चॅन्सलर, रिचर्ड (Chanceller, Richard) : (१५२१ – १० नोव्हेंबर १५५६). ब्रिटिश समन्वेषक व मार्गनिर्देशक. श्वेत समुद्र पार करणारी आणि रशियातील झार साम्राज्याशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणारी पहिली ब्रिटिश व्यक्ती. चॅन्सलर यांचे मूळ गाव ब्रिस्टल. त्यांनी भौगोलिक आणि सागरविषयक निपुणता  समन्वेषक सीबॅस्चन कॅबट आणि भूगोलज्ञ जॉन दी यांच्याकडून मिळविली. आर्क्टिक महासागरातून आशियाकडे जाण्यासाठी नॉर्थर्ईस्ट पॅसेज मार्ग शोधण्याच्या उद्देशाने चॅन्सलर, सीबॅस्चन कॅबट व सर ह्यू विलोबी यांच्यासह लंडनच्या व्यापारी संघटनेने इ. स. १५५२-५३ मध्ये ‘कंपनी ऑफ मर्चंट ॲडव्हेंचर्स’ची स्थापना केली. राजा एडवर्ड सहावा यांनी इ. स. १५५३ मध्ये ती विधिसंस्थापित केली. इ. स. १५५५ मध्ये तिला राजसनद मिळाल्यामुळे तिचे खाजगी स्वरूप संपुष्टात आले. पुढे तिला औपचारिक दृष्ट्या ‘मस्कोव्ही कंपनी’ म्हणून ओळखले जाई. या कंपनीच्या माध्यमातून केवळ नॉर्थईस्ट पॅसेजचा शोध घ्यायचा नव्हता; तर रशिया, चीन व इतर ठिकाणी व्यापार वाढवायचा होता.

या व्यापारी कंपनीने इंग्लंड ते चीन यांदरम्यानच्या नॉर्थईस्ट पॅसेज मार्गाचा शोध घेण्यासाठी आणि नवीन बाजारपेठा मिळविण्यासाठी इ. स. १५५३ मध्ये एक मोहीम आखली होती. या मोहिमेचे नेतृत्व इंग्रज सैनिक विलोबी यांच्याकडे सोपविले होते; तर चॅन्सलर यांची मार्गदर्शी म्हणून नेमणूक केली होती. विलोबी यांना या मोहिमेसाठी तीन जहाजे दिली. तीन जहाजांचा हा ताफा नॉर्वेमधील व्हर्दो या संकेतस्थळी एकत्र येणार होता; परंतु नॉर्वेच्या किनाऱ्यावर वादळामुळे विलोबी दोन जहाजांसह चॅन्सलरपासून वेगळे झाले. आपल्या दोन जहाजांसह विलोबी पूर्वेकडे गेले आणि रशियाच्या उत्तरेकडील आर्क्टिक महासागरात असलेल्या नॉव्हायाझीमल्या या द्वीपसमूहाचा शोध लावला; परंतु लॅपलँड प्रदेशाच्या किनाऱ्यावर सर्व सहकाऱ्यांसह विलोबी मृत्यू पावले.

चॅन्सलर यांनी आपला प्रवास तसाच पुढे चालू ठेवला. ते आपल्या एडवर्ड बोनाव्हेंचर या जहाजाने प्रथम व्हर्दो येथे पोहोचले. तेथून पुढच्या प्रवासात त्यांना श्वेत समुद्राचा प्रवेशमार्ग दिसला. स्थानिक लोकांकडून तेथील प्रदेशाविषयी माहिती घेतल्यानंतर श्वेत समुद्रातील द्वीना नदीच्या मुखाशी असलेल्या आर्केंजल बंदरात त्यांनी आपले जहाज नांगरले. तेथून हिमाच्छादित प्रदेशातून घोड्यांच्या स्लेज गाडीतून सुमारे १,००० किमी.चा प्रवास करून मॉस्कोला आले. त्यांना लंडनपेक्षा मॉस्को हे शहर मोठे वाटले. तेथे त्यांची झार राजा इव्हान चौथा यांच्याशी भेट झाली. आतापर्यंतच्या इंग्रजांच्या रशियाकडील भेटी या प्रामुख्याने जर्मन व्यापाऱ्यांच्या हॅन्सिअ‍ॅटिक लीगमार्फत होत असत. हॅन्सिअ‍ॅटिक लीगची व्यापारातील मक्तेदारी मोडून काढण्याच्या दृष्टीने चॅन्सलर यांनी अवलंबिलेल्या वेगळ्या प्रवासमार्गामुळे इव्हान चौथा खूष झाला. इव्हान यांनी चॅन्सलर यांचे उत्साहात आदरातिथ्य केले. झारने रशिया इंग्लंडशी व्यापार करण्यास अनुकूल असल्याचे पत्र दिले. झारशी झालेल्या यशस्वी वाटाघाटीनंतर चॅन्सलर पुन्हा आपल्या श्वेत समुद्रातील जहाजावर आले व तेथून इ. स. १५५४  च्या उन्हाळ्यात ते इंग्लंडला परतले. झारशी बोलणी यशस्वी झाल्यानंतर रशियन व्यापाराची मक्तेदारी ‘मस्कोव्ही कंपनी’कडे सोपविण्यात आली. इंग्लंडला परतले तेव्हा एडवर्ड राजाचे निधन झाले होते. त्यांच्यानंतर गादीवर आलेल्या राणी मेरी पहिली (मेरी ट्यूडर) यांच्याशी संपर्क साधणे अशक्य होते.

इसवी सन ऑक्टोबर १५५५ ते जुलै १५५६ या कालावधीत व्यापारी वाटाघाटींच्या निमित्ताने चॅन्सलर यांना पुन्हा मॉस्कोला पाठविण्यात आले. या वेळी व्यापारी संबंधांबाबत झारबरोबर चर्चा केली. तसेच उत्तरेकडील मार्गाने चीनला कसे पोहोचता येईल याबद्दलची माहिती घेतली. इ. स. १५५६ मध्ये रशियन राजदूत ऑसिप नीपीया यांना बरोबर घेऊन चॅन्सलर इंग्लंडला जाण्यासाठी निघाले. शरद ऋतूत त्यांनी आर्केंजल सोडले; परंतु तेथून परतीचा प्रवास करीत असताना खराब हवामानामुळे स्कॉटलंडलगतच्या पिट्सलिगो उपसागरात त्यांचे जहाज फुटून त्यातच त्यांचा अंत झाला.

समीक्षक : वसंत चौधरी