मुखर्जी, जतीन : (६ डिसेंबर १८७९ – १० सप्टेंबर १९१५). प्रसिद्ध भारतीय क्रांतिकारक. त्यांचा जन्म बंगालमधील नडिया जिल्ह्यातील कुष्टिया (कुष्टिया सांप्रत बांगला देशातील एक शहर) येथील कायाग्राम या गावी एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव उमेशचंद्र, आईचे नाव शरतशशी, तर बहिणीचे नाव बिनोदीबाला होते. आई उत्तम कवयित्री होत्या. मुखर्जी यांच्या बालपणीच वडिलांचे निधन झाले. त्यामुळे आई शरतशशी यांनीच मुलांचा सांभाळ केला. मुखर्जी यांना लहानपणापासूनच शारीरिक कष्टाचे खेळ आवडत होते. ते बलिष्ठ शरीरयष्टीचे व सेवाभावी वृत्तीचे होते. त्यांनी लहानपणी नाटकांमध्ये भक्तप्रल्हाद, ध्रुव, हनुमान, राजाहरिश्चंद्र यांच्या भूमिका केल्या होत्या. या भूमिकांचा प्रभाव त्यांच्यावर होता. कायाग्राममध्ये दहशत पसरवलेल्या एका वाघाला त्यांनी केवळ कुकरीच्या (गुरखा कट्यार) साहाय्याने ठार मारले, म्हणून त्यांना ‘बाघाजतीन’ या नावानेही ओळखले जाते.

त्यांचे शालेय शिक्षण नडिया येथील कृष्णनगर अँग्लो व्हर्नाक्युलर स्कूल येथे झाले. त्यानंतर त्यांनी कलकत्ता सेंट्रल कॉलेजमध्ये (सांप्रत खुदिराम बोस कॉलेज, कोलकाता) ललितकला शाखेत प्रवेश घेतला (१८९५). येथे त्यांचा स्वामी विवेकानंद यांच्याशी संपर्क आला व त्यातूनच त्यांना सामाजिक आणि राजनैतिक कार्याची प्रेरणा मिळाली. त्यानंतर ते भगिनी निवेदिता सहायता गटात सहभागी झाले. मुखर्जी यांची शारीरिक क्षमता ओळखून स्वामी विवेकानंद यांनी त्यांना प्रसिद्ध कुस्तीपटू अंबिका चरण गुहा यांच्या व्यायाम शाळेमध्ये प्रशिक्षणासाठी पाठविले. पुढे ब्रिटिशांच्या शिक्षणपद्धतीवर नाराज होऊन त्यांनी आपले शिक्षण बंद केले (१८९९) आणि बॅरिस्टर प्रिंगल केनडी यांच्या लेखन व ऐतिहासिक संशोधनामुळे प्रभावित होऊन त्यांचे सचिव म्हणून काम करण्यास मुजफ्फरपूर येथे गेले. मुखर्जी यांचा विवाह इंदुबाला बॅनर्जी यांच्याशी झाला (१९००). त्यांना अतींद्र (१९०३-१९०६), आशालता (१९०७-१९७६), तेजेंद्र (१९०९-१९८९) व बिरेंद्र (१९१३-१९९१) अशी चार मुले होती. पैकी त्यांच्या पहिल्या मुलाचा अकाली मृत्यू झाला.

