करंदीकर, रघुनाथ पांडुरंग : (२१ ऑगस्ट १८५७ – २४ एप्रिल १९३५). व्यासंगी कायदेपंडित, स्वातंत्र्य चळवळीतील प्रभावी नेते, साहित्यिक आणि लोकमान्य टिळकांचे सहकारी. दादासाहेब करंदीकर म्हणूनही परिचित. त्यांचा जन्म पंढरपूर येथे खाडिलकर घराण्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदभट्ट अनंतभट्ट खाडिलकर. रघुनाथ पाच-सहा वर्षांचे असताना आपली मोठी बहिण सत्यभामा करंदीकर यांच्याबरोबर साताऱ्यास राहावयास गेले. सत्यभामाबाईचे पती पांडुरंग रघुनाथ करंदीकर सातारचे प्रसिद्ध वकील होते. त्यांना अपत्य नव्हते. त्यांनी १८६५ मध्ये रघुनाथ यांस दत्तक घेतले. तेव्हापासून रघुनाथ गोविंद खाडिलकर हे रघुनाथ पांडुरंग करंदीकर झाले. त्यांचे शालेय शिक्षण सातारा व पुणे येथे झाले. ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले (१८७५). तत्पूर्वी १८६९ साली वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचा विवाह पंढरपूरच्या गोविंद विसाजी गोगटे यांच्या मुलीशी झाला होता. पत्नीचे माहेरचे नाव सखूबाई होते. लग्नानंतर त्यांचे नाव जानकीबाई असे झाले.

करंदीकरांनी बार्शीला वीस रुपये पगाराची बेलिफची नोकरी पतकरली (ऑगस्ट १८७५). तेथील दुय्यम न्यायाधीश (सब जज) लालशंकर उमियाशंकर यांच्या प्रेरणेने त्यांनी वकिलीच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला व ते परीक्षा उत्तीर्ण झाले (१८८०). त्यानंतर त्यांनी बार्शीतील नोकरीचा राजीनामा दिला व वकीली सुरू करण्यासाठी ते साताऱ्यात स्थायिक झाले. सातारा जिल्ह्यातील एक अभ्यासू वकील असा त्यांचा नावलौकिक झाला. मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी अनेक कामे चालवून यश मिळविले होते. वकिली व्यवसायाबरोबरच करंदीकरांनी सार्वजनिक जीवनात सामाजिक कार्यात सहभाग घेण्यास प्रारंभ केला.

पुणे येथील सार्वजनिक सभेची एक शाखा सातारा येथे सुरू करण्यात आली (१८७०). करंदीकर प्रांरभापासून या सभेच्या कामात सक्रिय होते. १८८३ मध्ये ते सार्वजनिक सभा, सातारा शाखेचे एक कार्यवाह झाले. त्यांनी १८८३-८४ मध्ये सार्वजनिक सभेच्यावतीने शेतकरी कर्जमाफी कायद्याच्या तरतुदींची सोप्या भाषेत शेतकऱ्यांना माहिती देऊन जागृती घडवून आणली. त्याचप्रमाणे त्यांनी व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी साताऱ्यात मॅजिस्ट्रेट ज्युरिस्डिक्शन बिल या नव्या कायद्याच्या तरतुदींवर चर्चा घडवून आणली. १८८४ साली महाराष्ट्रात आलेल्या स्वदेशी चळवळीच्या दुसऱ्या लाटेने करंदीकर प्रभावित झाले. त्या काळात त्यांनी विमा कंपनीच्या कामाचा प्रसार व विस्तार करण्याच्या कामात पूर्ण सहभाग घेतला. स्वदेशीला उत्तेजन देण्यासाठी स्वदेशी वस्तुंचे प्रदर्शन, स्वदेशी वस्तू व तंत्र यांना पुरस्कार, ठिकठिकाणी नामवंत वक्त्यांच्या व्याख्यानांचे आयोजन असे अनेक उपक्रम राबवले. १९०४ साली स्वदेशी चळवळीचे अंग म्हणून त्यांनी स्थापन केलेल्या शेतकरी परिषदेने शेतकऱ्यांची गाऱ्हाणी मांडून त्यांच्या हितसंबंधाचे रक्षण करण्याचे सातत्याने प्रयत्न केले. त्या परिषदेने डोंगरी जावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीचे तीन वर्षे पद्धतशीर सर्वेक्षण केले (१९०६,१९०७,१९०८). तसेच त्यांनी १९०६ साली सातारा येथे स्थापन केलेल्या औद्योगिक परिषदेने जिल्ह्यात उद्योगधंद्यांची पायाभरणी करण्याचा प्रयत्न केला.

हिंदी राष्ट्रीय सभा म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसचे करंदीकर १८८७ पासून निष्ठावान कार्यकर्ते होते. १९२९ पर्यंत ते नियमितपणे काँग्रेसच्या अधिवेशनाला उपस्थित राहत असत. त्यांच्या पुढाकारामुळे तसेच अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे एकोणिसाव्या शतकाच्या अखेर सातारा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला बनला होता. राष्ट्रीय चळवळीतील प्रमुख नेते न्या. रानडे, न्या. तेलंग, नामदार गोखले आणि लोकमान्य टिळक यांच्या व्यक्तिमत्त्वांतील विविध पैलू त्यांना आकर्षित करत होते. आपल्या कारकिर्दीचा बराच काळ ते उदारमतवादी नेमस्त होते. जनतेच्या अडीअडचणी, गाऱ्हाणे यांचे निवारण होण्यासाठी ब्रिटिश सरकारशी सहकार्य करण्याच्या धोरणाचा त्यांनी पुरस्कार केला.

