पाश्चिमात्य देशातील औद्योगिकीकरणाच्या अपरिहार्य परिणामातून पृथ्वीचा नैसर्गिक, जैविक व भौगोलिक समतोल बिघडून त्याचे गंभीर परिणाम मानवी जीवनावर झाल्यामुळे पर्यावरणीय स्त्रीवाद ही संकल्पना उदयास आली. १९७० च्या दशकात ही संकल्पना वापरात आली असून फ्रेंच स्त्रीवादी विचारवंत फ्राँस्वा यांनी फेमिनिझम ऑफ डेथ या आपल्या पुस्तकात ‘इकोफेमिनिझम’ हा शब्द पहिल्यांदा वापरला. त्यांनी आपल्या लेखनातून स्त्री व पर्यावरण यांचा घनिष्ठ संबंध अधोरेखित करत तत्कालिक पाश्चिमात्य देशांतील विचारसरणी पर्यावरणाच्या ऱ्हासाला व स्त्रियांच्या शोषणाला कारणीभूत ठरवली.

पर्यावरणीय स्त्रीवादाने पर्यावरण आणि स्त्रीयांच्या सहसंबंधाचा खोलवर विचार करत औद्योगिकीकरण व आधुनिकीकरणामुळे आधुनिक शेती, हायब्रीड बी-बियाणे, रासायनिक खते, औषधे इत्यादी घटकांमधून निसर्गातील प्राणी, जमीन, वायू इत्यादी घटकांचे अपरिमित शोषण होत असल्याने त्याचा थेट परिणाम स्त्रीयांवरती झाल्याची मांडणी केली. विकास अथवा प्रगतीमध्ये निसर्गाला नियंत्रित करण्याची, नियमित करण्याची क्षमता असून विकासाच्या प्रक्रियेचा पितृसत्तेशी घनिष्ठ संबंध आहे, असे अनेक अभ्यासकांचे मत आहे. थोडक्यात, विकासाची प्रक्रियाच पितृसत्ताक राहिली आहे. त्यामुळे पर्यावरणाचा मुद्दादेखील विकासाबाबतच्या विचारांमध्ये झालेल्या बदलांच्या अनुषंगाने पुढे आला.

पितृसत्ताक विकासामुळे पर्यावरणीय स्त्रीवादाने विकासप्रक्रियेच्या संदर्भात स्त्रियांच्या प्रश्नांचा नव्याने पुनर्विचार करण्याची गरज अधोरेखित केली. पर्यावरणीय स्त्रीवाद या संकल्पनेपूर्वी इ. स. १९५२ च्या सुमारास सिमोन दि बुआ यांनी पितृसत्ता ही स्त्रिया व निसर्ग या दोन्हींचे शोषण करत आहे, अशी मांडणी केली आहे. पर्यावरणीय स्त्रीवाद या संकल्पनेचा विकास करण्यामध्ये मारीया मेस, वंदना शिवा, बिना अग्रवाल, देवकी जैन यांसारख्या स्त्रीवादी विचारवंतांचा मोलाचा वाटा आहे.

भारतीय स्त्रीवादी विचारवंत वंदना शिवा यांनी १९८८ मध्ये लिहिलेल्या आपल्या स्टेइंग अलाईव्ह : वूमन, इकॉलॉजी अँड डेव्हलपमेंट या पुस्तकामध्ये आजच्या विकासाची प्रक्रिया यूरोपकेंद्रीत आणि पुरुषप्रधान विचारांवर आधारित असल्याचे मत व्यक्त केले आहे. भारतातील शेतीक्षेत्राचे महत्त्व आणि त्यामधील स्त्रियांचा श्रमात असलेला सहभाग मोठा होता व आजही आहे; मात्र या विकासाच्या प्रक्रियेत स्त्रियांचे स्थान कोठेही दिसून येत नाही. विज्ञानाची एकूण वाटचाल व पद्धती यांवरही पितृसत्तेचा असलेला प्रभाव त्यांनी अधोरेखित केला. एकूणच स्त्रियांकडील असलेले अनुभव, निरिक्षणे, ज्ञान कौशल्ये यांस ज्ञान मानले गेले नाही. त्यामुळे स्त्रिया या विकासाच्या प्रक्रियेतून बाहेर फेकल्या गेल्या.

जर्मन अभ्यासक मारीया मेस यांनी आपल्या पॅट्रीअर्ची अँड ॲक्युम्युलेशन ऑन वर्ल्ड स्केल अँड इंटरनॅशनल डिव्हिजन ऑफ लेबर या पुस्तकात स्त्रियांचे शोषण व पितृसत्तेचे वर्चस्व असलेली विकासप्रणाली आणि उत्पादन धोरणे यांचे नाते उलगडून दाखविले आहे. तसेच वसाहतवादाच्या भिंगातून पर्यायी विकासनीतीचा आणि स्त्रियांच्या शोषणाचा विचार केला. त्यांनी केलेल्या अभ्यासातून स्त्रिया केवळ विकासाच्या मुकबळी नाहीत, तर त्या संघर्ष करणाऱ्याही आहेत, हे त्यांनी दाखवून दिले.

वंदना शिवा आणि मारीया मेस यांनी १९९३ मध्ये लिहिलेल्या इकोफेमिनिझ्म या पुस्तकात पितृसत्ता व भांडवली व्यवस्था कोणत्याही वेगळेपणाला समान दर्जा देत नाहीत, अशी मांडणी केली. वेगळेपण हे उतरंडीच्या रचनेत बसविणे, त्यांना सत्ता राबविण्यासाठी आवश्यक असते.