कलकत्ता सेंट्रल कॉलेजमध्ये विद्यार्थी असताना सन १९०० मध्ये स्थापन झालेल्या अनुशीलन समितीच्या स्थापनेमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. याच काळात त्यांचा क्रांतिकारक योगी अरविंद घोष यांच्याशी संबंध आला. अनुशीलन समितीच्या शाखा संपूर्ण बंगालमध्ये उघडण्यामागे मुखर्जींचे योगदान होते. पुढे अनुशीलन समितीमध्ये युगांतर समिती हा स्वतंत्र गट तयार झाला. त्यांनी दार्जिलिंगमध्ये अनुशीलन समितीची एक शाखा ‘बांधव समिती’ स्थापन केली होती. १९०८ मध्ये अनेक बंगाली क्रांतिकारक अलिपूर बाँब खटल्यामध्ये अटकेत होते. तेव्हा बंगालमधील क्रांतिकारी चळवळीची व युगांतर समितीची जबाबदारी मुखर्जी यांच्यावर होती. त्यांनी या काळात अनेक गुप्त संघटना स्थापन करून आपल्या क्रांतिकारी कारवाया चालू ठेवल्या होत्या. युगांतर समितीने अन्यायी इंग्रज अधिकाऱ्यांचे वध करण्याची योजना आखली (२४ जानेवारी १९१०). अलिपूर बाँब खटल्यातील क्रांतिकारकांना अटक करण्यास जबाबदार असलेल्या पोलिस अधिकारी समसुल आलम व एक सरकारी वकील यांना बिरेन दत्त याने गोळी घालून मारले. या कटात मुखर्जी यांचा सहभाग असल्याची माहिती इंग्रजांना मिळाली. तसेच कलकत्ता येथील फोर्ट विलियममध्ये तैनात असलेल्या जाट रेजिमेंटला भडकावल्याच्या आरोप मुखर्जी यांच्यावर होता, त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. १९११ मध्ये त्यांची सुटका झाली.

क्रांतिकारी चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी एक नवीन पद्धत शोधली. बोनॉट गँग (ला बांडे-बोनट) हा फ्रेंच गुन्हेगारी अराजकतावादी गट फ्रान्स आणि बेल्जियममध्ये कार्यरत होता. या टोळीने फ्रेंच पोलिसांना उपलब्ध नसलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपल्या लुटीसाठी केला होता (यात ऑटोमोबाइल्स आणि रायफल्सचा समावेश होता). याच तंत्राचा वापर जतिन मुखर्जी यांनी भारतामध्ये क्रांतिकारी चळवळीस आवश्यक पैसे उभारण्यासाठी केलेला होता. त्यानुसार ते बँकेवर हल्ला करून बँक लुटायचे व मोटारीच्या साहाय्याने तेथून पळून जायचे. म्हणून त्या पद्धतीला इंग्रज इतिहासकार ‘बँक रॉबरी ऑन ऑटोमोबाइल्स टॅक्सी कॅब्स’ असे म्हणतात. मुखर्जींच्या नेतृत्वाखाली अनेकदा हत्यारांच्या लूटी झाल्या; पण त्यांचे नाव कधीही पुढे आले नव्हते. हावड़ा-सिबपूर षडयंत्र या खटल्यात तुरुंगात असताना इतर कैद्यांच्या सोबतीने त्यांनी एक नवीन ब्रिटिशविरोधी योजना तयार केली. ऑगस्ट १९१४ मध्ये यूरोपमध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले. या संधीचा फायदा घेऊन भारतातील ब्रिटिश राजवटीविरुद्ध सशस्त्र बंडखोरी करून भारतास ब्रिटीशांपासून मुक्त करणे, असा उद्देश गदर कार्यकर्त्यांचा होता. या षडयंत्रात भारतीय राष्ट्रवादी विचाराच्या संघटनेचे भारत, अमेरिका आणि जर्मनीचे सदस्य सहभागी होते. आयरिश रिपब्लिकन आणि जर्मन परराष्ट्र विभागाने या षडयंत्रात भारतीयांना सहकार्य केले. अमेरिकेतील गदर पार्टी, जर्मनीतील बर्लिन समिती, भारतातील भूमिगत भारतीय क्रांतिकारक (जतीन मुखर्जी व सहकारी) आणि सॅन फ्रान्सिस्को येथील दूतावास यांनी एकत्रितपणे हा कट रचला होता. युद्धाच्या काळात अमेरिकेतील गदर नेतृत्वाने जर्मन प्रतिनिधी (एजंट्स) बरोबर नियमित बैठक घेतली. या कटाचाच भाग म्हणून जर्मन लोकांच्या मदतीने, भारत-ब्रिटीश राजवटीच्या जुलूमशाहीविरुद्ध लढण्यासाठी अफगाणिस्तानातील अमीरची मर्जी मिळावी म्हणून इंडो-जर्मन मिशन देखील काबूलला पाठविले गेले होते. या योजनेनुसार ब्रिटिश भारतीय सैन्यात पंजाबपासून सिंगापूरपर्यंत संपूर्ण भारतभर बंडखोरी पसरवण्याचा प्रयत्न करणे, अशी योजना ही होती. भारतातून ब्रिटिश साम्राज्याचा नाश करण्याच्या उद्देशाने ही योजना फेब्रुवारी १९१५ मध्ये अंमलात आणणे, असे निश्चित केले होते. परंतु ब्रिटिश गुप्तहेर संस्थेने (इंटेलिजेंस सर्व्हिस) गदर चळवळीतील काही महत्त्वाच्या लोकांना अटक करून हे षडयंत्र मोडीत काढले. ही योजना ‘जर्मन प्लॉट’ किंवा हिंदू-जर्मन षडयंत्र या नावाने ओळखली जाते.

