पॅसिफिक महासागर आणि बेरिंग समुद्रातील पाण्यापासून बनलेली आहे. तिचा विस्तार जवळजवळ उत्तर ध्रुवापर्यंत आढळतो. पृष्ठीय जलराशीपेक्षा ही जलराशी उबदार असते. खोलवर आढळणारी अटलांटिक जलराशी ही सर्व जलराशींत उबदार असून तिच्यातील पाण्याचे तापमान ०° ते १° से. असते. तळावरील पाण्याचे तापमान -०.४° ते – ०.८° से. असते. बोफर्ट समुद्रातील पाण्याची सरासरी लवणता दर हजारी २८ ते ३२ यांदरम्यान असते.

बोफर्ट समुद्रातील पृष्ठीय व उपपृष्ठीय प्रवाहांची दिशा ही आर्क्टिक महासागरातून वाहणाऱ्या समुद्रप्रवाहांशी निगडित आहे. येथील प्रवाह घड्याळाच्या काट्याच्या दिशेला अनुसरून वाहतात. किनाऱ्याजवळ नैर्ऋत्येकडून व पश्चिमेकडून प्रवाह वाहत येतात. मॅकेंझी नदीच्या मुखाजवळ गौण स्वरूपाचा पूर्वेकडे वाहणारा प्रवाह आढळतो.

मॅकेंझी नदी दरवर्षी सुमारे १५ द. ल. टन एवढा गाळ या समुद्रात आणून टाकत असते. या गाळात डोलोमाइट आणि कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण अधिक असते. या खनिजांचे तसेच रेती व चिखलमिश्रित गाळाचे संचयन प्रामुख्याने सागरमग्न खंडभूमीवर होते.

बोफर्ट समुद्रात सुमारे ७० पेक्षा अधिक वनस्पतिजन्य प्लवकजीव आणि ८० जातींचे प्राणिजन्य प्लवकजीव आढळतात. या समुद्राच्या तळाशी सुमारे ७०० वनस्पती व प्राणिजाती आढळतात. तुलनेने या समुद्रातील त्यांची एकूण संख्या कमी आहे.

अलास्कातील नॉर्थ स्लोप म्हणून ओळखला जाणारा प्रदेश आणि बोफर्ट समुद्रात खनिज तेल व नैसर्गिक वायूची समृद्ध क्षेत्रे आहेत. तेथे अनेक तेलविहिरी खोदल्या असून त्यांतून मोठ्या प्रमाणात खनिज तेल व नैसर्गिक वायूचे उत्पादन घेतले जाते. ट्रान्स-अलास्का या १,३०० किमी. लांबीच्या नळमार्गाने अलास्काच्या उत्तर किनाऱ्यापासून दक्षिण किनाऱ्यावरील व्हॅल्दीझ या हिमरहित खुल्या बंदरापर्यंत खनिज तेल आणले जाते.

बोफर्ट समुद्राच्या किनाऱ्यावर सुमारे ३०,००० वर्षांपूर्वीपासून मानवी वस्ती आहे. तुक्तोयाक्तुक (कॅनडा) व प्रूधोन बे (अलास्का) ही या किनाऱ्यावरील प्रमुख खेडी आहेत. तुक्तोयाक्तुक येथील वातावरणाचे जानेवारीचे तापमान – २७° से. व जुलैचे तापमान ११° से. असते. प्रूधोन बे हा प्रदेश तेलविहिरींसाठी प्रसिद्ध असल्यामुळे तेथे तेल उद्योगात काम करणाऱ्या कामगारांची वस्ती बरीच आहे. बोफर्टच्या किनारी प्रदेशात प्रामुख्याने इन्युईट जमातीच्या लोकांचे वास्तव्य आहे. स्थानिक गरजा भागविण्यासाठी येथे मासेमारी व शिकार हे व्यवसाय केले जातात. या व्यवसायाचे व्यापारी स्वरूप नसल्यामुळे किनारी आणि सागरी भागात जीवसृष्टी बऱ्यापैकी टिकून आहे. कॉड, चार, सॅमन, सिस्को, व्हाइटफिश, हेरिंग, देवमासा, सील, वॉलरस हे येथील प्रमुख मत्स्यप्रकार आहेत. येथील जमीन अंदाजे एक मीटर खोलीपर्यंत गोठलेली असते. उन्हाळ्यात बर्फ वितळल्यावर केवळ वरचा काही सेंमी.चा थर उघडा पडतो. त्यामुळे येथील घरे उंच डांबांवर उभारलेली आढळतात. येथे धृवप्रदेशीय अस्वले (पांढरी अस्वले) मोठ्या प्रमाणात आढळून येतात.

समीक्षक : वसंत चौधरी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.