स्त्री व निसर्ग यांतील सहसंबंध अधोरेखित करताना अथवा पर्यावरणीय स्त्रीवादाची मांडणी करतांना काही अभ्यासकांनी स्त्रियांवरील विविध श्रमिक जबाबदाऱ्या त्यांना निर्सगाजवळ घेऊन जात असल्यामुळे स्त्रियांचे निर्सगाशी नाळ जुडली आहे, असे म्हटले. उदा., स्त्रियांचे काम हे निर्वाहासाठी केलेल्या शेतीतून, घरगुती कामांतून आणि मोबदल्यासाठी केलेल्या खुरपणीसारख्या शेतकामाच्या माध्यमातून पर्यावरणाशी जोडलेले असते. पर्यावरणाच्या ऱ्हासाचा परिणाम म्हणून यातील बरेच काम हे अधिक कष्टाचे, वेळखाऊ आणि किचकट बनते. ग्रामीण भागातील स्त्रियांचा शेती व शेतीसंलग्न कामांमध्ये आणि घरादारांत विशिष्ट भूमिका व जबाबदाऱ्यांमुळे माती, पाणी, वृक्ष, जंगल यांसारख्या नैसर्गिक संसाधनांशी संबंध येतो. त्यांच्या संरक्षण व संवार्धानामध्ये कळीची भूमिका बजावताना त्या दिसतात. त्यामुळे पर्यावरणीय स्त्रीवाद असे मानतो की, पितृसत्ताक विकासाच्या प्रक्रियेत होणारा पर्यावरणाचा ऱ्हास आणि स्त्रियांचे शोषण या दोन्ही लढाई हातात हात घालून लढावी लागेल.

पर्यावरणीय स्त्रीवाद हा शब्द पाश्चात्त्य स्त्रीवादी महिला विचारवंतांनी वापरात आणला असला, तरी भारतातील चिपको आंदोलन, केन्यातील ग्रीन बेल्ट चळवळ, पाश्चात्त्य देशातला अण्वस्त्रविरोधी चळवळीतील महिलांचा सहभाग इत्यादी प्रकारच्या विविध चळवळींनी एकत्रितपणे पर्यावरणीय स्त्रीवादाच्या तत्त्वज्ञानाला आकार दिलेला आहे. आज पर्यावरणीय स्त्रीवादाचा विचार विविध पातळ्यांवर देशात विकसित होताना दिसतो. त्यामध्ये आपल्या संस्कृती, परंपरांची चिकित्सा करत नवा अर्थ देणे; त्यातून संघर्ष आणि आंदोलने उभे करत दलित, आदिवासी, लहान शेतकरी, अण्वस्त्र विरोधक युद्ध इत्यादींना विरोध करणे; विस्थापितांशी नाते जोडत निसर्गाचा ऱ्हास, नैसर्गिक संसाधनांवरील वर्चस्वाला विरोध करणे इत्यादींच्या विरोधात पर्यावरणीय स्त्रीवाद उभा राहताना दिसतो.

पर्यावरणीय स्त्रीवादाच्या अंतर्गत पर्यावरण व स्त्रिया यांच्यातील अधोरेखित केल्या गेलेल्या सहसंबंधाची आणि पर्यायाने पर्यावरणीय स्त्रीवादाची चिकित्सा पुढे अनेक अभ्यासकांनी केली आहे. त्यांनी स्त्रियांचे निसर्गाशी एक स्वाभाविक नाते आहे किंवा स्त्रियांना उपजत जाणीव असते, असे गृहीत धरणे म्हणजे स्त्रियांच्या जडणघडणीसमोरील समाजाची प्रमुख भूमिका दुर्लक्षित होते. तसेच सामाजिक पुनर्रुत्पादनाचा स्त्रियांवर पडणाऱ्या ओझ्याचे समर्थन होते. त्यामुळे स्त्रिया आणि निसर्ग यांच्यातील परस्पर संबंधांची मांडणी एकसत्वीकरणाकडे जाते. या एकसत्वीकरणवादी पुर्वग्रहाची चिकित्सा करताना पर्यावरणीय स्त्रीवादी स्त्रिया आणि निसर्ग यांच्यामधील आदर्श नाते चित्रित करताना भारतीय समाजामध्ये रुजलेल्या जातवर्ग श्रेणीचे विश्लेषण येथे वगळले गेल्याचे चिकित्सक टिपणी करतात. त्यामुळे पाश्चिमात्य विकासाच्या प्रारूपावर मांडणी करणारी ही पर्यावरणीय स्त्रीवादी मांडणी काहीशी दुबळी ठरते, असे पर्यावरणीय स्त्रीवादी अभ्यासकांचे मत आहे.

संदर्भ :

  • देहाडराय, स्वाती; तांबे, अनघा (संपा.), स्त्रियांचे सामाजिक सक्षमीकरण, पुणे, २००९.
  • भागवत, वंदना व इतर, संदर्भसहित स्त्रीवाद-स्त्रीवादाचे समकालीन चर्चाविश्व, मुंबई, २०१५.
  • Agarwal, Bina, Cold hearths and Barren Slopes : The Wood Fuel Crisis in the Third World, 1986.
  • Datara, Chaya, Ecofeminism revisited : Introduction to the discourse, 2011.
  • Mies, Maria, Women have no Father land Ecofeminism, London, 1993.
  • Mies, Maria, Patriarchy and Accumulation on a World Scale : Women in the International Division of Labour, London, 1998.
  • Visvanathan, Nalini, and others, The Women, Gender, and Development Reader, New Africa, 1997.
  • Shiva, Vandana, Staying Alive : Women, Ecology, and Development, 2016.

समीक्षक : स्नेहा गोळे