लोकमान्य टिळक व करंदीकर यांचे व्यक्तिगत संबंध जिव्हाळ्याचे होते. टिळकांची प्रखर देशभक्ती आणि कार्यकर्तृत्व यांबद्दल करंदीकर यांना आदर वाटत होता. १९१७ च्या होमरूल चळवळीच्यावेळी ते टिळकांच्या राजकारणाशी एकरूप झाले. टिळकांनी इंडियन होमरूल लीगच्या बांधणीचे प्रयत्न सुरू केले, तेव्हा सातारा विभागाची जबाबदारी त्यांनी मोठ्या विश्वासाने करंदीकर यांच्यावर सोपविली होती. त्यांनी होमरूल फंडाला एक हजार रुपयांची मदत केली होती. टिळकांना अनेक वेळा न्यायालयीन खटल्यांना तोंड द्यावे लागले. अशाप्रसंगी त्यांनी निष्णात वकील म्हणून करंदीकरांचे सहकार्य घेतले.

लो. टिळकांचे मित्र पुणे येथील बाबा महाराज यांच्या मृत्युपत्राचे टिळक प्रमुख विश्वस्त होते. बाबा महाराज यांच्या निधनांतर त्यांच्या पत्नी ताई महाराज यांनी केलेल्या तक्रारीमुळे उद्भवलेला टिळकांवरील खटला १८९८ ते १९०४ पर्यंत चालला. तो खटला ताई महाराज प्रकरण म्हणून प्रसिद्ध आहे. त्या खटल्यात टिळकांची बाजू मांडण्याचे वकिली काम करंदीकरांनी शेवटपर्यंत कौशल्याने पार पाडले. त्यामुळे टिळक त्या खटल्यात निर्दोष ठरले. १८९९ साली टिळकांनी प्रेष केल्यावरून काशी येथे कृ. आ. गुरूजी यांच्यावर चाललेल्या खटल्याचे काम करंदीकरांनी तेथे जाऊन पाहिले. टिळकांच्यावरील राजद्रोहाच्या दुसऱ्या खटल्याचा १९०८ मध्ये निकाल देताना त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने प्रिव्ही कौन्सिलकडे दाद मागण्याची मंजुरी दिली नव्हती. तेव्हा स्वतंत्रपणे दाद लावून घेण्यासाठी प्रथम खापर्डे इंग्लडला रवाना झाले व पाठोपाठ करंदीकर तिकडे गेले. मात्र प्रिव्ही कौन्सिलने टिळकांचे अपील फेटाळून लावले (मार्च १९०९). करंदीकरांच्या षष्ट्यब्दीपूर्ती समारंभानिमित्त टिळक सातारला आले होते (सप्टेंबर १९१७). १९१८ साली व्हॅलेंटाईन चिरोल वरील अब्रुनुकसानीच्या खटल्यासंदर्भात टिळक इंग्लडला गेले आणि त्यांच्याबरोबर कायदा सल्लागार या नात्याने करंदीकर होते. मात्र त्या खटल्याचा निकाल टिळकांच्या विरुद्ध लागला; तथापि टिळक-करंदीकर यांच्यातील मैत्री अखेरपर्यंत टिकून होती.

दादासाहेब देशविदेशांतून ऐतिहासिक संदर्भसाधने घेऊन येत असत. १९१८ साली त्यांनी लंडनहून सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांचा ब्रिटिश रेसिडेंट्स बरोबर झालेला पत्रव्यवहार नकलून भारतात आणला. त्याचप्रमाणे मेणवली येथील नाना फडणवीस यांचे दप्तर त्यांच्या वंशजांकडून मिळवून त्यांनी ते इतिहास संशोधक दत्तात्रय बळवंत पारसनीस यांच्याकडून भारतवर्ष मासिकातून प्रसिद्ध करविले.

करंदीकर यांची मुंबई प्रांतिक कायदेमंडळाचे सदस्य म्हणून निवड झाली (१९२२). दुसऱ्यांदा त्यांची मध्यवर्ती कायदे मंडळाच्या कौन्सिल ऑफ स्टेटवर बिनविरोध निवड झाली होती. विलायतेहून धाडलेली पत्रे, केदारखंड यात्रा पत्रे, कै. रघुनाथ पांडुरंग उर्फ दादासाहेब करंदीकर यांची दैनंदिनी अशी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. सातारा येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाचे ते अध्यक्ष होते (१९०५).

त्यांचे नागपूर येथे निधन झाले.

संदर्भ :

  • करंदीकर, वि. र. संपा., कै. रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांची दैनंदिनी, सातारा, १९६२.
  • करंदीकर, वि. र. संपा., रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांची पत्रे, सातारा, १९३५.
  • गोखले, पु. पां. जागृत सातारा, १९६६.
  • फाटक,  न. र. लोकमान्य, मुंबई, १९७२.

                                                                                                                                                                                       समीक्षक : अवनीश पाटील