जतीन मुखर्जी यांच्यावरील वेगवेगळ्या खटल्यांमुळे त्यांनी अखेर आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. पुढे त्यांनी हरिद्वार व वृंदावनची यात्रा करून जे संन्यासी क्रांतिकारकांना मदत करतात त्यांची भेट घेतली. १९१३ मध्ये कलकत्त्यास येऊन त्यांनी युगांतर पार्टीची पुनर्बांधणी केली. दामोदर नदीच्या पुरामुळे नुकसानग्रस्त झालेल्या बरद्वान आणि मिदनापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी त्यांनी मदतकार्य केले. मुखर्जींच्या क्रांतिकारी कार्यामुळे प्रभावित होऊन क्रांतिकारक रासबिहारी बोस यांनी बनारसहून कलकत्ता येथे स्थांनातरित होऊन मुखर्जींचे नेतृत्व स्वीकारले. याच काळात जर्मनीचा राजा कलकत्ता भेटीवर आला असताना क्रांतिकारक नरेंद्र भट्टाचार्य यांच्यासोबत मुखर्जी यांनी त्यांची भेट घेऊन भारतात ब्रिटिशविरोधी बंडासाठी जर्मनीतून हत्यारांचा पुरवठा करण्याची मागणी केली. या हत्यारांच्या मदतीने ब्रिटिशांच्या विरोधात उठाव करण्याची त्यांची योजना होती. पहिल्या विश्वयुद्धाच्या काळात मुखर्जींच्या युगांतर पार्टीने बर्लिन कमिटी (इंडियन इंडिपेडंट पार्टी) स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती, तसेच भारतीयांच्या ब्रिटिशविरोधी योजनेस जर्मनीचा पाठिंबा होता. जर्मनीहून आलेली शस्त्रास्त्रे उतरविण्यासाठी त्यांनी ओरिसाचा (ओडिशा) समुद्रकिनारा निवडला होता; तथापि याची माहिती ब्रिटिशांना मिळाल्यामुळे ही योजना फसली. ब्रिटिशांनी मुखर्जी व त्यांच्या साथीदारांना पकडून देणाऱ्यास बक्षीस घोषित केले. अखेर बलसोर(ओडिशा) येथे ब्रिटिश पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मुखर्जी यांचे काही साथीदार मारले गेले तर, मुखर्जी जखमी झाले व त्यातच त्यांचे निधन झाले.

संदर्भ:

  • Mukherjee, Prithwindra, BaghaJatin : Life and Times of Jatindranath Mukherjee, New Delhi, 2010
  • शर्मा, विष्णु,गुमनाम नायकों की गौरवशाली गाथाएं, प्रभात प्रकाशन, दिल्ली, २०१८                                                                                                                                                                                       समीक्षक : अवनीश पाटील