महासागराचा उपविभाग किंवा सामान्यपणे पृथ्वीवरील खाऱ्या पाण्याचा मोठा जलाशय म्हणजे समुद्र होय. उदा., कॅरिबियन समुद्र, उत्तर समुद्र, भूमध्य समुद्र, अरबी समुद्र इत्यादी. अंशत: किंवा संपूर्ण भूवेष्टित खाऱ्या पाण्याच्या मोठ्या जलाशयांना समुद्र या संज्ञेने संबोधले जाते. उदा., कॅस्पियन समुद्र, मृत समुद्र, अरल समुद्र, सॉल्टन समुद्र इत्यादी. याउलट उत्तर अटलांटिक महासागरातील सारगॅसो समुद्राला तर समुद्र किनाराच नाही. कित्येकदा महासागराला समानार्थी शब्द म्हणूनही समुद्र ही संज्ञा वापरली जाते. समुद्र म्हणजे सामान्यपणे मोठे आणि खाऱ्या पाण्याचे जलाशय, असे मानले जात असले, तरी इझ्राएलमधील गॅलिली समुद्र म्हणून ओळखला जाणारा जलाशय म्हणजे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. महासागर आणि समुद्र यांच्यातील सीमारेषा काटेकोरपणे ठरविता येत नाही. समुद्र, आखात आणि उपसागर या महासागराच्या उपविभागदर्शक संज्ञा अगदी ढोबळमानाने वापरल्या जातात. या वेगवेगळ्या जलभागांच्या सीमा दाखविण्यासाठी कोणत्याही एका व्यापक किंवा सार्वत्रिक पद्धतीचा वापर केला जात नाही. जेथे शक्य आहे, तेथे जमिनीचा भाग किंवा सागरांतर्गत भूवैशिष्ट्यांचा वापर त्यांच्या सीमा ठरविण्यासाठी केला जातो; परंतु जेथे अशी भूवैशिष्ट्ये अस्तित्वात नसतात, तेथे काल्पनिक सीमा मानल्या जातात. या काल्पनिक सीमा काही वेळा राजकीय संकेत व सहमतीनुसार ठरवाव्या लागतात. सागरतळाची रचना, सागरी प्रवाह, सजीवांची स्थिती व अन्य काही घटकांचाही विचार करून या सीमा निश्चित केल्या जातात.

प्राचीन काळापासून समुद्रातून प्रवास करून त्यांचे समन्वेषण केल्याचे आढळते. कॅप्टन जेम्स कुक यांनी १७६८ ते १७७९ या कालावधीत पॅसिफिक महासागराचे समन्वेषण करण्यासाठी ज्या सफरी काढल्या, तेव्हापासून खऱ्या अर्थाने समुद्राचा अभ्यास ‘महासागरविज्ञान’ या विषयाच्या माध्यमातून होऊ लागला. संयुक्त राष्ट्रांच्या समुद्रविषयक कायदा व नियमानुसार सर्व महासागर हे समुद्रच असतात. महासागरांना जोडणाऱ्या समुद्राचा तसेच लगतच्या जलाशयांचा समावेश त्या महासागरातच केला जातो. उदा., भूमध्य समुद्र, उत्तर समुद्र, बाल्टिक, काळा, एड्रिॲटिक, कॅरिबियन इत्यादी समुद्र हे अटलांटिक महासागराचेच भाग मानले जातात. यातील बाल्टिक समुद्र व उत्तर समुद्र प्रामुख्याने सागरमग्न खंडभूमीवर निर्माण झालेले आहेत. कॅरिबियन समुद्र व मेक्सिकोचे आखात हे जलभाग एका कटकामुळे अलग झाले आहेत. हिंदी महासागरात समाविष्ट होणारे तांबडा समुद्र व इराणचे आखात हे सागरमग्न भूमीवर निर्माण झालेले आहेत. तांबडा समुद्र म्हणजे आफ्रिका व अरबस्तान यांदरम्यानची स्पष्टपणे आढळणारी खचदरीच आहे. भारतालगतचे अरबी समुद्र व बंगालचा उपसागर हे हिंदी महासागराचेच विस्तारित भाग आहेत. येथील अंदमान हा उथळ व परिवेष्टित समुद्र आहे. अमेरिकेच्या उत्तरेकडील बोफर्ट समुद्राचा समावेश आर्क्टिक महासागरात होतो. अटलांटिकच्या तुलनेत पॅसिफिकमधील समुद्र अरूंद व लांबट स्वरूपाचे आहेत. पॅसिफिकच्या पश्चिम भागात समुद्रांची संख्या अधिक आहे. बेरिंग, अल्यूशन, ओखोट्स्क, पीत, चिनी, सेलेबीझ, बांदा हे पॅसिफिकमधील प्रमुख समुद्र आहेत. पीत समुद्र वगळता इतर समुद्र खोल आहेत.

समुद्राच्या पाण्याची लवणता, त्यातील जीवसृष्टी किंवा सागरी परिसंस्था यांमध्ये स्थानपरत्वे भिन्नता आढळते. समुद्र हे अत्यंत महत्त्वाचे संसाधन आहे. मानवी विकास, जलवाहतूक, व्यापारवृद्धी, हवामान, जलचक्र, कार्बनचक्र, नायट्रोजनचक्र, मत्स्योत्पादन, खनिजोत्पादन, ऊर्जा निर्मिती, मनोरंजन, नौकाविहार, बोटींच्या शर्यती, विविध जलक्रीडा, हौसी मासेमारी इत्यादींच्या दृष्टिने जगातील सर्व समुद्र महत्त्वपूर्ण आहेत.

समीक्षक : माधव चौंडे